वाक्प्रचारांमध्ये समाविष्ट झालेली उपमानसृष्टी खूप विशाल आहे. त्यात मानवी व्यवहाराबरोबर सृष्टीतील पशुपक्षी यांच्याविषयीच्या निरीक्षणांनाही स्थान मिळाले आहे. याची ही उदाहरणे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंचुप्रवेश करणे या वाक्प्रचारात पक्ष्यांच्या विशिष्ट लकबींचा मार्मिकपणे वापर केला आहे. चंचू म्हणजे चोच. पक्ष्यांची चोच अगदी लहान असते. चोच आत घालण्यापुरती जागा आधी मिळवायची आणि मग अधिक जागा व्यापायची, अशी छोटय़ा पक्ष्यांची युक्ती असते. घरटे बांधताना त्यांना ही युक्ती वापरावी लागते. त्यांच्या या सवयीवरून ‘ चंचुप्रवेशान्मुसलप्रवेश:’, अशा धोरणी वृत्तीची घडण झाली असावी. म्हणजे आधी चोचीपुरती जागा मिळवायची आणि मग मुसळ (उखळीमध्ये धान्य कांडण्यासाठी वापरावयाचे मोठे साधन) मावेल इतकी मोठी जागा मिळवायची, असा व्यावहारिक धूर्तपणा त्यातून कळतो. एखाद्या ठिकाणी कसाबसा शिरकाव करून मग हातपाय पसरण्याचा, आपली कामे रेटण्याचा रोकडा व्यवहारबोध यातून लक्षात येतो.

दाती तृण धरणे या वाक्प्रचारामध्ये पशूंशी संबंधित निरीक्षण आले आहे. तृण म्हणजे गवत. हे अनेक पशूंचे  खाद्य असते. पायदळी तुडवले जाणारे तृण हे तुच्छतेचेही प्रतीक आहे. त्यामुळे दाती तृण धरणे म्हणजे लाचारी पत्करणे (जणू पशूंच्या पातळीला जाणे!) असा अर्थ होतो. शत्रूला शरण आणताना त्याचा अपमान करण्यासाठी हा वाक्प्रचार वापरलेला पाहायला मिळतो. मात्र हा वाक्प्रचार तेवढय़ाच पुरता मर्यादित राहिलेला नाही. नवकवी बा. सी. मर्ढेकर यांच्या एका कवितेत यंत्रयुगातील कारकुनाच्या जगण्याचे चित्रण आहे; ते असे: ‘सकाळी उठोनी चहा कॉफी घ्यावी, तशीच गाठावी वीजगाडी/ दाती तृण घ्यावे हुजूर म्हणून, दुपारी भोजन हेचि सार्थ’ यात साहेबापुढे लाचार होऊन काम करणाऱ्या कारकुनाची मन:स्थिती नेमकेपणाने व्यक्त झाली आहे! ‘हाती पेन घ्यावे’ असेही मर्ढेकर यांना म्हणता आले असते! पण भाषेत रुळलेले वाक्प्रचार, तसेच श्रुतयोजन यांचे समाजमनाला होणारे आवाहन मोठे असते, हे मर्ढेकर ओळखत होते! एकंदरीत यातून वाक्प्रचारांचे महत्त्वच कळते!

–   डॉ. नीलिमा गुंडी

  nmgundi@gmail. com