सर्वोदय म्हणजे काय या प्रश्नावर विविध उत्तरे येतील. वेद-उपनिषदे ते रस्किन अशा सर्व छटा हजर केल्या जातील. विनोबांनी मात्र गुरू नानकदेवांचे एक भजनच सांगितले आहे. ‘बिसर गई सब तात पराई’ या ‘शबदा’मधील पुढील दोन ओळी हा सर्वोदयाचा मूलमंत्र आहे, हे विनोबांनी सांगितले.
ना कोई बैरी नाहि बेगाना।
सगल संग हमको बन आई।।
साम्ययोगदेखील हेच तत्त्व प्रमाण मानतो. विनोबांची ‘सर्वेषां अविरोधेन’ हे आणखी एक तत्त्वही या ‘शबद’चे अनुसरण करते. विनोबांच्या मते, शीख धर्माचे तत्त्वज्ञान काय आहे? ‘‘परमेश्वर एक आहे. त्याची भक्ती करावी. हरि-नाम जपावे. सत्संग करावा. वाटून खावे. गुरुबानीचे हे सार आहे.’’
प्रथम सत्याग्रही झाले तेव्हा त्यांनी कारावासात, ‘जपुजी’चे अध्ययन सुरू केले. जपुजी म्हणजे काय तर शिखांचा नित्यपाठ. हरिपाठाप्रमाणे श्रद्धा जपणे हा दोहोंचा मुख्य उद्देश. या ग्रंथाची व्यापकता आणि त्याचा सखोल पाया ध्यानी घेऊन; विनोबांनी शीख धर्माचे सार म्हणून जपुजीची निवड केली.
नामदेवांच्या अभंगाची निवड करण्याच्या हेतूने त्यांनी ‘गुरुग्रंथ साहेब’ही अभ्यासला. पुढे दीर्घकाळ त्यांनी जपुजीचे अध्ययन केले. तथापि त्यांना या ग्रंथाची खरी उकल पंजाबच्या पदयात्रेत झाली. नानकदेवांचे शीख जनतेच्या हृदयातील स्थान विनोबांना तेव्हा जाणवले. त्यांचे जपुजीचे चिंतन अधिक गहिरे झाले. पुढे जपुजीवर त्यांनी दिलेली प्रवचनेही दिली. ‘जपुजी’ या नावाने ती पुस्तकरूपात आली.
भूदान यात्रेत, विनोबांना, जगन्नाथपुरीमध्ये नानकदेवांचे स्मरण झाले. पुरीच्या मंदिरात केवळ हिंदूंनाच प्रवेश आहे. विनोबा सर्वधर्मीय बांधवांसह जगन्नाथाच्या दर्शनाला गेले. तिथल्या पुजाऱ्यांनी या भूदान यात्रींना रोखले. विनोबांना आठवले की, नानकदेवांनाही असाच प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यावर उत्तर म्हणून गुरू नानकांनी ‘गगन में थाल रविचंद दीपक बने तारका मंडल कनक मोती।’ अशी जगन्नाथाची अद्वितीय आरती रचली होती. पुरीच्या लोकांना, नानकदेवांनी थेट विश्वरूप परमेश्वराचे ज्ञान घडवले होती. शीख बांधवांच्या नित्यपाठात या आरतीस महत्त्वाचे स्थान आहे, असे विनोबांनी सांगितले.
नानकदेवांनी आरती रचली तर ‘जी सर्वोलभ्य नाही ती मूर्तीच नव्हे,’ अशा आशयाचे विनोबांचे उद्गार आढळतात. ही दोन्ही उदाहरणे र्अंहसेचा आदर्श होती. त्यांच्यात काही शतकांचे अंतर असूनदेखील, र्अंहसेच्या तत्त्वाची परंपरा ध्यानी येते.
शीख धर्मातील दोन शब्द विनोबांनी महत्त्वाचे मानले. ‘निरभऊ’ आणि ‘निरवैरु’. निर्भय नाही तो निर्वैर नसतो, इतका सोपा व थेट संदेश या शब्दातून मिळतो. विनोबांनी या उपदेशाला ‘निष्पक्ष’ची जोड दिली. ‘निरभऊ-निरवैरु-निष्पक्ष’ अशी तत्त्वत्रयी त्यांनी सर्वांसमोर ठेवली.
पांथिकतेचा निषेध, स्त्रियांना सत्संगाचा अधिकार, नानकदेवांची दीर्घकाळ चाललेली आणि मोठा भूभाग व्यापणारी पदयात्रार, हिंदु आणि मुस्लीम या उभय धर्मांना जोडण्याचे कार्य आणि अखेरीस नामस्मरणाला शरण जाणे, आदी गोष्टी विनोबांनी शिरोधार्य मानल्या. खुद्द विनोबांचे आयुष्य काय वेगळे होते?
– अतुल सुलाखे
jayjagat24 @gmail.com