नीरजा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय असते नेमकी कविता? तीव्र भावभावनांचा उत्स्फूर्त आविष्कार की मनात उठलेल्या कल्लोळाला मिळालेला नेमका आवाज? नेमक्या शब्दांसाठी करावा लागणारा शोध की त्या शब्दांच्या शोधानंतर उमजल्यासारखं वाटणारं अगम्य काही? अस्वस्थ मन भरून येतं अनेक भावभावनांनी आणि मोकळं होईल पाऊस पडून गेल्यानंतरच्या निरभ्र आकाशासारखं; पडलेल्या पावसानंतर मातीत रुजलेले शब्द तरारून येतील आणि फुटेल एखादी कविता शब्दांच्या झाडाला असं वाटतं राहतं. कधी कधी होतं असं पण अनेकदा विरून जातात शब्द आणि अर्धवट रुजलेल्या गर्भासारखी निसटून जाते कविता ओटीपोटातून. मग पुन्हा वाट पाहायची शब्द रुजण्याची; कवितेचा गर्भ राहण्याची; प्रसूतीची, त्या वेळेला अनुभवायच्या वेणांची आणि कागदावर उतरल्यावर समाधानानं सोडलेल्या सुस्काऱ्याची. अर्थात हे असं समाधान काही क्षणांसाठीच असतं. कारण बाहेरचं जग, त्यातले ताणेबाणे सतत आदळत असतील कवीवर तर कशी थांबेल त्याच्या मनाची तगमग?

माझ्यासाठी कविता हा असाच अनुभव असतो अनेकदा.

कविता ही आपल्या जगण्याचा, आपल्या आनंदाचा, वेदनेचा उच्चार असतो असं म्हणतात अनेकदा. काय असतं हे जगणं? केवळ मी, माझे नातेसंबंध, माझी स्वत:ची सुख-दु:खं एवढंच असतं का या जगण्यात, की माझ्या जगण्यात ज्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि साहित्यिक पर्यावरणात मी राहत असते ते पर्यावरणही सामील असतं? मला वाटतं कवीचं जगणं या साऱ्या गोष्टींनी व्यापलेलं असतं. मी लिहायला लागले तो काळ अनेक चळवळींचा होता. वर्गलढे, जातिअंताची लढाई, स्त्रीमुक्ती चळवळ, आणीबाणी यांसारख्या अनेक गोष्टींचे पडसाद मनावर उमटत होते. पण प्रत्यक्ष जगण्यात मात्र मी यापासून फार दूर होते. कोणत्याही चळवळीशी थेट संबंध आला नव्हता माझा. पण जे वाचन मी करत होते ते मला वेगळय़ा तऱ्हेनं घडवत होतं. त्या काळात माझ्या नकळत मी आपल्या प्राक्कथा, लोककथा आणि पाश्चात्त्य मिथकांचे संदर्भ तपासून पाहायला लागले.

आणि मग हे सारंच कधी प्रत्यक्षपणे तर कधी अप्रत्यक्षपणे माझ्या कवितेतून प्रकट व्हायला लागलं. मग ‘कुंडाच्या चार चौकटीतला मासा आंधळा झाला / तेव्हाच साऱ्या वाट बंद झाल्या होत्या/ अंधारात मी तरी कुठे धर्म शोधणार?/ अधर्मालाच दिली सारी दाने,/ तेव्हापासून आजपर्यंत/ किती वस्त्रहरणे! किती वस्त्रहरणे! असं म्हणत मी द्रौपदीची व्यथा व्यक्त करायला लागले, तर कधी ‘इथंच कुणा द्रौपदीची वस्त्र फेडली/ अन् त्याच्याच पताका करून/ इथूनच पंढरपूरची िदडी गेली’ असं म्हणत समाजाच्या दुटप्पीपणावर वार करायला लागले. शब्दांत आक्रमकपणा यायला लागला. पुरुषसत्ताक व्यवस्थेत बाईला आलेलं दुय्यमत्व, तिचं होणारं शोषण जागोजागी दिसायला लागलं आणि माझ्या लेखणीला धार येत गेली.

माझ्या लेखनात स्त्रीनिष्ठ अनुभव जास्त येतात आणि ते साहजिकच आहे. एक स्त्री म्हणून व्यक्त होताना स्त्रीवादाचा अभ्यास करावा लागत नाही. ते आपसूक येत जातं. त्यामुळे माझ्यासाठी माझी कविता ही एक सर्जनशील कृतीच राहिली. ‘वेणा’, ‘स्त्रीगणेशा’, ‘निर्थकाचे पक्षी’, ‘मी माझ्या थारोळय़ात’ आणि लवकरच येणारा ‘विध्वंसाच्या वेदीवर चढण्याआधी..’ हे ‘निरन्वय’ या पहिल्या संग्रहानंतर आलेले पाचही संग्रह त्याची साक्ष देतात. आजच्या समाजातल्या विसंगती, लोकांची मानसिकता, त्याला असलेले सांस्कृतिक संदर्भ टिपण्याचा आणि माणसाच्या जगण्याला वेगवेगळय़ा परिप्रेक्ष्यातून भिडण्याचा प्रयत्न मी करते आहे आणि त्याबद्दलचं काही एक विधान मी कवितेतून करते आहे असं मला वाटतं.

माझा संघर्ष हा परंपरेशी, या परंपरेतल्या कर्मकांडाशी, जात, धर्म, लिंग यावर आधारलेल्या मानवी व्यवहाराशी, त्यातल्या सत्ताकारणाशी असतो. आज जगण्यात दाटून आलेली निर्थकता असो, जागतिकीकरणामुळे प्रचंड वेगानं झालेले बदल असोत किंवा काळाच्या आणि अवकाशाच्या पातळीवर आपलं हजारो तुकडय़ांत झालेलं विभाजन असो.. आजूबाजूला घडणाऱ्या या साऱ्या गोष्टी एक संवेदनशील माणूस म्हणून मला जाणवत असतात. मनात अनेक प्रश्न उभे राहतात, आणि मी विचारते,

कवितेतल्या पावसानं काय काय धुतलं जाऊ शकतं?

आत्महत्येच्या फासावरचे लालकाळे व्रण,

पुस्तकांच्या पानांवरच्या जळक्या खुणा

रक्तरंजित इतिहासाची भयभीत पानं

की एखाद्या मुलीच्या डोळय़ात दाटून आलेलं शरीराचं भय..?

आज एक कवी म्हणून मला वाटतं,

काळ कोणताही असला तरी

कवीला पेराव्या लागतात शब्दांच्या बिया

वेळ लागतोच रुजून यायला शब्द

अशा खडकाळ जमिनीत

करुणेचं पीक यायला जावी लागतात शतकं

कवीला पाहावी लागते वाट

मरणोत्तर जिवंत राहून शब्दांतून

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Difficult times recover what is exactly poetry emotions words power freshness life ysh