डॉ. जयदेव पंचवाघ jpanchawagh@gmail.com

चेहऱ्याच्या निम्म्या भागात होणाऱ्या प्रचंड वेदना म्हणजे ट्रायजेमिनल न्युराल्जिया. सुसाइड डिसीज म्हणून ओळखला जाणारा, रुग्णांसाठी असह्य़ ठरणारा हा आजार का होतो आणि तो कसा बरा करायचा हे कसं शोधलं गेलं याची यशोगाथा.

साल होतं १८६७. स्थळ लॉस एंजेलिस, अमेरिका. यूसीएलए विद्यापीठाच्या न्युरोसर्जरी विभागातील ऑपरेशन थिएटर. या प्रख्यात विद्यापीठातील दोन नामवंत न्युरोसर्जन मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारा मायक्रोस्कोप या ठिकाणाहून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवत होते. मायक्रोस्कोप एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवणे हे जिकिरीचं काम असतं. ज्या न्युरोसर्जनच्या मालकीचा हा मायक्रोस्कोप होता त्याचं नाव होतं डॉक्टर रॅण्ड आणि त्याच्या बरोबर असलेली व्यक्ती म्हणजे डॉक्टर पीटर जेनाटा.

डॉक्टर जेनाटा हे एक कुशाग्र बुद्धिमत्तेचं आणि स्वभावाने अत्यंत कलंदर व्यक्तिमत्त्व. ‘ट्रायजेमिनल न्यूराल्जिया’ हा अत्यंत वेदनादायक आजार कायमचा बरा करण्याची शस्त्रक्रिया शोधून काढण्याचा ध्यास त्यांनी घेतला होता. हा आजार विशिष्ट प्रकारच्या शस्त्रक्रियेने निश्चित बरा होईल याची त्यांना खात्री होती. त्यांच्या दुर्दैवाने यूसीएलएच्या हॉस्पिटलमध्ये काहीशा जुन्या विचारांच्या लोकांची सद्दी होती.

अर्थातच पीटर जेनाटासारख्या व्यक्तींचं त्यांच्याबरोबर पटणं जवळजवळ अशक्यच. त्यामुळेच अशा प्रकारची शस्त्रक्रिया या हॉस्पिटलमध्ये करण्यास त्यांना मज्जाव करण्यात आला होता. अर्थातच डॉक्टर जेनाटा हेसुद्धा सहजी हार मानणाऱ्यातले नव्हते.  मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारा मायक्रोस्कोप हा डॉक्टर रॅण्ड यांच्या व्यक्तिगत मालकीचा होता. त्यामुळे रॅण्ड यांना जवळजवळ ‘पटवून’च हा मायक्रोस्कोप दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेऊन शस्त्रक्रिया पार पाडण्याचं त्यांनी ठरवलं होतं. केवढा हा उपद्वय़ाप!!

या दोघा ‘उद्योगी’ माणसांनी हा मायक्रोस्कोप विलग केला, त्याचे सुटे भाग हातात घेऊन ते डॉक्टर जेनाटांकडे असलेल्या फोक्सवॅगन कंपनीच्या स्टेशन वॅगन गाडीत काळजीपूर्वक भरले आणि दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेऊन ते पुन्हा जोडून तिथे वापरण्यासाठी मायक्रोस्कोप तयार झाला!

अशा अनेक, कुशाग्र बुद्धीच्या आणि कलंदर वृत्तीच्या ‘उपद्वय़ापी’ लोकांच्या ‘उद्योगां’मुळेच वैद्यकशास्त्रातले अनेक शोध आजतागायत लागलेले आहेत.

ट्रायजेमिनल न्युराल्जिया म्हणजेच चेहऱ्याच्या निम्म्या भागात येणारी तीव्र कळ. त्या बाजूच्या कपाळ, डोळा, गाल व हनुवटी या भागात येणारी. अत्यंत तीव्र आणि जीवघेणी.  या आजारात व्यक्तीने बोलण्यासाठी तोंड उघडलं, दात घासताना ब्रशचा हिरडीला स्पर्श झाला, पंख्याचा किंवा खिडकीतून येणारी गार हवा चेहऱ्याच्या त्या भागाला लागली, तोंड पुसताना टॉवेलचा गालाला स्पर्श झाला, नाक साफ करताना बोटाचा त्या बाजूच्या नाकपुडीला किंवा वरच्या ओठाला ओझरता जरी स्पर्श झाला तरी अचानक विजेच्या करंटसारखी तीव्र कळ त्या भागातून सुरू होऊन चेहऱ्याच्या निम्म्या भागात पसरते. अचानक विजेचा उच्च दाबाचा करंट लागल्याप्रमाणे, हिरडी किंवा चेहऱ्यावर मिरचीची तांबडी पूड टाकल्याप्रमाणे, चेहऱ्याच्या त्या भागात एखादा अणकुचीदार चाकू खुपसल्याप्रमाणे, अनेक इंगळय़ा एकाच वेळी चेहऱ्याच्या अर्ध्या भागाला डसल्याप्रमाणे अशा विविध प्रकारे रुग्णांनी या तीव्र कळेचं वर्णन केलेलं आहे.

या आजाराची सुरुवात होताना ही कळ फक्त काही सेकंदच टिकते. त्यानंतर मात्र या वेदनेची तीव्रता आणि वेळ वाढत जाते. या आजारात, अगदी सुरुवातीच्या काळात कधीकधी ही कळ आपोआप कमीसुद्धा होते पण नंतर मात्र वेगाने तिची तीव्रता वाढत जाते. हे दुखणं इतकं भीषण आणि जीवघेणं असतं की याचं वर्णन रुग्णांनी वेगवेगळय़ा शब्दांत केलेलं आहे.

‘सर्व प्रकारच्या वेदनादायी आजारांपैकी सर्वात वाईट आणि तीव्र वेदना..’

‘अशा वेदनेबरोबर जगण्यापेक्षा आत्महत्या  परवडलीअशी भावना निर्माण करणारी वेदना’

‘वेदनेच्या रूपात मिळालेला शाप’

‘आपल्या शत्रूलासुद्धा होऊ नये अशी वेदना.’’ अशा अनेक प्रकारे.

हा आजार जगभर ‘आत्महत्या-प्रेरक’ आजार म्हणून ओळखला जातो कारण या वेदनेने काही रुग्ण इतके अगतिक होतात की ‘जगण्यापेक्षा मरण पत्करलं’ या भावनेतून जीवनाचा अंत करतात. आणि म्हणूनच १९६७ साली, या आजारावर निश्चित आणि कायमस्वरूपी अशा प्रकारची शस्त्रक्रिया शोधून काढणे अत्यंत आवश्यक आहे, याची डॉ. जेनाटाना खात्री पटलेली होती.

त्याआधीच्या काळात मेंदूवर शस्त्रक्रिया करून चेहऱ्याच्या दुखऱ्या भागातील संवेदना मेंदूपर्यंत वाहून नेणारी नस कापून टाकली जायची. मात्र त्यामुळे दर वेळी वेदना थांबायचीच असं नाही. तसंच, चेहऱ्याचा तो अर्धा भाग कायमचा बधिर व्हायचा. त्यात भर म्हणजे त्या बाजूचा डोळा जाण्याची शक्यतासुद्धा निर्माण होत असे. इतर काहीच कायमचे इलाज नसल्यामुळे ही शस्त्रक्रिया करावी लागायची.

शास्त्रीय शोध लागण्याच्या प्रक्रियेत अत्यंत चाणाक्ष आणि तीक्ष्ण निरीक्षणशक्ती असलेल्या व्यक्तींनी नोंदवून ठेवलेल्या गोष्टी कशा अमूल्य ठरतात याचं उदाहरण इथे दिसतं.

१९३० च्या दशकात डॉ. डॅन्डी या जगप्रसिद्ध न्युरोसर्जनला नस कापण्याची ही ‘नाइलाजास्तव’ करण्यात येणारी शस्त्रक्रिया करताना एक महत्त्वाची गोष्ट वारंवार जाणवली होती. डॉक्टर डॅन्डी यांनी लिहून ठेवलं आहे..‘मी जेव्हा जेव्हा ही नस कापण्यासाठी मेंदू उघडतो तेव्हा अनेक वेळेला या नसेला अगदी चिकटूनच रक्तवाहिनी असते. ही रक्तवाहिनी नसेमध्ये रुतलेली असते आणि तिची स्पंदनं नसेवर आपटत असतात. या स्पंदनांच्या दाबामुळे तर ही असह्य कळ येत नसेल?’

डॉक्टर जेनाटा यांच्या स्वत:च्या निरीक्षणांशीसुद्धा हे लिखाण मिळतंजुळतं होतं. शिवाय न्युरोसर्जरीचा प्राथमिक मायक्रोस्कोप १९६० च्या दशकात उपलब्ध झाला होता.  याच्या आधारावरून, नसेपासून रक्तवाहिनी दूर करून ही कळ, ‘नस न कापता’, कायमची बरी होऊ शकेल असा डॉक्टर जेनाटा यांचा कयास होता. या त्यांच्या म्हणण्याला तेव्हाच्या वैद्यकीय मरतडांनी अगदी कसून विरोध केला. ‘स्वत:च्याच शरीरातील रक्तवाहिनी असा आजार कसा निर्माण करेल? हा माणूस काहीतरी अशास्त्रीय बरळतो आहे !’ अशा प्रकारची भरपूर टीका त्यांच्यावर झाली. या विरोधामुळे डॉ. जेनाटांना जरी त्रास झाला तरी त्यांची जिद्द मात्र उलट वाढत गेली. त्यांनी या मरणप्राय वेदनेने तडफडणाऱ्या अनेकांना या दुखण्यातून त्यांच्या शस्त्रक्रियेने बरं केलं. हळूहळू सर्व वैद्यकीय जगताला याची दखल घ्यावीच लागली. ही शस्त्रक्रिया मायक्रो व्हास्क्युलर डीकॉम्प्रेशन (एमव्हीडी)  या नावाने प्रचलित झाली. आज या शस्त्रक्रियेत अत्याधुनिक न्युरो मायक्रोस्कोपच्या साहाय्याने दुखऱ्या नसेवर आदळणारी रक्तवाहिनी दूर करून त्यांच्यामध्ये ‘टेफ्लोन’ या पदार्थाचा न विरघळणारा कापूस ठेवला जातो.

अगदी आजही, आपल्या देशात ट्रायजेमिनल न्युराल्जिया या आजाराने ग्रस्त असलेल्या दुर्दैवी रुग्णांपर्यंत हा आजार शस्त्रक्रियेने बरा होऊ शकतो ही माहिती म्हणावी तशी पोहोचत नाही.

डॉक्टर जेनाटा आणि डॉक्टर डॅन्डी यांचं कार्य पुढे चालू राहावं म्हणून या आजारावर संशोधन करण्यासाठी, आणि हे रुग्ण वेदनामुक्त व्हावेत या उद्देशाने पुणे येथे गेली १५ वर्षे या आजाराचं केंद्र कार्यरत आहे.

प्रत्येक रुग्णावर शस्त्रक्रिया करताना डॉक्टर जेनाटा  आणि डॉ. डॅन्डी यांनी लावलेला शोध किती अमूल्य आहे आणि शस्त्रक्रिया किती अचूक आहे याची प्रचीती येऊन आजही मी नतमस्तक होतो. या वेदनेतून एमव्हीडी शस्त्रक्रियेने बरे झालेले रुग्ण जेव्हा म्हणतात, ‘डॉक्टर हा आजार बरा होऊ शकतो हे जर आम्हाला पूर्वीच कळालं असतं तर आयुष्यातली इतकी र्वष वाया गेली नसती’ तेव्हा वाईट वाटण्यापलीकडे काहीच करता येत नाही.

या आजारावर गेली हजारो र्वष अनेक प्रकारचे उपचार करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. चेहऱ्याच्या दुखऱ्या भागावर लाल मिरचीची पूड चोळणे, त्या चेहऱ्याच्या भागाला डाग देणे, विद्युत तरंग किंवा रेडिएशनने नसेचा काही भाग जाळणे, मेंदू आणि नसा बधिर आणि सुस्त करणारी औषधे देणे वगैरे. परंतु या सर्व उपचारांमध्ये एक महत्त्वाची त्रुटी आहे, ती म्हणजे या आजाराचं मूळ कारण ओळखून ते दूर करण्याची कुवत नसल्यामुळे हे सर्व उपचार तात्पुरतेच ठरतात आणि वेदनेचे या लोकांवर अत्याचार चालूच राहतात.

न्युरोसर्जरीतील या ऐतिहासिक घटनेकडे बघताना मला दोन वाक्यं आठवतात. त्यापैकी पहिलं हे नोबेल पारितोषिक विजेत्या पीटर मेडावार याचं.. ‘सायन्स इज द क्वेस्ट फॉर एनििथग दॅट ‘माईट’ बी ट्रू’  (तथाकथित विज्ञानमरतडांचा कितीही विरोध असला तरीही हे यात अध्याहृत आहे.)

दुसरं वाक्य सर विन्स्टन चर्चिल यांचं. डॉक्टर डॅन्डी आणि डॉक्टर जेनाटा यांच्या तीक्ष्ण निरीक्षणशक्तीला हे वाक्य म्हणजे मानवंदनाच आहे. ‘मेन ऑकेजनली स्टम्बल ओव्हर द ट्रुथ, बट मोस्ट ऑफ देम पिक देमसेल्व्ह्ज अप अ‍ॅण्ड हरी ऑफ अ‍ॅज इफ निथग एव्हर हॅपण्ड’ पीटर जेनाटा यांचा हा शोध आधुनिक पिढीला प्रेरणादायी ठरेल अशी माझी खात्री आहे.

(लेखक मेंदू व मणक्याचे शस्त्रक्रियातज्ज्ञ आहेत.

Story img Loader