‘इथे फक्त भारतीय संस्कृतीच’ या शीर्षकाच्या लेखाचा भर एकजीव झालेल्या भारतीय संस्कृतीवर असला, तरी संस्कृती अशी एकारलेली असते का, याबद्दल दुमत असल्याचे अनेक पत्रांतून स्पष्ट झाले. त्यांपैकी ही दोन उल्लेखनीय..

मी मूळचा सोलापूरचा. तेथे मराठी, कानडी, तेलुगू, उर्दूमिश्रित दखनी हिंदी या भाषा बऱ्यापैकी गुण्यागोविंदानं नांदतात. त्यांचे परस्परांवर परिणाम आणि भाषिक संकर होतात. परिणामी, तिथले बरेच मराठी भाषिक मुलगे ‘मी अंघोळ केली’ असे न म्हणता ‘मी अंघोळ केलो’, असे म्हणतात. ही असते स्थानिक भाषिक संस्कृती. चपातीऐवजी ‘भाकर’ खाणारी माणसं सोलापुरात बरीच आहेत. पक्क्या पुणेकराला मात्र ‘पोळी’ला ‘चपाती’ म्हणणे किंवा भाकरीला ‘भाकर’ म्हणणे पचत नाही. हीदेखील असते भाषिक-खाद्य संस्कृती. महाराष्ट्राचे दैवत आहे विठोबा, विठ्ठल, किंवा पांडुरंग. ‘कानडा वो विठ्ठलु कर्नाटकू’ असं त्याचं कौतुकमिश्रित वर्णन करणारा हा एक नितांतसुंदर अभंग आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरीत आलं ते कर्नाटकातून. ती असते धर्म अथवा पंथाची संकरित संस्कृती. अशा अनेक उपसंस्कृतींच्या संकरामधून वाडीवस्ती ते विश्वसंस्कृती घडते.

   ‘भारतात फक्त भारतीय संस्कृतीच’ हा लेख (१ एप्रिल) लिहिणाऱ्या रवींद्र साठे यांनी दिलेल्या उपमेप्रमाणे विविध अणूंच्या संयोगातून ज्याप्रमाणे संयुग बनते, बऱ्याच अंशी त्याप्रमाणे संस्कृती घडते. त्यामुळे संपूर्ण भारतातील माणसं ज्या ज्या प्रकारे भिन्न प्रदेश, जाती, धर्म, भाषा, विविध कला, वेश यांच्या समवेत जगतात, तिथल्या सर्व उपसंस्कृतींची मिळून आपसुकपणे भारतीय संस्कृती होते. ती असते एक नैसर्गिक संकर प्रक्रिया. हे संकर पर्यटनं किंवा स्थलांतरांमुळे वेगानं घडतात. या उपमेची अगदी उलटी प्रक्रियाही निसर्गात असते. भिन्न अणूंचं संयुग अणूइतकं भक्कम आणि म्हणून अविनाशी नसतं. संयुगातील अणुबंधांची ऊर्जा (बाँड एनर्जी) जेवढी जास्त, तेवढं संयुग भक्कम. त्या ऊर्जेपेक्षा थोडी जास्त ऊर्जा संयुग तोडण्यासाठी पुरवली, तर संयुगातील अणू विभक्त होतात. संयुग तुटतं. पाण्याचं विद्युत-विघटन केल्यावर हायड्रोजन आणि ऑक्सिजन वायू वेगळे होतात. ती प्रक्रिया जास्त ऊर्जाखाऊ असते, हे साठे यांना नक्की माहीत असणार.

   विविध उपसंस्कृतींच्या माणसांशी भक्कम मानवी बंध बांधून शहर, प्रांत, राष्ट्र भक्कम होतं. विविध देशांतील माणसांशी असेच मानवी बंध जुळले, तर अख्ख्या पृथ्वीची एक मानवी संस्कृतीदेखील घडू शकेल. ती प्रक्रिया सध्यादेखील आपल्या नाकाखाली चालू आहे. याउलट, हे मानवी बंध तोडण्यासाठी दंगलींची, युद्धांची ऊर्जा मोठय़ा प्रमाणात वापरली, किंवा कुठल्या विशिष्ट जनविभागाला कोणत्या तरी कारणानं दुय्यमत्व मिळालं, तर त्या गावाचं अथवा त्या राष्ट्राचं विभाजनदेखील घडतं. पाकिस्तानचं विभाजन होऊनच बांगलादेश बनला. कारण पूर्व पाकिस्तानातील संस्कृती पंजाबी मुस्लिमांसारखी नव्हती. ती पश्चिम बंगालसारखी होती. ती हिंदू वा मुस्लीम असणाऱ्या बंगाली लेखकांच्या लेखणीवर पोसलेली होती.

   स्वतंत्र झालेल्या बांगलादेशानं रवींद्रनाथांचीच एक कविता राष्ट्रगीत म्हणून स्वीकारली. या इतिहासावरून असं दिसतं की पश्चिम आणि आणि पूर्व पाकिस्तानचे असे तुकडे पडणं अस्वाभाविक नव्हतं. याउलट, एके काळी एकमेकांना पाण्यात पाहणारे पूर्व आणि पश्चिम जर्मनी हे दोन देश एकमेकांना जिंकून नव्हे, तर त्यांच्यातील संस्कृतिसाम्याच्या प्रेमानं त्यांना वेगळं करणारी भिंत पाडून एक झाले. आपल्याच एका उपसंस्कृतीला जगातील सर्वश्रेष्ठ म्हणत आयुष्य व्यतीत करणे ही झाली कूपमंडूक वृत्ती. ती उत्क्रांतीला आणि संस्कृतीच्या विकासालादेखील मारक असते. तुम्ही इतर संस्कृतींतील चांगले गुणदेखील घेत नाही.

कूपमंडूक वृत्ती सोडून विविधतेचा उत्सव सतत साजरा करणाऱ्या भारतीय शहरांतील एक शहर सोलापूर आहे. अशा सोलापूरच्या मोहसीन शेख नावाच्या तरुण मित्रानं पुण्यात एका सॉफ्टवेअर कंपनीत जॉब मिळाला म्हणून जवळच्या टपरीवर त्याच्या तरुण मित्रांत मला सामील करून चहाचं आमंत्रण दिलं होतं. त्याला एका धर्माध झुंडीनं पुण्यात ठार केलं! त्याचं पुण्यात जाणं त्याच्या वैयक्तिक सांस्कृतिक विकासाला पोषक होतं. परंतु नमाज अदा करून आलेल्या मोहसीनच्या डोक्यावर ती विणलेली पांढरी टोपी होती. एवढाच त्याचा ‘गुन्हा’. अशी कृत्ये ही, संयुगातील अणू विभक्त करणारी शक्ती असते. माझी खात्री आहे की कुठल्याही संस्कृतीबद्दल आस्था असणारा प्रत्येक माणूस अशा झुंडशाहीचा, तो निर्माण करणाऱ्या विविधांगी विद्वेषांच्या प्रसाराचा आणि तो पसरविणाऱ्या शक्तींचा निषेध करेल. अगदी रवींद्र साठेदेखील किमान मनातून तरी निषेधच करतील.

– प्रकाश बुरटे, पुणे</p>

संविधान हा नवभारताच्या संस्कृतीचा पाया..

‘इथे फक्त भारतीय संस्कृतीच’ या रवींद्र माधव साठे यांच्या लेखातील ‘कट्टरपंथी मानसिकता ही राष्ट्रवादाच्या विरुद्ध असते’ हे त्यांचे मत मान्य केले पाहिजे. परंतु कट्टरपंथी मानसिकता मुस्लीम, ख्रिश्चन, शीख किंवा हिंदू अशा कोणत्याही धर्मीयांची किंवा संस्कृतीवाल्यांची असता कामा नये, हे सांगण्यास मात्र ते विसरले आहेत. ‘एका राष्ट्राची एकच संस्कृती असते’ हे त्यांचे मत अत्यंत भाबडे आहे. संस्कृती ही कधीही निव्वळ एका शिक्क्याची नसते. संस्कृतिसंघर्ष आणि संस्कृती समन्वयाची प्रक्रिया सतत सुरू असते. त्यात वेगवेगळय़ा संस्कृतींचे संमिश्रण, संयोजन हे होतच असते.

    ‘एक भूमी, एक जन, एक संस्कृती म्हणजे राष्ट्र होते’ ही साठे यांनी केलेली व्याख्या तोकडी आहे. आज राष्ट्र या संकल्पनेची व्याख्या करायची पुढीलप्रमाणे करावी लागेल : ‘पृथ्वीवरील नैसर्गिक अथवा कृत्रिम सीमांनी बंदिस्त असलेल्या विशिष्ट भूप्रदेशातील असे लोक, की ज्यांचे मूलभूत हितसंबंध सारखे आहेत. जे आपल्या भूप्रदेशासंदर्भातील नजीकच्या इतिहासाकडून प्रेरणा घेऊन नवराष्ट्र निर्माणाच्या उदात्त ध्येयवादाने प्रेरित होऊन कार्यरत आहेत, ज्यांनी संघटितपणे परकीय सत्ता झुगारून स्वातंत्र्य व सार्वभौमत्व प्राप्त केले आहे. ज्यांच्यात मानवनिर्मित धर्म, जात, भाषा, संस्कृती असे वेगळेपण असले तरी जे आपल्या अशा वैविध्यतेला भूषण मानून त्यांचा गौरव करत व परस्परांचा आदर करत मानसिकदृष्टय़ा एकजीव होऊन आपल्या भूप्रदेशातील लोकांमध्ये सेंद्रिय एकजीवता आणू पाहतात, ज्यांनी एक राष्ट्र म्हणून वाटचाल करण्याची प्रागतिक दिशा देणारे स्वत:चे संविधान बनवलेले आहे व जे आपल्या संविधानाला मूलभूत मार्गदर्शक ग्रंथ मानून त्यातील तत्त्व व मूल्यांना अनुसरून आपल्या व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनातील प्रत्येक पाऊल टाकतात त्यांना एक राष्ट्रीय लोक म्हणता येईल.’ 

    एक भूमी, एक संविधान, एक राष्ट्रध्वज, एक संसद, एका प्रकारची (लोकशाही) राज्यव्यवस्था, विविध राज्यांची स्वतंत्र विधान मंडळे, केंद्र-राज्यांमधील एकजीवता कायम राखणारी अधिकारांची उचित विभागणी, स्वायत्त न्यायव्यवस्था, वैविध्यपूर्ण धर्म, संस्कृती असलेले नागरिक, सर्वाच्या संरक्षणासाठीची एक राष्ट्रीय फौज, सर्वाना एकजीव करणारी आणि प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, सेक्युलॅरिझम, बुद्धिवाद, विज्ञानवाद ही सकलजनहितकारी मूल्ये इत्यादी घटक आधुनिक राष्ट्रसंकल्पनेमध्ये महत्त्वाचे असतात. या घटकांना स्वीकारणाऱ्या लोकांचा ‘राष्ट्रभाव’ एकसारखा बनत असतो. तसे नसेल तर तो जाणीवपूर्वक प्रबोधनाद्वारे बनवायचा असतो. एकाच एका विशिष्ट धर्माची ‘हिंदू’ संस्कृती म्हणजे या राष्ट्राची संस्कृती असे म्हणणे चुकीचे असते. ‘हिंदू’ हा शब्द भारताच्या प्राचीन साहित्यात आढळत नाही. तो मोगली आक्रमकांनी वापरलेला आहे. हा शब्द आता ब्राह्मणवर्चस्ववादी लोक स्वत:च्या सोयीसाठी वापरत आहेत. आणि हिंदूत्वाचा अतिरेक करून आपल्या आधुनिक स्वातंत्र्यलढय़ातील राष्ट्रनिर्मात्यांनी संविधान व सेक्युलॅरिझच्या पायावर फार मोठय़ा प्रयासाने उभे केलेले राष्ट्र विस्कटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

रवींद्र माधव साठे यांना इंडोनेशियामधील राम, कृष्ण, गणपती यांचा प्रभाव दिसतो. परंतु जपान, श्रीलंका, म्यानमार, थायलंड इत्यादी कितीतरी देशांनी स्वीकारलेला भारतीय संस्कृतीतला बुद्ध मात्र दिसत नाही. भारताच्या प्राचीन संस्कृतीमधील बुद्ध तत्त्वज्ञान आणि आचारसंहितेचा वारसा खऱ्या अर्थाने आधुनिक लोकशाहीला पूरक ठरणारा आहे. तो वारसा मात्र हे ‘हिंदू संस्कृतीच भारताची खरी संस्कृती आहे’ असे सुचवणारे लोक कधीही अधोरेखित करत नाहीत. कारण त्यांच्या संकुचित हितसंबंधांच्या विरोधात गेलेला बौद्ध संस्कृतीचा वारसा ज्या ‘प्रतिक्रांतिकारी’ ,‘पुष्यमित्र शुंगी’ शक्तींनी नष्ट केला, त्या शक्तींबद्दल बोलणे अशा लोकांसाठी गैरसोयीचे असते.

लेखकाने लक्षात घ्यावे की भारताची प्राचीन संस्कृतीदेखील कधीही एक शिक्क्याची नव्हती. भारताच्या प्राचीन संस्कृतीमध्ये वैदिक आणि अवैदिक असा संघर्ष दिसतो. चार्वाक, महावीर, बुद्ध, वीरशैव, वारकरी, शीख आशा अवैदिक घटकांनी वैदिक ब्राह्मणी, वर्णाध, विषमतावादी, स्त्रिया व शूद्रादीअतिशूद्रांवर ज्ञानबंदी, शस्त्रबंदी लादणाऱ्या संस्कृतीवर अनेकदा मात केलेली आहे. फक्त ‘हिंदू’ संस्कृती म्हणजेच भारताची संस्कृती हा संकुचित विचार नवे राष्ट्र घडवताना सोडून दिला पाहिजे. भारतीय संविधानाने पुरस्कारिलेला धर्मनिरपेक्षवादाचा सर्वसमावेशक सांस्कृतिक पायाच भारत या राष्ट्राला मजबूत करणारा व प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारा आहे.

    – प्रा. डॉ. अनंत राऊत, नांदेड</p>