|| डॉ. जयदेव पंचवाघ
मेंदूच्या आजारांमध्ये मानसिक गुंतागुंतीचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो ही बाब इरॅझिस्ट्रेटसच्या सगळ्यात आधी लक्षात आली. प्राचीन काळापासून मेंदू आणि मज्जारज्जूच्या शस्त्रक्रियांवर ज्या असामान्य व्यक्तीच्या संशोधनाचा ठसा उमटलेला आहे त्यांचा इतिहास आणि आजच्या वैद्यकशास्त्रावरचा परिणाम आपण बघत आहोत.
या विषयात आणखी पुढे जाण्याआधी हेरोफिलसचा सहकारी शास्त्रज्ञ इरॅझिस्ट्रेटसबद्दल सांगणं मला अत्यावश्यक वाटतं. हेरोफिलसबद्दलच्या लेखात याचा ओझरता संदर्भ आला होता. मानवी मनोविकार आणि मनोविकारांचा शरीरावर होणारा परिणाम त्याने ख्रिस्तपूर्व ३०० वर्षांपूर्वी अभ्यासला होता. मेंदूच्या शस्त्रक्रि येच्या दृष्टीने याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. मेंदू व मणक्याच्या अनेक आजारांमध्ये विविध प्रकारच्या वेदना होत असतात. शस्त्रक्रिया करण्याआधी या वेदनांचं निश्चित कारण शोधून काढणं अत्यावश्यक असतं. कधी कधी हे कारण शारीरिक व्याधीत नसून मानसिक असंतुलनात दडलेलं असतं.
ही गोष्ट वेळेत लक्षात घेतली नाही आणि अशा रुग्णांची शस्त्रक्रिया केली गेली तर ती एक चूक ठरू शकते, ही मेंदूच्या सर्जरीची दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची बाजू आहे. म्हणूनच मेंदूच्या सर्जरीच्या इतिहासाचा विचार करताना इरॅझिस्ट्रेटसच्या कामाची दखल घ्यावीच लागेल.
अलेक्झांड्रियामध्ये हेरोफिलस आणि इरॅझिस्ट्रेटसने शरीरशास्त्र अभ्यासण्याचं केंद्र स्थापन केलं होतं हे आपण मागच्या वेळी बघितलं. या केंद्रामध्ये शवविच्छेदनासाठी त्या वेळेचा टोलेमी राजा मृत्युदंड दिलेल्या कैद्यांना पाठवत असे आणि जिवंतपणी शरीर विच्छेदन करायला सांगत असे, अशा प्रकारची बिनबुडाची वदंता कशी उठवली गेली हेही पाहिलं.
या इरॅझिस्ट्रेटसला मानवी शरीररचनेबरोबरच मनोव्यापार, मन, आत्मा याविषयीसुद्धा रुची होती. त्याची निरीक्षणशक्ती आणि अवघड आजारांचे निदान करण्याची क्षमता असामान्य होती. या काळात एक अतिशय विचित्र आणि मजेदार घटना घडली. इरॅझिस्ट्रेटस एका इजिप्शियन राजाच्या दरबारात डॉक्टर होता. राजाचा त्याच्यावर विश्वास होता. हा राजा आता मध्यमवयीन झाला होता. या वयात त्याचं एका तरुण मुलीवर प्रेम जडलं. ही मुलगी अप्रतिम लावण्यवती होती. त्या काळच्या अनेक तरुणांनी तिचं प्रेम संपादन करण्याचे प्रयत्न केले होते. अर्थातच सत्तेपुढे शहाणपण जसं चालत नाही तसं प्रेमही चालत नसल्यामुळे शेवटी त्या राजानेच तिच्याशी लग्न केलं. या राजाला एक तरुण मुलगा होता. या मुलाचं म्हणजेच राजकुमाराचंही तिच्यावर प्रेम जडलं. प्रेमानं तो अक्षरश: झुरायला लागला. प्रेमात ‘वेडा’ झाला. एका बाजूला तिच्याविषयीचं तीव्र प्रेम आणि दुसऱ्या बाजूला ती आपल्या वडिलांचीच पत्नी असल्याची जाणीव या दोन्हींच्या कोंडमाऱ्यात तो आजारी पडला. दिवसेंदिवस या मुलाची प्रकृती खंगत गेली. पण सांगणार कुणाला? राजाला मुलाची काळजी होती.
मुलाने प्रेमात वेडं होणे वगैरेची त्याला काहीही कल्पना नव्हती. शेवटी त्याने इरॅझिस्ट्रेटसवर मुलाची केस ‘सोपवली’. राजा त्याला म्हणाला… ‘बाबा रे, याला नेमकं काय झालं आहे हेच कळत नाही. लवकर शोधून काढ… नाही तर हा जगेल असं मला वाटत नाही.’
इरॅझिस्ट्रेटससुद्धा बुचकळ्यात पडला. दणकट तब्येतीचा तो मुलगा… त्याला काय कमी होतं…? इरॅझिस्ट्रेटसला काहीच कळेना.
बरं, त्या काळच्या सर्व तपासण्या करून या मुलाला काही शारीरिक व्याधी असल्याचेही दिसेना. पण मग हळूहळू मुलाच्या लक्षणांचा अभ्यास करताना इरॅझिस्ट्रेटसला लक्षात आलं, की जेव्हा ही सुंदर मुलगी (म्हणजे त्याची सावत्र आईच ती!) या मुलाच्या समोर येते तेव्हा त्याच्या चेहऱ्याचा रंग बदलून लाल होतो. त्याची त्वचा गरम होते, घाम येतो व नाडीचे ठोके वाढतात. हा मुलगा प्रेमाने अक्षरक्ष: खंगत चालला आहे हे त्याच्या लक्षात आलं. आता करायचं काय? शेवटी त्यांनी राजाला सांगितलं की महाराज मुलाच्या मनातल्या तीव्र द्वंद्वामुळे तो आजारी आहे. तो पूर्णपणे प्रेमात पडला आहे…पागल झाला आहे. (अर्थात कोणाच्या प्रेमात तो पडला आहे हे सांगायची हिंमत त्याला झाली नाही) तरी राजाने तो प्रश्न विचारलाच.
‘तो प्रेमात पडला आहे ही वाईट गोष्ट नसून चांगली आहे. नेमकी कोण मुलगी आहे ती मला सांग. मी तिला घेऊन येण्याची व्यवस्था करतो.’
आता मात्र इरॅझिस्ट्रेटसची तंतरली… पण तो अत्यंत तल्लख आणि हजरजबाबी होता.
‘महाराज तो माझ्या बायकोच्या प्रेमात पडला आहे.’ असं सांगून इरॅझिस्ट्रेटसने वेळ मारून नेली आणि दु:खी चेहरा करून म्हणाला … ‘बघा, आता मी काय करावं हे मला कळत नाही!’
राज पण आता निरुत्तर झाला. ते पाहून इरॅझिस्ट्रेटस पुढे म्हणाला, ‘महाराज, तो तुमच्या बायकोच्या प्रेमात पडला असता, तर तुम्ही काय केलं असतं?’
‘मी?…माझ्या मुलाच्या जीवनासमोर मला काही महत्त्वाचं नाही. मी माझ्या बायकोला त्याच्यासाठी सोडून दिलं असतं.’
‘काय सांगताय….हे खरं आहे?’
‘शंभर टक्के!’ राजा म्हणाला.
‘तर मग महाराज…. आता खरं सांगतो. तसंच काहीसं प्रत्यक्षात झालेलं आहे!…’ धीर करून इरॅझिस्ट्रेटस म्हणाला.
तीव्र निरीक्षणशक्ती व संभाषणचातुर्याचा हा एक नमुना म्हणावा लागेल. या राजाने खरोखरच ती मुलगी आपल्या मुलाला देऊन टाकली आणि मुलाची तब्येत ठणठणीत झाली.
आपल्या वडिलांबद्दलचा आदर, त्यांच्या अधिकारांविषयी असलेली भीती व त्या मुलीवर बसलेलं प्रेम, टोकाचं आकर्षण… या सगळ्यातील द्वंद्वाचा परिणाम त्या राजपुत्राच्या शरीरावर झाला होता. विचार व भावना यातील तीव्र ऊर्जेच्या शरीरावर होणाऱ्या परिणामाविषयीची जाण व त्याचं अचूक निदान याचं हे उत्तम उदाहरण आहे. या राजाचे नाव होतं सेल्युकस, मुलाचं नाव अँटिकस व मुलीचे नाव स्ट्रॅटोनिस!
हे सर्व पाहता हेरोफिलस व इरॅझिस्ट्रेटस या दोघांचा काळ मज्जासंस्थेच्या संशोधनात अत्यंत लक्षणीय समजला पाहिजे.
गेल्या १००-१५० वर्षांमध्ये मनोशारीरिक (म्हणजेच सायकोसोमॅटिक) व्याधींच्या मुळाशी गेलेले तीन प्रमुख पाश्चात्त्य शास्त्रज्ञ म्हणजे फ्रॉईड, पाव्हलॉव आणि कॅनन.
खरंतर मानसिक ऊर्जेचा शरीरातील इतर भागांवर होणारा परिणाम बघून आपल्याला आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. मानवी शरीर हे वेगवेगळे अवयव एकत्र जोडून तयार झालेलं नाही. वेगवेगळे भाग एकत्र करून यंत्र बनवण्यात येतं तसं मानवी शरीराचं नाही. स्त्री आणि पुरुष बीज यांचा संयोग होऊन एक पेशी तयार होते आणि या पेशीपासून संपूर्ण शरीर तयार होतं. आपल्या पायाचा अंगठा आणि कपाळ हे दोन्ही भाग एकेकाळी एकच पेशी होते हे समजून घेतलं तर हा सगळाच उलगडा क्षणात होईल. म्हणजेच आपलं संपूर्ण शरीरच एका पेशीची प्रसरण पावण्याची प्रक्रिया आहे त्यामुळे एका भागाचा दुसऱ्या भागावर परिणाम होत नसेल तरच उलट नवल म्हणावं लागेल. त्यामुळेच जसा मानसिक ऊर्जेचा शरीरावर परिणाम होतो तसाच शारीरिक हालचालींचा फक्त भावना आणि विचारच नाही तर मेंदूच्या सूक्ष्म रचनेवरसुद्धा परिणाम होतो. त्यामुळे मनोशारीरिक परिणामांप्रमाणे शरीर- मानसिक परिणामसुद्धा तेवढेच तीव्र असतात. भारतात प्राचीन काळी विकसित झालेलं मर्मविज्ञान ही याचीच पावती आहे ज्याला आज आपण अॅक्युप्रेशर आणि अॅक्युपंक्चर म्हणतो हे मर्मविज्ञानापासूनच निर्माण झालेले आहेत. मर्मविज्ञानातील बरीचशी रहस्येही काळानुसार लुप्त झालेली आहेत. (त्यामुळे अशा गोष्टींचा दाखला देऊन अप्रमाणित उपचार करू नयेत असंही वाटतं.)
हालचालींमध्ये सुसूत्रता लागणारे खेळ, व्यायाम, नृत्य, योग यांचा मेंदूच्या आणि एकूणच मज्जासंस्थेच्या आजारांवर सकारात्मक परिणाम होतो हे वारंवार सिद्ध झालेलं आहे.
योगशास्त्रात तर श्वासाचा मेंदूवर होणारा परिणाम अत्यंत बारकाईने अभ्यासलेला आहे.
मेंदूच्या शस्त्रक्रियांच्या संदर्भातील तपासणीमध्ये नेहमी दिसणारी लक्षणं म्हणजे पाठदुखी, कंबरदुखी आणि डोकेदुखी. या लक्षणांचं मूळ बऱ्याच वेळेला मानसिक द्वंद्वामध्ये असतं. अशा लोकांना शस्त्रक्रियेचा काहीही फायदा होत नाही, हे मी स्वत: अनेक वेळेला अनुभवलं आहे.
अत्यंत आग्रही विचार किंवा तीव्र भावना ही एक ऊर्जा असते. या ऊर्जेला योग्य वाट मिळाली नाही तर ती शरीराच्या इतर भागांमध्ये पसरते. पाठीचे स्नायू आणि डोक्याचे स्नायू या ऊर्जेमुळे आकुंचन पावतात आणि त्या आकुंचित स्थितीमध्ये त्यांच्यात जमणारे आम्ल पदार्थ दुखणं सुरू करतात.
स्नायूंप्रमाणेच ही ऊर्जा हृदयाचे ठोके आणि आतड्यांची हालचालसुद्धा उद्दीपित करू शकते.
एखाद्या व्यक्तीतील मानसिक द्वंद्वाचं कारण शोधून काढणारी ही एक कला आहे आणि ती जाणूनबुजून विकसित करावी लागते.
एक मेंदू शस्त्रक्रियातज्ज्ञ म्हणून किंबहुना कुठल्याही प्रकारच्या डॉक्टरने या गोष्टी पूर्णत: समजून घेऊन दैनंदिन उपचार पद्धतींमध्ये उपयोगात आणल्या तर अनेक रुग्णांचे उपचार अधिक सुकर होतील हे निश्चित.
पुण्यातील ‘सेंटर फॉर बिहेवियरल मेडिसिन’ आणि ‘सायनॅप्स ब्रेन अॅण्ड स्पाईन फाऊंडेशन’ या दोन संस्थांनी इंडो-जर्मन विद्यमाने योगासनं, प्राणायाम आणि रोजच्या जीवनातील इतर क्रिया करत असताना हृदयाचे ठोके, रक्तदाब आणि श्वासोच्छश्वास यात होणारे फरक मोजू शकणारं यंत्र विकसित केलं आहे.
गेली तीन वर्षे या यंत्राचा उपयोग भारतात व जर्मनीत होणाऱ्या संशोधनात करण्यात येत आहे. यातून निघणाऱ्या निष्कर्षांचा प्रभाव पुढील काळात उपचारांवर पडेल अशी आशा आहे.
लेखक मेंदू व मणक्याचे शस्त्रक्रियातज्ज्ञ आहेत. brainandspinesurgery60@gmail.com