महाराष्ट्र राज्यस्थापनेनंतर मराठीप्रमाणेच इंग्रजीतही लिहिणाऱ्या लेखकांची जी पिढी बहरली, त्यापैकी किरण नगरकर हे एक महत्त्वाचे लेखक. त्यांची ‘सात सक्कं त्रेचाळीस’ १९७४ मध्ये ‘मौज’नं प्रकाशित केली, पण १९७८ मध्ये ती इंग्रजीत आल्यानंतर अनेक कादंबऱ्या त्यांनी मराठीप्रमाणेच इंग्रजीतही लिहिल्या. ककल्ड आणि जशोदा या इंग्रजीतच नगरकरांनी लिहिल्या, त्या मराठीत भाषांतरित झाल्या. दरम्यान रावण आणि एडी, सात सक्कं त्रेचाळीस, गॉड्स लिटिल सोल्जर  यांचे अनुवाद अन्य युरोपीय भाषांतही झाले.. हे सारं ‘बुकमार्क’च्या वाचकांना माहीतच असेल म्हणा..

पण येत्या शनिवारपासून (पाच एप्रिल) ‘जहांगीर आर्ट गॅलरी’च्या वरच्या गच्चीतल्या छायाचित्रकला दालनात, किरण नगरकरांच्या स्मृती दृश्यरूप करणारं एक प्रदर्शन भरतंय.  त्यातले खुद्द नगरकरांनीच टिपलेले फोटो फार कमीजणांना माहीत असतील. वैचित्र्याची आवड नगरकरांना होती, याची साक्ष ही छायाचित्रं देतील.नगरकर जाहिरातक्षेत्रात कार्यरत होते, त्यावेळच्या काही लक्षणीय जाहिरातीही प्रदर्शनात आहेत. सोबत, रघू राय, सुधारक ओलवे, चिरोदीप चौधरी, सुनील सिप्पी आदी छायाचित्रकारांनी टिपलेली नगरकरांची व्यक्तिचित्रंही इथं पाहाता येतील. ‘पीपीटी’ या संस्थेतर्फे  (फोटोग्राफी प्रमोशन ट्रस्ट) संजय निकम, सुधारक ओलवे, कीर्ती मरोडिया यांनी ‘नगरकरांचं कायमस्वरूपी संग्रहालय नाही, तर प्रदर्शन तरी..’ म्हणून हे प्रदर्शन उभं केलं.  ते दहा एप्रिलपर्यंतच सुरू राहील.  नगरकर हयात असते, तर आजच- दोन एप्रिल रोजी- त्यांचा ८०वा वाढदिवस असता! हे या प्रदर्शनाचं खास निमित्त आहे.

Story img Loader