डॉ. जयदेव पंचवाघ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मेंदू आणि मज्जारज्जूवर केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियांचा इतिहास हा अचंबित करणारा आणि तेवढाच चित्तवेधक आहे. मानवाच्या  अवयवांपैकी सर्वात नाजूक आणि तितकीच महत्त्वाची अशी ही चेतासंस्था आहे. तिच्या शस्त्रक्रियेच्या विकासक्रमात अनेक अतक्र्य घटना आहेत, अत्यंत कुशाग्र बुद्धीच्या व्यक्तींची अथक धडपड आहे आणि प्राचीन काळापासून प्रगत होत गेलेल्या तंत्रज्ञानाची जोड आहे. अशा अत्यंत क्लिष्ट आणि मानवी क्षमतांना सर्वाधिक आव्हान देणाऱ्या या शस्त्रक्रिया म्हणजेच न्यूरोसर्जरी. या शस्त्रक्रियांच्या रोमहर्षक इतिहासाचा मागोवा घेण्यासाठी या लेखमालेचा प्रपंच. या लेखमालेचा प्रकाश विज्ञानाधारित मनोरंजनावर तर पडेलच, पण चेतासंस्थेच्या विकारांच्या लक्षणांवर आणि आधुनिक उपचारांवरसुद्धा या प्रकाशाचे उपयुक्त व महत्त्वाचे प्रकाशकिरण पडतील अशी आशा आहे.

‘‘मित्रांनो.. आज मी तुमच्या समोर एक विशेष वस्तू सादर करणार आहे.. ही वस्तू म्हणजे पेरू देशातील उत्खननात सापडलेली एक कवटी आहे.’’ १८६७ मध्ये त्या काळातील प्रसिद्ध चेतशल्य आणि मेंदूतज्ज्ञ डॉ. पॉल ब्रोका पॅरिसमध्ये एका मोठय़ा वैद्यकीय परिषदेमध्ये बोलत होते..

युद्धामध्ये मार लागून फुटलेल्या किंवा छिद्र पडलेल्या कवटय़ा प्राचीन दफनभूमीतून मिळणे ही काही आश्चर्यजनक गोष्ट नाही, परंतु डॉक्टर ब्रोका त्या दिवशी जी कवटी दाखवत होते त्या कवटीला जाणूनबुजून एक चौकोनी आकाराचे छिद्र करण्यात आलेले होते आणि हे छिद्र केल्यानंतर ती व्यक्ती काही महिने जगलेली दिसत होती. याचं प्रमाण म्हणजे त्या छिद्राच्या सभोवताली नवीन हाड तयार झाल्याच्या खुणा होत्या. अशा प्रकारची कवटी मिळण्याची ही काही पहिलीच घटना नव्हती, परंतु एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीने ती व्यवस्थित तपासून शास्त्रीय परिषदेमध्ये दाखवली जाण्याची मात्र ही पहिलीच वेळ होती.

या संस्मरणीय घटनेची सुरुवात १८६५ साली पेरू देशामध्ये झाली. अमेरिकेचे स्क्वायर नावाचे एक राजदूत पेरूला गेले होते. हे स्क्वायर पुरातत्त्व विज्ञानाचेसुद्धा गाढे अभ्यासक होते. या भेटीमध्ये त्यांना पेरूतील त्यांच्या एका मित्राने ‘इंका’ संस्कृतीच्या ऐतिहासिक भागातील, दफनभूमीमधून मिळालेली एक कवटी भेट दिली. काय विचित्र भेट ही! पण ही कवटी बघून स्क्वायरना यात काही तरी नवीन आणि महत्त्वाचं असल्याचं जाणवलं. त्यांनी ती कवटी न्यूयॉर्कमधील वैद्यकीय विज्ञान विभागाकडे सोपवली. पण, ‘‘प्राचीन काळी युद्धामध्ये कवटीला भोक पडलेल्या अशा अनेक कवटय़ा नेहमीच मिळत असतात,’’ असं म्हणून त्यांनी त्याकडे फार लक्ष दिलं नाही. स्क्वायर यांनी वैतागून ती कवटी परत घेतली आणि युरोपमधल्या प्रसिद्ध मेंदू व चेताविज्ञान शास्त्राचे गाढे अभ्यासक डॉक्टर पॉल ब्रोका यांच्याकडे पाठवली. डॉक्टर ब्रोका यांना मात्र त्या कवटीचं संशोधनातील महत्त्व तात्काळ समजलं. डॉक्टर ब्रोका म्हणजे तेच, ज्यांनी त्यानंतर मानवी मेंदूतील भाषा बोलण्याचं केंद्र नेमकं कुठे असतं ते शोधून काढलं. आज चेताविज्ञान शास्त्रात ते ‘ब्रॉकाज एरिया’ या नावानं ओळखलं जातं.

अशा प्रकारे मिळालेल्या कवटय़ा इ.स.पूर्व १०,००० वर्षांपासून नंतरच्या विविध काळातल्या आहेत. एवढंच नाही तर त्या जगातल्या विविध भागांतून मिळालेल्या आहेत. आज आपल्याला ज्या अतिप्रगत पद्धतीची मेंदूची शस्त्रक्रिया म्हणजेच न्यूरोसर्जरी माहीत आहे तिचा हा अगदी प्राचीन, प्राथमिक आणि जुजबी प्रकार असं म्हटलं तर वावगं ठरू नये.

डॉ. ब्रोकांसमोर प्रश्न असा होता की इतक्या प्राचीन काळी अगदी मुद्दामहून, टोकदार अवजारांच्या साहाय्याने जिवंत माणसाची कवटी उघडण्याचे उद्योग कोणी व कशासाठी केले असावेत? या विषयावर पुढच्या काही वर्षांमध्ये अनेक लोकांनी संशोधन केलं. अर्थात् या संशोधनाला अनेक मर्यादा होत्या. किंबहुना प्राचीन इतिहासाच्या कोणत्याही संशोधनामध्ये, घडलेल्या घटनांची लिखित नोंद उपलब्ध नसणे हा नेहमीच एक अडथळा असतो. त्यामुळेच आणि इतक्या प्राचीन काळी याची लिखित नोंद कोणीही आणि कुठेही केलेली नसल्यामुळे हे संशोधन अवघड आणि किचकट होतं. काही प्रत्यक्ष तर काही अप्रत्यक्ष पुरावे आणि तुटक नोंदी यांच्या साहाय्याने काही निष्कर्ष काढले गेले. मानवाने प्राचीन काळी न्यूरोसर्जरीचा हा प्राथमिक प्रयोग करण्यामागचं सर्वात प्रकर्षांने दिसणारं कारण म्हणजे अत्यंत तीव्र डोकेदुखी. अशा प्रकारची डोकेदुखी कमी व्हावी म्हणून कवटीला छिद्र पाडून त्यातील घाण बाहेर पडेल अशी एक आशा त्या काळातील लोकांना होती आणि अशीही शक्यता आहे की त्यापैकी काही व्यक्तींना खरोखरच मेंदूतल्या गाठींमुळे किंवा रक्तस्रावामुळे डोकेदुखी होत असेल आणि कवटीला जर मोठय़ा आकाराचं भगदाड पाडलं तर आतील दाब कमी होऊन अगदी तात्पुरता का होईना पण उपयोग होत असेल.

मानवी कवटी ही एक बंदिस्त पेटीप्रमाणे असते. यात कोणत्याही कारणांनी दाब वाढला तर पोटाच्या कातडीप्रमाणे कवटीचे हाड प्रसरण पावू शकत नाही. त्यामुळे कवटीच्या आतला दाब वाढून व्यक्ती बेशुद्ध होऊ शकते. अगदी आजही काही विशिष्ट प्रसंगी असा दाब वाढल्यास कवटीचा एक मोठा भाग आम्ही वेगळा काढून ठेवतो, जेणेकरून मेंदूला प्रसरण पावण्यासाठी जागा मिळावी.

प्राचीन काळी कवटीला भोक पाडण्याचं आणखी एक कारण म्हणजे मानसिक आजार. मानसिक आजार नेमके का होतात हे अगदी आत्ता आत्तापर्यंत माहीत नव्हतं. त्या काळच्या विविध समजुतींपैकी एक म्हणजे कवटीच्या आत भूत किंवा पिशाच्च जाऊन, घर करून बसल्यामुळे या व्यक्ती वेडय़ासारख्या वागतात. या भुतांना किंवा पिशाच्चांना हाकलून लावायचं असेल तर बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा करून द्यायला हवा ! कवटीला मोठं भोक पाडण्याइतका सहज मार्ग दुसरा कोणता?

तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अपस्मार म्हणजेच झटके येणे अर्थात एपिलेप्सी. एपिलेप्टिक फिट किंवा झटका येणाऱ्या व्यक्तींकडे बघून हा नेमका काय प्रकार आहे हे त्या वेळच्या वैद्यांनासुद्धा कळत नसे. झटक्यांच्या बऱ्याच प्रकारांमध्ये झटका येण्याआधी, झटक्यादरम्यान आणि अगदी नंतरसुद्धा त्या व्यक्तीच्या वागणुकीत व व्यक्तिमत्त्वात फरक पडतो, त्यामुळे हा काही तरी आधिभौतिक प्रकार कवटीच्या आत घडत असावा असा निष्कर्ष निघाला नाही तरच नवल. इतर फारसे काहीही उपाय नसल्यामुळे अशा आजारासाठी कवटीला भोक पाडून त्यातील अतिरिक्त शक्ती बाहेर काढून घ्यावी या उद्देशानेसुद्धा कवटीत ही छिद्रे किंवा भगदाडे पाडण्यात आली आणि असे पुरावे उपलब्ध आहेत.

कवटीला मुद्दामहून भोक पाडण्याचं चौथं कारण म्हणजे अपघातात किंवा युद्धात कवटीला झालेलं फ्रॅक्चर. अशा वेळी तुटून आत घुसलेला कवटीचा तुकडा वेळेत बाहेर काढल्यास मेंदूत होणारा जंतुसंसर्ग टळू शकतो हे प्राचीन काळापासून चौकस बुद्धीच्या वैद्यांना माहीत झालं होतं. मात्र हा तुकडा बाहेर काढण्यासाठी फ्रॅक्चर झालेल्या जागेच्या जवळ आणखी एक मोठं छिद्र किंवा भगदाड पाडावं लागतं हेसुद्धा लक्षात आलं होतं. छिद्र पाडलेल्या या काही कवटय़ांपैकी हे एक महत्त्वाचं कारण. न्यूरोसर्जरी (चेताशल्य) मध्ये मेंदूवर किंवा मज्जारज्जूवर शस्त्रक्रिया करायची असल्यास कवटीचा किंवा मणक्याचा काही भाग उघडणे क्रमप्राप्त असते. कवटी उघडण्याच्या प्रक्रियेमध्ये सोळाव्या शतकापासून ते आजतागायत अनेक सुधारणा होत गेल्या. पहिल्या महायुद्धात व त्यानंतर यात झपाटय़ाने प्रगती होत गेली.

आजच्या म्हणजेच अत्याधुनिक न्यूरोसर्जरीमध्ये अत्यंत अचूकपणे आणि नाजूकपणे कवटी उघडण्याचे तंत्रज्ञान विकसित झालं आहे. त्यासाठी अत्यंत प्रगत अशा धातूंपासून बनवलेले ड्रिल्स उपयोगात आणली जातात. गेल्या पाच ते दहा वर्षांत हाडं कापण्यासाठी सक्षम असलेल्या तीव्रतेचे अल्ट्रासोनिक तरंगसुद्धा वापरण्यास सुरुवात झालेली आहे. आज मेंदूच्या अवघड आणि क्लिष्ट शस्त्रक्रियांमध्ये आम्हाला अशा प्रगत तंत्रज्ञानाची अमूल्य मदत होते. परंतु इतिहासाच्या खांद्यावर उभं राहून अगदी थोडं जरी मागे बघितलं तरी डॉ. ब्रोका यांनी अभ्यासलेली ती कवटी आणि मानवाची इतर व्यक्तींना रोगमुक्त करण्याची धडपड अगदी स्पष्ट दिसते. आजच्या न्यूरोसर्जरीमध्ये कवटी उघडणं ही तर शस्त्रक्रियेतील अत्यंत प्राथमिक आणि साधी पायरी आहे. परंतु प्राचीन काळामध्ये फक्त एवढं करण्यासाठी मनुष्यांनी किती खटपट केली याचं जिवंत उदाहरण म्हणजे डॉ. ब्रोका यांनी त्या दिवशी पॅरिसमध्ये दाखवलेली कवटी होय.

लेखक चेतासंस्था शल्यविशारद आहेत. jpanchawagh@gmail.com