|| डॉ. पराग काळकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दहा हजार कोटींची पुण्याची शैक्षणिक अर्थसाखळी पुण्याची ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट अशी पुण्याची ओळख आहे. अनेकविध शैक्षणिक संस्थांच्या पुण्यातील अस्तित्वामुळे ही ओळख निर्माण झाली आहे. महाविद्यायलये, विद्यापीठे, संशोधन संस्था, स्पर्धा परीक्षा शिकवणी वर्ग या सर्वाच्या माध्यमातून शैक्षणिक अर्थसाखळी निर्माण झाली आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून पुणे शहर आणि परिसराचा झालेला कायापालट, त्यातून शहरात निर्माण होणारी संपत्ती निर्मिती याचा धांडोळा घेणे आवश्यक ठरते.
शिक्षणाचे केंद्र म्हणून पुण्याच्या जडणघडणीचा इतिहास जवळपास दोनशे वर्ष जुना आहे. ब्रिटिशांनी डेक्कन कॉलेजची स्थापना १८२१मध्ये केली. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी १८४०मध्ये शाळा सुरू केली. त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व डेक्कन एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, शिक्षण प्रसारक मंडळी, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी अशा संस्थांची स्थापना झाली. स्वातंत्र्योत्तर कालखंडात पुणे विद्यापीठाची स्थापना झाली. तर सिम्बायोसिस, एमआयटी, भारती विद्यापीठ, विश्वकर्मा शिक्षण संस्था अशा अनेक शिक्षण संस्था सुरू झाल्या. या संस्थांतून पूर्वप्राथमिक शिक्षणापासून पोस्ट डॉकपर्यंतचे विविध अभ्यासक्रम उपलब्ध झाले आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगर, जिल्ह्यातील शिक्षण संस्थांनी शिक्षणाचा विस्तार होण्यास मदत झाली. विशेष म्हणजे पुण्यात स्थापन झालेल्या शिक्षण संस्थांनी राज्यातील अन्य ठिकाणी महाविद्यालये, शिक्षण संकुले सुरू केली आहेत. तर सिम्बायोसिस, एमआयटी, भारती विद्यापीठ, डेक्कन एज्युकेशन सोसायटी अशा संस्थांनी परराज्यांमध्येही शिक्षण संकुले सुरू केली आहेत. सद्यस्थितीमध्ये पुण्यामधे जवळपास २१ विद्यापीठे आहेत. त्यात अभिमत, खासगी आणि राज्य विद्यापीठांचा समावेश होतो. एका शहरात एवढी विद्यापीठे असण्याचे उदाहरण देशात अन्यत्र जवळपास दुर्मीळ म्हणावे असे आहे. पुण्यामधे विविध विद्याशाखांची दोनशेहुन अधिक महाविद्यालये आहेत. त्यात कला, वाणिज्य, विज्ञान यासारखी पारंपरिक महाविद्यालये. तसेच अभियांत्रिकी, औषधनिर्माण, वास्तुकला, संगणक, व्यवस्थापन, वैद्यकीय महाविद्यालये आहेत. या सर्व विद्याशाखांची मिळून विद्यार्थीसंख्या दहा लाखांहून अधिक आहे. या शिवाय पुण्यात सात राष्ट्रीय संशोधन संस्था आहेत. तसेच स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठीचे केंद्र म्हणूनही पुण्यात राज्यभरातून विद्यार्थी येतात. या द्वारे शिक्षणाचे केंद्र म्हणून पुण्याची ओळख अधिक ठळक होत गेली, तसेच पुण्यात शिक्षणाची आणि त्या अनुषंगाने आवश्यक अशी एक व्यवस्था (इकोसिस्टिम) निर्माण होत गेली.
शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी
केवळ पदवीपासूनच्या शिक्षणाचा जरी विचार केला, तरी पुण्यात राज्याच्या कानाकोपऱ्यातील, परराज्यातील आणि परदेशातील विद्यार्थी मिळून दरवर्षी किमान पाच ते सहा लाख विद्यार्थी पुण्यात येतात. या विद्यार्थ्यांना पदवी शिक्षण किंवा पदव्युत्तर शिक्षण नाही, तर त्याबरोबरच त्याचा सर्वागीण विकास होण्यासाठीच्या सोयीसुविधा सहजपणे उपलब्ध होतात. त्यात इंग्रजी, गणित, विज्ञान, संगणक, अकाउंटन्सी, कॉस्टिंग, शासकीय पदभरतीसाठीच्या स्पर्धा परीक्षा अशा अनेक विषयांच्यासाठीचे शिकवणी वर्गही आहेत. या शिकवणी वर्गाची संख्या पाचशेहून अधिक आहे. या प्रत्येक वर्गात तीस ते पाचशे विद्यार्थी असतात. त्यामुळे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाच्या जोडीनं खासगी शिकवणी वर्गाची होणारी उलाढाल बरीच मोठी आहे. देशभरातून येणाऱ्या विद्यार्थ्यांप्रमाणेच पुणे हे परदेशी विद्यार्थ्यांचे आवडते शहर आहे. भारतात दरवर्षी जवळपास ५० हजार परदेशी विद्यार्थी येतात. त्यातील मोठा टक्का पुण्यात येतो. आशियाई, आफ्रिकन, मध्य पूर्व देशांतून शिक्षणासाठी दरवर्षी सरासरी पाच हजार विद्यार्थी पुण्यात येतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सिम्बायोसिस विद्यापीठ या शिक्षण संस्थांमध्ये परदेशी विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. परदेशी विद्यार्थी प्रामुख्याने पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या तयारीसाठी पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लाखाच्या घरात आहे. मध्यवर्ती पेठा या विद्यार्थ्यांचा प्रमुख परिसर आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
निवास व्यवस्था, खाणावळी आणि बरंच काही..
पुण्यामधे पूर्वी एखाद्या भागात, एखादी वस्तू मिळायची. त्या वस्तूसाठी शहराच्या कोणत्याही भागातून त्याच ठरावीक भागात जावं लागायचं. पण जसजशी विद्यार्थी संख्या आणि शिक्षण संस्था वाढल्या, शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात विद्यार्थीकेंद्री वस्तू आणि सेवा वाढू लागल्याचे आपल्याला दिसून येतं. सुरुवातीला शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी कालांतराने नोकरी मिळवून पुण्यातच स्थायिक झाले, पुण्याची उपनगरे इतकी विस्तारली की क्षेत्रफळाचा विचार करता पुणे आता मुंबईपेक्षाही मोठे आहे. या विस्तारातूनच एक वेगळीच सर्वसमावेशक संस्कृती उदयास आली, ज्याला इंग्रजीत कॉस्मोपॉलिटन म्हटलं जातं. पुण्याबाहेरून येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वसतिगृहात जागा मिळत नाही. त्यामुळे पुण्याबाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच निवास, भोजन, फिरणे, मनोरंजन, अभ्यास साहित्य, दैनंदिन वापराच्या वस्तू, अशा विविध वस्तूंची, सेवांची आणि सुविधांची साखळी निर्माण होत गेली आहे. पुण्यामध्ये दहा रुपयांपासून हजार रुपयांपर्यंतचे खाद्यपदार्थ मिळतात. तसेच जगातील सगळय़ा प्रकारचे खाद्यपदार्थ शहराच्या सर्वच भागांमध्ये उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत नाही. पहाटे चार वाजल्यापासून खाद्य पदार्थाची दुकाने सुरू होतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुणे शहराच्या विविध भागांमध्ये अभ्यासिका तयार झाल्या आहेत. त्यामुळे अभ्यासिकांची वेगळी संस्कृती निर्माण झाली असे म्हणता येईल. तसंच गेल्या काही वर्षांत परराज्यांतून आणि परदेशी विद्यार्थ्यांची पुण्यातील वाढती संख्या पाहून वसतिगृहांचा नवा व्यवसाय निर्माण झाला आहे. म्हणजे पारंपरिक वसतिगृहांप्रमाणे इंटरनेट वायफाय, स्वच्छता, कपडे धुण्यापासून सर्व सुविधा उपलब्ध असलेली उच्चभ्रू वसतिगृहे शहराच्या उपनगरांमध्ये तयार झाली आहेत. विशेष म्हणजे मोठय़ा कंपन्या या वसतिगृहांच्या क्षेत्रात उतरल्या आहेत. किमान आठ हजार ते चाळीस हजारांपर्यंतचे शुल्क या वसतिगृहांसाठी आकारले जाते.
पुण्याची शैक्षणिक अर्थसाखळी
पदवी, पदव्युत्तर पदवी, संशोधन, स्पर्धा परीक्षा, सनदी लेखापाल, कंपनी सचिव असे अनेकोविध अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी पुण्यात येतात. त्यातून पुण्याच्या आर्थिक वैभवामध्ये वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून येत असलेली संपत्ती शैक्षणिक संस्थांच्या विकासाबरोबरच आसपासच्या परिसराच्या विकासासाठीही अत्यंत पूरक ठरली आहे. पुणे शहरातील शिक्षणाची अर्थसाखळी जवळपास दहा हजार कोटींच्या घरात आहे. फोटोकॉपी करून देणारे दुकानदार, विविध सेवा पुरवठादार, घर भाडय़ाने देणारे व्यावसायिक, खानावळी-डबे पुरवणारे व्यावसायिक, पुस्तक दुकानदार, कपडे, मनोरंजन, शिकवणी वर्ग असे एकूणात पेनापासून संगणकापर्यंतच्या सर्व वस्तू आणि सेवांची विद्यार्थ्यांमुळे बाजारपेठ निर्माण झाली आहे. पुण्याबाहेरून म्हणजे राज्यातील विविध जिल्हे, परराज्य आणि परदेशी विद्यार्थी मिळून दरवर्षी सुमारे सात लाख विद्यार्थी पुण्यात येतात. प्रत्येक विद्यार्थ्यांचा मासिक खर्च पाच ते सात हजार रुपये गृहित धरला, तरी शिक्षणाच्या निमित्ताने अतिरिक्त उपलब्ध असणारी बाजारपेठ किमान दोन ते तीन हजार कोटीच्या आसपास आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शहरात नवनवे व्यवसाय निर्माण होतात, रोजगार निर्मिती होते, मोठी आर्थिक उलाढाल होते. केवळ शिक्षणामुळे होणारी शहराची संपत्ती निर्मिती हा खरोखरच अभ्यास करण्यासारखा विषय आहे.
पुण्याकडे ओढा का?
पुणे शहरातील विद्यार्थी बहुतांश करून शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतात. पण शहरातील उपगनगरांमध्ये, शहराच्या सीमारेषेवर सुरू झालेल्या शिक्षण संस्थांमध्ये येणारे विद्यार्थी पुण्याबाहेरचे असतात. त्यामुळे या शिक्षण संस्थांकडून विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, भोजन अशा सुविधा शिक्षण संकुलातच उपलब्ध करून दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सोयीच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची असल्याने विद्यार्थ्यांची या शिक्षण संस्थांना पसंती मिळते. त्याशिवााय विविध प्रकारच्या विद्याशाखांच्या शिक्षणाची व्यवस्था शहरातील महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये आहे. पुणे जिल्हा हा राज्यातील महत्वाचं औद्योगिक केंद्र आहे. हिंजवडी, खराडी आयटी पार्क, पिंपरी चिंचवड या उद्योगनगरीतील अनेक कंपन्यांमध्ये इंटर्नशीप, नोकरीच्या संधी निर्माण होतात. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होता होताच कॅम्पस प्लेसमेंटद्वारे विद्यार्थ्यांची कंपन्यांकडून नोकरीसाठी निवड केली जाते. शिक्षणाबरोबरच कला, क्रीडा आणि सांस्कृतिक विकास होऊ शकतो याचीही विद्यार्थ्यांना कल्पना आहे. त्यामुळे चांगल्या शिक्षण संस्थांत शिकणे, उज्ज्वल करिअरसाठी नोकरीच्या झटपट संधी मिळवणे या दृष्टीने विद्यार्थ्यांना पुणे महत्त्वाचे वाटते. एखाद्या शहराचा आर्थिक विकास हा त्या शहराच्या सर्वागीण विकासासाठी महत्त्वाचा असतो. शिक्षणाच्या निमित्ताने लाखो विद्यार्थी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून, आणि काही प्रमाणात जगभरातून पुण्याच्या शैक्षणिक विश्वाचा आणि सांस्कृतिक अनुभूतीचा घटक होण्यासाठी पुण्यात येत असतात. आलेला प्रत्येक जण फक्त शिक्षण घेऊन आपल्या गावी परत जात नाही. पुण्याचे पाणी, पुण्याची हवा, पुण्याची संस्कृती सर्वाना आपलंसं करते आणि मग तो माणूस कळत-नकळत कायमचा पुणेकर होऊन जातो. गेल्या काही दशकांमध्ये असे हजारो विद्यार्थी कायमस्वरूपी पुणेकर होऊन गेले आहेत.
नव्या संस्थांमुळे अर्थसाखळीत वाढ
पुण्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचे शिक्षण घेऊ शकता, म्हणजेच अनेकविध विद्या शाखेमध्ये पदवीपासून पदव्युत्तपर्यंतच्या शिक्षणाची सोय पुरेशा प्रमाणात पुणे शहरामध्ये उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे शिक्षणानंतरच्या विविध प्रकारच्या संधीही उपलब्ध आहेत. स्वत:च्या उद्योगापासून ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीची संधी पुण्यात सहजपणे उपलब्ध होऊ शकते. खरं सांगायचं तर पुणे तिथे काय उणे या म्हणीचा सार्थ उपयोग शिक्षण आणि शिक्षण व्यवस्थेशी निगडित असलेल्या सर्व इकोसिस्टीममधून आपल्याला बघायला मिळतो. या पुढील काळात पुण्यामध्ये आणखी काही विद्यापीठे या शहराच्या लौकिकामध्ये भर घालण्यासाठी येऊ घातलेली आहेत. त्यात सहकार विद्यापीठ, डिजिटल विद्यापीठ आणि क्रीडा विद्यापीठासारख्या नवीन संकल्पनांचा समावेश आहे. येत्या काळात निर्माण होणाऱ्या नव्या शैक्षणिक संधींचा लाभ मिळवण्यासाठी पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणखी वाढणार यात काहीच शंका नाही. स्वाभाविकच शहराची अर्थसाखळीही त्याच पद्धतीने वाढत जाईल.
(लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता आहेत)