स्मृती अत्यंत सूक्ष्म शक्ती आहे. तिचा विचारही तसाच करायला हवा. जगातील कर्माच्या मुळाशी चांगल्या आणि वाईट कामना असतात. कामनांच्या मुळाशी संकल्प असतो. तो मनातून उगवतो. मन, संकल्प, कामना आणि कर्म ही साखळी हे जीवनाचे रूप आहे. कर्म संपले तरी त्याचा संस्कार चित्तावर उमटतो. तो शुभ आणि अशुभही असतो. कारण कर्माचे रूप तसे असते. असे संस्कार चित्तावर ठसतात आणि तिथे टिकून राहतात. यालाच ‘स्मृती’ म्हणतात.

सगळय़ा कर्माचे संस्कार मनात राहिले तर ते असह्य ओझे होईल. त्यामुळे मन काही स्मृती दूर लोटते. ज्या राहतात त्यांना ‘स्मृती-शेष’ म्हणतात. माणसाला त्या भूतकाळाशी जोडून ठेवतात. मागे उरणाऱ्या स्मृती कोणत्या कर्माच्या आहेत यावर माणसाचे पुढचे आयुष्य अवलंबून असते. पण या स्मृतीमध्ये निवड कशी करायची?

स्मृतींची अचूक निवड आणि तिची शक्ती वाढवणे या दोन्ही गोष्टींसाठी विनोबांनी दोन मार्ग सांगितले आहेत. ‘विवेक’ आणि ‘वीर्यरक्षण.’ विवेकामुळे स्मृती निवडणे सोपे जाते तर वीर्यरक्षणामुळे तिची शक्ती वाढते.

विनोबांच्या साहित्यात ‘ब्रह्मचर्य’, ‘वीर्यरक्षण’ असे शब्द येतात. ते आपल्यापैकी अनेकांना अमान्य असतात. तथापि त्या संकल्पना त्यांनी सरधोपटपणे वापरलेल्या नाहीत. या दोहोंचा विचार ‘सर्व प्रकारचा संयम’ असाही घेता येईल आणि तिथे दुमत होण्याचे कारण नाही. स्मृतींच्या अनुषंगाने वीर्यरक्षण हा शब्द आल्याने हे सांगावेसे वाटले. विनोबांनी या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी स्वत:चा जीवनानुभवही सांगितला आहे.

‘मला जर कुणी व्यक्ती भेटायला आली आणि तासभर बोलली तर नंतर माझ्या लक्षात फार काही राहात नाही. एवढेच नव्हे तर मी माझे चरित्र लिहायला बसलो तर २०-२५ पानांच्या पलीकडे ते जाणार नाही.’ स्मृतींच्या निवडीची त्यांची साधना यावरून ध्यानी येते.

वीर्यसाधनेमुळे स्मृतिशक्ती विकसित होते, बलवती होते, ‘माझा असा अनुभव आहे’ असे ते म्हणतात तेव्हा खरोखरच तसे असू शकते. विनोबांचे बुद्धिवैभव पाहता त्यांचे हे प्रतिपादन पटते. शरीर थकत गेले तरी त्यांच्या प्रज्ञेचा विकास सुरूच होता. अर्थात हा सर्व अनुभवाचा आणि साधनेचा विषय आहे. विनोबांनीही तसेच म्हटले आहे.

स्मृतिशक्तीचा विकास करण्यासाठी विनोबांनी आणखी एक मार्ग सांगितला आहे, आत्मज्ञानाचा. माणूस मुळात स्वत:बद्दल उदार असतो. तो स्वत:ला माफ करतो. असे घडले नसते तर माणसाने आत्महत्या केली असती. ही उदारता, क्षमाशीलता तो जगाबाबत दाखवत नाही. कारण त्याच्यात आपपरभाव असतो. आत्मज्ञान नसल्याचे ते लक्षण आहे. हे आत्मज्ञान म्हणजे सर्वाप्रति सहानुभूती, मी या विश्वात आहे आणि हे विश्वही माझ्यात आहे, ही भावना. संतांच्या भाषेत सांगायचे तर ‘भूतमात्री हरी’

स्मृतीमध्ये चांगल्या गोष्टी राहाव्यात, तिची शक्ती उत्तरोत्तर वाढावी आणि आपपरभाव नाहीसा व्हावा; हा या शक्तीचा यथार्थ विकास आहे.

– अतुल सुलाखे  jayjagat24 @gmail.com

Story img Loader