९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फा. फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या छापील भाषणाचा हा संपादित अंश..

मानवी जीवन हे गूढ आणि रहस्यमय आहे. आपल्या जीवनाला अनेक पदर आहेत. त्यांपैकी साहित्य हा एक पदर आहे. मानवी जीवनातील गूढ जाणून घेण्याची माणसाला सतत उत्सुकता लागलेली असते. माणसाच्या मनात विचारांचे आणि भावनांचे सतत कल्लोळ उठत असतात. आपल्या विचारांना आणि भावनांना एखादा साहित्यिक शब्दरूप कसे देतो? कवयित्री संजीवनी मराठे आपल्या एका कवितेत म्हणतात, ‘मी न सांगायची कुणाला, कविता स्फुरते कशी?’

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

कवीला कविता, लेखकाला कथा, कादंबरी, निसर्गलेखन कसे काय साधते? त्याच्या मनात विचारांची घुसळण सतत चालत असते आणि कळीला जसे उमलून यावेसे वाटते, तसे एक दिवस लेखकाला लिहावेसे वाटते. कळीला जसे उमलण्यापासून कुणीच थांबवू शकत नाही, तसेच लेखकाला व्यक्त होण्यास कुणी प्रतिबंध करू शकत नाही. ही चिंतनशीलता अबोध मनाचा ताबा घेते आणि एक दिवस ती शब्दांच्या रूपाने प्रकट होते. या लेखनप्रक्रियेची तुलना एखाद्या गर्भवती स्त्रीबरोबर करता येईल. जेव्हा तिला जाणवते की, तिच्या उदरात अंकुर फुलतो आहे, तेव्हा तीही फुलते आणि तो आनंद व्यक्त केल्याशिवाय तिला राहवत नाही. लेखनाचा प्रवासही काहीसा असाच असतो. विचाराचे एखादे बीज कवी-लेखकाच्या अंतर्मनात पडते. कधी ते त्याच्या अबोध मनात जाते. दरम्यान लेखक अनेक प्रकारच्या अनुभवांतून जात असतो. ते बीज मात्र आतून काहीतरी सांगत असते. काही प्रकारांचे बी मातीत पेरले की, दिवसा-दोन दिवसांत सशाच्या डोळ्यांनी लुकलुक पाहू लागते. पहिल्या पावसामध्ये हा अनुभव येतो. चैत्रामध्ये भाजून निघालेली भूमी पहिल्या पावसानंतर अचानक बीजांकुरित होते. आफ्रिकेमध्ये मात्र काही वृक्ष असे आहेत की, त्यांची बीजे मातीत पडल्यानंतर खूप वर्षांनंतर त्यांना कोंब फुटतात. लेखकाचे असेच असते. कधी त्याची चिंतनशीलता मनाच्या गाभाऱ्यामध्ये काही दिवस, काही महिने, कधीकधी काही वर्षेही दडून बसते आणि मगच ती शब्दरूप घेते.

साहित्यिकाच्या या सृजनशीलतेला आपण ‘प्रतिभा’ म्हणतो. प्रतिभा, प्रतिभा म्हणजे काय? एका थेंबातून निर्झराचा प्रवास सुरू होऊन पुढे अनेक निर्झर त्याला मिळत जातात, तो विस्तारत जातो. झाडाझुडपांतून, खाचखळग्यांतून, कधी उंचावरून, कधी सपाटीवरून तो बहरतच जातो आणि मग एक दिवस हा महाप्रपात एखाद्या कडय़ावरून उसळतो, कोसळतो आणि साऱ्यांचे लक्ष वेधून घेतो. त्याला आपण धबधबा म्हणतो. प्रतिभेचा खडतर प्रवास असाच काहीसा असतो.

लेखक जेव्हा लिहायला बसतो, तेव्हा त्याची अंतर्दृष्टी जागृत होते आणि मनाच्या कोषात साठवलेले सगळे अनुभव कथा, कादंबरी, कविता, नाटक, ललित लेख यांच्या रूपाने कागदावर उतरतात. साहित्यिकाचे अनुभवविश्व जितके व्यापक, त्याची चिंतनशीलता जितकी सखोल, त्याची कल्पनाशक्ती जितकी प्रत्ययकारी आणि त्याची अंतर्दृष्टी जितकी जागृत, त्या प्रमाणात त्याच्या साहित्याची गुणवत्ता ठरत असते आणि ते अभिजात पदाला पोहोचते. उदा. जॉन स्टाइनबर्ग यांची ‘द ग्रेप्स् ऑफ रॉथ’ ही कादंबरी! तीसच्या दशकातील मंदीच्या काळामध्ये अमेरिकेत अनेकांची अन्नान्नदशा झाली. काम मिळविण्यासाठी मोठय़ा प्रमाणात स्थलांतरे होऊ लागली. ओक्लोहोमा या विभागातून बेकारांचे तांडेच्या तांडे कॅलिफोर्नियाच्या दिशेने निघाले. अनेकांनी हे तांडे जाताना पाहिले, मात्र जॉन स्टाइनबर्ग यांना त्यांची होणारी होरपळ, त्यांना होत असलेल्या यातना, ते उपसत असलेले कष्ट, त्यांची चाललेली धडपड आणि जगण्याची जिद्दही जाणवली. त्यांच्यातला संवेदनशील लेखक जागृत झाला आणि ‘द ग्रेप्स् ऑफ रॉथ’ या अजरामर ग्रंथाची निर्मिती झाली.

हे अंतर्दृष्टीचे किंवा प्रतिभेचे वरदान वैज्ञानिकाला किंवा आध्यात्मिक व्यक्तीलादेखील लाभलेले असते. वैज्ञानिक त्यामुळे शोध लावतात. उदा. गॅलिलिओला लागलेला सूर्य स्थिर असल्याचा शोध आणि आध्यात्मिक क्षेत्रात मदर तेरेसा यांना लाभलेली अंतर्दृष्टी. त्यामुळे जे रंजले-गांजले आहेत, त्यांच्यात त्यांना देव दिसू लागला. थोडक्यात, आपण पाहतो, पण आपल्याला दिसत नाही. प्रतिभावंतांना मात्र ते दिसते. हाच त्यांच्यामधील व आपल्यामधील फरक आहे.

उत्तम साहित्याच्या वाचनामुळे आपल्याला पराकोटीचा विविधांगी अनुभव येतो. कधी आपण आनंदाच्या लाटेवर लहरतो, तर कधी दु:खाने गहिवरतो. कधी आपल्याला जीवनाच्या अर्थाच्या प्रश्नांविषयी उत्तरे मिळतात, तर कधी व्यसनांच्या किंवा वासनांच्या गर्तेतून बाहेर पडण्यास मदत होते. कधी आपल्याला विश्वाच्या अनंततेचे भान येते, कधी विश्वाचे आर्त हृदयाला भिडते; तर कधी मानवी आत्म्याच्या महत्ततेचे दर्शन घडते. अशा प्रकारे आपले जीवन सुंदर व संपन्न होऊन आपल्या जीवनाला दिशा मिळू शकते.

मराठी साहित्य – मुमुर्षू?

अलीकडे मराठी भाषेच्या भवितव्याविषयी चिंता व्यक्त केली जाते. ती मुमुर्षू.. म्हणजे मरणपथाला लागली आहे, असे सांगितले जाते. जे जे जिवंत असते, त्यांच्यापुढे जगण्याची आव्हाने असतात. त्यावर मात करून ते टिकाव धरते. त्याचप्रमाणे मराठी भाषेपुढे आव्हाने आहेत. उदा. आजची सर्वव्यापी डिजिटल साधने, लोकव्यवहारातील हिंदीचे वाढते प्रस्थ, परदेशी भाषांचे वाढते महत्त्व आणि विशेष म्हणजे मराठी माणसाचा जन्मजात न्यूनगंड, इत्यादी. परंतु तसे जर असेल, तर आजघडीला शेकडो दिवाळी अंक प्रसिद्ध होतात, लक्षवेधी मराठी साहित्य निर्माण होते, मराठी वृत्तपत्रांत दोन-दोन पानांच्या मराठी नाटकांच्या जाहिराती येतात, गाजलेल्या मराठी पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या प्रसिद्ध होतात. या सर्वाचा आस्वाद मराठी माणूसच घेतो आहे ना? म्हणूनच मराठी माणसाला विचारावेसे वाटते, ‘भ्रांत तुम्हां का पडे? मायबोलीचे दूध प्याला आहात ना?’ आता गेल्या वीस-पंचवीस वर्षांत मराठी बाळे इंग्रजी माध्यमात शिकून वाघिणीचे दूध पिऊ लागली आहेत, हे खरे; परंतु आजही महाराष्ट्रातील ऐंशी टक्के शाळा मराठी माध्यमाच्याच आहेत ना?

‘पूर्व दिव्य ज्यांचे, त्यांना रम्य भावी काळ’ असे कवी विनायक सांगून गेले. आपले पूर्वदिव्य काय, ते संतसाहित्याने सिद्ध केलेले आहे. आज चार मराठी लेखकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले आहेत. (अर्थात हिंदीला अकरा व कन्नडला आठ पुरस्कार मिळालेले आहेत. आपल्याला खूप पल्ला गाठायचा आहे.) काही मोजक्या मराठी पुस्तकांची अन्य भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत आणि होत आहेत. हे सर्व आश्वासक आहे.

वेदना-साहित्याची जननी

वेदना हा एक मूलभूत मानवी अनुभव आहे. वेदनेतून प्रेरणा घेऊन अनेक साहित्यिकांनी उत्कृष्ट साहित्याची निर्मिती केली आहे. साहित्यिकाच्या, अस्तित्वाच्या अंतरात्म्यापर्यंत ती पोहोचलेली असते म्हणून वेदना ही साहित्याची जननी ठरलेली आहे. वेदना या मनुष्यमात्रांच्या असोत, पशुपक्ष्यांच्या असोत किंवा वृक्षवेलींच्या असोत, त्या माणसाला, त्याच्या आत्म्याला गदगदून हलवतातच.

एकोणिसाव्या शतकात विकसित झालेल्या ‘ब्लॅक लिटरेचर’मध्ये तत्कालीन गुलामगिरीत खितपत पडलेल्या कृष्णवर्णीयांच्या नरकयातनांचे दर्शन घडते. साहित्याला दिलेले ते वेगळे वळण होते आणि जगाचे त्या साहित्याकडे लक्ष वेधले गेले; कारण वेदनेबरोबर त्या साहित्यात अभिजातताही होती. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठी साहित्याच्या वृक्षाला दलित साहित्याच्या रूपाने रसरशीत धुमारे फुटले आणि कवितांच्या व आत्मचरित्रांच्या रूपात ते व्यक्त होऊ लागले. वंचित व शोषितांची दखल घेण्यात आणि त्यांच्या साहित्याचे योग्य मूल्यमापन करण्यात प्रस्थापित समीक्षक कमी पडले. वेदना ही सर्वव्यापी आहे. त्याचे उदाहरण म्हणजे पॅलेस्टिनी लोक कसे इस्रायलपुरस्कृत अत्याचाराला अलीकडे (१९४८ नंतर) तोंड देत आहेत, हे मी पॅलेस्टिनमधल्या माझ्या वास्तव्यात डोळ्यांनी पाहिले आणि तेथल्या अभ्याससत्रावेळी त्याविषयी ऐकलेसुद्धा. मनुष्य जेव्हा वेदनेत असतो आणि त्याचे तोंड बंद केले जाते, तेव्हा त्याचे हृदय बोलू लागते. काही पॅलेस्टिनी कवितांचा अनुवाद माझ्या वाचनात आला. रक्तात बुडवलेल्या लेखणीने केलेले ते काव्यलेखन आहे.

जे काळजातून निघते, ते काळजाला भिडतेच आणि वाचकाला अंतर्मुख करते. साहित्य हा सत्याचा आविष्कार आहे. लेखक आपल्या साहित्यकृतीतून माणसाचा शोध घेत असतो आणि विशेषत: स्खलनशील माणसामध्ये असा शोध लवकर लागतो. कारण माणसाचे हृदय हे कुरुक्षेत्र आहे. तिथे बऱ्यावाईटांचा संघर्ष होत असतो. त्या संघर्षांला भिडता भिडता माणूस थकून जातो. परंतु संघर्ष जीवनाचा अविभाज्य भाग आहे.. ज्याच्या काळजातून काटा आरपार जातो आणि त्या काटय़ाची लेखणी करून जो लिहितो, अशी साहित्यकृती अभिजात पदाला पोहोचते. कलात्मक रीतीने वर्णन केलेली वेदना रसिकाला एक प्रकारचा इंद्रियातील आनंद देत असते. यालाच समीक्षक ब्रह्मानंदाच्या जातीचा आनंद समजतात.

साहित्याचे व्यासपीठ

प्रत्येक क्षेत्राचे स्वतंत्र व्यासपीठ असते. त्यांचे व्यासपीठ त्या त्या क्षेत्रापुरते मर्यादित असते आणि असले पाहिजे. आपण कधी कधी राजकीय व्यक्तींना अनेक प्रकारच्या कार्यक्रमांच्या व्यासपीठावर बसवत असतो. उस्मानाबादच्या संमेलनाचे व्यासपीठावर स्थानापन्न न होण्याचा निर्णय राजकारणी मंडळींनी मोठय़ा मनाने घेतलेला आहे. एक नवीन पायंडा उस्मानाबादच्या संमेलनातून सुरू होत आहे. साहित्य संमेलने हे साहित्यिकांचे व्यासपीठ आहे आणि तिथे अग्रपूजेचा मान साहित्यिकांचाच असतो. एक साहित्यप्रेमी म्हणून राजकीय व्यक्तींनी अवश्य संमेलनाला हजर राहावे. सरकारने आपल्या सांस्कृतिक धोरणाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून पुतळे उभारण्याऐवजी साहित्य संमेलनाला पुरेसे अनुदान द्यावे. दुष्काळग्रस्त भागात आणि श्रीमंत भागात जेव्हा संमेलने होतात, तेव्हा शासनाने अनुदान देताना त्याचा विचार करावा.

राजकारण ही लोकशाहीतील महत्त्वाची प्रक्रिया आहे. एखाद्या देशाचे भवितव्य त्या देशाच्या भल्या-बुऱ्या राजकारणावर अवलंबून असते. निवडणुकीच्या माध्यमातून आपण आपले नागरी जीवन राजकारण्यांच्या हवाली करीत असतो. म्हणून साहित्यिक या प्रक्रियेपासून अलिप्त राहू शकत नाही. जेव्हा लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही प्रवृत्ती अवतरते, तेव्हा साहित्यिकांनी स्पष्ट बोलले पाहिजे आणि लिहिले पाहिजे. अशा वेळी मान राखणे हा भेकडपणा आहे. समर्थ रामदास यांनी आपल्या ‘दासबोध’ या ग्रंथात म्हटले आहे-

‘‘मुख्य ते हरिकथा निरूपण

दुसरे ते राजकारण

तिसरे ते सावधपण

सर्व विषयी।’’

राजकारण का करावे आणि कसे करावे, याचा वस्तुपाठ समर्थानी घालून दिलेला आहे. पोप अकरावे पायस (१८५७-१९३९) यांनी आपल्या एका लेखात म्हटले होते, ‘ज्यांना राजकारणात रस आहे, जे राजकारणात सक्रिय भाग घेतात, त्यांनी अतिशय अवघड, परंतु अतिशय सन्माननीय अशा राजकारणाच्या कलेत पारंगत झाले पाहिजे.’ पोप पायस यांच्या या विधानाला हिटलर आणि मुसोलिनी यांची पार्श्वभूमी होती. ज्यूंचा संहार होत असताना पोप पायस बारावे यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल संदिग्धता व्यक्त केली जाते. सध्याचे पोप फ्रान्सिस यांनी त्या काळचे सगळे दस्तऐवज आता खुले केले आहेत. योग्य वेळी सत्य बाहेर येईलच. जेव्हा समाजात असाधारण परिस्थिती निर्माण होते, जेव्हा हुकूमशहा आणि लष्करशहा यांचा उदय होतो, जेव्हा मानवी हक्क, प्रतिष्ठा आणि जीवन पायदळी तुडवले जाते, तेव्हा साहित्यिक, विचारवंत, धर्माचार्य या सर्वानी एखाद्या द्रष्टय़ाप्रमाणे स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे.

ज्ञानपीठ विजेत्या महाश्वेतादेवी या बंगाली लेखिका होत्या. बंगाली साहित्यामध्ये त्यांनी मोलाची भर घातली आहे. मात्र स्वत:ला अभ्यासिकेत कोंडून न घेता, त्यांनी रस्त्यावर उतरून गोरगरिबांसाठी संघर्ष केला. नयनतारा सहगल या गाजलेल्या लेखिका आहेत. भारतात अलीकडे अनेक प्रकार घडत आहेत, ज्यामुळे कायद्याची पायमल्ली होते, लेखनस्वातंत्र्य मर्यादित केले जाते. त्याबद्दल त्या आपले मत स्पष्टपणे मांडतात. त्यामुळे अनेकांना त्यांना कार्यक्रमांना बोलावण्याची भीती वाटते. ज्यांच्या लेखणीत नैतिकता ठासून भरलेली असते आणि वृत्तीमध्ये एक प्रकारचा बेडरपणा असतो, त्यांचा समाजमनाला धाक वाटतो. ज्यांच्याविषयी धाक वाटावा असे किती साहित्यिक आपल्या आजूबाजूला आहेत? आपल्या महाराष्ट्रात आपण नेहमी दुर्गाबाईंची आठवण काढतो. दुर्गा भागवत यांना साहित्यातील ‘रणरागिणी’ असे म्हटले जाते. कारण त्या भूमिका घेत आल्या अन् भूमिका लढवत आल्या.

जेव्हा नागरी स्वातंत्र्याचा संकोच होतो, तेव्हा समाजामध्ये धर्माच्या नावाने भेदाभेद केला जातो आणि समाजाचे वांशिक शुद्धीकरण करण्याचा निर्णय घेतला जातो. जेव्हा एखाद्या प्रदेशाला नजरकैदेचे स्वरूप येते, जेव्हा दोष नसताना अश्राप नागरिकांची उपासमार होते, त्यांचे उपजीविकेचे साधन हिरावून घेतले जाते, तेव्हा विचारवंतांनी आणि साहित्यिकांनी गर्जना केली पाहिजे- ‘राजा, कठोर आत्मपरीक्षणाची वेळ जवळ आली आहे.’

अभिव्यक्तिस्वातंत्र्य

मानवाचा इतिहास हा अन्यायाचा, गुलामगिरीचा, विषमतेचा आणि भेदभावाचा आहे. लिंग, वंश, जात, धर्म आणि जन्मस्थान या कारणांवरून माणसाने माणसावर, सबलांनी दुर्बळांवर, उच्चवर्णीयांनी कनिष्ठांवर, पुरुषांनी स्त्रियांवर अनन्वित अत्याचार केले आहेत आणि अन्यायाची ही मालिका अजूनही खंडित झालेली नाही. माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आपले सुरूच आहे. मात्र शत्रू खूप प्रबळ आहे. त्याला सात जीव आहेत. प्रतिगामी शक्तींचा सहज पराभव होत नाही. वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या रीतीने हा अन्याय सुरू असतो. त्याची कारणमीमांसा बदलत जाते, परिस्थिती बदलत जाते, परंतु अन्याय बदलत नाही. उदा. आधुनिक काळामध्ये इलेक्ट्रॉनिक्स साधनांद्वारे होणारे शोषण.

भारतीय घटनेने स्वीकारलेल्या न्याय, स्वातंत्र्य, समानता व बंधुत्व या मूल्यांच्या प्रकाशात आपल्याला नव्या संस्कृतीच्या मंदिराची उभारणी करायची आहे. या चार महान मूल्यांबरोबर भारतीय संविधानाने आपल्याला समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाच्या विरोधाचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आणि घटनात्मक संरक्षणाचा हक्क असे सहा मूलभूत हक्क बहाल केले आहेत.

भारतीय संविधानाला एका रथाची उपमा दिली, तर स्वातंत्र्य, समता, बंधुभाव व सामाजिक न्याय ही चार मूल्ये त्या रथाची चार चाके आहेत, सहा मूलभूत हक्क त्या रथाचे सहा अश्व आहेत, ‘सेक्युलर’ या इंग्रजी शब्दाला काही जण आक्षेप घेतात. या इंग्रजी शब्दाचा उगम युरोपमध्ये झालेला आहे. तिथे सेक्युलर म्हणजे केवळ इहवाद किंवा धर्मविहीनता असा केला जातो. आपली सेक्युलर ही कल्पना त्याहून खूप भिन्न आहे. तिचा अर्थ सर्वसमावेशकता- म्हणजे सर्वाना समान वागणूक आणि कुठलाही एक धर्म राष्ट्रधर्म नाही, असा आहे. पंडित नेहरूंनी सेक्युलॅरिझमची ही भारतीय संकल्पना जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा स्पष्ट केली आहे. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सेक्युलॅरिझम (धर्मनिरपेक्षता, सर्वसमावेशकता) हा भारतीय घटनेचा आत्मा आहे. तो रथाचा सारथी आहे. जोपर्यंत सारथी सुरक्षित आहे, तोपर्यंत आपल्या देशाच्या अखंडतेला कुठलाही धोका नाही, असे मला वाटते. म्हणूनच आपल्या एका हातात आपापल्या धर्माचा धर्मग्रंथ असला, तर दुसऱ्या हातात भारतीय संविधानाची प्रत असली पाहिजे.

सर्जनशील व्यक्ती अनेकदा द्रष्टी असते. जे सर्वसामान्यांना दिसत नाही, ते त्यांना दिसत असते. आपले द्रष्टेपण ते कलात्मकरीत्या व्यक्त करीत असतात. त्यांचा लेखन किंवा कलाविष्कार प्रक्षोभक असू शकतो. हे सर्व स्वीकारणे आणि पचविणे परंपरावाद्यांना आणि संस्कृती-संरक्षकांना प्रसंगी अवघड जाते.

लोकशाहीच्या बुरख्याखाली एकाधिकारशाही नांदू शकते आणि आणीबाणी न लादताही लोकशाहीचा गळा घोटता येतो, हादेखील लोकशाहीला फार मोठा धोका आहे. असे जेव्हा जेव्हा घडते, तेव्हा तेव्हा सर्व स्वातंत्र्यप्रिय नागरिकांनी व विशेषत: साहित्यिकांनी व विचारवंतांनी सजग राहून स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे, असे मला वाटते.

उलटी गंगा

आपल्याकडे संविधानासारखे धन आहे. त्यानुसार आपण अभिव्यक्तिस्वातंत्र्य अनुभवत आहोत. परंतु दुर्दैवाने अधूनमधून आपल्याकडे विचारांची गंगा उलटय़ा दिशेने वाहू लागते. आपला प्रवास सहिष्णुतेतून असहिष्णुतेकडे, विशालतेकडून संकुचितपणाकडे आणि अहिंसेकडून हिंसेकडे होऊ लागतो. परंतु रोगाचे अचूक निदान झाले की, त्यावर जालीम इलाज करता येतात. आजच्या घडीला आपल्या देशाचे खरे शत्रू दुसरा धर्म, दुसरी जात, दुसरा देश नाही, तर बेकारी, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अतिवृष्टी, अनावृष्टी आणि दुष्काळ, ग्रामीण-शहरी यांच्यातील वाढलेली दरी, धर्माधता व त्यामुळे होणारे उत्पात इ. आहेत. आर्थिक क्षेत्रातील घसरण, बंद होत चाललेले उद्योगधंदे, लघुउद्योगांवर आलेली संक्रांत, त्यामुळे निर्माण झालेले बेकारांचे तांडे व त्यांचे उद्ध्वस्त होत चाललेले संसार ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे समाजाच्या सहनशीलतेची हद्द होत आहे. कवी गिरिजाकुमार माथूर म्हणतात,

‘‘सब्र करने की हद भी

एक दिन टूट जाती है

जब कुछ नहीं होता

तब क्रांति हो जाती है’’

आपले राज्यकर्ते त्याची वाट पाहात आहेत काय? सैतानाप्रमाणे क्रांती आपल्याच लेकरांचा घास घेत असते, हे आपण लक्षात ठेवू या.

Story img Loader