प्रदीप आपटे pradeepapte1687@gmail.com
१७१३ मध्ये कागदाचा पहिला कारखाना भारतभूमीवर सुरू झाला असला, तरी आयात कागदावर भारतीय (तमिळ) लिपीतील मुद्राक्षरांत छापलेले पुस्तक १५७८ मध्येच आले होते. पोर्तुगीज, स्पॅनिश, जर्मन, डेन यांनी मुद्रणकला भारतात रुजवली
आगीवर हुकमत आणि चाकाचा शोध ही मनुष्याला गवसलेल्या तंत्रज्ञानातील ब्रह्मपावले आहेत. साधारण तेवढेच मोल ध्वनीला चित्र-रेखा रूप देणे या युक्तीला माणसाच्या संस्कृतीत आहे. पण त्याचा प्रचार आणि प्रसार तुलनेने मुंगीच्या पावलाने झाला. धातूच्या पत्र्यांवर लिहिणे, शिळेवर कोरणे तर रोजघडीच्या व्यवहारात भलतेच दुर्मीळ! ते सहसा राज्यकर्ते आणि दानकर्त्यांपुरते सीमित असायचे. वस्त्रावर गेरू/ काजळीने लिहिणे, ठरावीक वृक्षांच्या सोयीस्कर सालीवर पानांवर काटय़ाने वा दाभणाने कोरून लिहिणे हेच वापरात अधिक आढळायचे. अशा तंतुमय वस्तूंचा लगदा वापरून त्याचे सालीसारखे पापुद्रे घडण्याची क्ऌप्ती म्हणजे कागद. इ.स. ८६८ मध्ये जगातले पहिले पुस्तक चीनमध्ये अवतरले असे मानले जाते. सर ऑरेल स्टेन या संशोधकाला (१९७७ साली) चीनमध्ये सहस्रबुद्धांची गुहा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी ८६८ सालचे मुद्रित पुस्तक मिळाले. त्याचे नाव हीरक सूत्र! पण हिंदुस्तानात कागद नक्की कधी अवतरला याचा फारसा धड माग मिळत नाही. पण त्याचा वापर करून लिहिणाऱ्यांचा कुशल वर्ग आणि व्यवसाय उदयाला आला. जो कोणी शब्दांमाजी आशय ग्रंथून (गुंफून) सांगतो तो ‘ग्रंथकार’ वेगळा! ते लिपीरूपाने गोंदवून ठेवणारा तो ‘लेखक’. पण त्याची आणखी एक प्रत काढणे तेवढेच वेळखाऊ. त्यामुळे ग्रंथप्रसार अगदी क्षीण असे. पोथी लिहून नकलून घेणे आणि जपणे खर्चीक होते. त्या पोथ्यांना ‘ऊन’ देणे कीडीपासून जपायला बंदिस्त पेटारे वापरणे अशा जिकीरखोर गोष्टीदेखील सांभाळाव्या लागत. जगभरची परिस्थिती साधारणत: अशीच होती. पण अगोदर ठोकळा मुद्रण युरोपात प्रचारात होते. जॉन ग्युटेनबर्गने सुटय़ा मुद्रणखिळ्यांनी मजकूर रचण्याची युक्ती चालवून रूढ केली. त्याचे अनुकरण करीत विल्यम कॅक्स्टनने इंग्लंडमध्ये ‘दिस्कोर्स ऑर सेइंग्ज ऑफ फिलोसॉफर्स’, ‘कँटरबरी टेल्स’, ‘मिरर ऑफ द वर्ल्ड’ यांसारखी पुस्तके प्रकाशित केली. विल्यम टाइन्डलने बायबलचे सुगम इंग्रजीत भाषांतर केले. आठवा हेन्रीचा विरोध न जुमानता त्याने ते इंग्लंडात प्रसारले. या गुन्ह्यासाठी त्याला जिवंत जाळले गेले!
भारतात हे तंत्रज्ञान अवतरले त्यालाही अपघाती निमित्त ठरले ते बायबल आणि त्याचे पोर्तुगीज येशुदास प्रचारक! गोव्यातल्या येशूप्रचारकांचा धर्मप्रचार सत्ताधारी धाकावर विसंबलेला होता. धर्मप्रसारणेसाठी मुद्रण वापरावे अशी काही फार कळ त्यांना लागली नव्हती. तरीदेखील स्थानिक भाषेत येशूशिक्षण देण्याचे मोल काही जेजुइटांना उमगायला लागले होते. नवीन धर्मातरितांमध्ये वेगवेगळ्या भाषकांचा भरणा होता. उदा. आठ गोवेकर, नऊ मल्याळी, दोन बंगाली. अॅबिसिनियातील मिशनऱ्यांना येशूप्रसारासाठी मुद्रण यंत्र पाहिजे होते. त्यांच्याकरिता धाडलेले यंत्र जलमार्गे गोव्यात धडकले; पण काही अडचणीच्या परिस्थितीमुळे तिथेच अडकले! कालांतराने १५५७ साली ‘दौत्रिन क्रिस्तां’ हे झेविअरने लिहिलेले पुस्तक छापून प्रसिद्ध झाले. हिंदुस्तानातील देशी भाषांच्या लिपीत मुद्राक्षरे करण्याचे श्रेय जुवांवद बुस्तामांती आणि जुवाव गोन्साल्विस या स्पॅनिशांना जाते. १५७८ साली दोत्रिना क्रिस्ता या पुस्तकाची तमिळ-मलबारी लिपीतील आवृत्ती अवतरली. हे पहिले देशी लिपीतले पुस्तक. पण १५६० साली धार्मिक न्यायाची छळपद्धती ऊर्फ ‘इन्क्विझिशन’ सुरू झाले. मालमत्ता जप्त करणे ते जिवंत जाळणे अशा शिक्षांचे हे छळपर्व होते. तरीदेखील म्हणावा तसा धर्मप्रसार साधला नाही. म्हणून निराळ्या सुधारित धर्मप्रसार पद्धतीबद्दल विचारांनी जरा उचल खाल्ली. त्याला मंदगतीने तुकडय़ा तुकडय़ांनी संमती मिळत गेली. देशी लिपीचे मुद्रासाचे बनविण्यासाठी अनेकदा मदत आणि परवानगी विनवल्या गेल्या. तरीदेखील १६१६ साली स्टीफन्सचे मराठी खिस्तपुराण रोमन लिपीतच छापले गेले! मात्र रोमन लिपीत छापण्याजोगी अनेक पुस्तके गोव्यातून छापली गेली. त्यातलेच एक पुस्तक गार्सिया द ओर्ताचे (त्याबद्दल नंतर लिहिणार आहेच).
परंतु गोमंतक हा एकमेव दरवाजा नव्हता आणि पोर्तुगीजांबरोबरीने इतर युरोपीयदेखील हिंदुस्तानात येत होते. वावरत होते. त्यातला एक लक्षणीय खटपटय़ा म्हणजे सॅक्सनीतील जर्मन मिशनरी बार्थोलेमेऊस त्सिगेनबाल्ग! डेन्मार्कचा अधिपती चौथा फ्रेडरिकच्या आश्रयामुळे त्सिगेनबाल्ग आणि त्याचा सहकारी शिष्य हाईनरिश प्लुटशाऊ हे दोघे बरोबरीने ख्रि्रस्तीधर्म प्रसारासाठी हिंदुस्तानात दाखल झाले. तंजावरच्या राजाकडून डॅनिश साम्राज्याने पाच मैल लांब, तीन मैल रुंद जागा मिळविली होती. त्याचे गावाचे नाव तरंगअम्बादि. त्याचे युरोपीय बोबडे रुप ट्रान्केबार (जसे चोलमण्डलचे कोरोमाँडेल!) डॅनिशांचे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ऊर्फ जॉन कंपनीशी वाकडे होते. डॅनिश राजवटीला धर्मप्रसारात रस होता तर ब्रिटिश ईस्ट इंडिया या कंपनीचा धर्मप्रसाराला विरोध असे!
त्सिगेनबाल्गला स्थानिक भाषेत संवाद साधण्याचे आणि स्थानिक संस्कृती उमजून घेण्याचे फार महत्त्व वाटत असे. स्थानिकांचे ग्रंथ तो गोळा करीत असे. त्या ग्रंथांबदल तो लिहितो, ‘या पुस्तकाचे बाह्यरूप युरोपातील पुस्तकापेक्षा वेगळे आहे. त्यात कागद नाही, चामडे नाही, शाई, लेखणी नाही! ताडाच्या पानांवर लोखंडी साधनाने मजकूर कोरला जातो. प्रत्येक पानाच्या शेवटी एक छिद्र पाडले जाते आणि त्यात दोरा ओवून पाने एकत्र ठेवली जातात.’ ही पुस्तके गोळा करण्याच्या उद्योगाबद्दल तो सांगतो ‘मी अनेकदा काही मलबारी लेखकांना मृत ब्राह्मणांच्या विधवांकडून त्यांच्याकडील पुस्तके विकत घेण्यासाठी पाठवले आहे. त्यातील अनेक दुष्प्राप्य झाली आहेत.. तरीही कितीही किंमत मोजून ती विकत घेणे आणि संग्रहित करणे यासाठी मी प्रयत्नाची पराकाष्ठा करीत आहे.. (ती वाचून) त्यांच्या खोटय़ा मूर्तिपूजक धर्माचे मूलभूत तत्त्वज्ञान आणि चमत्कारिक कल्पना यांची चांगली कल्पना मला येईल. काळाच्या ओघात त्यांच्याच लिखाणाचा आधार घेऊन त्यांच्या धार्मिक श्रद्धा कशा भ्रामक दुष्टपणाच्या आणि तिरस्करणीय आहेत हे मला पटवून द्यायचे आहे.’
मलबारी शिकण्यासाठी त्यांनी प्रथम एका शाळा शिक्षकाला आपल्या घरी ठेवून घेतले. नंतर जॉन कंपनीत काम केलेल्या एका मलबारी नोकराला घेतले. त्याच्या मदतीने हजारो निवडक मलबारी शब्दांचा संग्रह तयार केला. ‘ते आम्ही अर्थासहित तोंडपाठ करून टाकले. लवकरच त्या भाषेतील शब्दांचे उच्चार, त्यांतील चढउतार, शब्दांची वाक्यांतील रचना आम्हाला कळू लागल्या आणि नंतर त्या भाषेतील पुस्तके वाचण्यास सुरुवात केली.’
परंतु स्थानिक भाषेत संवाद करून धर्मप्रसाराचा उद्देश साध्य करण्यासाठी मलबारी भाषेत पुस्तके करवून घ्यावी लागत. त्यासाठी फार जिकीर करावी लागे. लेखनिक म्हणून फार माणसे ठेवणे खर्चीक होते. एवढे करून मोजक्याच प्रती तयार होत. हा अडसर निवारण्यासाठी त्याने मुद्रणयंत्राचा धोशा धरला. नुसत्या मुद्रणयंत्राने थोडेच भागणार? मलबारी आणि कालांतराने तमिळ भाषा लिपींच्या मुद्रा धातूओतकामाने घडविणे हा एक मोठा किचकट उद्योग होता. त्यांनी त्यासाठी लागणारी ओतशाळा उभी करून घेतली. सुरुवातीला जर्मन ओताऱ्याने तयार केलेली मुद्रा-अक्षरे मोठी होती. सोयीस्कर अशी लहान मुद्राक्षरे करवून घ्यावी लागली. जर्मन ओतारी आणि जुळारी डॅनिश मिशनसाठी काम करीत होता! त्याने घडविलेल्या मलबारी शब्दसंग्रहामध्ये २६ हजार शब्द होते. त्यात तीन रकाने होते. पहिल्या रकान्यात शब्द मलबारी लिपीत दुसऱ्या रकान्यात त्याचे रोमन लिप्यंतर आणि तिसऱ्या रकान्यात त्याचा जर्मन भाषेत अर्थ अशी जुळणी होती. हा संग्रह करायला त्याला दोन वर्षे लागली! अडचण फक्त मुद्राखिळे तयार करण्याची नव्हती. योग्य प्रकारच्या कागदाचादेखील तुटवडा असे. तो जपून, तोलूनमापून वापरावा लागे. त्यावर उपाय करण्यासाठी त्यांनी हिंदुस्तानातच कागदाची गिरणी उभारायचे १७१३ साली ठरविले! आणखी एक विशेष म्हणजे १७१४ साली त्सिगेनबाल्ग दोन वर्षांसाठी रजेवर मायदेशी गेला. तेव्हा त्याने मलबारी भाषेचा विसर पडू नये म्हणून एका मलबारी हिंदुस्तानी माणसाला सोबत नेले. त्याच प्रवासात त्याने युरोपियनांना उपयोगी होईल असे एक छोटे मलबारी व्याकरणाचे पुस्तक तयार केले. हे पुस्तक मलबारी- तमिळीचे व्याकरण लॅटिन भाषेत समजावून सांगणारे होते. ते १७१६ साली प्रसिद्ध झाले.
मुद्रणकलेच्या तंत्राचा हिंदुस्तानात झालेला शिरकाव सांगणारे हे दोन नमुने आहेत. स्थानिकांत याबद्दल अगदीच औदासीन्य होते का? खुद्द वि. का. राजवाडय़ांचा असा ग्रह झाला होता. ‘इतका घनिष्ठ संबंध येऊन मुद्रणकलेसारखा उघडउघड डोळ्यांवर येणारा गुण ज्या लोकांच्या लक्षात आला नाही, त्यांचे भूगोलाचे व इतिहासाचे ज्ञान कोते असावे यांत मोठे नवल नाही,’ असा जळजळीत फटका त्यांनी एतद्देशीय राजवटींना मारला आहेच. त्या वेळी सुरत, आग्रानंतर कोलकाता येथे व्यापारी आणि राजकीय खटपटी करणाऱ्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची लक्षणीय हजेरी होतीच. कालांतराने ती बलाढय़ कंपनी राज्यकर्ती बनली. त्यांचा मुद्रणविषयक उत्साह आणि व्यवहार कसा व किती जागरूक होता? त्याचा आढावा पुढच्या वेळी!
लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुप्रतिष्ठ प्राध्यापक असून ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि विचक्षण अभ्यासक आहेत.