दिलीप हेर्लेकर
मराठी विज्ञान परिषदेचे संस्थापक मधुकर नारायण तथा म.ना. गोगटे यांचे वयाच्या ८९व्या वर्षी वृद्धापकाळाने पुण्यात निधन झाले. त्यांनी मराठी परिषदेचे कार्यवाह, परिषदेचे अध्यक्ष तसेच परिषदेच्या विश्वस्त म्हणून काम केले. मुंबईत जन्मलेल्या गोगटे यांनी पुण्यातून अभियांत्रिकीची पदवी तर लंडनमधून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. मुंबईत ४० वर्षे अभियांत्रिकी क्षेत्रात स्वत:चा यशस्वी व्यवसाय केल्यानंतर १९९७ मध्ये ते पुण्यात स्थायिक झाले. तिथे ते मराठी विज्ञान परिषद- पुणे विभागाच्या कामात सहभागी होत, इन्स्टिटय़ुट ऑफ इंजिनीअर्स व महाराष्ट्र साहित्य परिषद या संस्थांबरोबर त्यांनी संबंध प्रस्थापित केले.
गोगटे १९६२ ते १९६६ मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्यकारिणीत सदस्य होते. संघाच्या शास्त्रीय समितीचे कार्यवाह म्हणून त्यांनी विज्ञान विषयावर व्याख्याने, शास्त्रीय संमेलन वगैरे बरेच कार्यक्रम केले. संघात साहित्यापेक्षा जास्त होत असलेले विज्ञानाचे कार्यक्रम इतरांना रुचले नाहीत आणि त्यांना संघ कार्यकारिणीतील स्थान गमवावे लागले. मग समविचारी मंडळींना बरोबर घेत त्यांनी २४ एप्रिल १९६६ रोजी मराठी विज्ञान परिषदेची स्थापना केली. डिसेंबर १९६६ मध्ये परिषदेचा पहिला मोठा कार्यक्रम म्हणजे मुंबईत घेतलेले मराठी विज्ञान संमेलन. हा उपक्रम अजूनही अखंडपणे सुरू असून २०२२ सालचे ५७ वे अधिवेशन (आता संमेलनाऐवजी अधिवेशन) गोवा येथे होणार आहे.
सुरुवातीच्या दोन वर्षांत मुंबईत एक हजार सभासद नोंदवून गोगटे यांनी माणसे जोडायला सुरुवात केली. दुसऱ्या वर्षांपासून गावोगावी परिषदेच्या शाखा सुरू करून विज्ञान प्रसाराचा विस्तारही वाढवला. नंतर काही तांत्रिक अडचणींमुळे शाखेऐवजी स्वायत्त पण संलग्न विभाग अशी रचना निर्माण केली. सध्या सांप्रत परिषदेशी संलग्न ७० विभाग काम करतात. कालांतराने परिषदेला महाराष्ट्र परिभाषा कोश निर्मितीत, विज्ञानाच्या सगळय़ा शाखांत प्रतिनिधित्व मिळाले. याचा पुढचा टप्पा असा की, राज्यभर विज्ञानविषयक कार्यक्रम करायचा असेल तर तो शासनाकडून विश्वासाने परिषदेकडे सोपवला जाऊ लागला; इतका भरवसा परिषदेने शासन दरबारी निर्माण केला. ठिकठिकाणी असलेले विभागांचे जाळे यासाठी कामी येते हा संस्थापकांच्या दीर्घ दृष्टीचा परिणाम म्हणायला पाहिजे.
लोकांना मराठीतून विज्ञानविषयक लिखाण करायला प्रोत्साहित करावे या उद्देशाने परिषदेने विज्ञान निबंध स्पर्धा (१९६७ सालापासून) आणि विज्ञान रंजन कथा स्पर्धा (१९७० सालापासून) सुरू केल्या, ज्या आजही सुरू आहेत. मराठीतून विज्ञान विषयावर लिहायला लेखक तयार झाले, तसेच मराठीतील विज्ञान कथांचे दालन समृद्ध व्हायला स्पर्धेच्या जोडीने घेतलेल्या इतर उपक्रमांमुळे हातभार लागला. याशिवाय गोगटे यांनी आधी परिषदेचे वार्तापत्र सुरू केले व दीड वर्षांतच (एप्रिल १९६८) ‘पत्रिका’ हे विज्ञान मासिक सुरू केले. त्यात बदल व वाढ होत ते आजतागायत सुरू आहे. त्याची नोंदणी केंद्र सरकारच्या संबंधित विभागाकडे सुरुवातीलाच केल्याने शासकीय अनुदाने मिळायला व काही सवलती मिळायला आजही फायदा होतो. इथेही गोगटे यांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय येतो.
परिषदेची समाजात प्रतिमा निर्माण करण्यासाठी त्यांनी शासकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना वेगवेगळय़ा कार्यक्रमात बोलावून परिषदेच्या कामाची जवळून ओळख करून दिली. तसेच परिषदेचे मासिक मान्यवरांना पाठवून त्यांच्याशीही संपर्क प्रस्थापित केला. त्यामुळे अनेक मान्यवर परिषदेशी जोडले गेले, परिषदेबद्दल आस्था बाळगू लागले तर काही परिषदेचे हितचिंतक झाले. या सगळय़ा कामांवर कडी करणारी कृती म्हणजे परिषदेची स्वत:ची वास्तू! एका टेबलावरून सुरू झालेला परिषदेचा कारभार उण्यापुऱ्या १८-१९ वर्षांत स्वमालकीच्या वास्तूतून होऊ लागला, ही नक्कीच संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे. यासाठी शासनाकडे अर्ज करून व सतत पाठपुरावा करत एक हजार चौ.मीटरचा भूखंड आधी भाडेपट्टय़ाने व नंतर मालकीतत्त्वावर मिळवला. त्यावर टप्प्याटप्प्याने विज्ञान भवनाची उभारणी केली.
म. ना. गोगटे यांनी तन-मन-धन अशा तिन्ही अंगाने परिषदेत सहभाग घेतला. परिषदेचा चहूबाजूंनी उत्कर्ष साधला. परिषदेला समाजात स्वत:ची ओळख निर्माण करून दिली, याचमुळे आजही समाज परिषदेला मदत करत आहे. स्थापत्य अभियंता असलेल्या गोगटे यांनी व्यवसायात जसा इमारतीचा पाया पक्का बांधला, तेच तत्त्व अनुसरून संस्था उभारणी केली हे निर्विवाद! त्यांची दृष्टी लांबपल्ल्याची होती, तोच धागा पकडत पुढे कार्य सुरू ठेवणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल.
मराठी विज्ञान परिषदेचे संस्थापक म. ना. गोगटे यांचे ७ मे २०२२ रोजी निधन झाले. त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा.