|| प्रसाद माधव कुलकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नि:स्पृहपणामुळे एन.डी. पाटील यांचा नैतिक धाक सर्वसामान्यांना आणि सत्ताधाऱ्यांनाही वाटे. अंगभूत गुण त्यांनी समाजाच्याच कारणी लावले…

समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सदस्य आणि विद्यमान अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, महाराष्ट्रातील सर्व पुरोगामी – प्रबोधन – विज्ञानवादी – साम्यवादी – विवेकवादी -चळवळीचे नेते, शेतकऱ्यांचे- वंचितांचे- कष्टकऱ्यांचे – सर्वहारा वर्गाचे तारणहार आणि आपल्या अफाट कार्यकर्तृत्वातून महाराष्ट्राच्या स्थापनेपासून महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनमोल योगदान देणारे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात व समाजकारणात नैतिक धाक व अंकुश म्हणून ज्यांचा आदरपूर्वक उल्लेख करावा लागेल असे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा. डॉ. एन. डी. पाटील. अथक परिश्रम करणाऱ्या सरांच्या शब्दकोशात थकणे हा शब्दच नव्हता. अविश्रांत वाटचाल आणि  एन.डी. हे समानार्थी शब्द होते. आज वार्धक्याने ते कालवश झाले. सर्वांगीण समतेसाठी आयुष्य व्यतीत करणारा महान कृतिशील प्रज्ञावंत आपण गमावला आहे.

 गेल्या साडेतीन दशकांहून अधिक काळ मी त्यांना जवळून पाहतोय. गेले दोन वर्षांचा करोनाकाळ सोडला तर वयाच्या नव्वदीनंतरही ते सतत कामाच्या रगाड्यात व्यस्त व व्यग्र असत. दिवसाचे चोवीस तासही अपुरे वाटावेत आणि सलग चारसहा तासांची झोप म्हणजे चैन वाटावी इतका त्यांचा कामाचा व्याप. लोकांची गर्दी, कार्यक्रमाची आखणी व कृती, प्रचंड स्वरूपाचे अद्ययावत वाचन, अफाट व्यासंग, पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे होणारा प्रवास, सर्वसामान्यांच्या व्यक्तिगत गाऱ्हाण्यांपासून संस्थात्मक अडचणीतून मार्ग काढण्याची धडपड, हे सारे दशकानुदशके सुरू होते. गेल्या दहा-बारा वर्षांत मुंबईऐवजी कोल्हापूरला राहायला आल्यानंतरही ही धावपळ सुरूच होती. प्रकृतीच्या तक्रारी वयपरत्वे जाणवत असूनही सर त्या सदैव बाजूला ठेवून कार्यरत असत. एक पाय व एक किडनी गेली अनेक वर्षे कमजोर असतानाही एन.डी.सर कमालीचे सक्रिय होते. ‘मी कोणत्याही आंदोलनासाठी एका पायावर आणि एका किडनीवर लढण्यासाठी सदैव तयार आहे,’ असे गमतीने म्हणणारे एन.डी.सर मार्च २१ मध्ये करोनावरही मात करून सुखरूप परत आलेले होते.

त्यांच्या अथक परिश्रमाचे एक उदाहरण यानिमित्ताने आठवते. १९९९ साली समाजवादी प्रबोधिनीच्या प्रबोधन प्रकाशन मालेद्वारे एन.डी.सरांचे ‘महरषी शिंदे : उपेक्षित महात्मा’ ही पुस्तिका प्रकाशित करायचे ठरले होते. आचार्य शांतारामबापू गरुड आणि मी एन.डी.सरांना त्याची वारंवार आठवण करून देत होतो. परंतु सरांच्या अत्यंत व्यग्र दिनक्रमामुळे लेखनासाठी उसंत मिळत नव्हती. पुस्तिका प्रकाशनाची जाहीर केलेली तारीख जवळ येत होती. बहुतेक ते प्रकाशन पुढे ढकलावे लागणार असे मला व बापूंना वाटत होते. पण शब्दाचे पक्के असणाऱ्या सरांचा एके संध्याकाळी पाचच्या दरम्यान मला फोन आला. ते म्हणाले : मी बेळगावात आहे. येथून निघून प्रबोधिनीत येतो आहे. रात्री आठ वाजता सर आले. थोड्या गप्पा व जेवण आवरून त्यांनी समाजवादी प्रबोधिनीच्या  कार्यालयात कागदांची चळत घेऊन लिहायला सुरुवात केली. मी त्यांच्या जवळच खुर्चीवर बसलो होतो. मी त्यांना म्हटले, सर तुम्ही सांगा मी लिहून घेतो. तर ते म्हणाले, नाही रे, मला तशी सवय नाही. स्वत: लिहिले की लेखनाची भट्टीही छान जमते. आणि ते मलाच म्हणाले, मी लिहीत बसतो तू जाऊन झोप. पण एवढा प्रचंड असामान्य ऊर्जास्रोत समोर साक्षात लिहीत बसलेला असताना मला झोप येणे अशक्य होते. ते लिहितील तशी पाने मला वाचायला देत होते. ती वाचून मी स्तिमित होत होतो. त्यांची अफाट स्मरणशक्ती आणि व्यासंग त्यांच्या शब्दाशब्दांतून दिसून येत होता. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे नावाचा महामानव मी एन.डी.पाटील नावाच्या कार्यमहर्षीकडून समजून घेत होतो. अखेर सलग आठ-नऊ तास एकटाकी, एकहाती लिहिलेल्या त्या पुस्तिकेचे हस्तलिखित सकाळी सहा वाजता एन.डीं.नी पूर्ण तयार केले. तोपर्यंत शांतारामबापूंही उठून कार्यालयात आले होते. त्यांना आश्चर्य वाटले पण आपल्या सहकाऱ्याची खात्रीही होती. चहा घेऊन थोड्या गप्पा मारून सर पुढच्या कामाला लगेच साताऱ्याला निघून गेले. ही इतकी अस्सल ऊर्जा फक्त आणि फक्त विचारांच्या निष्ठेतूनच येत असते. या पुस्तिकेसह ‘शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी ?’ , ‘जर्मनीतील लोकजीवन’ आदी सरांनी लिहिलेल्या पुस्तिका समाजवादी प्रबोधिनीद्वारेच प्रथम प्रकाशित झाल्या.

त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांपैकी एक अशी ओळख ही माझी फार मोठी कमाई होती. अलीकडे सरांना विस्मरण होई, त्यांना माणसे ओळखू येत नसत. पण त्याही वेळी ते मला ओळखत असत. त्या वेळी अनेकदा डोळ्यात आलेले पाणी लपवू शकलो नव्हतो. २०१२-१३ साली भारताच्या केंद्र सरकारने भारतातील विविध राज्यातील विविध क्षेत्रांत महनीय व उत्तुंग  कामगिरी करणाऱ्या आणि वयाची पंचाहत्तरी पूर्ण करणाऱ्या मान्यवरांचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व, त्यांची जडणघडण स्पष्ट करणाऱ्या सविस्तर मुलाखती संकलित करण्याची योजना आखली होती. आकाशाच्या उंचीच्या या व्यक्तिमत्त्वाची सर्वांगीण ओळख पुढच्या पिढ्यांनाही झाली पाहिजे हा या मुलाखतीमागचा हेतू होता. त्या मालिकेमध्ये सामाजिक क्षेत्रातील उत्तुंग कामगिरी बाबत सरांची मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली होती. ही मुलाखत सलग चार दिवस आकाशवाणी कोल्हापूरच्या स्टुडिओत रेकॉर्ड केली जात होती. जवळजवळ सोळा तासांची ही दीर्घ मुलाखत आहे. यथावकाश सरकारद्वारे त्याचे प्रसारण व शब्दांकन करून प्रकाशनही केले जाणार होते. त्याचे ग्रंथरूपाने इंग्रजी भाषांतरही होणार होते. अशी ती योजना होती. पण नंतर सरकार बदलले. आता त्या मुलाखतीही कदाचित दाबलेल्या असाव्यात. त्याचे रेकॉर्डिंग माझ्याकडे अथवा सरांकडेही नाही. पण त्या प्रदीर्घ मुलाखतीतून एन.डी.सरांची सारी वाटचाल, त्यांचे अंतरंग, त्यांची वैचारिक भूमिका अधोरेखित झाली होती.

‘कमवा आणि शिका’ या योजनेचे आचरण करत ते एम. ए. एलएल.बी. झाले. शिक्षक-प्राध्यापक-प्राचार्यही झाले. अवघी सहा-सात वर्षे त्यांनी ती नोकरी केली आणि सोडून दिली. ऐन तारुण्यात गिरणी कामगार युनियनचा सेक्रेटरी म्हणून त्यांनी नाममात्र जीवन वेतनावर कार्यकर्ता म्हणून समाजकारणात, राजकारणात पदार्पण केले. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाने आणि राज्यघटनेने स्वातंत्र्य, सार्वभौमत्व, एकात्मता, धर्मनिरपेक्षता समाजवाद, लोकशाही ही मूल्ये रुजवली. या संकल्पनांवर पूर्ण निष्ठा ठेवून तो विचार समाजात रुजवण्यासाठी आयुष्य कारणी लावायच्या ऊर्मीनेच एन. डी. सर कार्यरत होते. सर्वसामान्य जनतेशी त्यांची जुळलेली नाळ यामुळेच हे घडले. त्या अनमोल बांधिलकीचेच हे फलित होते.

विद्यार्थिदशेमध्ये स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झालेल्या एन.डींनी त्या वेळीही कारावास भोगला आहे, गोवा मुक्ती लढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, साराबंदी चळवळ, शेतकरी दिंडी, दुष्काळ निवारण मोर्चा, शेतकरी आंदोलने, शेतीमालाला हमीभाव मिळण्यासाठीच्या लढा, सेझविरोधी आंदोलन, उच्च न्यायालय खंडपीठ ,शिक्षणविषयक श्वेतपत्रिका, एन्रानविरोधी आंदोलन, टोलविरोधी आंदोलन, वीजदरवाढविरोधी आंदोलन, पिण्याच्या पाणीहक्काचे आंदोलन, कापूस दर आंदोलन, शिक्षण बचाओ आंदोलन, जागतिकीकरणविरोधी लढा यांसारखी शेकडो आंदोलने गेल्या काही दशकांत एन.डी.सरांनी लढली. काहींच्या पूर्ततेसाठी ते अखेरपर्यंत लढत राहिले. जनतेच्या पैशातून उभारलेला साखर कारखाना वाचविण्यापासून ते सेझच्या निमित्ताने अंबानीसारख्या भांडवलदारांच्या घशात गोरगरिबांची हजारो एकर गेलेली जमीन परत मिळवण्यात एन.डी. यशस्वी झाले आहेत.  जनतेसाठी केलेल्या आंदोलनात त्यांना अनेकदा लाठीमार सोसावा लागला आहे. तुरुंगवास पत्करावा लागला आहे. इतकेच नव्हे तर गोळीबारही झेलावा लागला आहे. इस्लामपुरातील लढ्यात आपल्या पुतण्याबरोबरच काही सहकाऱ्यांचे हौतात्म्यही सरांनी सर्वसामान्यांच्या हक्कासाठी पचवले.  शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा खांद्यावर घेऊन पण तमाम चळवळींचे नेतृत्व करणाऱ्या एन.डीं.नी महाराष्ट्र विधानसभा  आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद, आघाडी सरकारच्या समन्वय समितीचे अध्यक्षपद भूषवलेले होते. तेवीस वर्षे आमदार असलेल्या सरांनी महाराष्ट्राचे सहकार मंत्रीपदही भूषवले . मंत्री असतानाही स्वत:चे कपडे स्वत: धुताना एनडी दिसले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता म्हणून आलेले मानधन आपल्याबरोबर वाटचाल करणाऱ्या गोरगरीब कार्यकर्त्यात वाटून त्यांना सुखाचे दोन दिवस देऊ पाहणारे एन.डी. दिसले, तसेच आपल्याला मिळालेल्या लाखो रुपयांच्या पुरस्काराच्या रकमा त्याच व्यासपीठावरून  सामाजिक, शैक्षणिक काम करणाऱ्या  संस्थांना, चळवळींना ते देताना दिसले. विधान परिषदेसाठी पक्षाने उमेदवारी दिलेली असतानाही, निवडून येण्याची खात्री असतानाही ती संधी आपल्या सहकाऱ्यांनाही मिळावी या भावनेने उमेदवारी नम्रपणाने नाकारणारे एन.डी.ही दिसतात. समाजकारणात आणि राजकारणात इतकी निकोप आणि नितळ दृष्टी घेऊन जगण्यासाठी फार मोठे काळीज लागते. या नि:स्पृहपणामुळेच, सत्ताधाऱ्यांपासून सर्वसामान्य कार्यकर्त्यांवरही एक प्रकारचा नैतिक धाक असणारे मात्र सर्व समस्यांतून निश्चितपणे मार्ग काढू शकतील असा सर्वांना विश्वास देणारे एन.डी.सरांसारखे दुसरे व्यक्तिमत्त्व वर्तमान महाराष्ट्रात नव्हते.

सर्वसामान्यांचे संसार उभे करताना, लढे लढताना एन.डी. सर व्यावहारिक अर्थाने स्वत:च्या संसारात फारसे अडकून पडले नाहीत. समाजाचा संसार करण्याची मोकळीक एन.डी. सरांना मिळाली होती याचे सर्व श्रेय अर्थातच त्यांच्या सहचरी सरोजताई ऊर्फ माईंना द्यावे लागेल. एन.डीं.सारख्या वादळाचा संसार माईंनी शिक्षिकेची नोकरी करत आणि सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत समर्थपणे पेलला. आजही माई या साऱ्यात कमालीच्या तन्मयतेने व्यग्र असतात. आपल्या मुलांना अंगभूत गुणांवर पुढे जाण्याची दीक्षा या दाम्पत्याने दिली.

 रॉबर्ट फ्रॉस्टच्या कवितेचा दाखला देत सर नेहमी म्हणत, ‘या वनराजीतून बाहेर जाणारे दोन रस्ते होते, त्यापैकी कमी मळलेला रस्ता मी निवडला. आज मी जो आहे तो त्याच वाटचालीतून घडलो आहे.’ पण खरे तर एन.डी.सर महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात, शिक्षण क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात स्वत:चा वेगळा निर्माण रस्ता करणारे होते. त्यांनी तयार केलेल्या रस्त्यावरून अधिक जोमाने वाटचाल करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

लेखक  समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजी या संस्थेचे सरचिटणीस व ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती’चे संपादक आहेत.

prasad. kulkarni65@gmail. com