|| भक्ती बिसुरे

संरक्षण सिद्धता आणि संरक्षण सामग्रीचे उत्पादन अशा दोन्ही निकषांवर पुणे शहराचे भारताच्या नकाशावरील स्थान अनन्यसाधारण आहे. लष्कराचे दक्षिण मुख्यालय असलेल्या पुणे शहरात अनेक लष्करी आस्थापना कार्यरत आहेत. त्याला संरक्षण सामग्री उत्पादनाची जोड मिळाल्याने पुणे शहराला भारतीय संरक्षण उद्योगाच्या नकाशावर अढळ स्थान मिळाले आहे. देशाच्या संरक्षणासाठी असे दुहेरी योगदान हा पैलू पुणे शहर आणि पुणेकरांच्या समृद्धी आणि अभिमानाचा मानिबदू ठरला आहे.

संरक्षण सिद्धता आणि संरक्षण सामग्रीचे उत्पादन अशा दोन्ही निकषांवर पुणे शहराचे भारताच्या नकाशावरील स्थान अनन्यसाधारण आहे. भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडचे मुख्यालय म्हणून पुणे शहराचे योगदान महत्त्वाचे आहे. लोहगाव हवाईदल स्थानकाच्या रुपात भारतीय हवाईदलाचे एक प्रमुख केंद्रही पुणे शहरात आहे. त्यामुळे स्वाभाविकच पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात संरक्षण सामग्री उत्पादन व्यवसायानेही आपले हातपाय रोवले आहेत. त्यामुळे संरक्षण उत्पादन अर्थात डिफेन्स मॅन्यूफॅक्चिरगच्या क्षेत्रात पुणे शहराचे अस्तित्व महत्त्वाचे आहे. केवळ भारतीयच नव्हे तर जगातील अनेक देशांच्या लष्करासाठी संरक्षण सामग्रीचे उत्पादन पुणे शहरातून होते. यांमध्ये दारुगोळा, शस्त्रास्त्रे आणि तोफखाना यंत्रणा तसेच संरक्षण तंत्रज्ञान यांचाही प्रामुख्याने समावेश आहे. महाराष्ट्रात पुणे, नागपूर, औरंगाबाद, अहमदनगर आणि नाशिक या शहरांमध्ये प्रामुख्याने संरक्षण उत्पादन उद्योगांचा पसारा आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओ या देशाच्या संरक्षण उत्पादन आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाचे संशोधन करणाऱ्या संस्थेच्या अनेक महत्त्वाच्या प्रयोगशाळा पुणे शहर आणि परिसरात आहेत. दारुगोळा कारखान्यांचे खडकी हे देशभरातील प्रमुख केंद्रही पुणे शहरात आहे. त्यामुळे मेक इन इंडिया या भारत सरकारच्या धोरणाचे प्रतिबिंब संरक्षण सामग्री उत्पादनाच्या बाबतीत पुणे शहरात पुरेपूर दिसून येते. येथे तयार झालेल्या संरक्षण सामग्रीला आशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिका खंडांतील सुमारे ७५ देशांमध्ये मागणी आहे. संरक्षक्ष क्षेत्रातील वापरासाठी लागणारी रसायने, शस्त्रास्त्रे, दुर्बिणी, तोफखाना, लष्करी चिलखती वाहने, शस्त्रास्त्रांचा वेध घेणाऱ्या रडार यंत्रणा, फायर कंट्रोल सिस्टिम्स अशा अनेक उत्पादनांची निर्मिती पुणे शहर परिसरातील संरक्षण उद्योगांद्वारे पूर्ण केली जाते.

संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेच्या म्हणजेच डीआरडीओच्या अनेक महत्त्वाच्या प्रयोगशाळा पुणे शहर आणि परिसरात आहेत. त्यांमध्ये हाय एनर्जी मटेरिअल रिसर्च लॅबोरेटरी, आर्मामेंट रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, मोबाईल सिस्टिम कॉम्प्लेक्स या काही महत्त्वाच्या प्रयोगशाळा आहेत. हाय एनर्जी मटेरिअल रिसर्च लॅबोरेटरी ही प्रयोगशाळा संश्लेषण, व्यक्तिचित्रण आणि मूल्यमापन यासह उच्च ऊर्जा सामग्रीच्या मूलभूत आणि उपयोजित संशोधनाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. रॉकेट आणि क्षेपणास्त्रांसाठी घन पदार्थाचा प्रणोदकांचा विकास आणि मूल्यांकन; तोफा दारूगोळय़ासाठी साठी घन पदार्थ घटक आणि काडतूस केस तंत्रज्ञान; उच्च स्फोटक रचना आणि थर्मोबॅरिक स्फोटके; पायरोटेक्निकची रचना आणि विकास तसेच स्फोटक प्रतिक्रियाशील चिलखत विकसित करणे आणि उच्च ऊर्जा सामग्रीसाठी पायलट प्लांट सुविधांची रचना आणि स्थापना करणे ही या प्रयोगशाळेची काही प्रमुख कामे आहेत. उच्च ऊर्जा सामग्रीचा अभ्यास आणि मूल्यमापन करण्यासाठी विविध प्रकारच्या उपकरणे/इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या डिझाइन, विकास आणि निर्मितीमध्ये देखील हाय एनर्जी मटेरिअल रिसर्च लॅबोरेटरीचा सहभाग आहे. एचईएमआरएल उच्च ऊर्जा सामग्रीचे संश्लेषण आणि दर्जा उंचावण्यासाठी पायलट प्लांटची रचना आणि विकास देखील करते. या प्रयोगशाळेद्वारे संरक्षण उत्पादन क्षेत्रातील इतर संस्था तसेच प्रयोगशाळांना उच्च ऊर्जा सामग्री, त्यांचा वापर आणि उत्पादनाशी संबंधित बाबींवर तांत्रिक सहाय्य, मार्गदर्शन किंवा सल्ला देखील पुरवते. आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट ही डीआरडीओची प्रयोगशाळा प्रामुख्याने संरक्षण सेवांसाठी पारंपरिक शस्त्रास्त्रांच्या क्षेत्रात संशोधन, आरेखन आणि विकसन क्षेत्रात कार्यरत आहे. लहान शस्त्रे, तोफखाना, रॉकेट यंत्रणा, हवेतून मारा करणारी युद्धसामग्री आणि शस्त्रास्त्रे विकसित करण्याच्या क्षेत्रात या प्रयोगशाळेचे योगदान अनन्यसाधारण आहे. शस्त्रास्त्रे आणि तोफखाना आरेखन आणि विकासासाठी प्रगत पायाभूत सुविधा आणि आवश्यक तंत्रज्ञान आर्मामेंट रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटने निर्माण केले आहे. २००५ पासून आजपर्यंत प्रयोगशाळेने आपला आयएसो दर्जा कायम राखला आहे. बाँबे इजिनिअर्स ग्रुप ही भारतीय लष्कराची संस्थाही संरक्षण उत्पादन क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देत असून चिलखती वाहने, रडार अशा अनेक उत्पादनांचा पुरवठा पुणे शहरातून भारतीय लष्कराला करण्यात येतो.

देशातील आयुध निर्माण कारखान्यांमध्ये खडकी दारुगोळा कारखान्याचे महत्त्व गेली अनेक वर्षे कायम आहे. डिसेंबर १८६९ मध्ये ब्रिटिश सरकारचा लहान शस्त्रास्त्र उत्पादन विभाग म्हणून खडकी दारुगोळा कारखाना सुरु झाला. स्नायडर्स रायफल आणि हेन्री मार्टिनी रायफलसाठी गन पावडर वापरून दारुगोळा काडतूसाचे नियमित उत्पादन १८७२ मध्ये सुरू झाले. आशिया आणि आफ्रिकेतील युद्धाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दारुगोळा कारखाना खडकी येथे उत्पादन सुविधा आणि मक्र्युरी फ्युलमिनेट, लीड ऑक्साईड, लीड स्टायफनेट तसेच डिटोनेटर अशा विविध प्रकारांचे उत्पादन खडकी येथे सुरु करण्यात आले. या कारखान्याने बदलत्या काळाबरोबर स्वत:ला अद्ययावत केले. त्यामुळेच प्रत्यक्षात लहान शस्त्रास्त्रांच्या निर्मितीसाठी उभा राहिलेला हा कारखाना आज मध्यम आमि मोठय़ा क्षमतेचा दारुगोळा तयार करत आहे. गेल्या काही वर्षांत पुणे शहराचा विस्तार वाढला. त्यामुळे पूर्वी नागरी वस्तीपासून लांब असलेला कारखाना आता शहराच्या

 मध्यवस्तीत आला. त्यामुळे सुरक्षा निकषांच्या दृष्टीने अनेक उच्च क्षमतेच्या दारुगोळय़ाची निर्मिती इतर शहरांतील कारखान्यांमध्ये हलवण्यात आली. असे असले तरी पुणे शहरातील संरक्षण उत्पादन क्षेत्रात या कारखान्याचे स्थान महत्त्वाचे आहे.

पुणे शहरातील अनेक खासगी कंपन्यांचेही संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रातील योगदान महत्त्वाचे आहे. यांमध्ये लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, रिलायन्स, मिहद्रा, भारत फोर्ज यांचा समावेश आहे. भारत फोर्ज ही कंपनी संरक्षण सामग्री उत्पादनाच्या क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी पुणे शहरातील आहे. धातूविज्ञानशास्त्रातील सखोल ज्ञान, असामान्य उत्पादन कौशल्य आणि नाविन्यपूर्णतेचा ध्यास आणि अनुभव यांच्या बळावर भारत फोर्जने गेल्या दोन दशकांमध्ये संरक्षण उत्पादन क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे.

मेक इन इंडिया धोरणाचा भाग म्हणून भारतीय संरक्षण खात्याच्या गरजांकडे लक्ष पुरविणे, आरेखन करणे आणि गरजांची पूर्तता करणे यासाठी भारत फोर्जने जगभरातील संरक्षण क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे. कंपनी मोठी झेप घेण्यासाठी पूर्णपणे सज्ज असून भारताचे आत्मनिर्भर बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सहाय्य पुरवितानाच एकीकडे भारतीय संरक्षण क्षेत्रामध्ये स्वदेशी प्रवाह आणण्यासाठी कंपनीतर्फे योगदान दिले जाते.

लष्कराच्या दक्षिण कमांडचे मुख्यालय म्हणून पुणे शहरात अनेक लष्करी आस्थापना कार्यरत आहेत. त्याला संरक्षण सामग्री उत्पादनाची जोड मिळाल्याने पुणे शहराला भारतीय संरक्षण उद्योगाच्या नकाशावर अढळ स्थान मिळाले आहे. देशाच्या संरक्षणासाठी असे दुहेरी योगदान हा पैलू पुणे शहर आणि पुणेकरांच्या समृद्धी आणि अभिमानाचा मानिबदू ठरला आहे.

Story img Loader