|| डॉ. आत्माराम पवार
‘पुणे तेथे काय उणे’ या पुण्याबद्दलच्या विशिष्ट मानांकनाची सुरुवात पुरातन कालापासून झाली असावी. मराठी साम्राज्याचा इतिहास, त्यानंतर स्वतंत्र भारतासाठी पेरलेले बीज, शिक्षण आणि सांस्कृतिक कार्याची परंपरा; एवढेच नव्हे तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी बरोबरच औषध क्षेत्रामध्ये देशाची प्रगती होण्यासाठी पुण्याची निवड प्राधान्याने झाली होती. संसर्गजन्य आजारांच्या महामारीपासून देशाला वाचवण्यासाठी प्रतिजैविकांची गरज पूर्ण करण्याच्या हेतूने पुण्याची निवड करून १३ मार्च १९५४ ला भारतातील पहिला सार्वजनिक औषध उत्पादन प्रकल्प ‘हिंदूस्थान अँटिबायोटिक लिमिटेड’ सुरू केला गेला. हामायसिन या पेनिसिलीन प्रकारातील नवीन औषधाच्या शोधासह अनेक औषधी घटकांचे उत्पादन आणि त्यापासून विविध प्रकारची औषधे बनवणारी कंपनी पिंपरी येथून गेली अनेक दशके देशाची सेवा करत आहे.
संसर्ग झाल्यास तो आजार बरा करण्यासाठी हिंदूस्थान अँटिबायोटिक तर अशा आजारांविरुद्ध प्रतिकार शक्ती निर्माण करण्याच्या हेतूने सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया स्थापन झाली. स्वातंत्र्यानंतर भारतास लस उपलब्धीसाठी पाश्चिमात्य देशावर अवलंबून राहावे लागत होते. लसीचा तुटवडा आणि भारतीयांना न परवडणारी किंमत या गोष्टींचा विचार करून १९६६ ला सायरस पूनावाला यांनी सीरमची स्थापना केली. मांजरी येथे ४२ एकरवर अतिअद्ययावत, हर एक जागतिक दर्जा पूर्ण करणारी सीरम पुण्याचा नामलौकिक वाढवत आहे. आज कंपनीचे मूल्य १७,९२९ कोटी रुपये आहे. जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी १७० पेक्षा जास्त देशांना दीड ते दोन अब्ज लशींच्या मात्रा पुरवठा करते व जगातील साधारणत: ६२ टक्के मुलं सीरमची लस घेतात. बिलथोवेन बायोलॉजिकल नेदरलँड कंपनीचे २०१२ मध्ये अधिग्रहण करून पाश्चिमात्य देशांची लशीची गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे. कोव्हिशिल्डच्या ५०० अब्ज मात्रा उपलब्ध करण्याच्या हेतूने कार्य करताना, स्फुटनिकच्या ३०० अब्ज मात्रा, कोव्होव्हॅक्स ही नाकाद्वारे दिली जाणारी लस सुद्धा सीरम उत्पादन करत आहे. मुंबईच्या हाफकिन कंपनीची छोटी शाखा सुद्धा पुण्यामध्ये १९७७ पासून लसनिर्मिती संबंधी काम करत आहे.
औषध विषयक संशोधन व उत्पादन यासाठी पुण्यातील तिसरे मोठे नाव म्हणजे एमक्युअर फार्मास्युटिकल्स. १९८३ मध्ये चालू झालेल्या या कंपनीचे सीईओ सतीश मेहता आहेत तर शार्क टँक इंडियामधून ओळखीच्या झालेल्या नमिता थापर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत. ६०९१ कोटी रुपये महसूल असलेली कंपनी अकरा हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देत आहे. पाच संशोधन केंद्रे, चौदा औषधी उत्पादन कारखाने, ३५० हून अधिक विविध औषधे व ७० पेक्षा जास्त देशांना पुरवठा करणारी कंपनी जगाच्या कानाकोपऱ्यात पुण्याचे नाव पोचवत आहे. परदेशात विस्तार करण्यासाठी २०१४ ला टिलोमेड लॅब लंडन, २०१५ मरकंन फार्मा कॅनडा, २०१६ भारद्वाज फार्मा जर्मनी अशा कंपन्या अधिग्रहित केल्या आहेत. जिनोवा बायोफर्माचे ऊटिकल्स सोबत करोना वरील लस संशोधन चालू आहे. झुवेंतस या उपकंपनी तर्फे विटामिन, अँटिव्हायरस, डायबेटिक अशा विविध प्रकारच्या औषधांचे संशोधन व उत्पादन चालू आहे. वरील नामांकित औषध उत्पादन कंपन्यांसोबतच संशोधन क्षेत्रासाठी लुपिन फार्मासुटिकल या भारतातील पहिल्या सात क्रमांकित कंपनीने २००१ ला लुपिन रिसर्च पार्क चालू केला आहे. त्या वेळी ६०० दशलक्ष गुंतवून जवळपास ३०० शास्त्रज्ञांना समाविष्ट करून घेतले आहे. हृदयरोग, मधुमेह, दमा अशा अनेक रोगावरील जेनेरिक औषधांसोबतच बायोटेक व मूळ औषधी घटक यामध्येही मोठे संशोधन केले जात आहे. मल्टीनॅशनल कंपन्याचा दर्जा असणाऱ्या लुपिन कंपनीव्यतिरिक्त सावा हेल्थ केअर (चिंचवड), केलिडस रिसर्च लॅब (चाकण), फ्लोरिंटीस (ताथवडे), रॉस लाइफ सायन्सेस (भोसरी), विनसिया (एरंडवणे), साय नेप्स (खराडी), एक्टोरीअस इंनोवेशन्स (कोथरूड) या कांट्रैक्ट रिसर्च ऑर्गेनाइजेशन औषध संशोधनाचे कार्य करत आहेत. एनजिन ही अल्केमची उपकंपनी चाकण येथे औषध संशोधन, बायोथेरेपेटीक्स तसेच उत्पादन करते. सिनर्जीन बायो वाकडेवाडी येथील सीआरओ क्लिनिकल ट्रायल व बायो टेक्नोलॉजी या क्षेत्रात नावीन्यपूर्ण काम करते. सिनथेरा बायोमेडिकल पाषाण ही स्टार्ट अप कंपनी बोन रिप्लेसमेंट व अस्थी रोगासाठी काम करते. वेलइनोवेट बायोसोल्युशनस, आरएक्सको हे इतर औषध क्षेत्रातील स्टार्ट आहेत.
तसा औषध उत्पादन क्षेत्रातील पुण्याचा इतिहास हा स्वातंत्र्यपूर्व आहे. १९३६ साली श्री. डी. एच. वर्मा यांनी वर्मा फार्मसी चालू केली. जोशी कुटुंबाने १९५७ ला कोथरूड मध्ये आईसन फार्मासिटिकल तर आर. बी. पारगे यांनी १९६२ ला मंगळवार पेठेत लिब्रा ड्रग्ज चालू केली. श्री त्रिवेदी यांची न्यूलाइफ १९७३ ला तर बोरांची लीटाका फार्मा १९७४ पासून औषध क्षेत्रात काम करीत असून लीटाकाचा महसूल पाचशे कोटी आहे. एस. डी. सावंत यांची सेंटॉर फार्मा (१९८०) या मुंबई स्थापित कंपनीची शाखा हिंजवडी येथे संशोधन व उत्पादन करीत आहे. राष्ट्रीय पातळीवरील चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या शिप्ला कंपनीचा औषध उत्पादन कारखाना कुरकुंभ येथे १९९४ पासून चालू आहे. तर एफडीसी या नामवंत कंपनीची शाखा उरुळी देवाची येथे आहे. क्युअर मेडिसिन व जेनफार्मा (भोसरी), हिकल (हिंजेवडी), व्हिप्रो (तळेगाव), श्रवीण (प्राधिकरण), राऊफसल (उंड्री); ओमनी अॅक्टिव्ह (पिंपरी) याव्यतिरिक्त आयट्रोस फर्मास्युटिकल्स, एनर्जाइज फार्मासिटिकल, झायफ्रास फार्मासिटिकल, बेबेरी फार्मासिटिकल, एम्बी वर्ड एक्सीम या औषध उत्पादन करणाऱ्या कंपन्या देशांतर्गत व निर्यातीसाठी औषध उत्पादन करीत आहेत.
औषध उत्पादनसंबंधी विशिष्ट काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये नारायणगावच्या फ्रेजेनिअस केबी या मल्टिनॅशनल इंजेक्शन क्षेत्रातील कंपनीचे नाव घ्यावे लागेल. मुरली कृष्णा फार्म ही नावीन्यपूर्ण औषधे बनवणारी कंपनी सुद्धा याच गावात २००४ ला चालू झाली. २०० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय औषध कंपन्यांना संशोधनपर नावीन्यपूर्ण औषध बनवत ४५ कोटींचा महसूल असणारी ही सीआरओ कंपनी गेल्या तीन वर्षांत साठ टक्के दराने वाढत आहे. कॉग्नीजंट, क्रेस्ट, एस. पी. सॉफ्ट टेक, एमक्युअर, सायफोरमिक्स, ईनव्हेन्टीव्ह, टीसीएस, कोव्ह्यान्स, ऑक्सिजन या फार्मकोव्हिजिलन्स म्हणजे औषधांच्या प्रतिकूल परिणामांची नोंद ठेवणाऱ्या कंपन्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील काम करीत आहेत. इंटॉक्स ही प्राण्यावरील औषध चाचण्या घेते. अमेज हेल्थकेअर फक्त त्वचा रोगासंबंधी औषध संशोधन व उत्पादन करणारी संस्था २०१५ ला स्थापन झाली आहे. दिया फार्मासिटिकल ही कंपनी मूळ औषधी घटक व फार्मा इम्पुरिटीजचे उत्पादन करते. बिल्केअर कंपनी औषधांच्या पॅकेजिंगबाबत संशोधन व सेवा देते तर असोसिएटेड कॅप्सूल शिरवळ येथे रिकाम्या कॅप्सूल व त्यासंबंधी यंत्रसामग्रीबद्दल संशोधन व विकास करते. एमएएच इंडिया (१९९६) ही मल्टिनॅशनल कंपनी व्हेटर्नरी औषधांची निर्मिती करते. वेटरनरी मेडिसिन मॅन्युफॅक्चररच्या पहिल्या दहा क्रमांकामध्ये ऐव्हिबो अॅनिमल हेल्थ या रुणवाल ग्रुपची कंपनी गणली गेली आहे. ऑपट्रा सिस्टम्स हे क्लिनिकल ट्रायलमधील तंत्रज्ञान पुरवते. जिनोवा बायोफर्मासुटिकल्स (२००६) बायोथेरापेऊटिक औषधे बनवते. सायक्लोन फार्मासिटिकल (२००५) ही फार्मासिटिकल कन्सल्टान्सी करणारी कंपनी आहे तर अजिओ फार्मासिटिकल (२९९१) ही मार्केटिंग कंपनी आहे. स्प्रिगर, डॉकफ्लेक्सस, इनोव्हेटिव्ह या मेडिकल रायटिंग करीत आहेत. इतर काही कन्सल्टन्सी फर्म – डी. पी. असोसिएट, कॉस्मिक रिसर्च, ऑप्टीमम मेडटेट, हनुल मेडिझीन इ.
आयुर्वेदिक व होमिओपॅथिक औषध उत्पादनामध्ये सुद्धा पुण्याचा हिस्सा मोठा आहे. आयुर्वेदिक रसशाळा, शारंगधर फार्मा, इंदू फार्मा, एवरेस्ट फार्मा, ग्रीन फार्मसी या कंपनी आयुर्वेदिक व हर्बल औषधे बनवत आहेत. इंदू केअर फार्मसी जेजुरीला मोठा प्लांट उभारत आहे. इंडस बायोटेक ही हर्बल व बायोटेक प्रकारातील तर बीव्हीजी लाइफ सायन्स, एरी हेल्थकेअर, सिट्रोन लाइफ सायन्सेस, अयुरसिन बायोजेनीक्स, साईवेद फार्मा या आयुष औषध क्षेत्रातील संशोधन व उत्पादन संस्था आहेत. डेक्कन न्यूट्रासुटीकल, न्युकजेनेक्स लाइफ सायन्सेस या नुट्रासुटीकल कंपनी; डोलिओसिस होमिओ फार्मा होमिओपॅथिक औषधे तयार करते. अन्न व औषध प्रशासन मान्यताप्राप्त पब्लिक टेस्टिंग लॅबरोटरी भारती विद्यापीठाचे पूना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये कार्यरत आहे. तेथे अॅलोपॅथिक आयुर्वेदिक व व्हेटर्नरी औषधांचे परीक्षण केले जाते.
हिंदूस्थान अँटिबायोटिक ही पुण्याची औषध क्षेत्रातील मोठी ताकद आहे. परंतु काही प्रशासकीय व राजकीय कारणांमुळे या वैभवशाली परंपरेला दृष्ट लागली आहे. तोटय़ात असलेल्या या कंपनीची २६३ एकर जमीन विकणे ठरले होते. कंपनीने पुन्हा सुरुवात करत, उलाढाल वाढवली आहे. प्रतिजैविकांची मागणी जागतिक पातळीवर प्रचंड वाढली असून हिंदूस्थान अँटिबायोटिक्सच्या पुन: उभारणीतून पुण्याच्या नावलौकिकात वाढ व्हावी, ही श्रींची इच्छा!
अशाप्रकारे पाऊणशेच्या जवळपास व त्यातील काही जागतिक दर्जाच्या औषध संशोधन व उत्पादन कंपन्यांनी पुण्यास फार्मा हब निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला आहे. फार्मसीच्या शिक्षण क्षेत्रातील पुण्याची बाजू भक्कम आहे. पूना कॉलेज ऑफ फार्मसी भारती विद्यापीठ या १९८१ साली सुरू झालेल्या पुण्यातील प्रथम फार्मसी महाविद्यालयाने चार दशकात आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवला आहे. आज रोजी पुणे जिल्ह्यातील ३५ पेक्षा जास्त फार्मसी महाविद्यालयातून या क्षेत्रासाठी लागणारा तज्ज्ञ निर्माण होत आहे. दरवर्षी ५० पेक्षा जास्त जण पुण्यातून फार्मसीमध्ये पीएचडी प्राप्त करत आहेत. फार्मसीचे शिक्षण घेणारा वर्ग पुण्यामध्ये मोठा आहे व औषध कंपन्यांची संख्यासुद्धा बरी आहे. परंतु पुण्याकडे औषध निर्माण करणारे शहर म्हणून बघितले जात नाही. आयटी पार्कप्रमाणे पुण्याला फार्मा पार्क करता येईल, हे निश्चित.
(लेखक भारती विद्यापीठाच्या पूना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य आहेत.)