अक्षय देवरस a.s.deoras@pgr.reading.ac.uk

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई-कोकणात मार्चच्या मध्यावर चटके देणाऱ्या उष्णता-लाटेचा संबंधच जागतिक तापमानवाढीशी नाही, असे सिद्ध करता येईलही; पण म्हणून नि:श्वास नाही सोडता येणार ! तापमानवाढ आपणच करत असल्याने उन्हाळाच नव्हे, पाऊसही विचित्रपणे वाढणार..

मार्च महिना आला की महाराष्ट्रात उन्हाळय़ाची चाहूल आपल्या सर्वानाच लागते, ही सामान्य घटना आहे. परंतु या वर्षी अनेकांचे लक्ष वेधले ते १४ मार्चला मुंबई आणि कोकणात आलेल्या उष्णतेच्या लाटेने. या दिवशी मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेत ३९.६ अंश कमाल तापमान मोजण्यात आले, जे सरासरीपेक्षा सुमारे सात अंश अधिक होते. इतकेच नव्हे तर मुंबईच्या अनेक भागांत ४० अंशपेक्षा अधिक कमाल तापमानाची नोंद खासगीत काही लोकांनी केली. दरम्यान, कोकणातील रत्नागिरीतही कमाल तापमान ४० अंशपेक्षा अधिक मोजण्यात आले. १६ मार्चपासून या भागांमधून उष्णतेची लाट तर ओसरली, पण ती मागे सोडून गेली हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढ या संदर्भातील बरेच प्रश्न. यात मुंबईतील उष्णतेच्या लाटेचा आणि जागतिक तापमानवाढीचा काय संबंध? भारतासह महाराष्ट्रात तापमानात किती वाढ झाली? पुढे किती अपेक्षित आहे? जागतिक तापमानवाढीमुळे वर्षभर उन्हाळा जाणवेल का, यांसारख्या अनेक प्रश्नांचा त्यात समावेश आहे.

सांताक्रूझला मार्च महिन्यात ४० अंश कमाल तापमान हे नवीन नाही. या ठिकाणी मार्चमधील आजपर्यंत मोजण्यात आलेले सर्वात अधिक तापमान हे ४१.७ अंश इतके आहे जे २८ मार्च १९५६ रोजी मोजण्यात आले. गेल्या दहा वर्षांत पाचदा सांताक्रूझमधील कमाल तापमान ४० अंशांच्या वर गेले आहे. इतकेच नव्हे तर मार्च २०१३ मध्ये सलग सहा दिवस पारा ३९ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहिला आहे. म्हणजेच १९५६ आणि २०१३च्या तुलनेत २०२२ मध्ये इतका उकाडा अद्याप तरी जाणवलेला नाही. याचा अर्थ असा होतो का, की १९५६ किंवा २०१३ मध्ये २०२२ पेक्षा जागतिक तापमानवाढीचा अधिक प्रभाव होता?

हवामानाची परिस्थिती (मेट्रॉलॉजिकल कंडिशन) आणि जागतिक तापमानवाढ या मुळात दोन वेगवेगळय़ा गोष्टी आहेत. एखाद्या दिवशी मुंबईमध्ये ऊन तापले की नाही याचा थेट संबंध त्या भागातील हवामानाच्या परिस्थितीशी असतो आणि याचे उदाहरण म्हणजे १४ मार्चची उष्णतेची लाट. मुंबई आणि कोकणातील कमाल तापमान हे अरबी समुद्रावरून येणारे वारे- जे जमिनीकडून येणाऱ्या वाऱ्याच्या तुलनेत थंड असतात- यामुळे नियंत्रित राहाते. जमीन ही समुद्रापेक्षा लवकर तापते, ज्यामुळे जमिनीवर दिवसा कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. तुलनेत समुद्रावर हवेचा दबाव अधिक असतो ज्यामुळे वारे हे समुद्राकडून जमिनीकडे म्हणजेच पश्चिमेकडून पूर्वेकडे मुंबईसारख्या ठिकाणी वाहतात. परंतु वर्षभरात अनेकदा (प्रामुख्याने पावसाळी ऋतू वगळता) हवामानाच्या परिस्थितीमुळे जमिनीजवळ पूर्व दिशेकडून वारे वाहतात, ज्यामुळे मुंबई अथवा कोकणातील तापमानात लक्षणीय वाढ होते. याचा अर्थ असा की या उष्णतेच्या लाटेचा आणि जागतिक तापमानवाढीचा थेट संबंध नव्हता. पण १९५६ च्या तुलनेत २०२२ मध्ये पृथ्वीचे एकंदरीत तापमान अधिक वाढले आहे हे निश्चित.

२०२० मध्ये केंद्र सरकारच्या भूविज्ञान मंत्रालयाने ‘अ‍ॅसेसमेंट ऑफ क्लायमॅट चेंज ओव्हर द इंडियन रीजन’ नावाचे एक पुस्तक प्रकाशित केले. ज्यात भारतातील तापमान आणि एकंदरीत हवामानात कसा बदल झाला आहे आणि भविष्यात काय बदल अपेक्षित आहे हे सांगितले आहे. १९०१ ते २०१० दरम्यान एकूण भारतातल्या वार्षिक सरासरी तापमानात (अ‍ॅन्युअल मीन टेम्परेचर) वाढ झाली आहे, जी १९८६ ते २०१५ या काळात ०.१५ अंश प्रति दहा वर्षे इतकी आहे. याच काळात सर्वच ऋतूंमधल्या तापमानात वाढ झाली आहे, परंतु उन्हाळय़ात (मार्च ते मे) सर्वात अधिक वाढ मोजण्यात आली आहे. भारतातल्या वेगवेगळय़ा विभागांचा विचार केला तर उत्तर भारत आणि ईशान्य भारतात सर्वात अधिक वाढ मोजण्यात आली. उन्हाळय़ात तर ती ०.५ अंश सेल्सिअस प्रति दहा वर्षे इतकी लक्षणीय आहे. तुलनेत दक्षिण भारतातील तापमानात सर्वात कमी वाढ मोजण्यात आली. यात आणखी एक विशेष बाब म्हणजे १९५१ पासून एकंदरीत भारतात दिवसा आणि रात्री पडणाऱ्या थंडीत प्रचंड घट दिसून आली. उष्णतेच्या लाटेचा विचार केला तर भारतातील इतर भागांपेक्षा मध्य आणि उत्तर भारत यांच्या तीव्रतेत अधिक वाढ झाल्याचे दिसून आले.

महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर १९८६ ते २०१५ या काळात वार्षिक कमाल तापमानात ०.३ अंश प्रति दहा वर्षे इतकी वाढ झाली. हिवाळय़ात दक्षिण मराठवाडा, दक्षिण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात ०.५ अंश प्रति दशक इतकी वाढ झाली आहे. मुंबईचा शहरात १९७३ ते २०२० दरम्यान तापमान ०.२५ अंश प्रति दशक इतके वाढले. हे आकडे आपल्याला ऐकायला फार जास्त वाटत नसले तरी, त्यांच्यामुळे हवामानावर आणि लोकांच्या आरोग्यावर परिणाम होईल इतके ते अधिक आहेत.

पावसाळा नाही, तडाखेच

वाढत्या तापमानाचा एक मोठा परिणाम हा पावसावर होतो, कारण जसे तापमान वाढते तसतशी हवेत आद्र्रता धरून राहण्याची क्षमतासुद्धा वाढते. यामुळे मुसळधार पावसात वाढ होऊ शकते. एक सोपा हिशेब लावायचा तर प्रति एक अंश तापमानवाढीमुळे भारतासारखा उष्णकटिबंधीय भागात पडणाऱ्या मुसळधार पावसाचे प्रमाण हे जवळपास सहा टक्क्यांनी वाढू शकते आणि याचे एक उदाहरण म्हणजे जुलै २०२१ मध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी. या सर्वाचा अर्थ हाच होतो की मुसळधार पाऊस पडण्यासाठी एका ठिकाणी हवामानाची योग्य परिस्थिती असेल तर हवामान बदल अथवा जागतिक तापमानवाढ हे त्या पावसाला वाढवण्याचे काम करते.

भविष्यात तापमान किती वाढू शकते याचा अंदाज ‘क्लायमॅट मॉडेल्स’च्या मदतीने लावता येतो, ज्यात संगणक अथवा परमसंगणकावर हवामानसंदर्भातील समीकरणे आणि माहिती प्रक्रिया केली जाते. काही अहवालांनुसार भारतात १९७६ ते २००५ च्या तुलनेत २०४० ते २०६९ या काळात वर्षांचे सरासरी तापमान हे १.४ ते २.७ अंश इतके वाढण्याची शक्यता आहे. तर २०९९ पर्यंत ते १.३ ते ४.४ अंश इतके वाढू शकते. सर्वाधिक वाढ भारतातल्या उत्तर, ईशान्य, मध्य आणि पश्चिम भागांत होण्याची शक्यता आहे. यामुळे उष्णतेची लाट आणि त्याच्या कालावधीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.

राज्याचा विचार केला तर २०१४ साली नवी दिल्लीतील ‘टेरी’ या संस्थेने ‘यूके मेट ऑफिस’ च्या मदतीने शासनासाठी एक अहवाल प्रकाशित केला. या अहवालानुसार येणाऱ्या दशकात अमरावती आणि औरंगाबाद विभागातील तापमान हे सर्वात जास्त वाढेल. या भागातील वार्षिक सरासरी तापमान २०७० पर्यंत १९७० ते २०००च्या तुलनेत ३ ते ३.५ अंश सेल्सिअस इतके वाढू शकते. तर नागपूर विभागात ३.२ अंश इतके आणि पुण्यासह कोकणात २.७ अंशपर्यंत ते वाढू शकते. अलीकडेच प्रकाशित झालेल्या ‘आयपीसीसी’च्या अहवालानुसार मुंबईमध्ये शतकाच्या अखेपर्यंत वार्षिक सरासरी तापमान हे ४.६ अंश इतके वाढू शकते.

जागतिक तापमानवाढ आणि हवामानात होणारे बदल हे मानवनिर्मित कारणांमुळे होत आहेत, याबद्दल कोणतीही शंका नाही. येणाऱ्या दशकांमध्ये भारतासह राज्यातील तापमानात अजून वाढ होणे हे अटळ आहे. वर्षभर कडक उन्हाळा जाणवला नाही तरी वाढलेल्या कालावधीचा उन्हाळी ऋतू आणि योग्य हवामानाची परिस्थिती असल्यास उष्णतेच्या लाटेची वाढलेली शक्यता पाहायला मिळेल. भविष्यात मुंबईमध्ये उन्हाळय़ातील कमाल तापमान हे राजस्थानसारखे ५० अंशपर्यंत पोहोचण्याची शक्यता जरी नसली तरी राज्यातील इतर भागांत (चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अकोला) तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे ही शक्यता नाकारता येत नाही. लेखक इंग्लंडमधील रेडिंग विद्यापीठात हवामान अभ्यासक आहेत.