मंगला नारळीकर

सण समारंभ, उत्सव साजरे करताना आपला उत्साह व आवाज यांचा इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी सर्वानी घ्यायला नको का?

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

लोक अनेकदा विचारतात, ‘तुमचा देवावर विश्वास आहे का?’ हा प्रश्न गोंधळात टाकणारा आहे, असे सांगावे लागते. कारण देवासंबंधी विविध लोकांच्या विविध कल्पना असू शकतात. उदाहरणार्थ हिंदु, मुस्लीम, ख्रिश्चन किंवा इतर अनेक धर्मातील देव एकच आहेत का? की ती एकाच परमेश्वराची वेगवेगळी रूपे आहेत? देव किंवा ईश्वर म्हणजे नक्की काय? परमेश्वर ही सर्व चेतन व अचेतन सृष्टी निर्माण करणारी आणि त्यांच्यावर अधिकार असणारी अशी महाशक्ती आहे का? तसे मानायला हरकत नाही. निसर्ग सर्व धर्माच्या लोकांना समान वागणूक देतो, तसा परमेश्वर सर्वाना सारखी वागणूक देतो का? तो प्रसन्न किंवा रागावलेला असतो का? माणसांकडून पूजा, प्रार्थना यांची अपेक्षा करतो का? या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. शिवाय या संदर्भात मला एक प्रश्न पडतो. अशी सर्व सृष्टीवर अधिकार असणारी शक्ती असेल, तर ती मानवाशी कोणत्या भाषेत संवाद साधेल? हिब्रू, संस्कृत, ग्रीक, लॅटिन, अरेबिक, मोठाले पिरॅमिड बांधणाऱ्या जुन्या इजिप्शियन लोकांची भाषा की अन्य कोणती भाषा? परमेश्वराची भाषा म्हणजेच निसर्गाची भाषा असावी. ती कोणत्याही मानवी भाषेवर अवलंबून नसावी. खरे वैज्ञानिक निसर्गाच्या भाषेतून ज्ञान मिळवतात, ते आपल्या भाषेत मांडतात, पण भाषांतर करून कोणत्याही भाषेत ते सांगता येते. ते ज्ञान इतर लोक पडताळून पाहू शकतात. उदाहरणार्थ न्यूटनचे नियम किंवा डार्विनचा सिद्धांत. सगळे महान वैज्ञानिक प्रामाणिक सत्यशोधक असतात. अर्थात सृष्टीमागच्या त्या महान शक्तीचा अभ्यास हत्ती आणि सात आंधळय़ांच्या गोष्टीसारखा आहे. प्रत्येकाला त्या प्रचंड शक्तीचा किंचितसा भाग समजतो आणि याची वैज्ञानिकांना कल्पना असते. अलीकडे कोविडच्या साथीने जगभर सर्व देशांमध्ये धुमाकूळ घातला. त्यात कोणत्याही जातीच्या, धर्माच्या किंवा वंशाच्या लोकांमध्ये भेदभाव केला नाही. निसर्ग ज्याप्रमाणे समभावाने चालतो, तसेच त्या परमेश्वरी शक्तीचे असावे. कोविडचा सामना करताना वैज्ञानिकांनी अथक प्रयत्नांनी शोधलेल्या लसींचा आधार सर्वानी घेतला. अजूनही मानवाला सर्व विश्वामागच्या त्या शक्तीचे फार थोडे आकलन झाले आहे. 

अनेक धर्म कोणत्या तरी रूपातील ईश्वराची कल्पना सोयीसाठी मांडतात. त्याला काही हरकत नसावी. कारण ईश्वराचे काही तरी प्रतीक मानून त्याची पूजा प्रार्थना करणे हे बहुजनांना सोयीचे असते, आवडते. त्यांना ईश्वराशी संवाद साधायचा असतो, गाऱ्हाणे सांगायचे असते. लहान मुले आईबापांजवळ तक्रार करतात, मागणे सांगतात, त्याप्रमाणे त्यांना करायचे असते. त्यांना त्यामुळे मानसिक शांती, समाधान मिळते. असा संबंध वैयक्तिक पातळीवर असतो, त्यातून स्रवणाऱ्या भक्तिरसाने साहित्य, संगीत अशा क्षेत्रांत भरपूर प्रमाणात आनंददायी निर्मिती केली आहे. ईश्वराशी असे संबंध किंवा वैयक्तिक पातळीवर निर्वाण किंवा मोक्ष यांच्यासाठी करायचे प्रयत्न हे समाजातील इतरांना त्रासदायक नसावेत. वेगवेगळय़ा देवतांची प्रार्थना करताना त्या देवता म्हणजे अतिभव्य परमेश्वराची प्रतीके आहेत हे विसरू नये.

‘अहं निर्विकल्पो निराकार रूपो विभुव्र्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियांणी। सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धश्चिदानंदरूप: शिवोँऽहं शिवोऽहम्।’ अशी अनेक स्तोत्रे रचणाऱ्या आद्य शंकराचार्यानी विविध देवतांच्या सुंदर, लालित्यपूर्ण आरत्या लिहिल्या आहेत. अशा विविध प्रतीकांचे अद्वैत त्या परमेश्वरात आहे, हे सांगितले आहे.

धर्माचे एक सामाजिक रूप असते, त्याचा आज अधिक गांभीर्याने विचार व्हायला हवा. प्रत्येक धर्माचे सामाजिक नियम काही थोर, विचारवंत आणि समाजाच्या हितचिंतकांनी त्या त्या काळाला अनुसरून तयार केले, यात शंका नाही. आज काळ खूप पुढे सरकला आहे, समाज बदलला आहे. तेव्हा आजच्या काळाला योग्य असे नियम आजच्या समाजधुरीणांनी तयार करायला नकोत का?

धर्म म्हणजे समाजाला धारण करणारा, समाजहित साधणारा नियम असा अर्थ आहे आणि प्रत्येक धर्म असे सामाजिक नियम घालून देतो. खोटे बोलू नका, चोरी करू नका, आई-वडिलांचा मान राखा, गरिबांना मदत करा, दान करा हे नियम सगळेच धर्म सांगतात. मग हाच पाया समजून सामाजिक वर्तनासाठी सर्व धर्माचे समान नियम का असू नयेत? आपल्या देशात अनेक धर्माची भरपूर माणसे आहेत. त्यांनी अनेक पिढय़ा शांततेने एकत्र घालवल्याही आहेत. वाद घालणाऱ्या आणि भांडणे करणाऱ्या नेत्यांना जनतेनेच सुनावले पाहिजे. प्रत्येक धर्माच्या लोकांनी परधर्मीयांचे अत्याचार इतिहासात सोसलेले दिसतात. पण आता जुन्या अत्याचारांची आठवण काढून पुन्हा द्वेष व भांडणे करायची की आपल्या देशाची राज्यघटना पायाभूत समजून त्या पायावर आपआपल्या धर्माचे समाज व्यवहार ठरवायचे? स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या मागण्या सर्व समाजांच्या आहेत. एकाच भागात अनेक पिढय़ा राहिलेल्या, एकाच मातीत निर्माण झालेले अन्न खाणाऱ्या, एकच हवामान अनुभवणाऱ्या लोकांनी बंधुभावाने राहिले पाहिजे. सर्व भारतीयांना कायद्याने समान हक्क आहेत. जाती आणि धर्म यामुळे होणारे विभाजन गौण मानायला हवे. सामान्य जनतेनेच जरा विचार करून त्यांच्यात फूट पाडणाऱ्या लोकांना थांबवले पाहिजे. परधर्मीयांचा द्वेष न करता, त्यांच्या धर्मात दिसणाऱ्या चांगल्या गोष्टींचा आदर करणे हे विचारी लोक करू शकतील का? तसे झाले, तर ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील ‘ईश्वरनिष्ठांची मांदियाळी’ आपल्या समाजात अवतरेल. फूट पाडणाऱ्या लोकांना दूर ठेवण्याचे शहाणपण जनतेत नसेल, तर संशय आणि द्वेष यावर आधारित समाजविभाजन, अराजक आणि रक्तपात, प्रगतीला थांबवणारी अंदाधुंद परिस्थिती अटळ आहे. तुकोबांचे वचन, ‘पुण्य परउपकार, पाप ते परपीडा’ हे पाळून सामाजिक नियम ठरवले पाहिजेत. प्रत्येक समाजात तुकोबांप्रमाणे, असा उपदेश करणारे संत होते. त्यांचे स्मरण करू या. सर्व धर्मप्रमुखांना माझे हे आवाहन आहे. सण समारंभ, उत्सव साजरे करताना आपला उत्साह व आवाज यांचा इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी सर्वानी घ्यायला हवी. अशा काळात लोकांच्या भावना भडकावणाऱ्यांपासून सावध राहायला शिकले पाहिजे.

mjnarlikar@gmail.com

Story img Loader