विनोबांच्या समत्वामध्ये सामाजिक समतेला मोठे महत्त्व दिसते. या समतेचा आरंभ शरीरपरिश्रमाने होतो. योगसाधनेची सुरुवात करण्यापूर्वी आठ तास शरीरश्रम केले पाहिजेत असे ते सांगत आणि स्वत:ही तसे करत. जणू शरीर परिश्रम म्हणजे त्यांच्यासाठी यम-नियम असावे.

विनोबांसाठी समत्वामध्ये जातिभेद निर्मूलन केंद्रस्थानी होते. हा वारसा त्यांना आजोबांकडूनच मिळाला होता. त्यांच्या आजोबांनी म्हणजे शंभुराव भावे यांनी वाईच्या उच्चवर्णीयांचा विरोध पत्करून, भावे घराण्याचे शिवमंदिर सर्वांसाठी खुले केले होते. हरिजनांच्या मंदिर प्रवेशाच्या चळवळीत स्वेच्छेने जी मंदिरे खुली करण्यात आली त्यात हे मंदिर अग्रणी होते.

विनोबांना असा वारसा मिळाला होता. वडील नरहरपंत भावे विज्ञाननिष्ठ होते. त्यांचा तर्कप्रधान दृष्टिकोन विनोबांना वारसा म्हणून मिळाला. सामाजिक समतेचा हा वारसा विनोबांनी आणखी विकसित केला.

वाईला केवलानंद सरस्वती ( नारायणशास्त्री मराठे ) यांच्याकडे म्हणजे प्राज्ञपाठ शाळेत ते वेदाध्ययनासाठी गेले तेव्हा त्यांनी नारायणशास्त्रींना अट घातली की ‘ही विद्या हरिजनांना शिकवणार असाल तरच मी शिकेन.’ पुढे अध्ययन झाल्यावर कुणीही माझ्याकडे यावे आणि वेदाध्ययन करावे हे त्यांनी सांगितले.

गांधीजींच्या आश्रमातील समतेच्या कार्याला बाळकोबा भावे यांनी गती दिली. ते विनोबांचे मधले भाऊ. त्याची कहाणी अशी, एक दिवस आश्रमात एक लहान मुलगा मैला सफाईचे काम करत होता. त्याला या कामासाठी घरच्या मंडळींनी धाडले होते. त्याला ते काम झेपत नव्हते. बाळकोबांनी ते पाहून त्याला मदत करायला सुरुवात केली. दोघांनी मिळून त्या दिवशी मैला सफाई केली. आश्रमवासीयांमध्ये एकच अस्वस्थता पसरली कारण त्यांच्या दृष्टीने एक ‘ब्राह्मण’ हे काम करत होता. विनोबांना ही गोष्ट समजताच त्यांना अत्यंत आनंद झाला. तुझ्यासोबत आता मीही हे काम करेन असे त्यांनी सांगितले. पुढे सुरगावला दोन वर्षे त्यांनी हेच काम केले.

पुढे जातिभेद निर्मूलनासाठी ते आपल्या सहकाऱ्यांसह वर्ध्याजवळच्या नालवाडीत राहू लागले. ही मंडळी मेहतरांचे काम करतात म्हणून तिथल्या दलित लोकांचा त्यांना विरोध झाला. अगदी विहिरीवर पाणी भरण्यास त्यांना मज्जाव करण्यात आला.

विनोबांच्या कार्याची वार्ता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कानी गेली असावी. कारण वर्धेला गांधीजी आणि जमनालालजी यांच्या भेटीसाठी आले असता त्यांनी नालवाडीला आवर्जून भेट दिली. बाबासाहेबांनी विनोबांची दखल घ्यावी असे कोणतेही कारण तेव्हा नव्हते. त्यामुळे ही भेट म्हणजे विनोबांच्या जातिभेद निर्मूलनाच्या कार्याला मिळालेली मोठी पावती होती.

विनोबांना जातिभेदाची एवढी चीड होती की, ‘मी जर अस्पृश्य म्हणून जन्माला आलो असतो तर माझी र्अंहसा डळमळीत झाली असती.’

ही कबुली पुरेशी स्पष्ट आहे. विनोबांचे साम्य-दर्शन सामाजिक समतेपासून सुरू होणे अटळ होते.

– अतुल सुलाखे

  jayjagat24 @gmail.com

Story img Loader