|| श्रद्धा कुंभोजकर
वारसा हा फक्त प्राचीनच नसतो, तर तो बहुसांस्कृतिकही असतो आणि त्याच्या माध्यमातून गतकाळ आपल्याला काही सांगू पहात असतो याचं उत्तम वर्तमान उदाहरण म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि त्याच्या परिसरात आढळलेली स्मृतिस्थळं..
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्थापनेला १० फेब्रुवारी रोजी ७३ वर्ष पूर्ण होत आहेत. सावित्रीबाईंच्या ज्ञानदानाच्या वारशाची आठवण कृतज्ञतेनं जपणाऱ्या विद्यापीठाला दीडशे वर्ष जुन्या मुख्य इमारतीसारख्या बहुविध प्रकारचा वारसा मिळालेला आहे; परंतु सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा परिसर हा विविध स्मृतिस्थळांनी समृद्ध असणाऱ्या वारशाचेही आश्रयस्थान आहे हे फारसे कुणाला माहीत नसते.
या स्मृतींचा मागोवा घेण्याला कारणीभूत झाला तो एक संशयकल्लोळच. विद्यापीठ ग्रंथालयासमोर एक कबर असल्याचं अनेक विद्यार्थी सांगतात, पण ते कधी पाहिलं नव्हतं म्हणून विद्यापीठ परिसरात चक्कर टाकली. एच. टी. केबल असं लिहिलेली एक आठवणीची खूण ग्रंथालयासमोरच्या बागेत दिसलीदेखील. दोन बाजूंना बाणासारखी निमुळती टोकं असणारी आडवी पट्टी एका खांबावर उभारलेली दिसली; पण ख्रिश्चन धर्मपरंपरेनुसार कबरीवर असणारी जन्ममृत्यूची नोंद किंवा क्रूस काही दिसेना. जरा थांबून विचार केल्यावर लक्षात आलं, की कुण्या केबलसाहेबाची ही कबर नसून उच्च दाबाच्या विजेच्या तारा जमिनीखालून या दिशेने जात आहेत हे सांगण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यानं अनेक वर्षांपूर्वी उभारलेली ती दिशादर्शक खूण आहे!
असा संशयकल्लोळ होण्याचं कारण म्हणजे आपण कशाची आठवण जपतो आहोत ती खूणगाठच आपल्याला अनेकदा कळेनाशी झालेली असते. तर असं होऊ नये आणि विद्यापीठ परिसरात असणाऱ्या स्मृतिस्थळांचा वारसा नोंदवून ठेवावा यासाठी प्रत्यक्ष सर्वेक्षणच केलं. तेव्हा लक्षात आलं की, विद्यापीठाच्या परिसरात किमान १२ विविध स्मृतिस्थळं आहेत. त्यांचा हा परिचय.
१. म्हसोबा- विद्यापीठाची मुख्य इमारत आणि मुख्य अतिथीगृह यांमधल्या जागेत म्हसोबाचं ठाणं आहे. मानवी आकारातील मूर्ती इथे दिसत नाही; परंतु अनेक लहान लहान पाषाणांना मिळूनच म्हसोबाचं ठाणं मानलं जातं.
२. मरीआई- विद्यापीठ पोस्ट ऑफिसच्या मागच्या बाजूला मरीआईचं लहानसं देऊळ आहे. इथेदेखील मरीआईची मूर्ती नसून अनेक लहान पाषाणांना मिळून देवीचं स्थान मानलं जातं.
३. अनाम कबर- मरीआई मंदिराच्या समोरच एक अनाम कबर आहे. या कबरीजवळ मेंदीचं झुडूप आहे. त्याची निगा स्थानिक मंडळी राखतात.
४. साती आसरा- सेवक विहाराच्या मागच्या बाजूने वाहणाऱ्या ओढय़ाकाठी अगदी लहानसं साती आसरांचं स्थान आहे. या जलदेवता सात लहान पाषाणांच्या स्वरूपात आहेत.
५. हनुमान मंदिर- विद्यापीठ सेवक विहारातील हनुमान मंदिरात हनुमान प्रतिमा तर आहेच. त्या मंदिरातच बाहेरच्या बाजूला विठ्ठलरखुमाई आणि राधाकृष्णांच्या मूर्तीही आहेत. जुन्या लहान दगडी देवळाचा सभामंडप गेल्या दशकात विस्तारित केलेला दिसतो. प्रदक्षिणेच्या वाटेवर एका वठलेल्या झाडाच्या बुंध्यापाशी एका आकारविहीन दैवताची स्थापना केलेली आहे.
६. शंकराचं देऊळ- सेवक विहाराजवळच काळय़ा पाषाणातून घडवलेली पिंड असणारं शंकराचं देऊळ आहे. मंदिर अगदी नवं असलं तरी शिविलग आणि लहानसा नंदी जुने आहेत.
७. गणेश मंदिर- हे गणपती उत्सवाच्या निमित्तानं बसवल्या जाणाऱ्या मूर्तीसाठी केलेलं अगदी अलीकडच्या काळातलं मंदिर आहे.
८. वीर गोगादेव मंदिर- विद्यापीठाची मुख्य इमारत इंग्रजांनी बांधली त्या काळापासून विद्यापीठात काम करणाऱ्या सेवकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या नाथपंथी वीर गोगादेव या दैवताचं मंदिर सहसा कुठे आढळत नाही. ते सेवक विहारासमोरच आहे. वीर गोगादेव या सुमारे एक हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या राजपुरुषाची जन्मकथा सांगणारे काव्य या देवळात एका फलकावर छापील स्वरूपात पाहायला मिळते. वीर गोगादेव यांचे मातापिता गोरखनाथांचे अनुयायी होते. गोरखनाथांच्या कृपेनं गोगादेव यांनी अंगनपाल याचा पराभव करून राज्य स्थापन केल्याची आख्यायिका या काव्यातून समजते. या देवळात गोरखनाथांची समाधिमुद्रेतील मूर्ती आणि वीर गोगादेव यांची अश्वारूढ मूर्ती आहे. त्याशिवाय त्रिशूल आदी नाथपंथीय चिन्हांचीही पूजा केली जाते.
९. जुम्बलशाह दर्गा- सेवक विहाराच्या पूर्वेला असणारा हा दर्गा जुम्बलशाह यांच्या स्मृत्यर्थ निर्माण केलेला आहे.
१०. बुद्ध विहार- सेवक विहाराजवळ लहानसा बुद्ध विहार आहे. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून सुमारे पन्नास वर्षांपासून हा विहार प्रेरणा देत आहे.
११. राजभवन ट्रस्ट मस्जिद- सेवक विहार आणि इंग्रजांच्या काळातील हत्तीखान्याची इमारत यादरम्यान ही सत्तर वर्ष जुनी मस्जीद आहे.
१२. एलिसची कबर- सर जेम्स फग्र्युसन यांच्या ऑस्ट्रेलियन पत्नीची भाची म्हणजे एलिस रिचमन ही पंचविशीतली मुलगी त्यांच्या कुटुंबात राहात असे. १३ नोव्हेंबर १८५६ रोजी जन्मलेल्या एलिसला १८८२ मध्ये संक्रांतीच्या दिवशी कॉलऱ्यामुळे मृत्यू आला. तिची कबर आणि त्याभोवती असणारी एलिस गार्डन ही सुंदर बाग हे विद्यापीठातलं नीरव ठिकाण आहे.
जलदेवता असणाऱ्या साती आसरा किंवा रोगराईपासून वाचवण्यासाठी पूजल्या जाणाऱ्या मरीआईसारख्या देवता या दैवतशास्त्रीय दृष्टीनं पाहिलं तर अगदी पुरातन असतात. त्यांना मानवी आकार नसतो. त्यांचं शक्यतो घडीव असं देऊळही नसतं. निराकार ईश्वराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न मशिदीच्याही माध्यमातून केलेला दिसतो. माणसांच्या योगक्षेमाची काळजी वाहणाऱ्या दैवी शक्ती म्हणून शिव, विष्णू, विठ्ठल अशा दैवतांची भक्ती केली जाते. भगवान बुद्ध, वीर गोगादेव, जम्बीलशाहबाबा अशा समाजाला दिशा देणाऱ्या, आधार देणाऱ्या माणसांची दैवतस्वरूपात आठवण जपली गेलेली दिसते, तर एलिसची किंवा एखाद्या अनाम व्यक्तीची कबर आपल्याला सोडून पुढे गेलेल्या सोबत्यांची आठवण जपत असतात.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा परिसर हा माणसाला मिळालेला वारसा किती प्रकारचा असू शकतो याचा प्रत्यय देतो. दख्खनच्या पठारावर करोडो वर्षांपूर्वी तयार झालेला बसाल्ट दगड, विद्यापीठाच्या परिसरातून वाहणाऱ्या ओढय़ाच्या काठावर असणारं साती आसरांचं लहानसं देऊळ, दूर ऑस्ट्रेलियातून येऊन कॉलऱ्यामुळे मृत्यू पावलेल्या एलिसची ओढय़ाकाठची समाधी, आफ्रिकेतून भारतात आलेल्या इंग्रजांनी सोबत आणलेली बाओबाबची झाडं आणि हाय टेन्शन केबलचं चिन्ह दाखवणाऱ्या दगडी खांबाला एच. टी. केबल नावाच्या इंग्रजाची समाधी असल्याचं मानणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अनेक पिढय़ांची कुजबुज-हे सगळेच विद्यापीठाच्या वारशाचा अविभाज्य भाग आहेत. गतकालीन श्रद्धास्थानांबद्दलच्या आदराचा बहुसांस्कृतिक वारसा या परिसरानं जपला आहे.
लेखिका ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’त इतिहासाचे अध्यापन करतात.
shraddhakumbhojkar@gmail.com