सकृद्दर्शनी इंग्रजी भासणाऱ्या आणि आज देशभर प्रचलित असलेल्या या शब्दाचे जनक आपलेच एक मराठी बांधव आहेत. ते आहेत समतानंद अनंत हरी गद्रे. आपल्या आयुष्यात पत्रकारितेपासून ते समाजसुधारकापर्यंत जे अनेक व्यवसाय गद्रे यांनी केले, त्यांतील एक म्हणजे जाहिराती करणे. सोहराब मोदी या त्या काळात खूप दबदबा असलेल्या नाटय़-चित्रनिर्मात्याचे जाहिरातीचे सगळे काम ते सांभाळत असत. ‘साष्टांग नमस्कार’नंतर पुढल्याच वर्षी, म्हणजे १९३४ साली, ‘घराबाहेर’ हे आपले पुढचे नाटक अत्रेंनी लिहिले व त्याच्या जाहिरातीची जबाबदारी गद्रे यांच्यावर सोपवली. ‘घराबाहेर’ने लोकप्रियतेचा कळस गाठला.
सलग चार महिने गिरगावातील ‘रॉयल ऑपेरा हाऊस’ इथे त्याचे प्रयोग झाले. त्याकाळी तिथे चित्रपट नाही तर फक्त नाटकेच व्हायची. हे नाटक तसे मोठे होते, साडेचार तास चालणारे होते. पण प्रेक्षक अगदी तल्लीन होऊन बघत. एका रविवारी त्या नाटकाचे थेट नाटय़गृहातून इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीने ‘आकाशवाणी’वरून प्रक्षेपण केले. तोपर्यंत कुठल्याही मराठी नाटकाचे आकाशवाणीवरून असे थेट प्रक्षेपण झाले नव्हते.
‘घराबाहेर’ची गद्रे यांनी केलेली जाहिरात मोठी आकर्षक होती. त्यांनी लिहिले होते :
‘सगळी मुंबई घराबाहेर पडली. का? ऑपेरा हाऊसमध्ये अत्र्यांचे घराबाहेर नाटक पाहण्यासाठी.’
याच नाटकाची जाहिरात छापताना त्यांनी ‘हाऊसफुल्ल’ हा शब्दप्रयोग प्रथम केला.
रॉयल ऑपेरा हाऊस या नावातील ‘हाऊस’ हा शब्द आणि ते पूर्ण भरलेले म्हणून ‘फुल्ल’ हा (‘ल’ला ‘ल’) शब्द त्यांनी एकत्र आणला. न्यूयॉर्कच्या ब्रॉडवेवर किंवा लंडनच्या वेस्ट-एन्डवर तेव्हा ‘टिकेट्स सोल्ड’ असे म्हणायचा प्रघात होता. हाऊसफुल्ल शब्द मग इतरांनीही उचलून धरला. आज सगळय़ाच भारतीय भाषांत वापरला जाणारा हा शब्द मुळात अनंतरावांचा.
‘बेफाट’, ‘दणदणीत’, ‘खणखणीत’, ‘तडाखेबंद’ हे नाटक-सिनेमाच्या जाहिरातीत आज सर्रास वापरले जाणारे शब्द हीदेखील त्यांचीच देणगी. आपल्या ‘निर्भीड’ या लोकप्रिय साप्ताहिकात त्यांनी या नाटकाविषयीच्या बातम्या सतत छापल्या. नाटकाचे स्वत: विस्तृत परीक्षण केले.
या साप्ताहिकाचा ‘घराबाहेर विशेषांक’देखील त्यांनी काढला. ‘घराबाहेर’च्या प्रचंड यशाने भारावून गेलेल्या अत्रेंनी आपल्या ‘कऱ्हेचे पाणी’ या आत्मचरित्रात त्या यशाचे खूप मोठे श्रेय अनंतरावांना दिले आणि त्यांना ‘जाहिरात-जनार्दन’ ही उपाधी बहाल केली.
– भानू काळे, bhanukale@gmail.com
‘भाषासूत्र’ या सदरात सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस, पाच जाणकार लेखकांचे लघुलेख दिले जातात. या आठवडय़ात सोमवारच्या लता मंगेशकर आदरांजली अंकामुळे ‘भाषासूत्र’च्या लेखकांचा ठरलेला क्रम बदलला; तो दुरुस्त करण्यासाठी अपवाद म्हणून या अंकात, या आठवडय़ातील अखेरचा लेख (शुक्रवारऐवजी) देत आहोत.