|| कण्णन सुंदरम
द्रमुक आणि अण्णा द्रमुक हे पक्ष ज्या राज्यात आलटूनपालटून सत्तेवर येतात असे म्हटले जाते, त्या तमिळनाडूत द्रमुकचे सत्तेवर येणे हे ठीकच, पण ज्या पेरियारप्रणीत विचारांमुळे हे दोन्ही पक्ष स्थापन झाले, ते विचार आज कुठे आहेत?
अ. भा. द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) या पक्षाने दहा वर्षे विरोधी पक्षाची भूमिका बजावल्यानंतर २०२१च्या निवडणुकीत तमिळनाडूतील सत्ता परत मिळविली. भारतीय जनता पक्ष हा द्रमुकचा प्रमुख वैचारिक विरोधक, त्याला रोखण्यात यश मिळाले. द्रमुकनेते एम. करुणानिधी हयात नसतानाही मिळालेल्या, जागांची संख्या दीडशेच्या आसपास नेणाऱ्या या यशानंतर कार्यकत्र्यांच्या पातळीवर जल्लोष सुरू होणे ठीकच; परंतु द्रमुकचे वैचारिक पाठीराखे म्हणविणाऱ्या अनेकांना द्रमुकच्या या विजयाचा तितकासा आनंद झालेला दिसत नाही. त्यांच्यापैकी काही जणांची कुजबुज अशी की, प्रशांत किशोर या ‘उत्तर भारतीय ब्राह्मण’ माणसावर आपण विसंबलो नसतो, तर अवघ्या १५८ जागांवर समाधान न मानता, तमिळनाडू विधानसभेच्या २३४ पैकी २०० जागा द्रमुकने पटकावल्या असत्या! ही कुजबुज नजरेआड केली तरी, द्रमुकचे अनेक वैचारिक समर्थक पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींच्या विजयाचे भरभरून कौतुक करताना दिसतात; पण स्वत:च्या राज्यातील, स्व-पसंतीच्या पक्षाचा विजय त्यांना उत्साहवर्धक वाटत नाही, असे का व्हावे?
यामागील कारणे शोधण्याआधी काही गोष्टी स्पष्ट केल्या पाहिजेत. ‘द्रमुकचे वैचारिक समर्थक’ हे एरवी डावी-उजवीकडे न झुकणारे, स्वतंत्र बाण्याचे विश्लेषक म्हणून एरवी खपून जाणारे, असेच आहेत. पण त्यांना ऐतिहासिक कारणांमुळे द्रमुक जवळचा वाटतो आणि भाजपला आपल्या राज्यापासून लांबच ठेवले पाहिजे हे त्यांना पटते. ही भावना इतकी बलवत्तर आहे की, तमिळनाडूमधील -तमिळ भाषेतील- माध्यमांमध्ये तसेच येथील समाजमाध्यम व्यवहारावरही भाजपचे प्राबल्य नसून या द्रमुककडे झुकलेल्या मंडळींचाच दबदबा आहे. काही वेळा लोकभावना एकीकडे आणि ही मंडळी भलतीकडे, अशी विसंगतीही दिसते.
तमिळनाडूतील गेल्या दीडदोन दशकांच्या विधानसभा निवडणुकांचा आढावा घेतल्यास, इतक्या जागा द्रमुकला एकविसाव्या शतकात प्रथमच मिळाल्या आहेत. लोकसभेसाठी २००४ मध्ये झालेल्या निवडणुकांत अखिल भारतीय अण्णा द्रमुक (यापुढे ‘अण्णाद्रमुक’) या पक्षाने सपाटून मार खाल्यावरही, पुढे २००६च्या विधानसभा निवडणुकीत द्रमुकने स्वत:च्या अवघ्या ९६ जागांनिशी अल्पमतातील सरकार स्थापले. मग २०११ मध्ये जयललितांच्या अण्णा द्रमुकपुढे करुणानिधींच्या द्रमुकची इतकी पीछेहाट झाली की, १० टक्केदेखील जागा मिळवता न आल्याने ‘प्रमुख विरोधी पक्ष’ हे बिरुदही द्रमुकने गमावले. जयललितांच्या घसरणीमुळे २०१६ मध्ये द्रमुकलाच विजय मिळणार, अशी बोलवा असतानाही बाजी मारली ती अण्णा द्रमुकनेच.
भाजपचा तमिळनाडू-प्रवेश काही आजचा नाही. १९९०च्या दशकापासूनच कधी अण्णा द्रमुकशी, तर कधी करुणानिधींच्या द्रमुकशी राजकीय शय्यासोबत भाजपने केलेली आहे. द्रमुकशी २००१च्या विधानसभा निवडणुकीत युती करून चार जागा भाजपने जिंकल्याही होत्या. २०११ आणि २०१६ मध्ये भाजपने (अनुक्रमे) २०४ आणि १८८ जागा लढवून शून्य जागा मिळवल्या, पण यंदा ‘जगातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष’ अशी ख्याती झालेल्या भाजपने अण्णा द्रमुकशी युती करून २० जागा लढविल्या आणि चारच -म्हणजे द्रमुकशी २००६ मध्ये युती असताना जिंकल्या होत्या तेवढ्याच- जागा मिळविल्या.
मुद्दा भाजपच्या संख्याबळाचा नाही किंवा यंदा भाजपच्या मतांची टक्केवारी दोन पूर्णांक ६२ शतांश होती हाही नाही. भाजपमुळे तमिळनाडूच्या राजकारणात यंदा काही निराळी वळणे आली. रामस्वामी पेरियार यांच्या प्रेरणेने ‘द्रमुक’ची स्थापना झाली तसेच नंतरही पेरियारवादी चळवळीतील अनेक नास्तिकतावादी संघटना स्थापन झाल्या, त्यांपैकी ‘करुप्पर कूटम’ या गटाने मुरुगनविरोधी मोहीम सुरू केली होती. तमिळनाडूत आजपर्यंत अशा मोहिमांचे कुणाला काही वाटत नाही. पण भाजप, त्यांचे हिंदुत्व याचा बोलबाला तमिळनाडूतही वाढल्यामुळे निराळ्या घडामोडी घडत गेल्या. मुरुगन हा तमिळनाडूचा, तमिळभाषकांचा, तमिळ अस्मितेचाच जणू देव अशा थाटात ‘करुप्पर कूटम’च्या विरोधात प्रचार झाल्यावर, या गटाशी आमचा काही संबंध नाही, असे स्पष्टीकरण द्रमुकने दिले. तरीही, द्रमुक कसा हिंदुविरोधी, हिंदुहितविरोधी पक्ष आहे वगैरे प्रचाराला जोरच चढला. यावर ठाम पेरियारवादी भूमिका घ्यायची सोडून द्रमुकने भलताच रस्ता धरला. मुरुगनच्या हातातील ‘वेल’ हे भाल्यासारखे शस्त्र भाजपने २०२०च्या नोव्हेंबरपासूनच राजकीय प्रतीक बनवले होते, ते आता द्रमुकच्याही प्रचार-चित्रांमध्ये दिसू लागले. द्रमुकप्रणीत आघाडीतील ‘द्रविडार कळखम’ या जहाल पेरियारवादी मित्रपक्षाचे नेते के. वीरमणी यांच्या प्रचारसभांपासून द्रमुकचे कार्यकर्ते पाठच फिरवीत आहे, असे चित्र यंदा पहिल्यांदाच दिसू लागले.
दुसरे निराळे वळण भाजपचे. मोदींचे नाव यंदा तमिळनाडूत चालणार नाही, हे ओळखून भाजपने या राज्यात मोदींच्या ऐवजी जयललिता आणि एम. जी. रामचंद्रन या दिवंगत अण्णा द्रमुक नेत्यांचेच ‘कटआऊट’ लावून प्रचार केला.
या वैचारिक गोंधळात काहींचे अनपेक्षित लाभ होतात, तसा लाभ ‘मावळते’ आणि पराभूत मुख्यमंत्री ई. के. पलानिस्वामी यांचा झालेला आहे. एकंदरीत यंदा निवडणूक जिंकण्यापेक्षा पक्षावर आपली पकड बसवणे हाच पलानिस्वामींचा प्राधान्यक्रम असावा, असे अनेक संकेत मिळत होते. त्यांनी आघाडी करतेवेळी पारंपरिक मित्रपक्षांनाही दूरच लोटले. त्यामुळे ‘देशिय मुरपोकु द्रविड कळघम’ (डीएमडीके) आणि पुतिया तमिळगम यांसारखे छोटे पक्ष आघाडी सोडून गेलेच; पण दिवंगत जयललिता यांच्या वारस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शशिकला यांनी स्थापन केलेला ‘अम्मा मक्कळ मुन्नेत्र कळघम’ (एएमएमके) हा नवा पक्ष तर, पलानिस्वामींनी आघाडीच्या जवळपासही फिरकूच दिला नाही. वास्तविक, भाजपने शशिकलांच्या करिश्म्याचा वापर व्हावा म्हणून ‘एएमएमके’शी सोयरीक करण्याचे टुमणे कायम ठेवले होते, तरीही पलानिस्वामी बधले नाहीत. अखेर शशिकलांच्या पक्षाचा दारुण पराभव झालाच. त्या पक्षाला खातेही उघडता आले नाही. शिवाय, पक्षांतर्गत विरोधक ओ. पन्नीरसेल्वम यांचीदेखील सद्दी संपल्यात जमा, त्यामुळे ‘जयललितांच्या पक्षा’वर आता पलानिस्वामींचीच पकड, हे त्यांच्या पराभवातले सुख.
पण अण्णा द्रमुकचा पराभव झाला, याचे कारण भाजपशी केलेली युती. खुद्द जयललिता यांनीच २००४ मधल्या पराभवानंतर ज्या भाजपशी युती नको अशी जाहीर भूमिका घेतली होती, ऐन २०१४च्या ‘मोदी लाटे’तही ज्या अण्णा द्रमुकने राज्यातील सर्व ३९ लोकसभा मतदारसंघ लढवून भाजपला जागा दाखवून दिली होती, त्या भाजपशी जयललितांच्या निधनानंतर अण्णा द्रमुकने युती केली, ती काही स्वखुषीने म्हणता येणारी नाही. विशेषत: जयललितांच्या निधनानंतर, केंद्र सरकार अण्णा द्रमुकवरील दबाव कसा वाढवत होते हे साऱ्यांनी पाहिलेच आहे. त्यातच पाताळ मक्कळ कच्चि (पीएमके) सारख्या दलितविरोधी पक्षाशी केलेली युतीदेखील अण्णा द्रमुकला महागात पडली. अर्थात, याच पीएमकेला यंदा पाच जागा मिळाल्या आहेत.
द्रमुकप्रणीत आघाडीतील अन्य पक्षांनी द्रमुकपेक्षा कमी जागा लढवूनही तुलनेने जास्त जिंकल्याचे यंदा दिसले. द्रमुकच्या मित्रपक्षांतील अनेक उमेदवार जास्त मताधिक्याने निवडून आले. अर्थात, मित्रपक्षांशी द्रमुकचे वागणे नेहमीच स्वकेंद्रित राहिल्याचे २००४ पासून दिसून आले आहे. मनमोहन सिंग सरकारमध्ये लागोपाठ दोनदा (२००४ आणि २००९) अनेक मंत्रिपदे मिळवूनही, राज्यामधील सत्तेत काँग्रेसला द्रमुकने २००६ मध्ये नगण्य वाटा दिला होता. यंदा काँग्रेसने २५ जागा लढवून त्यापैकी १८ जिंकल्या. विडुदलै चिरुथैगळ कच्चि (व्हीसीके) हा द्रमुकचा मित्रपक्ष सहाच जागांवर लढला, त्यापैकी चार जागांवर जिंकला.
अशा परिस्थितीत खरे तर द्रमुकने काँग्रेस, व्हीसीके आणि डावे पक्ष यांना योग्य स्थान देऊनच तमिळनाडूत आघाडी सरकार स्थापन करायला हवे. पण तसे होणार नाही. या अन्य पक्षांना द्रमुकतर्फे सत्तेत योग्य वाटा दिलाच जाणार नाही. तसे झाले, तर पुन्हा द्रमुकची उतरंड सुरू होईल. या निवडणुकीने सर्वांचीच वैचारिक घसरण आणि भूमिकांमधील धरसोड दाखवून दिली, हे मात्र नक्की.
लेखक ‘कलाचुवादु’ या तमिळ नियतकालिकाचे संपादक आहेत.