|| नंदा खरे
आयआयटीच्या टप्प्यावर भेटलेला मित्र, पुढे कुणाचा ‘सद्सद्विवेक’ ठरतो, कुणाचा ‘मेन्टर’ ठरतो.. अनेकांच्या बुद्धीची मशागत करत राहणारे सुधीर बेडेकर यांच्या समग्र कार्याचा हा आढावा नव्हे. सुधीर बेडेकर का महत्त्वाचा होता, हे सांगण्यासाठी ही नोंद..
२००२-०३ ची घटना असेल, बहुधा. पुण्यात ‘आजचा सुधारक’ मासिकाचा एक कार्यक्रम झाला, ओंकारेश्वरजवळच्या एका हॉलमध्ये. त्यावेळी सुलक्षणा महाजन मासिकाच्या नागरीकरण विशेषांकाचं काम करत होत्या. आम्ही सारे स्वयंसेवक म्हणून सतरंज्या घालत होतो. मी मध्येच उद्गारलो ‘चला! एक विचारवंत तर आला’ सुलक्षणांनी विचारलं ‘कोण?’ म्हटलं ‘सुधीर बेडेकर!’ सुलक्षणांच्या चेहऱ्यावर आदर दाटून आला. मी त्यांना सुधीर माझा वर्गमित्र-वसतिगृह-मित्र कसा होता याचा तपशील सांगितला. त्या म्हणाल्या, ‘आम्ही कॉलेजात असताना सुपरस्टार होते ते! कुठेही ते आले की लोक सावध व्हायचे.’ त्या अर्थातच मागोवा मासिकाच्या, मागोवा गटाच्या बहराच्या काळाबद्दल बोलत होत्या, ‘आणीबाणी’च्या तात्काळ आधीचा, आज कैक शतकं दूर वाटणारा.
त्या ज्या काळाबद्दल बोलत होत्या त्यावेळी परिस्थितीबद्दल जागरूक मुलं कुमार शिराळकरांची ‘ऊठ वेडय़ा, तोड बेडय़ा’; सुधीर बेडेकरची ‘हजार हातांचा ऑक्टोपस’ आणि ‘निषासूक्त की सूर्यगर्जना’ वगैरे पुस्तिका वाचून प्रभावित होत असत. मागोवा गट एकटाही नव्हता. युक्रांद (युवक क्रांती दल), दलित पँथर, राष्ट्र सेवा दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवसेना इत्यादींच्या युवक संघटनाही असत; आणि त्याही जोमदार. ग्रंथालीच्या ‘संकल्प’ या पुस्तकात अशा संघटनांचा एक ‘क्रॉस-छेद’ सापडेल. अर्थात, मी मागोवा गटाचा हितचिंतक इतपतच गुंतलो होतो. पण सुधीरचा जुना मित्र या नात्यानं मला परावर्तित अभिमान वाटत असेच!
आमची आयआयटी पवईतली मैत्री. खरं तर सुधीर इलेक्ट्रिकलचा विद्यार्थी, मी सिव्हिलचा. पहिलं वर्ष वर्गमित्र, पुढचं वर्ष संपर्क नाही, अशानंतरची तीन वर्ष होस्टेलमेट हाच मुख्य संपर्क होता. त्याच तीन वर्षांमध्ये सुधीर खरं तर इंजिनीअिरगला ‘अल विदा’ म्हणून पूर्णवेळचा कम्युनिस्ट तत्त्वज्ञ होत होता. ..आणि कॉलेजमध्ये अधूनमधून ‘गचकत’ होता! पण त्याची हुशारी, कलात्मकता, विनोदबुद्धी, साऱ्यांचे आम्ही लोक भक्त होतो.
(राहावत नाही म्हणून मध्ये बोलतो : सुधीरनं एका साबणाच्या वडीत एक उत्तम नग्न-स्त्री-आकृती कोरली. आमच्यातलाच एक ‘अकल का दुश्मन’ तीच वडी घेऊन अंघोळीला गेला!)
पण तरीही सुधीर १९६७ ऐवजी १९६९ मध्ये बी.टेक.झाला; आणि त्याला दोनदा नापास करणाऱ्या इलेक्ट्रिकल विभागानं काही काळ त्याला डेमॉन्स्ट्रेटर म्हणून नोकरीही दिली! मग मात्र सुधीर पूर्णवेळ डाव्या चळवळींशी निगडित कामंच करत राहिला.
मी मूळचा वऱ्हाडातला होतो, महानगरी केंद्रापासून दूर. पण १९६९-७१ औरंगाबादजवळ जायकवाडी धरण, आणि १९७१-७५ काळात पुणे-सोलापूर रस्त्यावर उजनी धरण यांच्याशी संबंधित कामांवर असल्यानं सुधीरशी संपर्क कायम राहिला; थोडा तुटक का असेना. आणि हा ‘मागोवा गटा’च्या बहराचा काळ होता.
इतर युवक गटांपेक्षा मागोवाची बांधणी सैल होती. कुमार शिराळकर- दीनानाथ मनोहरांसोबत एक गट शहाद्याच्या आदिवासी चळवळीत काम करायचा. त्यात प्रफुल्ल बिडवई, अच्युत गोडबोले वगैरे लोक कमीअधिक वेळ सहभागी होत. मला वाटतं प्रफुल्ल, गोडबोले वगैरे काही महिने होते. गम्मत म्हणजे त्या कामाला प्रसिद्धी देणारं ‘माणूस’ साप्ताहिक, त्याचे संस्थापक-संपादक श्री. ग. माजगावकर, हे ‘उजवे’ मानले जात, तर शिराळकर-मनोहर कर्मठ डावे ! पण तो आणीबाणीपूर्व काळ एकमेकांच्या ‘वाटांमध्ये’ समान तुकडे शोधून द्वेषहीन भावानं पटतील तेवढी कामं एकत्र करण्याचा होता. विरोधकांना ‘संपवण्यात’ वेळ वाया न घालवता कामं केली जात. डॉ. अनंत फडके त्यांचं आयुष्यभराचं वैद्यकीय शहाणपण पसरवायचं काम करू लागले होतेच. प्रफुल्ल बिडवई मार्क्सवादाचा अभ्यास आणि सोबत वार्ताहरकी करत असे. एका पंधरवडय़ाच्या काळात मलेरियानं पछाडलेला शिराळकर सुधीरच्या घरी राहिल्याचंही अर्धवट आठवतं. मी मात्र निरीक्षक, मूठ-पसा पैसे देणारा, असाच होतो.
पण एकदा थेट मदत करता आली. १९७२-७३ चा दुष्काळ जोरावर होता. ‘पीएल-४८०’ नावाच्या अमेरिकन कायद्यानं दिलेल्या भिकेवर आपण जेवत होतो. दांडेकर-रथ यांच्या ‘पॉव्हर्टी इन इंडिया’ या प्रबंधावर बेतलेली रोजगार हमी योजना जन्माला येत होती. त्या योजनेखालील कामं कशी होतात ते पाहायला मागोवा गटाचे दोघे जण मराठवाडय़ात जाऊ इच्छित होते, कारण दुष्काळाचा जोर तिथे सर्वाधिक होता. तिथे मी जायकवाडी डाव्या कालव्याशी संबंधित काही कामं करत होतो. तर माझ्या कॅम्पवरच्या लोकांना ‘पाहुण्यांच्या जेवण्या-राहण्याची सोया करा, माझ्या खात्यावर’ असं पत्र देऊन बालमोहन लिमये (आयआयटी, पवईच्या गणित विभाग-प्रमुख पदावरून निवृत्त) आणि माधव रहाळकर (उद्योग-जगतातून निवृत्त, बहुधा.) यांना गुड-बाय केलं. त्यांनी बहुतेक कामं मंत्र्यांच्या गावांसाठीच कशी होतात (उपशीर्षक : ऑल रोड्स लीड टु रोम!), कामगारांना कशी वागणूक दिली जाते (अत्यंत तुच्छतेची, ‘भिकारडे कुठले’) वगैरेंवर उत्तम लेख लिहिला, तोही ‘इकॉनॉमिक अँड पोलिटिकल वीकली’ या दर्जेदार साप्ताहिकात. तो गोविंदराव तळवलकरांना आवडून त्यांनी त्यांच्या पेपरात संपादकीयालगत लेखाचं मराठी भाषांतर छापलं! लिमये-रहाळकर लिहीत होते वेगळय़ा मंत्र्याबद्दल, पण ते ‘लावून घेतलं’ सिंचनमंत्र्यांनी! अखेर ‘कोणी गुपित फोडलं?’ अशी जुजबी चौकशी होऊन प्रकरण मिटलं.
एव्हाना मागोवा मासिक त्याच्या खास आवाजात ‘बोलू’ लागलं होतं, सुधीरसारखंच मुद्देसूद आणि पूर्णपणे तर्ककर्कश.. आणि मधूनच थांबून विचार करणारं ! अगदी ‘महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व’ ऊर्फ पु. ल. देशपांडे यांनाही आव्हानित करत मागोवाचा प्रवास सुरू होता. आणि यातच आणीबाणी आली. लेख कापले जात, तेव्हा पानं कोरी राहात. मागोवाने कागद कोरे ठेवून पाहिले, तर त्यांवर बंदी आली. जडजंबाल तात्त्विक लेख लिहिले, तर गरीब बिचारे पीएसआय विचारू लागले ‘साहेब, माझी नोकरी नाही नं जाणार, यामुळे? समजत नाही, हो, आम्हाला!’ अखेर दोन अंक तीन महिन्यांच्या अंतराने निघाले ‘पोर्तुगाल : अपुरी क्रांती : पूर्वार्ध आणि उत्तरार्ध’ कंटाळून सुधीरनं मागोवा बंद केलं. माझ्या आग्रहावरून आठवडाभर तो उजनी धरणावरही राहून गेला; पण तशा सुट्टीची त्याला ना सवय होती, ना गरज.
तळमळतच सुधीरनं, मागोवा गटानं आणीबाणी ओलांडली. काही काळ सुधीर माकपच्या राज्य-समितीतही होता. पण त्याचा मूळ स्वभाव विचारवंताचा, अभ्यासकाचा, तत्त्वज्ञाचा होता. मासिकाचं संपादकत्त्व, यापेक्षा ‘प्रॅक्टिकल’ काम त्याला रुचत नसे. तरी माकपनं त्याला ‘फुआमा’ (फुले-आंबेडकर-मार्क्स) भाषणांची एक मालिका महाराष्ट्रभर द्यायला लावली. पण हे चाळणीनं पाणी भरायला लावणं होतं; ‘काम’ नव्हतं. सुधीरनं मागोवा-नमुन्याचं ‘तात्पर्य’ हे मासिक काढलं. पक्षाच्या दैनंदिन कार्यक्रमांतला सहभाग वाढवायचा प्रयत्न केला. पण तो होता एकीकडे राज्यशास्त्राचा अभ्यासक, दुसरीकडे सरकारांची नाडी दौडवायला लावणारा अनियत-लेखक; ढोबळमानानं नोम चोम्स्की प्रकारचा माणूस. काही उदाहरणं पाहा :
सुधीरनं ‘साधना’मध्ये एक लेख लिहिला. मथळय़ात वहिदा रहमान (‘प्यासा’मधली), सोफिया लॉरेन (‘टू विमेन’मधली) आणि झोर्बा (द ग्रीक, अँथनी क्वीननं अजरामर केलेली भूमिका) होते. पण भावुक सुरुवात करून सुधीर मार्क्स आणि चे गव्हेरापर्यंत कसा गेला ते वाचकाला समजतच नाही! आणि गव्हेरा भेटतो कसा, तर आपल्यावर बंदूक ताणणाऱ्याला म्हणताना ‘हं ! घाबरतोस काय? दाब घोडा!’.
‘आजचा सुधारक’ मासिकानं ‘जात-आरक्षण’ विशेषांक काढला. नंतर मात्र सुधीरनं दोन कळीचे संदर्भ पुरवले. एक म्हणजे आरक्षणाला थोडाफार पर्याय पुरवणारी ‘जेएनयू’ मधली यंत्रणा; आणि दुसरं डॉ. लोहियांचं टिपण की, आरक्षणामुळे एकाही ‘खुल्या’ प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांला प्रवेश नाकारला जायला नको. सुधीरनं तो ‘सुधीर’ असल्यामुळे अट घातली की, या पुरवण्यांमुळे त्याचे आणि प्रभाकर नानावटींचे संबंध बिघडायला नकोत! हो, टी.बी.खिलारे आणि प्रभाकर नानावटी त्या विशेषांकाचे अतिथी संपादक होते! अर्थातच तसं झालं नाही. उलट नानावटी, सुधीर, मी अनेकदा टपरीवर जाऊन उत्तम कॉफीसाठी नानावटींना ‘कापत’ असू!
तिसरं उदाहरण माझंच. १९६५ साल संपत होतं. मी लोकलच्या दारात लटकून रविवारी रात्री होस्टेलकडे परतत होतो. इतर वर्गमित्रांत
GRE- TOEFL, एमटेक प्रवेश परीक्षा वगैरे विषयांवर चर्चा वाढत होत्या. मी मात्र ‘हा बाह्या वर करतो आणि पूल-धरणं बांधायला लागतो’, अशा मूडमध्ये होतो. पण लोकलचा ताल, मुंबईची गर्दी यानं रूळ बदलले गेले. आपण एका अजस्र यंत्राचा नगण्य भाग आहोत, असं मनावर ठसू लागलं. होस्टेल गाठलं तर ‘मेस’ बंद व्हायच्या बेतात होती. एकटा सुधीर जेवत होता. मीही ताट भरून त्याच्यापुढे जाऊन बसलो, आणि तिरसटपणे म्हटलं ‘बेडय़ा, तुझ्या कम्युनिझममध्ये स्वातंत्र्य असतं नं, तर मी आलो असतो तुझ्यासोबत.’ सुधीरनं त्याच्या पेटंट घुबडाच्या नजरेनं माझ्याकडे पाहिलं. ‘आज कसलं स्वातंत्र्य आहे तुला;?’ हो, आम्ही कडक शिव्याही देत असू! आणि झेन कथांमध्ये सत्याचा साक्षात्कार होतो तसं मला झालं . मुळात होतं कसलं स्वातंत्र्य! आजतागायत मी नियतवाद आणि ईहा (फ्री विल अॅण्ड डिटर्मिनिझम) यांवर विचार करायला घाबरतो !
पण तेव्हापासून मी मान्य केलं की परीकथांमधल्या जादूगाराचा जीव जसा पोपटात असतो, तशी माझी सदसद्विवेकबुद्धी सुधीरपाशी आहे. महत्त्वाचं सारं त्याला विचारूनच करावं, हे बरं. असाच एरवी दांडगट वाटणारा प्रफुल्ल बिडवई जाहीर करायचा, ‘सुधीर माझा मेंटर
(mentor) आहे.’
गेल्या वर्षांच्या सुरुवातीपासून आम्ही अनेक जण एकमेकांशी बोलताना एक विषय यायचा ‘तू केव्हा होतो आहेस पंचाहत्तरचा?’ वर्षांच्या मध्यावर सुधीर झाला, शेवटाजवळ मी. हे तर्कशास्त्र असंच चालायला नको होतं. असो!
nandakhare46@gmail.com