||| डॉ. अनंत सरदेशमुख
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आज पुण्यातील अनेक प्रस्थापित उद्योग राष्ट्रीय सीमा ओलांडून आंतरराष्ट्रीय झाल्या आहेत. पुण्यात स्थापित झालेल्या अनेक कंपन्या आज, महाराष्ट्राबाहेर मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तरांचल अशा अनेक राज्यातून आपली उत्पादने बनवीत आहेत. तेथे उत्पन्न होणारी संपत्ती आज पुण्याचेच महत्त्व वाढवत आहे. पुण्यातील उद्योग सक्षम असल्यामुळे येणाऱ्या पाच वर्षांत अवकाश, संरक्षण, मेकॅट्रोनिक्स, रोबोटिक्स, मेट्रोलॉजी, वैद्यकीय उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक यांसारख्या नवीन तंत्रज्ञानावर आधारित अनेक स्टार्टअप्स, मध्यम व लघु उद्योग पुण्यात प्रस्थापित होतील. त्याला निगडित असणारे सेवा क्षेत्रातील उद्योग, फिन्टेक सारखे क्षेत्रसुद्धा पुण्यात बरेच प्रगत झाले आहे. या सर्व घटना पुण्याच्या समृद्धतेची नांदीच देत आहेत.
महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर म्हणजे १९६० पासून पुण्याची निवृत्त, मध्यमवर्गीयांचे गाव ही ओळख बदलू लागली. एक शांत, निसर्गरम्य गाव झपाटय़ाने औद्योगिक बनू लागले आणि जिथे उद्योजकता, उद्योग येतो तेथे समृद्धी नक्कीच येते. ‘कराग्रे वसते लक्षी’ ! असे आपण नेहमीच म्हणत नाही का?
पूर्वेकडील ऑक्सफर्ड ही ओळख अजून मजबूत होऊन त्यात पूर्वेकडील डेट्रॉइट ही नवीन ओळख जोडली गेली. शिक्षण आणि नंतर उद्योगात संधी या नवीन समीकरणाने पुण्याला एका नव्या समृद्धीच्या मार्गावर जोराने पुढे नेले.
१९६० च्या पुढील साधारण तीन दशकांत पुणे वाहन, यांत्रिकी उद्योगाचे महत्त्वाचे स्थान बनले. मोठय़ा उद्योगांनी अनेक छोटय़ा उद्योगांना संधी दिली आणि पुणे लघु, मध्यम उद्योगाचे सुद्धा केंद्र बनले. महाराष्ट्रीय उद्योजकतेचा उगम झाला आणि तो प्रवाह जोरात वाहू लागला.
१९९० च्या दशकात माहिती तंत्रज्ञान उद्योगाची मुहूर्तमेढ पुणे परिसरात झाली. हिंजवडीसारख्या आय.टी. पार्कच्या आणि नंतर प्रस्थापित झालेले खराडी, विमाननगर, मगरपट्टा येथील आय.टी. पार्कच्या स्थापनेमुळे, तेथील अद्ययावत पायाभूत सुविधांमुळे, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जगातील आणि भारतातील अनेक मान्यवर कंपन्या पुण्यात आल्या. याच उद्योगामुळे बिझिनेस प्रोसेस आउट सोर्सिगसारखे नवीन व्यवसाय पुण्यात आले आणि वाढीला लागले. या क्षेत्रातील अनेक परकीय कंपन्या पुणे परिसरात आल्या. आज पुण्यात आंतरराष्ट्रीय संगणक प्रक्रिया कंपन्या आहेत. ज्याला इंग्रजीत ‘बॅक ऑफिस’ म्हणतात अशा अनेक आंतरराष्ट्रीय बँका, वित्तीय संस्था, विमा कंपन्या, हवाई वाहतूक कंपन्या यांची बॅक ऑफिस पुण्यात आहेत. एवढेच काय रोटरी सारख्या जगातील सर्वात मोठय़ा स्वयंसेवी संस्थेचे बॅक ऑफिस पुण्यात आहे. ‘आउट सोर्सिग’ ही संकल्पना सुद्धा जगात चांगलीच रुळली आहे आणि आज पुण्यातील अनेक कंपन्या आज जागतिक कंपन्यांची काही आउट सोर्सिग खाली येणारी कामे करत आहेत.
चित्रपट जगतात ज्याला ‘स्पेशल इफेक्ट्स’ म्हणतात ते स्पेशल इफेक्ट्स बॉलीवूड नाही तर हॉलीवूडच्या चित्रपटाला जगताला देणाऱ्या कंपन्यासुद्धा पुण्यात कार्यरत झाल्या. या सर्व देशी आणि मुख्यत्वे परदेशी उद्योगांनी केवळ गुंतवणूक पुण्यात आणली असे नाही तर अनेक रोजगार उत्पन्न करून अनेक तरुणांना समृद्ध केले. त्यांच्या संपत्ती निर्माण करण्याच्या प्रक्रियेला चांगली सुरुवात करून दिली. एवढेच नव्हे तर या उद्योगामुळे आज तरुण पिढीची गुंतवणूक, संपत्ती मागील पिढीला अचंबित करणारीच आहे.
पुणे क्षेत्रात सुरुवातीला वाहन उद्योगाला लागणाऱ्या सुटय़ा भागांचे उद्योग, इतर अभियांत्रिकी उद्योग अस्तित्वात होते. परंतु पुढे जाऊन अनेक प्रकारचे विविध उद्योग पुण्यात आले. पुणे हे देशाचे एक महत्त्वाचे वाहन उद्योग केंद्र बनले. अनेकांना माहीत नसेल परंतु पुणे हे, उत्पादन क्षेत्रातील शास्त्रीय तांत्रिक मोजमाप करणाऱ्या म्हणजेच ‘मेट्रोलॉजी’ या क्षेत्राचे सुद्धा महत्त्वाचे केंद्र आहे. पुण्यात अवकाश, सुरक्षा, संरक्षण या क्षेत्रात महत्त्वाचे उत्पादन करणाऱ्या मोठय़ा आणि लघु, मध्यम कंपन्या आहेत. ज्याला इंग्रजीत ‘काँट्रॅक्ट रिसर्च’ म्हणजेच कंत्राटी संशोधन म्हणतात अशा प्रकारचे संशोधन करणाऱ्या संस्था सुद्धा अस्तित्वात आल्या. माहिती तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्र यांचा संगम झालेला आपल्याला पुण्यात दिसेल. पुणे क्षेत्रात आज सुद्धा अनेक उद्योग आकर्षिले जात आहेत. त्याची मुख्य कारणे म्हणजे येथे उपलब्ध असणारे कुशल मनुष्यबळ आणि त्या मनुष्यबळाची उत्पादकता. जेव्हा मनुष्य कुशल असतो, उत्पादक असतो तेव्हा त्याला त्याच्या कामाला मोबदला हा देखील भरपूर मिळतो हे साधे गणित आहे. त्या मुळेच दरडोई उत्पन्न हे राष्ट्रीय दरडोई उत्पन्नाच्या पुढे आहे.
आज पुणे ‘ईव्ही’ म्हणजे इलेक्ट्रिक वाहनाचे एक प्रमुख केंद्र बनत आहे. ही पुण्याची नवीन ओळख आहे. या नवीन घडामोडीमुळे पुण्यातील गुंतवणूक, पुण्यातील उत्पादन, पुण्याचे उत्पन्न वाढणार आहे हे नक्कीच. त्याचे परिवर्तन पुण्याच्या संपत्तीत भर पडण्यातच होणार आहे. पुणे हे आज स्टार्टअपचे सुद्धा केंद्र बनत आहे. तरुण पिढीतील उद्योजकता बहरत आहे आणि उद्याचे अनेक यशस्वी उद्योजक, युनिकॉर्न्स पुण्यात रूप घेत आहेत हेही खूप उत्साहवर्धक आहे.
पुणे नवनिर्माण, स्टार्टअप या क्षेत्रात सुद्धा आघाडीवर आहे. पुणे परिसरात सुमारे तीनशेहून अधिक जर्मन कंपन्या, सुमारे वीस स्वीडिश कंपन्या आहेत. तसेच या शिवाय इटालियन, अमेरिकन, ब्रिटिश, कोरियन आणि इतर बहुद्देशीय कंपन्या कार्यरत आहेत. यात अनेक परदेशी लोक काम करत आहेत. त्यांचे वास्तव पुण्यात असल्यामुळे पुण्याला एक वेगळेच रूप आलेले आहे. पुणे हे नुसतेच विश्वनागरिक शहर बनले नसून पुणे हे आता सातवे महानगर आहे. या महानगरीच्या रूपाने आज अनेक देशांतील आणि परदेशातील व्यवसाय, उद्योग नक्कीच पुण्याकडे आकर्षित होतात. या आकर्षणाचा, या उद्योगांच्या पुण्यातील वास्तव्याचा पुण्यातील समृद्धतेवर आकर्षकच परिणाम होत आहे.
महाराष्ट्राचा राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा हा सुमारे १३ टक्के आहे. या १३ टक्क्यांतील सुमारे तीस टक्के हिस्सा हा पुण्याचा असावा. या आकडय़ांकडे बघता पुणे आपल्या राष्ट्राच्या सकल उत्पन्नात सुमारे चार ते पाच टक्के हातभार लावते. जेव्हा आपण सकल राष्ट्रीय उत्पादनाचा विचार करतो, तेव्हा त्यात महाराष्ट्राचा सहभाग हा सुमारे २० टक्के आहे. म्हणजेच पुण्याचा सकल राष्ट्रीय उत्पादनातील हिस्सा हा सुमारे ६ टक्के असावा.
आज पुण्यातील अनेक प्रस्थापित उद्योग राष्ट्रीय सीमा ओलांडून आंतरराष्ट्रीय झाल्या आहेत. पुण्यात स्थापित झालेल्या अनेक कंपन्या आज, महाराष्ट्राबाहेर मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तरांचल अशा अनेक राज्यातून आपली उत्पादने बनवीत आहेत. तेथे उत्पन्न होणारी संपत्ती आज पुण्याचेच महत्त्व वाढवत आहे.
संगणक तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स, उत्पादन तंत्रज्ञान यांचा एकत्रित उपयोग करून पुणे आजच्या नव्हे तर उद्याच्या युगाची उत्पादने बनवण्याकडे झेप घेत आहे. पुण्यात अनेक नवीन उत्पादने विकसित होत आहेत. याची कल्पना शहरातील इन्क्युबेटरना भेट दिल्यानंतर नक्कीच येईल. जास्त कार्यक्षमतेची यंत्रे, संगणक संचालित यंत्रे, विजेवरील वाहने इत्यादी अनेक नवीन व ज्यांच्यामुळे वाहननिर्मिती किंवा इतर उत्पादनाला एक वेगळी दिशा मिळणार आहे असे तंत्रज्ञान, अशी यंत्रे आज पुण्यात विकसित होत आहेत. पुण्यातील उद्योग सक्षम असल्यामुळे येणाऱ्या पाच वर्षांत अवकाश, संरक्षण, मेकॅट्रोनिक्स, रोबोटिक्स, मेट्रोलॉजी, वैद्यकीय उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक यांसारख्या नवीन तंत्रज्ञानावर आधारित अनेक स्टार्टअप्स, मध्यम व लघु उद्योग पुण्यात प्रस्थापित होतील. त्याला निगडित असणारे सेवा क्षेत्रातील उद्योग, फिन्टेक सारखे क्षेत्रसुद्धा पुण्यात बरेच प्रगत झाले आहे. या सर्व घटना पुण्याच्या समृद्धतेची नांदीच देत आहेत.
पुण्यात दिसून येणारी उद्योजकता ही संपूर्ण सक्षम वाटत आहे. नवीन प्रयोग, साहस, श्रम या सर्वच गोष्टी नव्या उद्योजकांत दिसून येते. त्याची छोटीशी चुणूक आपण करोना महासाथीमध्ये बघितली आहे. जेव्हा कृत्रिम श्वसन यंत्रणा (व्हेन्टिलेटर) सारख्या साधनांचा तुटवडा होता, तेव्हा अनेक उद्योग पुढे आले आणि त्यांनी त्याची निर्मिती केली. पुण्यातील अन्नप्रक्रिया उद्योग सुद्धा पुढील पाच वर्षांत वाढीला लागणार आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या कृषिविषयक सुधारणा, कायद्यातील बदल हे या क्षेत्राला चालना देतील. नवे तंत्रज्ञान, यंत्रसामग्री यांनी हा उद्योग निर्यातीच्या दृष्टीने खूप सक्षम होणार आहे. पुणे हे एक प्रमुख कृषी उत्पादन केंद्र आणि बाजारपेठ आहे. निर्यातीतील होणाऱ्या सुधारणा या केंद्राला विशेष महत्त्व प्राप्त करून देतील. पुण्याच्या व्यापारात, उलाढालीत अजून चांगली वाढ दिसून येईल.
संगणक, माहिती तंत्रज्ञान सर्वच क्षेत्रात प्रचंड बदल घडवून आणत आहे. किंबहुना माहिती तंत्रज्ञानाशिवाय प्रगती करणे कठीण होत आहे. कृषी क्षेत्रात सुद्धा संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाचा होणारा बदल पुण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. नुकत्याच अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेल्या ड्रोनसंबंधी घोषणेचा फायदा पुणे नक्कीच करून घेईल. ड्रोनच्या साहाय्याने शेताची पाहणी, निरीक्षण, औषध फवारणी इत्यादी गोष्टी आज काही प्रमाणात घडत आहेत आणि त्यांचा अजून विस्तार होईल. या पुढचे तंत्रज्ञान अजून क्रांती घडवून आणेल.
‘पुणे तिथे काय उणे’ असे पूर्वी विचारले जायचे आणि त्याचे उत्तर अलीकडच्या काळात पुणे तिथे सर्वच उणे असे थोडेसे कुचेष्टेने दिले जायचे. पण, आता असे म्हणता येईल, पुणे तिथे सोयी, सुविधा जरी उणे तरी समृद्धीचे निश्चितच देणे.
(लेखक मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अॅन्ड अॅग्रिकल्चरचे (एमसीसीआयए)
माजी महासंचालक आणि व्यवस्थापन सल्लागार आहेत.)