|| निमरोद कलमार
इस्राएल लढत असलेले युद्ध पॅलेस्टिनी राष्ट्राविरुद्ध वा कोणत्या धर्माविरुद्ध नाही. ते पॅलेस्टिनी लोकांविरुद्धही नाही. ते ‘हमास’ या दहशतवादी संघटनेच्या गुन्ह्यांविरुद्ध आहे. त्यामुळे दहशतवादी संघटना आणि स्वत:च्या नागरिकांचे रक्षण करू पाहणारा लोकशाही देश, यांच्यात साधर्म्य साधण्याचे प्रयत्न नैतिकदृष्ट्या निंदनीय ठरतात…
गेल्या नऊ दिवसांमध्ये गाझा पट्टीतून इस्राएली शहरे आणि गावांवर साडेतीन हजारांहून अधिक रॉकेट्सचा मारा करण्यात आला आहे. आजवर त्यात १२ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये थाई आणि भारतीय नागरिकांचाही समावेश आहे. अनेक जण जखमी झाले आहेत. अनेक इस्राएली कुटुंबे अनेक दिवसांपासून बॉम्बप्रतिरोधक छावण्यांमध्ये राहात आहेत. मुले शाळेत जात नाहीयेत. रॉकेटच्या वेगाने लसीकरण करून कोविड-१९च्या संकटावर मात केल्यानंतर आज अनेक मुलांवर हमासच्या रॉकेटच्या भीतीने घरी बसून राहण्याची वेळ आली आहे. इस्राएलमध्ये रात्रंदिवस सायरनचे आवाज घुमत आहेत. सामान्यजनांसाठी घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. अनेक देशांमध्ये लोकांना अशा प्रकारच्या दिनक्रमाची कल्पना करणेसुद्धा अवघड आहे.
गैरसमज पसरवणारे दावे
जगातील अनेक देशांनी ‘हमास’ला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. इस्राएलचा विनाश करणे हे त्यांचे ध्येय जगजाहीर आहे. निरपराध इस्रााएली नागरिकांची जास्तीत जास्त प्राणहानी होण्याच्या उद्देशानेच हमास इस्रााएलमधील नागरी वस्त्यांवर रॉकेट हल्ले करत आहे. हमासच्या अत्याचारांचे बळी केवळ इस्रााएली नागरिक नसून पॅलेस्टिनी जनतेलाही त्याची मोठी किंमत चुकवावी लागत आहे. हमास गाझा पट्टीतील लोकांचा ढाल म्हणून वापर करत आहे. हमास शाळा आणि नागरी वस्त्यांमधून इस्राएलवर रॉकेट हल्ले करत असून त्यांच्या मधोमध आपल्या लष्करी नेतृत्वाला लपवत आहे. दाटीवाटीच्या वस्त्यांतून इस्रााएलच्या शहरांवर अंधाधुंदपणे रॉकेट हल्ला करणे हा दुहेरी युद्धगुन्हा आहे. बुधवारी इस्रााएलने मदतीच्या सामग्रीने भरलेल्या वाहनांचा काफिला गाझा पट्टीत पाठवला. सीमेवरील तपासणी नाक्यावर असताना हमासकडून या काफिल्यावर रॉकेट हल्ला करण्यात आला.
त्यामुळे हे लक्षात घ्यायला हवे की, इस्रााएल लढत असलेले युद्ध पॅलेस्टिनी लोकांविरुद्ध नाही; ते दहशतवादाविरुद्ध आहे. ते राष्ट्रीय किंवा धार्मिक स्वरूपाचे नाही. ते हमासच्या दहशतवादी कृत्यांविरुद्ध आहे. कोणताही सार्वभौम देश स्वत:च्या नागरिकांचे रक्षण करण्यासाठी अशा प्रकारचे युद्ध लढेल. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक वृत्तमाध्यमांद्वारे तसेच समाजमाध्यमांद्वारे गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे की, इस्राएलने मुस्लीमधर्मीयांना जेरुसलेममधील त्यांच्या पवित्र स्थळांत प्रार्थना करण्यास मज्जाव केल्याने या संघर्षाची ठिणगी पडली. हा दावा पूर्णत: असत्य आहे. मोठ्या प्रमाणावर रक्तपात होत असतानाही इस्राएलने उपासना स्वातंत्र्याचा सन्मान केला आहे. ईदच्या दिवशी हमास इस्राएलवर रॉकेट हल्ले करत असूनदेखील, हजारो लोकांनी जेरुसलेममधील अल अक्सा मशिदीत नमाजपठण केले. अनेक आठवडे पॅलेस्टिनी लोकांनी जेरुसलेम भागात केलेल्या दंग्यांमध्ये यहुदी नागरिकांना लक्ष्य केल्यानंतर, म्हणजे १० मे रोजी, हमासने रॉकेट तसेच स्फोटकांनी भरलेल्या फुग्यांद्वारे इस्रााएलवर हल्ले करण्यास सुरुवात केली.
हिंसाचार पूर्वनियोजित
पॅलेस्टिनी लोक आणि त्यांचे समर्थक असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत की, त्यांचा हिंसाचार हा इस्राएलच्या कारवायांच्या प्रत्युत्तरादाखल आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की, हा हिंसाचार पूर्वनियोजित असून अनेकदा पॅलेस्टिनी लोकांमधील परस्परांतील संघर्ष आणि हेवेदावे त्यासाठी कारणीभूत असतात. पॅलेस्टिनी धुरीण स्वत:च्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयाला होणाऱ्या संभावित टीकेवरून लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. ही संधी साधून हमास पॅलेस्टिनी जनतेत तसेच मुस्लीम देशांमध्ये स्वत:ची प्रतिमा उजळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी एकीकडे आपणच जेरुसलेमचे रक्षक असल्याचे चित्र उभे करून हमास हिंसाचार आणि अस्थैर्य निर्माण करत आहे.
आंतरराष्ट्रीय समुदायाने भूमिका घ्यावी
सध्या चालू असलेल्या संघर्षाचा अंत करून भविष्यात असे प्रसंग पुन्हा उद्भवू नयेत यासाठी आंतरराष्ट्रीय समुदाय महत्त्वाचे योगदान देऊ शकतो. पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही हे हमासला ठणकावून सांगितले पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादी संघटना म्हणून ओळखली जाणारी हमास जोपर्यंत रॉकेट हल्ला करून आपला फायदा होत आहे असे मानते, तोपर्यंत इस्रााएली गावांवर आणि शहरांवर रॉकेट बरसतच राहतील.
हमास अन्य दहशतवादी संघटनांप्रमाणेच स्वसंरक्षणासाठी लढणाऱ्या लोकशाही देशांना बेकायदेशीर ठरवण्याचा प्रयत्न करत आहे. हमासच्या कृत्यांचे समर्थन करता येणार नाही. संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करणारी दहशतवादी संघटना आणि स्वत:च्या नागरिकांचे रक्षण करू पाहणारा लोकशाही देश, यांच्यात साधर्म्य साधण्याचे प्रयत्न केवळ नैतिकदृष्ट्या निंदनीय नसून भविष्यात दहशतवादी कारवायांना खतपाणी घालणारे आहेत.
लेखक भारतातील इस्राएलच्या दूतावासाचे उप-वाणिज्यदूत (डेप्युटी कॉन्सूल जनरल) आहेत.