खान्देशच्या प्रतिभावान कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यपंक्ती आज त्यांनी रचलेली ‘म्हण’ म्हणून मान्यता पावलेल्या आहेत. बहिणाबाई चौधरी या सिद्धहस्त कवयित्री. ज्यांनी आपल्या प्रतिभेने उजळलेले अनमोल काव्यधन मराठी कवितेसाठी दिले. त्या स्वत: शिकलेल्या नव्हत्या. पण त्यांची काव्यरचना चिरंतन मानवी मूल्यांची शिकवण देणारी आहे. सकाळी सकाळी अंगणात मनोहारी प्राजक्तसडा पडावा तशी सहज, सुंदर त्यांची काव्य निर्मिती ! त्यांची काव्यरचना जीवनातील विसंगतीवर मार्मिक भाष्य करते. ‘पाहीसनी रे लोकांचे यवहार खोटे नाटे, तवा बोरी बाभयीच्या अंगावर आले काटे’ असं त्या अगदी सहज म्हणू शकतात.
अशीच मानवी व्यवहारावर मार्मिक टिप्पणी करणारी म्हण आहे : ‘आग्या टाकीसनी चूय पेटत नाही, टाया पिटीसनी देव भेटत नाही.’
‘आग्या’ म्हणजे ‘काजवा’. जर चूल पेटवायची असेल तर तिथे विस्तवच हवा. काजवे टाकून काही चूल पेटणार नाही. चूल पेटवायची असेल तर त्याला आगीची योग्य धगच लागते. तसेच रोज नुसत्या टाळय़ा पिटून काही देवाची प्राप्ती होणार नाही. त्याच्या प्राप्तीसाठी साधना आणि तपश्चर्येची जोड असावी लागते. म्हणजेच कोणत्याही गोष्टीची प्राप्ती करून घ्यायची असेल, तर प्रथम ती गोष्ट प्राप्त व्हावी म्हणून आवश्यक असणारी मनाची तीव्र आच, इच्छा आणि योग्य दिशेने प्रयत्न करणे खूप महत्त्वाचे आहे.
आपण असे समजतो की सर्व संतांना परमेश्वराचे, त्या जगन्नियंत्याचे दर्शन झाले होते. त्यांना परमेश्वराचा साक्षात्कार झाला होता. ते परमेश्वराशी बोलू शकत होते. नामदेवांनी विठ्ठलाला नैवेद्य ग्रहण करण्याचा हट्ट धरला होता आणि विठ्ठलाला तो नैवेद्य ग्रहण करायला भाग पाडले होते. या सर्वाच्या प्रयत्नामागे ईश्वराला भेटण्याची तीव्र मनीषा, त्याच्या प्राप्तीसाठी करायला लागणारी साधना, तपश्चर्या, जनहिताचा खरा कळवळा, सारे त्यांच्या पाठीशी उभे होते. पण त्यांचे विरोधक मात्र फक्त कर्मकांडात आणि बाह्य देखाव्यात गुंतलेले होते. त्यांना हे खरे तर कळायला हवे होते की ‘आग्या टाकीसनी चूय (चूल) पेटत नाही अन् टाया (टाळय़ा) पिटीसनी देव भेटत नाही.’
– डॉ. माधवी वैद्य
madhavivaidya@ymail.com