|| डॉ. जयदेव पंचवाघ

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

थोडं चालल्यावर पाय दुखणं या लक्षणाचं कारण असतं पायांच्या रक्तवाहिन्यांमध्ये निर्माण झालेले अडथळे.

माझ्या गेल्या काही लेखांच्या संदर्भात काही जवळच्या मित्रांनी  ‘लेखांमध्ये ग्रीक आणि रोमन उल्लेख आलेले दिसतात, आपल्या ऋषी-मुनींबद्दल किंवा काहीच दिसत नाही’ अशा अर्थाच्या काही प्रतिक्रिया मला दिल्या. त्याविषयी थोडं लिहिणे गरजेचे आहे.

भारतीयांची वैद्यकशास्त्रविषयक अस्मिता ही योगशास्त्र, आयुर्वेद, चरक आणि सुश्रुत यांसारखे बुद्धिमान वैद्य वगैरेंशी संबंधित आहे हे मला माहीत आहे.  किंबहुना या व्यक्तींविषयी आपल्या सर्वांनाच नितांत आदर आहे यात शंका घेण्याचं कारण नाही. पण त्याबरोबर हेही लक्षात ठेवायला हवं की, आजच्या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिभाषेत वापरल्या जाणाऱ्या शब्दांची मुळं ही ग्रीक आणि लॅटिन भाषांमधून आलेली आहेत.

खरं हे शब्द त्या-त्या भाषांसाठी अजिबात जड नाहीत. आपल्याला ते ऐकताना जड वाटतात. याचं एक उदाहरण म्हणजे हेरोफीलससंदर्भात  लिहिलेल्या लेखांमध्ये मी ‘टॉक्र्युलार हेरोफिलाय’ आणि ‘कॅलॅमस स्क्रिप्टोरियस’ या मेंदूतील दोन भागांच्या नावांचा उल्लेख केला होता.  द्राक्षांचा रस काढण्याचं त्या काळातील यंत्र आणि पिसाच्या लेखणीच्या टोकाचा आकार यांवरून ही नावे आली आहेत ! म्हणजेच ही नावं मुळात अजिबात अवघड नाहीत.

मला असं निश्चितपणे वाटतं की ज्या समाजातील रुग्ण प्रगल्भ असतात, तिथली वैद्यकीय सुविधा आपोआप सुधारत जाते.  आपल्याला होऊ शकणारे आजार कोणते, त्यांची लक्षणे काय, त्या लक्षणांना आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिभाषेत काय म्हणतात, या लक्षणांवरून वैद्यकीय निदान करण्यासाठी कोणत्या तपासण्या करणं योग्य असतं, कोणत्या प्रकारचे डॉक्टर कोणत्या आजारांवर उत्कृष्टपणे उपचार करू शकतात, मेडिकल स्पेशलायझेशन आणि सुपर स्पेशलायझेशन केलेल्या डॉक्टरांच्या पदव्या ज्या अगम्य भाषेत असतात त्याचा नेमका अर्थ काय इत्यादी गोष्टी रुग्णांना माहीत असणं आवश्यक आहे. विशेषत: आजच्या इंटरनेटच्या युगात तर भारतीय रुग्णांना ही परिभाषा सहज कळणं अत्यावश्यक आहे. असो.

 न्युरोसर्जरीमध्ये मणक्याची शस्त्रक्रिया हा एक अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. आज यातील वारंवार दिसणाऱ्या एका महत्त्वाच्या लक्षणाविषयी तुम्हाला सांगणार आहे. या लक्षणाचं वर्णन आजच्या वैद्यकीय निदानांमध्ये आणि ‘अहवाला’मध्ये येतं.

मेंदू व मणक्याच्या आजारांमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने घडते आणि ती म्हणजे यात दिसणारी लक्षणं आजाराच्या जागेपासून दूरवर असतात. उदाहरणार्थ, मेंदूत उजव्या बाजूला वाढणाऱ्या गाठीमुळे डाव्या बाजूच्या पायातील शक्ती कमी होऊ शकते, मानेतील मज्जारज्जूवर दाब आल्यामुळे चालताना पायाचा तोल सांभाळता येत नाही, चप्पल निसटून पडते वगैरे.

इसवी सनाच्या पहिल्या ५० वर्षांमध्ये क्लॉडियस नावाचा रोमन राजा होऊन गेला. तो चालताना लंगडायचा. ‘क्लॉडिकेअर’ म्हणजे ‘लंगडणे’ अशा अर्थाच्या लॅटिन शब्दावरून त्याचं नाव पडलं असं काही इतिहासकार म्हणतात. आणि त्यामुळेच विशिष्ट अंतर चालून गेल्यावर, पाय दुखल्यामुळे जे लंगडणं चालू होतं त्या लक्षणाला ‘क्लॉडिकेशन’ असं नाव आहे.

‘क्लॉडिकेशन’ या लक्षणाचे दोन प्रकार आहेत त्यापैकी पहिला प्रकार म्हणजे एका किंवा दोन्ही पायांच्या रक्तवाहिन्यांमध्ये निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे पायाच्या स्नायूंचा रक्तपुरवठा कमी पडून थोडं चालल्यावर पाय दुखणं किंवा पायात गोळे येऊन थांबावं लागणं. या आजाराचं निदान वेळेत करून हे अडथळे दूर करावे लागतात नाही तर पायाला गँगरीन होण्याची शक्यता असते.

न्युरोसर्जरीच्या संदर्भातील  ‘क्लॉडिकेशन’  हे लक्षण मात्र वेगळं आणि थोडं गुंतागुंतीचं आहे. या लक्षणाचं गांभीर्य समजून त्याचं निदान योग्य वेळेत व्हायचं असेल तर सर्वसामान्य जनतेला हे लक्षण कळायला हवं.

प्रथमच सांगितल्याप्रमाणे ‘क्लॉडिकेशन’ याचा शब्दश: अर्थ ‘लंगडत चालावं लागणं’ असा आहे. मणक्यातील नसांवर आलेल्या दाबामुळे जे ‘क्लॉडिकेशन’  होतं त्याला ‘न्युरोजेनिक क्लॉडिकेशन’ हा शब्द वापरला जातो.

आपल्या पाठीचा कणा हा अनेक मणक्यांचा मिळून बनलेला असतो. कण्याच्या मध्यभागी एक ‘कॅनॉल’ असतो ज्याला ‘स्पायनल कॅनॉल’ असा शब्द आहे. पाठीच्या कण्यात मानेचे सात, पाठीचे बारा आणि कंबरेचे पाच असे मणके एकावर एक रचलेले असतात. सर्वात शेवटी त्रिकोणी माकडहाड असतं. आपला मज्जारज्जू म्हणजेच स्पायनल कॉर्ड साधारण कमरेच्या पाच मणक्यांपैकी पहिल्या मणक्यापाशीच संपते. त्याच्या खालच्या कॅनॉलमध्ये मज्जारज्जूतून निघून मांडी व खुब्यातील विविध स्नायूंना पुरवठा करणाऱ्या नसा असतात. शिवाय नाजूक लैंगिक अवयवांच्या व शौचाच्या जागेभोवतीच्या संवेदना वाहून नेणाऱ्या नसांचा पुंजकासुद्धा असतो. अशा विविध नसांनी हा कॅनॉल भरलेला असतो.

कमरेच्या मणक्यातील हा कॅनॉल  शवविच्छेदनाच्या किंवा प्रत्यक्ष शस्त्रक्रियेच्या वेळी  पाठीमागून उघडला तर या अनेकविध नसांचे एक ‘शेपूट’च या कॅनॉलमध्ये भरलेले दिसते. मागून बघितल्यास घोड्याचे शेपूट जसे दिसेल, तसे ते दिसते. म्हणूनच सतराव्या शतकातील डॉक्टर ‘आंद्रेयास लाझरस’ याने या नसांच्या पुंजक्याला  ‘कॉडा (शेपूट) इक्वाईना (घोड्याचे)’ असं नाव दिलं. ‘कॉडा इक्वाईना’ म्हणजे घोड्याचं शेपूट!! आता बघा हा किती साधा शब्द त्यांनी लोकांना कळण्यासाठी वापरला. पण केवळ त्याचं मूळ लॅटिन असल्यामुळे तो अगम्य वाटतो. असो.

तर हा मणक्याचा कॅनॉल, ज्यात हे ‘घोड्याचं शेपूट’ असतं तो काही कारणामुळे चिंचोळा झाला, तर या नसांच्या समूहावर सहाजिकच दाब येतो. काही व्यक्तींमध्ये जन्मत:च हा कॅनॉल चिंचोळा असतो आणि इतर व्यक्तींमध्ये वयपरत्वे या कॅनॉलमधल्या उतीबंधांमध्ये कॅल्शियम साचत गेल्यामुळे आणि ते जाड झाल्यामुळे कॅनॉल चिंचोळा होऊन नसांवर दाब वाढत जातो. याच्या परिणामस्वरूप होणारं ‘न्युरोजेनिक क्लॉडिकेशन’ हे लक्षण खालीलप्रमाणे.

व्यक्ती चालायला लागली की सुरुवातीला फारसा त्रास जाणवत नाही. पण काही वेळानंतर कमरेपासून मांड्यांचा मागचा भाग, नितंबांचा भाग आणि विशेषत: पोटऱ्या जड होऊ लागतात. हे भाग ‘भरून’ येतात. या भागांमध्ये आणि कधी कधी मूत्रविसर्जन तसेच शौचाच्या नाजूक भागांमध्ये  मुंग्या आणि बधिरपणा येतो. आणखी काही पावलं तसंच रेटून चाललं तर पुढे जाणं अक्षरश: ‘अशक्य’ होतं आणि व्यक्तीला जागच्याजागी थांबावं लागतं. आजाराच्या अधिक प्रगत अवस्थेत खूप वेळ एका ठिकाणी उभं राहिल्याससुद्धा पाठ, मांड्या व पोटऱ्या भरून येऊन बसावं लागतं. चालताना, हे लक्षण सुरू झाल्यावर व्यक्ती कमरेत पुढे वाकून म्हणजेच पोक काढून चालली तर थोड्या प्रमाणात आणि काही काळ हे लक्षण कमी होतं. चालणं थांबवल्यानंतर आणि बसून विश्रांती घेतली असता ‘काही वेळानंतर’ ही लक्षणे कमी होतात आणि परत काही पावलं पुढे चालता येतं. या लक्षणांचं वर्णन करताना पोटऱ्या जड होणे, बधिर होणे, पायातली शक्ती निघून गेल्यासारखी वाटणे, पाय लटपटायला लागणे, मांड्या पाय आणि नाजूक लैंगिक अवयवांमध्ये मुंग्या व बधिरपणा येणे अशा शब्दांचा लोक उपयोग करतात.

‘न्युरोजेनिक क्लॉडिकेशन’चे लक्षण हे वाढत्या वयाबरोबर बऱ्याच व्यक्तींमध्ये दिसते आणि या लक्षणाचं निदान व्यवस्थित झालं तर या व्यक्ती शस्त्रक्रियेने बऱ्या होऊ शकतात हे माहीत असणं गरजेचं आहे. याचं कारण म्हणजे विशेषत: वाढत्या वयाबरोबर इतरही अनेक आजार असल्याने ‘आता हे असंच चालायचं’ असा म्हणून बरेच लोक याकडे दुर्लक्ष करून या लक्षणांना शरण जातात.

अशा प्रकारचा लक्षणसमूह दिसल्यास आज उपलब्ध असलेल्या एक्स-रे, एम आर आय आणि इतर काही चाचण्यांच्या साहाय्याने योग्य निदान करून (आणि गरज असल्याची खात्री करून) न्युरोसर्जरीतील शस्त्रक्रियेने ही लक्षणे नाहीशी होऊ शकतात. आणि म्हणूनच ‘न्युरोजेनिक क्लॉडिकेशन’ या लक्षणाची ओळख प्रत्येकाला असणे गरजेचे आहे. हे नाव ऐकायला क्लिष्ट वाटलं तरी ‘क्लॉडिकेअर’ म्हणजे लंगडणे ही त्यांची व्युत्पत्ती समजून घेतली तर याच्याइतका दुसरा सरळ शब्द कदाचित नसेल.

मागच्या शतकाच्या मध्यात ‘फेरबिअस्ट’  या नेदरलॅण्डमधील न्युरोसर्जनने या लक्षणाचा आणि त्याच्या कारणमीमांसेचा खूप खोलवर अभ्यास केला. अशा प्रकारचा अभ्यास करून त्याचा अन्वयार्थ लावणं हे इतकं सोपं काम नव्हतं. कारण यात दिसणारी लक्षणे एक तर विचित्र होती आणि काही अंतर चालून गेल्यावरच सुरू व्हायची आणि म्हणूनच डॉ. फेरबिअस्टला याचं फार मोठं श्रेय जातं. त्याच्या सखोल अभ्यासामुळे या  आजाराने पीडित अनेक रुग्ण गेल्या काही वर्षांमध्ये वेदनामुक्त झाले आहेत.

आज आधुनिक तंत्रज्ञानामुळे या शस्त्रक्रिया तुलनेने खूपच सोप्या झालेल्या आहेत. यात दुर्बीण, एंडोस्कोप, रेडिओ लहरी अशा तंत्रांचा उपयोग होऊ शकतो.

शेवटी जाता जाता असं म्हणावंसं वाटतं की, रुग्णांनी वैद्यकीय क्षेत्रातील हे शब्द समजून घेतले तर त्यांना त्यांच्या लक्षणांची योग्य ओळख होईल आणि त्यांच्या निदानाचा आणि अहवालामधील शब्दांचा उलगडा होईल.

लेखक मेंदू व मणक्याचे शस्त्रक्रियातज्ज्ञ आहेत.

 brainandspinesurgery60@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: King claudius neurogenic claudication leg pain blood vessels obstacles yoga ayurveda akp