कुमार गंधर्व

भारतीय गायिकात लताच्या तोडीची गायिका दुसरी झालीच नाही असे माझे स्पष्ट मत आहे. लतामुळे चित्रपट संगीताला विलक्षण लोकप्रियता लाभली आहे. इतकेच नव्हे तर शास्त्रीय संगीताकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोनही फार बदलून गेला आहे. साधीच गोष्ट. पूर्वीदेखील घरोघर लहान मुले-मुली गात असत. पण त्या गाण्यात आणि हल्ली घरोघरी ऐकू येणाऱ्या छोटय़ा छोटय़ा मुला-मुलींच्या गाण्यात केवढा तरी फरक पडलेला आढळून येतो. आजकालची चिमुरडी पोरेदेखील सुरेल गुणगुणतात. ही किमया लताचीच नव्हे काय ? कोकिळेचे सूर सतत पडत राहिले तर ऐकणाऱ्याला तिचेच अनुकरण करावेसे वाटणे स्वाभाविक आहे.

चित्रपट संगीतामुळे चांगल्या स्वरावली लोक प्रत्यही ऐकत आहेत. संगीताच्या निरनिराळय़ा प्रकारांशी त्यांचा परिचय होत आहे. त्यामुळे त्यांचे स्वरज्ञान वाढले आहे. तशीच सुरेलपणाची चांगली समजही त्यांना आली आहे. लयीचेही निरनिराळे प्रकार त्यांना समजू लागले आहेत आणि आकारयुक्त लयीची त्यांना जाणीव झाली आहे. सर्वसामान्य लोकांनाही त्यातील सूक्ष्मता कळू लागली आहे. हे सारे कर्तृत्व लताचेच आहे.

अशा रीतीने नव्या पिढीचे गाणे तिने संस्कारित केले आहे आणि सामान्य माणसांची संगीतविषयक अभिरुची घडविण्यात तिने फार मोठा हातभार लावला आहे.

लताच्या गाण्याचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे तिच्या स्वरांचा निर्मळपणा आणि निरागसपणा. लताचा जीवनाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तोच तिच्या गाण्यातल्या या निर्मळपणात प्रतििबबित झाला आहे असे जाणवते. संगीताच्या क्षेत्रात लताचे स्थान एखाद्या अव्वल दर्जाच्या गायकाइतकेच म्हणावे लागेल. कारण लतामुळे शास्त्रीय संगीत घरोघरी पोहोचले आहे.

(लोकराज्य १९९२ मधून)

Story img Loader