सुनीता देशपांडे
अलीकडे अनेकदा सकाळी झोपेतून उठतानाच एखादी कवितेची किंवा गीताची ओळही मनात जागी होऊन येते आणि मग दिवसभर ती मनातल्या मनात गुणगुणत राहाते. तिची ही दिवसभराची सोबत रोजच्या तोचतोचपणाची जाणीव हलकी करते, ताण ढिला करते, सुखदायक आठवणींची सहल घडवते, आणखीनही हवंहवंसं वाटणारं काहीबाही अधूनमधून करत असते. या कशालाच काही नियम, बंधनं वगैरे नसतात. ना बांधिलकी, ना जबाबदारी. सोबतीला फक्त हवा तेवढाच गारवा, हवी तेवढीच ऊब.
आज सकाळी सकाळीच ‘झिम्मा खेळू ये गं, झिम्मा नाचू ये’नं हात पकडला आणि क्षणात परकरी वयात नेलं. माझ्या कानांना सूर-लयीची श्रीमंती मला वाटतं जन्मजातच लाभली असावी; पण तो सूर गळय़ाच्या मात्र जवळपासही फिरकायला राजी नसावा. त्यामुळे आयुष्यभर टिकून राहिलेली कवितेची मैत्री ही शुद्ध कवितेच्या रूपातच राहिली; तिनं गाण्याचा वेश कधी परिधान केलाच नाही.
त्या वयातलं हे ‘झिम्मा खेळू ये’ हात, पाय आणि काही अंशीच गळा असं शारीरिक फिरक्यांत घुमायचं गाणं. आज मात्र ते मनातच गरगरत राहिलंय :
‘झिम्मा खेळू ये गं, झिम्मा नाचू ये,
आकाशींचे तारेसंगे झिम्मा खेळू ये’
‘अंधारी ही रात्र काळी, कोणी पाहीना मुळी ही,
एकटीच अंतराळी झिम्मा खेळू ये’
‘सप्तऋषींमध्ये सती, बैसलीसे अरुंधती,
लाडक्या या आजीसंगे झिम्मा खेळू ये’
‘दक्षिणेचा झंझावात, रानफुले उफाळत,
झंझावाती दोघे रंगू झिम्मा खेळू ये’
इतक्याच ओळी आठवताहेत. अशा या ओळींना मग आयुष्यातल्या त्या त्या वेळीच्या तऱ्हेतऱ्हेच्या अनुभवांचे संदर्भ येऊन बिलगायला लागतात आणि आकाशीच्या त्या ताऱ्यांच्या गतीनंच एक एक क्षण हा एकेका युगाइतका सर्वव्यापी, विश्वंभर व्हायला लागतो. तारे पाहावे अमावास्येच्या रात्री. त्या रात्री ताऱ्यांशी मनाजोगी जवळीक साधता येते. मनाला जणू त्यांची गती मिळते. प्रत्यक्ष भोगलेल्या, वाचनातून अनुभवलेल्या, कल्पनाविश्वात जन्मणाऱ्या असंख्य क्षणांना जाग येते. स्वत:चं- फक्त स्वत:चं असं स्वतंत्र विश्व निर्माण होतं. एखाद्या क्षणाचं वय किंवा आकार ठरवायची मोजमापं कोणती? तो तो क्षण लहान की मोठा? वयानं, आकारमानानं, ताकदीनं केवढा? आपल्या मनाएवढा!
पोरवयात ‘पूर्वायुष्यातल्या आठवणी’ वगैरे काही नसतंच म्हणायला हरकत नाही. असतं ते भविष्य. वेगवेगळी स्वप्नं, इच्छा, आकांक्षा, ध्येयं. नव्या नव्या रूपांतली छोटी छोटी सुख-दु:खं. आज हे सगळं पाठमोरं पाहताना मी निर्विकार आहे. पण त्या त्या क्षणी त्या त्या सुखदु:खांत किती खोलवर गुंतलेली होते! आयुष्याला अर्थ देणारे, निर्थकही ठरवणारे, उधळून लावणारे तऱ्हेतऱ्हेचे क्षण. त्या इच्छा, आकांक्षा तृप्त झाल्या की नाहीत आणि किती प्रमाणात झाल्या किंवा नाही झाल्या या कशालाच आज काही महत्त्व नाही. स्वप्नं मात्र अद्यापही संपतच नाहीत. एकामागून एक स्वप्नं पडतच राहातात. काही पुरी होतात, काही अपुरीच राहतात, रेंगाळतात, काही आपण स्वत:हूनच सोडून देतो. पण नवी नवी स्वप्नं पडतच राहातात. स्वप्नं म्हणजे जणू श्वासच. आयुष्यभर चालू राहणारा. तो थांबेल त्या क्षणी आयुष्यही संपलेलं असेल.
आज सकाळपासून या श्वासाचा झिम्माच झालाय. तो सारं विश्वच व्यापायला आसुसलाय. आकाशातल्या सर्व तारकांशी त्याला हातात हात घालून खेळायचं आहे. ही जुनी गाणी लहान वयात तोंडपाठ होतात. मधल्या सगळय़ा आयुष्यात बहुधा मनाच्या कोठीत कुठल्या तरी कोपऱ्यात पडून असतात, आणि अखेरीअखेरीच्या एकटेपणात, जणू उतरणीवर पाय घसरू नये म्हणून हात द्यायला धावून येतात; प्रगट होतात. तोच झिम्मा. तितकाच ताजातवाना.
आज सकाळी त्यानं मला जागं केलं. दिवसभर सोबत केली. रात्री झोपेसरशी तो गुप्त होण्याचा संभवच अधिक. पण आजचा दिवस धन्य करणाऱ्या या सोबत्याला निदान कृतज्ञतेपोटी तरी मी काय देऊ? माझ्या वयाला साजेसा आशीर्वाद? तो झिम्मा तर चिरंजीवच आहे, त्याला आशीर्वाद द्यायची माझी पात्रताही नाही. मग नुसताच राम राम करायचा का? निरोप देताना आपण ‘जा’ म्हणत नाही. ‘परत या’ या अर्थी ‘या’ म्हणतो. पण जाणाऱ्याचं परत येणं आपल्या हाती नसतं. माझ्या भाळी असेल तर यापुढेही तो परत परत येईलही. या आशेवरच त्याला ‘ये’ म्हणते : ‘ये ग’ म्हणते. झिम्मा खेळू ये ग, झिम्मा खेळू ये ग, झिम्मा खेळू ये..
(‘मण्यांची माळ’ या मौज प्रकाशनाच्या पुस्तकातील लेखाचा संपादित अंश)