गिरीश फोंडे
सात दशकांहून अधिक काळ संघर्षरत राहिलेले दिवंगत नेते एन. डी. पाटील यांचा प्रभाव का अमीट राहील, हे सांगणारी आदरांजली..
भारताच्या स्वातंत्र्यलढय़ापासून, त्यानंतरच्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून ते वंचितांना उद्ध्वस्त करणाऱ्या जागतिकीकरणाच्या व धर्माध फॅसिस्ट शक्तींच्या उदयापर्यंत एवढय़ा काळाचा साक्षीदार असणारा संघर्षयोद्धा प्रा. एन. डी. पाटील यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या समाजकारण व राजकारणात निर्माण झालेली पोकळी भरून येणे हे कठीणच आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत असणारी घोषणा ‘समाजवादी भारतात समाजवादी महाराष्ट्र झालाच पाहिजे’ हे त्यांचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्याचे काम नव्या पिढीवर सोपवून ते निघून गेले.
रायगड जिल्ह्यातील पेणनजीकच्या ४५ गावांतील शेतकऱ्यांचा महा-मुंबई (अंबानी) सेझसाठी संपादन केली जाणारा ३४ हजार एकर जमीन वाचवण्याचा लढा असो की बंद गिरणी कामगारांचा लढा, गोवा मुक्तिसंग्राम, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, भूमिहिनांसाठी आंदोलने, शेतमालाला किफायतशीर भाव मिळण्यासाठी केलेले लढे, कापूस एकाधिकार योजना, महागाई आणि उपासमार विरोधातील आंदोलन, बहुजनांच्या शिक्षणाला ग्रासणाऱ्या निर्णयांविरुद्ध लढा, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ, धरणग्रस्त व विस्थापितांची आंदोलने, एन्रॉनविरोधी आंदोलन, शेगाव ते नागपूर विधानसभेवर पायी चालत काढलेली िदडी, महाराष्ट्र राज्य वीज संघर्ष समितीचे आंदोलन, भूविकास बँकेच्या मनमानी कारभाराविरुद्धचे आंदोलन, अन्याय्य कामगारकपात करणाऱ्या कारखानदारांच्या मुसक्या आवळण्यासाठी केलेले आंदोलन, भांडवलदारी जागतिकीकरणविरोधी आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र समितीचे बेळगाव महाराष्ट्रात आणण्याचे आंदोलन, कोल्हापुरातील टोलविरोधी आंदोलन अशी आंदोलनांची न संपणारी मोठी यादी केवळ एन. डी. पाटील सरांच्या संघर्षमय जीवनाशीच जोडली जाऊ शकते.
कोणतेही पद असो वा नसो, वयाच्या नव्वदाव्या वर्षांपर्यंत महिन्यातील सत्तावीस दिवस ते अखंड संचार करीत. हे फिरणे बेळगावपासून महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यापर्यंत.. कष्टकऱ्यांच्या लढय़ात, प्रबोधनाच्या आघाडीवर, शोषणमुक्त समताधिष्ठित समाजरचनेसाठी. यामुळेच, महाराष्ट्रातले सर्व आणि कर्नाटकातील चार तुरुंग त्यांना आतून-बाहेरून माहीत होते. मोर्चे, घेराव, निदर्शने, उपोषणे भ्रष्ट मंत्री आणि अधिकाऱ्यांची झाडाझडती, न्यायाची पाठराखण, अन्यायाशी टक्कर, भल्याभल्यांना दिलेली आव्हाने, ठोकरून लावलेली आमिषे, सडेतोड युक्तिवाद, घणाघाती भाषणे, अखंड चळवळी हा त्यांचा जणू श्वासोच्छ्वास होता.
कार्ल मार्क्स, महात्मा फुले, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांचे तत्त्वज्ञान ही त्यांची वैचारिक वाघनखे. अखंड वाचन, दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रखर प्रज्ञावाद आणि बेडर लढवय्येपणा ही त्यांच्या भात्यातील अजेय आणि अमोघ शस्त्रास्त्रे होती. पूर्ण विचारांती लढा पुकारल्यानंतर विजयाशिवाय थांबणे त्यांच्या रक्तात नव्हते. प्रतिस्पर्ध्याचे पद, सामर्थ्य, दमन, शक्ती, धनदांडगेपणा त्यांना विचलित करत नसे. कर्मवीर विठ्ठल रामजी िशदे यांची निरपेक्ष समर्पण वृत्ती, गांधींचा अहिंसात्मक सत्याग्रही मार्ग, महात्मा फुलेंची धर्मनिरपेक्ष जातीनिरपेक्ष सत्यशोधकी निष्ठा, कर्मवीरांची नसानसांत भिनलेली तत्त्वनिष्ठा आणि बंडखोरी यांचे अजब मिश्रण म्हणजे एन. डी. पाटील!
क्रांतिकारकांचे आगर आणि प्रतिसरकारचा तालुका म्हणून सर्वपरिचित असलेल्या वाळवा तालुक्यातील ढवळी गावात त्यांचा जन्म झाला. शाळेच्या रजिस्टरमध्ये १५ जुलै १९२९ अशी जन्मतारीख शिक्षकांकडून नोंदवली गेली. गावातील मारुतीच्या देवळात भरत असलेल्या शाळेमध्ये एन. डी. पाटील यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. ढवळीपासून आठ किलोमीटरवरील रयत शिक्षण संस्थेमध्ये एन.डी. सरांनी माध्यमिक शिक्षणाचे धडे गिरवले. याच कालावधीत क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, जी. डी. बापू लाड असे वाळव्यातील क्रांतिदूत एन. डी. पाटील यांच्या ढवळीतील घरी येत-जात, प्रसंगी मुक्कामाला असत. त्यांच्या विचारांचा प्रभाव एन. डी. यांच्यावर पडलाच, पण या साऱ्यांच्या कार्यशैलीचा वारसा स्वातंत्र्योत्तर काळात कसा सांभाळायचा, याचे उदाहरण एन. डी. सरांनी स्वत:च्या आचरणातून घालून दिले. ते बोलके नव्हे तर कर्ते सुधारक होते. पूर्ण गावाला परवानगी असणारी, पण दलितांना बंदी असलेली घरच्यांच्या मालकीची असणारी विहीर जोपर्यंत दलितांना खुली करणार नाही तोपर्यंत घरात पाऊल ठेवणार नाही, अशी भूमिका घेऊन एन. डी. सर शेवटी ही विहीर दलितांना खुली करूनच थांबले.
अर्थशास्त्रातून त्यांनी एम.ए. पदवी संपादन केली. मग कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या आष्टा येथील ट्रेिनग कॉलेजमध्ये एन. डी. पाटील यांना लेक्चरर पदावर रुजू करून घेतले. बॅरिस्टर पी. जी. पाटील यांच्यासोबतही एनडी सरांनी काम केले. ९ ऑगस्ट १९४७ रोजी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली. १९५० मध्ये दाभाडी येथील अधिवेशनात शेतकरी कामगार पक्षाने मार्क्सवाद- लेनिनवादाचा अंगीकार केला. केशवराव जेधे, शंकरराव मोरे, भाऊसाहेब राऊत, क्रांतिसिंह नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील या शे. का. पक्षाचे आधारस्तंभ असलेल्या नेत्यांबद्दल एन. डी. सरांना प्रचंड आदर होता. त्यामुळे त्यांनी या पक्षात काम करायला सुरुवात केली. १९९५ पासून पुढल्या वीस वर्षांहून अधिक काळ ते शेकापचे सरचिटणीस राहिले. मुंबई गिरणी कामगार संघटनेचे नेतृत्वदेखील त्यांनी केले. अशा प्रकारे सामाजिक व राजकीय क्षेत्रांत त्यांची प्रभावशाली परिवर्तनवादी नेत्यांच्या तालमीत जडणघडण झाली. १९५४ ते १९५७ च्या काळात कर्मवीर अण्णांनी त्यांच्यावर ‘कमवा व शिका’ योजनेच्या प्रमुख पदाची जबाबदारी दिली. आज ही योजना अनेक विद्यापीठांमध्ये पथदर्शी ठरली आहे. एन. डी. पाटील १९६० ते १९८२ दरम्यान १८ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. ते १९७८ ते १९८२ या काळात सहकारमंत्री राहिले. १९८५ ते १९९० या काळात कोल्हापूर मतदारसंघाचे ते आमदार होते.
गोिवद पानसरे यांच्या हत्येनंतर निघालेल्या अंतिम यात्रेत, वयाची नव्वदी पार केलेल्या एन. डी. पाटील यांना अश्रू अनावर झाले होते. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर, व्यवस्थित चालता नाही आले तरीदेखील दुर्दम्य इच्छाशक्ती असलेले एनडी सर वॉकर घेऊन दर महिन्याच्या २० तारखेला कोल्हापुरात त्यांचा खून करणाऱ्यांवर कारवाई करा या मागणीसाठी मॉर्निग वॉक आंदोलन करीत. अगदी करोनाच्या संकटकाळातदेखील जनतेच्या न्याय्य मागण्यांसाठी त्यांनी व्हीलचेअरवर बसून कोल्हापूर कलेक्टर ऑफिससमोरच्या आंदोलनात सहभाग घेतला.
एन. डी. पाटील यांचे वैयक्तिक जीवन हे चारित्र्यसंपन्न व नीतिमत्तेचा वस्तुपाठ घालून देणारे होते. रयत शिक्षण संस्थेसारख्या अनेक संस्थांमध्ये पदाधिकारी असल्यानंतरदेखील किंवा मंत्रिपदावर असताना नंतरदेखील त्यांनी कोणी कितीही जवळ असला तरी नियमबाह्य लाभ करून दिला नाही किंवा स्वत: घेतला नाही. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा मसुदा प्रस्तावित असताना त्यामध्ये एन. डी. सरांना अध्यक्ष या नात्याने राज्य मंत्रिपदाचा दर्जा मिळण्याची तरतूद होती, पण एन. डी. सरांनी ठामपणे ती धुडकावून लावली.
एन. डी. पाटील सर हे पुरोगामी, परिवर्तनवादी, लोकशाही समाजवादासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी चालतेबोलते विद्यापीठ होते. त्या विद्यापीठाचा चालतेबोलतेपणा आज संपला, पण शिकवण जपून ठेवणे पुढल्या पिढीच्या हाती आहे.
लेखक पीएचडी संशोधक व परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते आहेत. girishphondeorg@gmail.com