अतुल सुलाखे jayjagat24 @gmail.com
साम्ययोगाच्या अभ्यासासाठी गीताईतील ५, ६, ९ आणि १८ हे अध्याय महत्त्वाचे मानले जातात. विनोबांनी ‘साम्ययोग हे गीताईचे पालुपद आहे,’ असे सांगितले, त्या अनुषंगाने तीन ग्रंथ कळीचे आहेत. ‘गीता प्रवचने’, ‘गीताई चिंतनिका’ आणि ‘स्थितप्रज्ञ दर्शन’. या ग्रंथांमुळे गीताईची खोली समजतेच पण सूत्र, वृत्ति व भाष्य या अध्ययनाच्या पारंपरिक पद्धतीशी परिचयही होतो. या तिन्ही ग्रंथांना गीताईची ‘प्रस्थानत्रयी’ असेही म्हटले जाते.
भारतीय दर्शनशास्त्रात ‘प्रस्थानत्रयी’ या संकल्पनेला अत्यंत महत्त्व आहे. प्रस्थान म्हणजे मार्ग. ब्रह्मविद्या किंवा अध्यात्मविद्या प्राप्त करून घेण्यासाठी तीन मार्ग आहेत. उपनिषदे, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्रे. हे ग्रंथ अध्यात्मविद्येचे मार्ग म्हणून ‘प्रस्थान’ आणि संख्या तीन असल्याने ‘त्रयी’.
काळाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रस्थानत्रयीच्या अध्ययनातून विविध दर्शनांची मांडणी करण्यात आली. आद्य शंकराचार्यानी केवलाद्वैतपर, भास्कराचार्यानी द्वैताद्वैतपर, रामानुजाचार्यानी वैष्णव विशिष्टाद्वैतपर, नीलकंठ शिवाचार्यानी शैव विशिष्टाद्वैतपर, मध्वाचार्यानी वैष्णव द्वैतपर, निंबार्काचार्यानी आणि श्रीनिवासाचार्यानी वैष्णव द्वैताद्वैतपर, वल्लभाचार्यानी वैष्णव शुद्धाद्वैतपर, चैतन्य महाप्रभूंचे अनुयायी बलदेवाचार्यानी अचिंत्यभेदाभेदपर व श्रीकरांनी षट्स्थल-भेदाभेदपर अशी भाष्ये लिहिली आहेत. ही भाष्ये ब्रह्मसूत्रांवरची आहेत. संपूर्ण प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहिणाऱ्यांमधे आद्य शंकराचार्य आणि मध्वाचार्याचा समावेश होतो.
गीताईची प्रस्थानत्रयी म्हणजे जुन्या आणि नव्या तत्त्वज्ञानांचा समन्वय आहे. विश्लेषणाची रीत ऋषी आणि शास्त्रकारांची आहे. तिला भूदान यज्ञाची जोड मिळाली व कालसुसंगत दर्शन आकाराला आले. या प्रस्थानत्रयीचा पूर्णविराम म्हणजे गीतेचा साम्ययोगपर अर्थ.
याखेरीज प्रस्थानत्रयीतील अन्य दोन ग्रंथांवर विनोबा आणि त्यांचे मधले भाऊ बाळकोबा यांचे लिखाण आहे. ‘उपनिषदांचा अभ्यास’ या छोटेखानी पुस्तकातून विनोबांनी उपनिषदांच्या अध्ययनाची अनोखी वाट दाखवली आहे. भूदान यात्रेत त्यांनी उपनिषदांवर अनौपचारिक मांडणी केली. तिचेच पुढे ‘अष्टादशी’ हे पुस्तक झाले. अर्थात विनोबांनी ब्रह्मसूत्रांवर विस्तृत लिहिले नाही. ही उणीव बाळकोबा भावे यांनी भरून काढली. त्यांनी ‘ब्रह्मसूत्रां’वर अत्यंत सखोल भाष्य लिहिले. ‘ब्रह्मसूत्र’ हा एकच ग्रंथ प्रमाण मानून त्यांनी आयुष्यभर अध्ययन आणि अध्यापन केले. याशिवाय त्यांनी गीतेवरही भाष्य लिहिले.
धाकटय़ा शिवबांनी (शिवाजीराव भावे), गीताईच्या संपादनात, त्या अनुषंगाने अभ्यास साहित्य तयार करण्याची मोठी कामगिरी केली. यात मुख्यत्वे कोश वाङ्मयाचा मोठा वाटा दिसतो. विनोबांच्या गीताध्ययनात शिवाजीरावांचा लक्षणीय सहभाग होता. आणखी महत्त्वाची बाब म्हणजे गीताईच्या प्रसारार्थ एक दशकभर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पदयात्रा चालवली. या बंधुत्रयीने प्रस्थानत्रयीची अशी सेवा केली. गीताईप्रमाणेच विनोबांनी वेद उपनिषदांवर आणखी सखोल भाष्य केले असते. मात्र अवाढव्य जबाबदाऱ्यांमुळे त्यांना ते शक्य झाले नसावे. ‘तुम्ही ग्रामदान द्या, मग वेदोपनिषदांवर मी हवे तेवढे लिहीन’ असेही ते म्हणत. विनोबांची अध्यात्मविद्या लौकिक समस्यांना पारखी नव्हती एवढाच याचा अर्थ.