अतुल सुलाखे jayjagat24 @gmail.com
साम्ययोगाचा विनोबांनी विकास केला ते सूत्र म्हणजे ‘ब्रह्म सत्यं’. आचार्याचे अद्वैत दर्शन ही साम्ययोगाची पृष्ठभूमी. ती भूमिका प्रदीर्घ परंपरेतून आली होती. तिला जोड मिळाली ती ज्ञानदेवांच्या वाणीची. ही वाणी विनोबांसाठी स्फूर्तिदायी होती. माउलींमुळे सारे विश्व त्यांना स्फूर्तिप्रद झाले.
साम्ययोगाचा मागोवा घेताना, त्याला आधार असणाऱ्या आणि विनोबांनी प्रमाण मानलेल्या काही ओव्या अशा : ऐसेनि विवेकें उदो चित्तीं । तयासी भेदु कैंचा त्रिजगतीं ।
देखें आपुलिया प्रतीति । जगचि मुक्त ॥
(ज्ञानदेवी सप्तशती – ५.८५ )
अशा ज्ञानाने (अभेद भावनेने अथवा सर्वाशी असणाऱ्या ऐक्य भावनेने) ज्याच्या चित्तात उदय केला आहे, त्याला त्रलोक्यात भेद कसा दिसेल? तो आपल्या अनुभवाने सारे जगच मुक्त आहे असे पाहातो. यापुढची ओवी तर साम्ययोगाची चपखल व्याख्याच आहे : हें समस्तही श्रीवासुदेवो ।
ऐसा प्रतीतिरसाचा वोतला भावो ।
म्हणौनि भक्तांमाजीं रावो । आणि ज्ञानिया तोचि ॥
(ज्ञा. स. ७. १३६ )
हे सर्वच विश्व वासुदेव आहे, असा अनुभवरूपी रसाचा भाव त्याच्या अंत:करणात ओतलेला असतो. त्यामुळे तो भक्तांमध्ये राजा असतो आणि ज्ञानीही तोच असतो.
साम्ययोग म्हणजे सर्वाभूती भगवद्भाव, असे विनोबा सांगतात तेव्हा त्यांच्या समोर ही ओवीच असणार.
ज्ञानेश्वरीतील सातशे ओव्या निवडताना विनोबांनी संपादक म्हणून किती अधिकार वापरला ते सांगणे कठीण आहे. जवळ जी ज्ञानेश्वरीची प्रत होती तिच्यातील निवडलेल्या ओव्यांवर त्यांनी फक्त खुणा केल्या होत्या.
विनोबांची खरी समाधी लागलेली दिसते ती माउलींच्या भजनांवर बोलताना. एरवी ज्ञानदेवांविषयी अतीव आदराने बोलणारे विनोबा त्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करतात. जणू एखाद्या मित्राचा संदेश ते पोचवत आहेत. साम्यावस्था लाभली की सर्वाभूती हरी हीच भावना निर्माण होते. माउलींच्या या भजनावर विनोबा लिहितात,
हरि आला रे हरि आला रें ।
संत-संगें ब्रह्मानंदु जाला रे ।।
हरि येथें रे हरि तेथें रे ।
हरीविण न दिसे रितें रे ।।
हरि आदी रे हरि अंती रे ।
हरि व्यापक सर्वा भूतीं रे ।।
हरि जाणा रे हरि वाना रे ।
बाप रखुमादेवी-वरु राणा रे ।।
ज्ञानदेवाला ईश्वराचा सगुण साक्षात्कार पहिल्याप्रथम झाला, त्या प्रसंगाचे वर्णन ज्ञानदेव करीत आहेत.
सर्व संतांना बरोबर घेऊन ईश्वर मला भेट देण्यासाठी आला आहे. संतांच्या संगतीमुळेच मला एवढा आनंद लाभू शकला. दिक् कालाने निर्माण केलेले सारे भेद आता मावळले. सर्व भूतांमध्ये हरीशिवाय काही उरले नाही. सर्व बुद्धि-शक्तीने त्याला जाणावे आणि सर्व वाक्-शक्तीने त्याला वर्णावे या शिवाय आता दुसरे काम उरले नाही. विनोबा सांगतात तो साम्ययोग आणि सर्वाभूती भगवद्भाव या प्रेरणांचा उगम असा आहे. ‘ज्ञानदेव धर्मसंस्थापक होते आणि देवाने मराठी माणसांसाठी प्रेषित म्हणून त्यांना धाडले होते,’ असे विनोबा म्हणत. त्या अर्थाने साम्ययोग हा महाराष्ट्राचा धर्म आहे.