अतुल सुलाखे jayjagat24 @gmail.com
विनोबांचा शोध घेताना काही संकल्पना अगोदरच माहीत असतील तर त्यांची ओळख नेमकेपणाने होते. त्यांचे साहित्य वाचताना गीताई-रामहरी, सत्य-प्रेम-करुणा, सर्व धर्म प्रभूचे पाय, जगत् – स्फूर्ति:, गुणदर्शन, सत्यग्राही, आदि शब्द-प्रयोग आपले लक्ष वेधून घेतात. वस्तुत: हे आणि असे शब्द म्हणजे विनायक नरहर भावे यांची खरी ओळख आहे.
विनोबांचे एका शब्दात वर्णन करायचे झाले तर ते ‘विचार-पुरुष’ असे करावे लागेल. त्यांनी आयुष्यात प्रत्येक गोष्ट केली ती ‘विचार’पूर्वक. त्या विचारांना प्रयोगाची जोड दिली आणि हाती आलेल्या निष्कर्षांवर पुन्हा चिंतन केले.
‘चिंतन-प्रयोग-चिंतन’ या सूत्राच्या आधारे विनोबांच्या जवळपास प्रत्येक कृतीची संगती लावता येते.
व्यक्तीपेक्षा विचार मोठा हा भारतीय दर्शनांचा एरवीही विशेष आहे. अद्वैत, विशिष्टाद्वैत, लोकायत या आणि अशा नावांनी तिचे प्रवर्तक ओळखले जातात. नावे घेतली नाहीत तरी चालते. सगळे संत तर भागवतधर्मीच होते. विनोबांना या परंपरेची सखोल जाण होती.
यातूनच ‘सर्वोदया’चा विचार व्यापक रूपात समोर आला. महात्मा गांधींची हत्या झाल्यानंतर भविष्याचा वेध घेण्यासाठी एक चिंतनपर बैठक झाली. तिच्यामध्ये विचाराची महती विनोबांना किती जाणवत होती हे ठळकपणे ध्यानी येते.
त्या बैठकीत, ‘सत्य, अिहसा या मूल्यांना गांधीजी नसते तर प्रतिष्ठा मिळाली नसती,’ असा सूर उमटला. त्याविरोधात बोचरी प्रतिक्रिया देत विनोबांनी स्पष्टपणे सांगितले की –
‘‘गांधींमुळे सत्याला प्रतिष्ठा नाही. सत्यामुळे गांधींना प्रतिष्ठा लाभली! माणसे जेव्हा तत्त्वांचे दर्शन घेतात तेव्हा ती प्रतिष्ठित होतात.’’
याच बैठकीत ‘सर्वोदय’ या शब्दाला व्यापकता देताना विनोबांनी व्यक्ती नव्हे तर विचार मोठा हे सूत्र पुनश्च ठसवले. परिणामी गांधीजींचा, विनोबांचा, असे सर्वोदय विचारांचे कप्पे पडण्याऐवजी सर्वोदयाच्या सूत्रात एक प्रदीर्घ आणि भव्य परंपरा गुंफली गेली. यातच ‘साम्ययोग’ येऊन जातो.
विनोबांच्या आयुष्यावर तीन दार्शनिकांचा प्रभाव होता. शंकराचार्य, ज्ञानदेव आणि गांधीजी. या तिघांबद्दल त्यांना अपार प्रेम आणि आदर होता. तथापि या आदरभावाला अंतिम रूप द्यायची वेळ आली तेव्हा त्यांनी एक सूत्र तयार केले –
‘ब्रह्म सत्यं जगत्स्फूर्ति: जीवनं सत्य-शोधनम्।’
या सूत्रात अद्वैत ते अहिंसा या परंपरांच्या दरम्यान भारताचा म्हणून जो तत्त्वविचार आहे तो सगळा येतो.
‘गीताईवर माझे नाव नसावे तथापि या युगात ते शक्य नाही, बाबाला विसरा पण गीताई स्मरणात ठेवा.’ या आणि अशा आशयाच्या त्यांच्या उद्गारात भावना तर होतीच, पण त्यामागे एक विचारही होता.
त्यांच्या ‘ज्ञानदेवी सप्तशती’ या ज्ञानेश्वरीतील सातशे ओव्यांच्या संकलनात, पुढील ओवी आहे.
माझें असतेपण लोपो । नामरूप हारपो ।
मज झणें वासिपो । भूतजात ॥ ज्ञा. १३.१९८ ॥ हा विचार विनोबा शब्दश: जगले.