– अतुल सुलाखे jayjagat24 @gmail.com
चंद्रमे जे अलांछन । मरतड जे तापहीन ।
ते सर्वाही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
– ज्ञानेश्वरी.
****
कर्मात चि तुझ़ा भाग, तो फळांत नसो कधीं
नको कर्म-फळीं हेतु, अकर्मी वासना नको
– गीताई अ. २
संतांच्या अचाट कार्याचा आणि त्यांच्या लौकिक आणि आध्यात्मिक पराक्रमाचा आपल्याला अंदाज नसतो. किमान महाराष्ट्रात तरी असे घडू नये कारण संत-सज्जनांचे वर्णन करताना माउलींनी ‘मार्तण्ड जे तापहीन’ असा नेमका शब्द प्रयोग केला आहे. संत हे सूर्यापेक्षाही श्रेष्ठ असतात इतकी ही साधी गोष्ट आहे. सूर्यापेक्षाही पराक्रमी असणाऱ्या संतांनी तिथवर पोचण्यासाठी कशी तपश्चर्या केली असेल हे आपल्यापर्यंत येत नाही. ते सांगण्याचे कार्य विनोबांनी केले.
महाराष्ट्रातील पाचही संतांचा जीवनादर्श ठेवून त्यांनी प्रत्यक्ष साधना केली. त्या साधनेचे उपांग म्हणावे अशी वाङ्मय निर्मिती केली. यासोबत जुन्या काळातील संतांची बरीच शक्ती, व्यवस्थेतील वाईट गोष्टींवर, सुरुवातीचे प्रहार करण्यात गेली. आपल्याला त्याच्यापुढे जायचे आहे. संतांच्या खांद्यावर बसून भविष्यात पराक्रम करायचा आहे, याचीही कल्पना त्यांना होती.
विनोबांची ही भूमिका लक्षात घेतली की साम्ययोगाचे आणि संतांचे नाते लक्षात येते. त्याचप्रमाणे संतांच्या आणि विनोबांच्या ‘साहित्या’चा दर्जा समजतो.
गीता प्रवचनांमध्ये या अनुषंगाने एक उल्लेख आला आहे. संतांनी आपले काम सांभाळून त्याद्वारे परम सत्याचे दर्शन घेतले. भागवत धर्माची उकल करताना विनोबांनी ही भूमिका आणखी पुढे नेली.
‘‘भागवत धर्म म्हणजे ‘देव, भक्त आणि नाम’ यांचा त्रिवेणी संगम आहे. देव साध्य, भक्त साधक आणि नाम साधन या तिहींच्या कल्पनेत संतांनी माधुर्य आणि औचित्य यांची सुंदर जोड घातली आहे.’’
मूळ भागवत धर्मातील देवाची कल्पना साधी आहे. तिच्या भोवती गूढतेचे वलय नंतरच्या काळात निर्माण झाले. संतांनी हा साधा देव अगदी भोळा करून टाकला. या नात्यात इतके समत्व होते की देव, भक्तांना त्यांच्या रोजच्या कामात मदत करत असे. नामदेव, जनाबाई, सावता महाराज, सजन कसाई आदी संत मंडळींसाठी देवाने केलेले साह्य़ इथे आठवते. आध्यात्मिक आणि लौकिक आयुष्यात थेट देवालाच पाचारण करावे, एखाद्या मित्राशी मोकळेपणाने करावा तसा देवाशी संवाद साधावा आणि देवाशी ऐक्य कसे साधता येईल याचीच आस धरावी असा संतांचा भक्तिमार्ग आहे. संतांचे याही पुढचे कार्य म्हणजे हे सर्व संचित त्यांनी जनताजनार्दनासमोर ठेवले. त्यासाठी भाषा, लोकव्यवहार, धर्माचे कल्याणप्रद रूप आदी अनंत गोष्टींचे ज्ञान प्राप्त केले. उदाहरण म्हणून एकनाथ महाराजांचे साहित्य पाहावे. कर्म करावे, फळाची इच्छा ठेवू नये आणि कर्म न करण्याचा विचारही करू नये या मार्गाने संत तापहीन सूर्य बनतात.
हे बरेचदा ठावूक नसते म्हणून संतांच्या अवतीभवती एक गूढ वलय उभे राहते वा केले जाते. त्यांच्या वाङ्मयाकडे सोयीने पाहिले जाते. सुदैवाने सात दशके विनोबांनी गीतेची अशी सेवा केली की तिच्यामुळे संतांच्या साधनेची कल्पना येऊ शकते. गीताईसाठी जी खडतर साधना केली तो भारतीय संस्कृतीचा विशेष आहे.