विनोबांनी ज्या वयात ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा घेतली, त्या वयातील कोणत्याही लहान मुलाची हीच प्रतिक्रिया असते. मुंजीच्या वेळी हा प्रसंग घडला. जेमतेम सहा-सात वर्षांचे मूल असे काही म्हणते तेव्हा ती बाब हसून सोडली जाते. मात्र त्यांच्या आईला यातील गांभीर्य जाणवले असणार. आपले मूल वैराग्याची कास धरते हे जाणवल्यानंतर तिने त्याला या मार्गावर ठाम राहण्याची प्रेरणाच दिली. एकदा त्या विनोबांना म्हणाल्या, ‘‘विन्या, तू वैराग्याच्या खूप गोष्टी करतोस, पण मी स्त्री नसते तर खरे वैराग्य म्हणजे काय हे तुला दाखवून दिले असते.’’

विनोबांच्या वैराग्याच्या प्रेरणेचे मूळ इथे आहे.

या ब्रह्मचर्य व्रताची परिणती ब्रह्मजिज्ञासेत झाली आणि त्यातून विनोबांनी गृहत्यागाचे पाऊल उचलले. ‘देवाच्या सख्यत्वासाठी, पडाव्या जिवलगांसी तुटी,’ या रामदास स्वामींच्या उक्तीचा विनोबांवर विलक्षण प्रभाव होता. हाताशी ज्ञानेश्वरी आणि डोक्यात रामदास घेऊन ते काशीला निघाले., तेव्हा बंगाल प्रांतात जाऊन क्रांतिकार्य करावे की हिमालयात जाऊन साधना करावी हा पेच डोक्यात होताच. शेवटी हिमालयाने बाजी मारली आणि पावले गांधीजींच्या आश्रमात स्थिरावली.

वयाच्या विशीमध्ये असताना असे काही करायचे तर आत्मप्रेरणेला ज्ञानाची जोड असणे अनिवार्य असते. विनोबांची ज्ञानसाधना साधारणपणे वयाच्या तेराव्या वर्षी सुरू झाली. आरंभ ज्ञानेश्वरीने झाला. हा ज्ञानप्रवास औपचारिकपणे २ ऑक्टोबर १९७४ ला संपला. त्या दिवशी त्यांनी स्व. जानकीदेवी बजाज यांना श्रीविष्णुसहस्रनामाचा एक श्लोक शिकवला. त्यानंतर विनोबांनी काही लिहिले नाही.

गागोदे, बडोदा, वाई, साबरमती, वर्धा, पवनार, तुरुंग आणि सबंध भूदान यज्ञाच्या निमित्ताने केलेली पायपीट, विनोबांच्या नित्य अध्ययनावर यापैकी कशाचाही परिणाम झाला नाही. गांधीजींच्या परिवारात विनोबांसारखा दुसरा व्यासंगी नव्हता.

विद्या आणि ज्ञान या दोन्ही पातळय़ांवर विनोबा सारखेच अधिकारी होते. त्यामुळे गांधीजींच्या हत्येनंतर ते अविचल राहिले. पुढे काय करायचे याबाबत त्यांनी मार्गदर्शनही केले. त्यांना ‘जंगम विद्यापीठ’ म्हटले जाते यातच सर्व काही आले.

या व्यासंगाला त्यांनी आश्रमीय साधनेची जोड दिली. आश्रमीय व्रतांचे पालन करताना अध्यात्म आणि शरीरश्रम यांची जी अद्भुत सांगड त्यांनी घातली ती बिनतोड होती. गांधीजींच्या शब्दात सांगायचे तर ‘आजवर आश्रमात जे लोक आले ते काही तरी घेण्यासाठी आले. हा एकच मुलगा असा निघाला की जो देण्यासाठी आश्रमात आला.’ यावर वेगळय़ा टिप्पणीची गरज नाही.

पूर्वायुष्यातील साधकावस्था क्रमश: नेतृत्वात बदलली ती १९५० नंतर. पहिल्यापासून विनोबांच्या मनात चराचर सृष्टीविषयी प्रेमाची भावना होती. भूदान यज्ञाच्या निमित्ताने तिचे व्यापक दर्शन झाले. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांच्या सहवासात आलेल्या मंडळींनी ही बाब नोंदवली आहे. आई नसणाऱ्या मुलींना विनोबांच्या सहवासात आईचे दर्शन झाले याहून आणखी काय सांगायचे?

या सर्वाहून वेगळा असा त्यांचा विशेष म्हणजे स्वातंत्र्याची प्रखर ओढ. जरा कुणी त्यांच्यावर अंकुश ठेवायचा प्रयत्न केला की ते बंड करायचे. याला खुद्द गांधीजींचाही अपवाद नव्हता. ‘‘मैं बापू का पाला हुआ जंगली जानवर हूँ।’’ आणि ‘गांधीजींचे मला पटले तेवढेच कार्य मी केले.’ या दोन उक्ती त्यांचे स्वातंत्र्यप्रेम ठसवणाऱ्या आहेत.

असा हा विनोबांचा षट्सूत्री जीवनपट. त्यांच्या विचारांचा मागोवा घेताना तो ध्यानी ठेवायचा आहे.

अतुल सुलाखे  jayjagat24 @gmail.com

Story img Loader