अतुल सुलाखे jayjagat24@gmail.com
साम्ययोगाची पूर्वअट असणारी सामाजिक समता, स्त्रीशक्ती जागी करण्यासाठी फार गरजेची असते. स्त्रिया अक्षम असतील तर खरे परिवर्तन होणार नाही आणि समग्र परिवर्तनाखेरीज महिलांना सन्मान मिळणार नाही. सामाजिक क्षेत्रातील हा पेच विनोबांना ठाऊक होता. त्यांनी त्यांच्या पद्धतीने या मुद्दय़ाला हात घातला. विनोबा जवळपास सात दशके कार्यमग्न होते. या कालावधीतील त्यांचे कार्य स्तिमित करणारे होते. एवढय़ा व्यग्र आयुष्यातून चटकन आठवावे असे विनोबांचे मुख्य कार्य कोणते होते? गीताई आणि तदनुषंगिक साहित्य? भूदान यज्ञ? समन्वय?
विनोबांची ही आणि अशी कार्ये नि:संशय महत्त्वाची आहेत. तथापि त्यांच्या आयुष्यावर दोन प्रेरणांचा प्रभाव दिसतो. आई आणि मातृशक्ती. गीताई ते गोसेवा या त्यांच्या कृती आईच्या संस्कारांमुळे घडल्या. त्यांच्या प्रत्येक कार्यातही महिला अग्रेसर होत्या. विनोबांच्या चरित्रात याचे भरपूर तपशील आढळतात.
विनोबांनी ‘चरित्र’ या साहित्य प्रकाराच्या संदर्भात वापरलेले दोन शब्द इथे ध्यानी घ्यायला हवेत. पहिला ‘अनात्मचरित्र’ आणि दुसरा ‘भावचरित्र.’ विनोबा म्हणाले होते की ‘बाबा (विनोबा) आत्मचरित्र लिहू लागला तर ते अनात्मचरित्र होईल.’ अनात्मचरित्र हा शब्द ‘प्रेमपंथ अहिंसेचा’ या पुस्तकात आढळतो. खरे आत्मचरित्र कसे हवे, याची ही अचूक उकल आहे. ‘भावचरित्र’ हा शब्द त्यांनी एकनाथांच्या भजनांना लिहिलेल्या प्रस्तावना खंडात दिसतो. त्यात नाथांचे स्थूल चरित्र त्यांनी जेमतेम १५ ओळींत सांगितले आहे आणि उरलेले सर्व ‘भावचरित्र.’ नाथांची साधना, गुरुकृपा, पूर्वसूरी, समकालीन आणि नंतरची पिढी असा तो आढावा आहे. शंकराचार्य ते महात्मा गांधी एवढा मोठा आढावा यानिमित्ताने विनोबांनी घेतला आहे.
विनोबांचे अनात्मचरित्र मिळते परंतु त्यांचे भावचरित्र कसे पाहायचे? त्यांचे अशा प्रकारचे चरित्र आहे. फक्त ते अप्रत्यक्ष रूपात आहे. दोन मुख्य शाखा आणि तीन उपशाखा, अशी त्या चरित्राची मांडणी करता येते. पहिली मुख्य शाखा आहे माता रुक्मिणीबाई. आईशिवाय विनोबांची ओळख अपूर्ण आहे. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावरही आईचे स्मरण झाले की त्यांच्या डोळय़ातून अश्रुधारा वाहात असत इतके ते मातृभक्त होते. दुसरी शाखा आहे ‘मातृशक्ती’ची. मातृशक्ती स्वत:मध्ये बाणवणे हे विनोबांच्या आयुष्याचे मोठे ध्येय होते आणि त्यात ते यशस्वीही झाले. विनोबांचे निकटवर्तीय, विनोबांमध्ये आम्हाला आई दिसली, असे आवर्जून सांगतात.
मातृशक्ती ही मुख्य तर शाखा तर गीतेशी संबंधित साहित्य, भूदान यज्ञ, आणि ब्रह्मविद्या मंदिरादि देशभरातील सहा आश्रम या उपशाखा आहेत. हे कार्य ध्यानात घेतले नाही तर विनोबांच्या चरित्राचे आपले आकलन अपूर्ण ठरू शकते.
ऋषी, मुनी, साधू संत या परंपरेवर विनोबांची अपार श्रद्धा होती. संपूर्ण भारताला आध्यात्मिक पातळीवर मार्गदर्शन करणाऱ्या चार महिला संतांची त्यांनी निवड केली. समाजाने आणि त्यातही महिलांनी या संतांना आदर्श मानावे अशी त्यांची भूमिका होती. काश्मीर, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडू असा मोक्याचा भारत, विनोबांनी या संतांच्या ताब्यात दिला आहे. स्त्रीशक्तीचे हे पंचक आहे,
लल्ला अंडाळ अन् मीरा,
मुक्तेसवे महादेवी ।
ज्ञान-धैर्य-वैराग्याची
वाट दावतील नवी ।।