अतुल सुलाखे – jayjagat24@gmail.com
जुन्या शब्दावर नवीन अर्थाचे कलम करणे ही विचारक्रांतीची अहिंसक प्रक्रिया आहे
– गीता प्रवचने, अध्याय २.
विनोबांच्या विचार पद्धतीबाबत शरीर परिश्रम आणि विद्वत्तेइतकीच आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे. ती आहे त्यांची विचार करण्याची रीत. त्यांच्या विद्वत्तेपेक्षा ती थोडी सरस आहे.
विनोबा वर्तमानातील प्रश्नांकडे जुन्या संज्ञा वापरून पाहतात. त्यामुळे एखादा प्रश्न समजून घेताना दिशाभूल होते. उदा. भूदान यज्ञ ते सूक्ष्मात प्रवेश. त्यांच्या साहित्यात याचा विपुल आढळ दिसतो. त्यावर नापसंतीचा सूरही उमटतो. तथापि त्यातील आशय पूर्णपणे नवा असतो आणि ही गोष्ट चटकन लक्षात येत नाही. हेच उलटही घडते.
पारंपरिक मंडळींनी त्यांच्यावर आक्षेप घेतले की ते म्हणत, ‘ऋषी आणि संत यांच्यापेक्षा मला अधिक समजते कारण मी त्यांच्या खांद्यावर बसलो आहे. एरवी मी असे म्हणण्याचे धाडस केले नसते.’
ही विचार पद्धती आपल्याला माहीत नसेल तर आधुनिक आणि पारंपरिक रीतीने विचार करणाऱ्यांपर्यंत विनोबांचा विचार बरेचदा पोचत नाही. आधुनिक म्हणवणाऱ्यांना परंपरा सहसा माहीत नसते आणि पारंपरिक मंडळींचे आधुनिकतेशी वावडे असते.
त्यांच्या कोणत्याही लिखाणात ‘विचार-सूत्र’ आढळते. परंपरा आणि आधुनिकता यांचा समन्वय साधणारे या अर्थाने हे ‘विचार-सूत्र’ दिसतेच पण त्यांची भाषाही सूत्रमय आहे.
गीता प्रवचनांमधे सूत्र, वृत्ती यांचे दर्शन होते. गीताईमधे ६० अधिकरणे आहेत. विनोबांनी बायबल, कुराण, यांचे सारांश काढले. त्या सारांशालाही सूत्ररूप दिले. आश्रमीय व्रतांचीही त्यांनी सूत्रमय मांडणी केली.
विचार मांडण्याची ही रीत ऋषींची आणि शास्त्रकारांची आहे. एक छोटे सूत्र आपल्यासमोर मोठा आशय ठेवते.
विनोबांच्या मते हिंदू कोण तर ‘हिंसया दूयते चित्तम्।’ जो हिंसेने दु:खी होतो तो. यावर कोणत्याही टिप्पणीची गरज नाही.
अशी सूत्रे त्यांनी लोकभाषेतही रचली.
संस्कृतप्रमाणे लोकभाषेतही त्यांनी सूत्रे दिली. ‘सबही भूमि गोपाल की।’ आणि ज्याला अंतिम म्हणता येईल ते आहे, ‘जय जगत्’ यात सारे काही येते. या सूत्रांवर आधारित जे काम त्यांनी उभे केले त्याला अहिंसक क्रांतीचा प्रयोग म्हणता येईल.
विनोबांची भाषा सूत्रमय असली ती क्लिष्ट नाही. ते या सूत्रांची उकल करतात तेव्हा त्या विवेचनाला प्रासादिकतेचा स्पर्श होतो. विनोबांच्या विचारांचा आणखी एक विशेष म्हणजे एकमताचा आग्रह. त्यांना बहुमत मान्य नव्हते. शंभरातील एक व्यक्ती वेगळे मत मांडत असेल तर विनोबा त्या माणसाचे मत विचारात घेणार. त्याचे परिवर्तन होईपर्यंत वाट पाहणार. कारण ९९ लोकांचे मत गृहीत धरून एखादा निर्णय घेणे म्हणजे वेगळी भूमिका असणाऱ्या एका व्यक्तीवर सक्ती होते. इथे हिंसा येते आणि विनोबांना अहिंसक क्रांतीचे बीज रोवायचे होते.