– अतुल सुलाखे jayjagat24 @gmail.com
ईशावास्य वृत्तीमधे व्यूह-समूह, आत्मज्ञान-विज्ञान आणि आवाहन-विसर्जन, असे शब्दप्रयोग दिसतात. यातील एक जोड विनोबांच्या आयुष्याचा भाग होती. आत्मज्ञान आणि विज्ञान. केवळ शब्द शुष्क वाटू शकतात. विनोबांच्या तत्त्वज्ञानात गाभ्याचे स्थान असणाऱ्या या संकल्पना त्यांना लहानपणीच्या संस्कारातून मिळाल्या.
अगदी लहानपणी रुक्मिणीबाई विनोबांना म्हणत, ‘कमी खावे. आत्ता कमी खाल तर जे आहे ते पुष्कळ दिवस पुरेल.’ ईशावास्यात आलेले आत्मज्ञान विनोबांना अशा विविध गोष्टींमधून मिळाले होते. त्याला ‘त२भ’असे सूत्ररूप देण्याचे संस्कार वडिलांचे म्हणजे नरहर शंभुराव भावे यांचे. आईने कमी खा असे शिकवले तर वडिलांनी सांगितले : अन्नाची चव सर्वात जास्त कुठे जाणवते तर घास जिभेवर असला की.. त्यामुळे अन्न चावून खावे. आई त्याग करायचे शिक्षण दिले तर वडील भोगाची रीत वैज्ञानिक पद्धतीने समजावून सांगत.
आईकडून तत्त्वज्ञानाचे संस्कार कळत नकळत झाले असले तरी वडिलांनी मात्र त्यांना जाणीवपूर्वक वैज्ञानिक पद्धतीने विचार करायला शिकवले. विनोबांच्या साहित्यावर धर्मश्रद्धांचा मोठा प्रभाव आढळतो. त्यांची ज्ञानप्राप्तीची वाट धर्मग्रंथांचे परिशीलन करत झाली. तथापि विनोबांवर विद्यार्थिदशेत आधुनिक विद्येचे संस्कार झाले. ते वडिलांनी केले. संस्कृत भाषेऐवजी फ्रेंचची निवड करणे, वडिलांना रसायन उद्योगात मदत करणे, त्यातून निर्माण होणारी उत्पादने विकण्यासाठी साह्य करणे. ही कामेही त्यांनी केली असावीत कारण तसे उल्लेख मिळतात.
उद्योग उभारावा, वकिली करावी, वडिलांची अशी स्वप्ने त्यांना पूर्ण करता आली नसली तरी वडिलांच्या प्रयोगशील वृत्तीचा विनोबांवर मोठा ठसा होता. उदाहरण म्हणून भूदान यज्ञाकडे पाहू. ते सामाजिक कार्य आहेच पण ‘सोशल आंत्रप्रिन्युअरशिप’ चे सर्वोच्च उदाहरणही आहे.
असेच एक उदाहरण ‘ऋषी शेती’चे आहे. केवळ मानवी श्रमांच्या आधारे शेती करायची, अशी ही संकल्पना. तिचे नाव पारंपरिक असले तरी व्यावसायिक शेतीपेक्षा उत्पादन जास्त हवे हा विचारही त्यामागे होता. आणि खरोखरच त्यांनी दीडपट उत्पन्न काढून दाखवले.
मैलासफाईचे काम करताना विनोबांनी गावाच्या आरोग्याचा अभ्यासही केला. आहार, अध्ययन, शेती, सफाई या क्षेत्रांतील विनोबांच्या प्रयोगांवर वडिलांच्या संस्कारांचा मोठा ठसा दिसतो.
याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक कृती जाणीवपूर्वक करणे ही त्यांची रीत होती. मूळ पाया गणिताचा होता. तेही संस्कार पुन्हा वडिलांनी केले. ‘गणितासारखे शास्त्र नाही’ इतकी विनोबांची नि:शंक भूमिका होती. विनोबा काम करत पण प्रसिद्धीपासून दूर राहात. ‘प्रथम सत्याग्रही’ म्हणून निवड होईपर्यंत विनोबा जगाला माहीतच नव्हते. त्यांची ओळख करून देण्यासाठी खुद्द गांधीजींना पुढे यावे लागले. हा संस्कारही वडिलांचा. विनोबांवर आईचा प्रभाव होता हे चटकन दिसते तथापि त्यांच्या आयुष्यावर वडिलांचाही ठसा होता हे आवर्जून शोधावे लागते. नरहरपंतांमधील वैज्ञानिक माहीत असेल तर विनोबांच्या गीताईसह विविध कृतींमधील विज्ञानाची संगती लागते. अन्यथा त्यांचे कार्य म्हणजे ‘फॅड’ वाटते आणि सुशिक्षित म्हणवणाऱ्या मंडळींची तशी धारणा आहे.