अतुल सुलाखे  jayjagat24 @gmail.com

‘जो निरंतर आत्म्यातच सगळी भूते आणि सगळय़ा भूतात आत्मा पाहतो तो मग कोणालाही आणि कशालाही कंटाळत नाही’

‘ज्याच्या दृष्टीने आत्माच सर्व भूते झाला, त्या निरंतर एकत्व पाहणाऱ्या विज्ञानी पुरुषाला, मोह कुठला आणि शोक कुठला?’

(ईशावास्य वृत्ती, मंत्र ६-७)

‘ईशावास्य-वृत्ती’ हे एकच पुस्तक विनोबांनी लिहिले असते तरी चालले असते, असे म्हटले जाते आणि त्यात अतिशयोक्ती नाही. ही ‘वृत्ती’ म्हणजे साम्ययोग, सर्वोदय, या सर्वाचे सार आहे. तिची अगदी तोंडओळख झाली तरी निकोप जीवन विचार गवसतो.

गांधीजींनी आज्ञा केली म्हणून विनोबांनी अशी रचना केली. अवघ्या १८ मंत्रांचे हे उपनिषद पण त्यात विनोबांना समग्र गीता दिसली. ते ईशावास्य उपनिषदाला, परिपूर्ण उपनिषद मानत. वेद आणि गीता यांना जोडणारे उपनिषद म्हणूनही ते ईशावास्याकडे पाहात.

आपण केलेले विवरण पारंपरिक अर्थापेक्षा निराळे आहे, याची त्यांना कल्पना होती. प्रचलित अर्थाला त्यांची हरकत नव्हती पण जुन्या विचारांवर आधुनिकतेचे कलम करायचे ही त्यांची ‘वृत्ती’ च होती. ती इथेही दिसते.

ईशावास्य वृत्ती १९४७ मध्ये पुस्तकरूपात आली. तिला विनोबांनी छोटी पण परिपूर्ण प्रस्तावना लिहिली. तिच्यामध्ये ईशावास्य आणि गीता यांच्या नात्याची उकल आहे.

ईशावास्यात, ‘व्यूह’ आणि ‘समूह’ असे शब्द आहेत. विनोबांना या दोन शब्दात गीतेचा दहावा आणि अकरावा अध्याय दिसला. ‘अ-कायम्,’ ‘अ-व्रणम्’ आणि ‘अस्नाविवरम्’ यातून क्षेत्र-क्षेत्रज्ञ विचार दिसतो. ‘एवं नान्यथोस्ति’ मध्ये गीतेचा कर्मयोग येतो. ‘वायुरनिलम्’ या मंत्रात आठव्या अध्यायातील ‘प्रयाण साधना’ आणि ‘सातत्य योग’ यांचे दर्शन होते.

‘ततो न विजुगुप्सते’ म्हणजे भक्त-लक्षण तर ‘तत्र को मोह: को शोक:’ म्हणजे गीतेचे सार. सारे विश्व वासुदेव आहे ही कल्पना तर ‘ईशावास्य’ या शब्दातच आहे. नवव्या अध्यायातील राजविद्या-राजगुह्य योग म्हणजे ‘त्यक्तेन भुञ्ज्ीथा:’. ‘असुर्या नाम ते लोका:’ हा आसुरी संपत्तीचा निर्देश आहे.

साम्ययोग आणि आत्मौपम्यता यासाठी सहावा आणि सातवा मंत्र महत्त्वाचे आहेत.

‘योऽसौ असौ पुरुष: सोहऽमस्मि’ म्हणजे ‘पुरुषोत्तम योग’ झाला. चौथ्या आणि पाचव्या मंत्रात ‘ज्ञेय वर्णन’ दिसते. ‘कुर्वन्नेवेह कर्माणि’ आणि ‘कुरु कर्मैव तस्मात् त्वं’ यातील सारखेपणा चटकन समोर येतो. दोन्हीकडे कर्माला महत्त्व आहे.

‘मां अनुस्मर युध्य च’ हा उपदेश ‘युयोध्यास्मज जुहुराणमेन:’ मधे वेगळय़ा रीतीने आला आहे. ईशावास्यातील भाषा भक्तांसाठी आहे.

मंत्र नऊ ते चौदा मधील ‘बुद्धि-शोधन’ आणि ‘हृदय-शोधन’ म्हणजे ‘सांख्य बुद्धि’ आणि ‘योग बुद्धि.’ दुष्टतेचे नियमन आणि आणि साधुत्वाचा प्रसार म्हणजे ‘यम’ आणि ‘सूर्य.’

ही सर्व संगती विनोबांनी लावलेली आहे. शेवटी ‘मला गीतेचे वेड असल्याने असे दिसत असेल’ हे नोंदवायलाही ते विसरले नाहीत. म्हणजे इतरांना अर्थाचे स्वातंत्र्य आहेच. ईशावास्य म्हणजे फक्त गीतेचे बीज नव्हे. ते परिपूर्ण जीवन दर्शन आहे. ते कसे हे पुढील लेखात.

Story img Loader