अतुल सुलाखे jayjagat24 @gmail.com
‘ ..नारायणशास्त्री मराठे यांच्या प्राज्ञ मठासंबंधी निरीक्षण झाले नसल्यामुळे आजच काही लिहिता येत नाही. एवढे म्हणण्यास हरकत नाही की शास्त्रीबोवांसारखा निरभिलाष विद्वान लाखातसुद्धा मिळावयाचा नाही. तसेच ही संस्था म्हणजे वाईचें एक भूषण आहे.. ’
‘श्री विनोबा भावे मूळचे वाईचे आहेत पण आता ते भारताचे किंबहुना अखिल मानवांचे आहेत. कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग यांची परिणत अवस्था त्यांचे ठिकाणी आहे. – केवलानंद सरस्वती (नारायणशास्त्री मराठे).’
विनोबांनी बडोद्याचे ग्रंथालय अक्षरश: पिसून काढले होते. आधुनिक विद्या, महाकाव्ये, धार्मिक साहित्य यांचे त्यांनी परिशीलन केले होते. तरीही त्यांना संस्कृत शास्त्र ग्रंथांचा अधिक अभ्यास करावा असे वाटले. त्यासाठी त्यांना मार्गदर्शकाचीही गरज वाटत होती. काशीमध्ये त्यांना असा एक विद्वान मिळाला. त्यांच्याकडे विनोबांनी आपली इच्छा बोलून दाखवली. या अभ्यासासाठी किती काळ लागेल या प्रश्नावर ते शास्त्रीबुवा उत्तरले, ‘बारा वर्षे.’ विनोबा म्हणाले, ‘माझ्याकडे एवढा वेळ नाही.’ ‘मग तुम्ही किती वेळ देऊ शकता?’ ‘दोन महिने!’ परिणामी विनोबांना अशा अभ्यासाची इच्छा काही काळ दूर सारावी लागली.
पुढे ते गांधीजींकडे आले. बापू त्यांची आध्यात्मिक प्रगती पाहून थक्क झाले. तेव्हाच विनायकाचे विनोबा असे नामकरण झाले. गांधीजींना असे नामकरण करताना ज्ञानोबा, तुकोबा अशा संतमालेचे स्मरण झाले. विनोबा म्हणजे त्या मालेतील मणी. ही सगळी प्रशस्ती कितव्या वर्षी विनोबांना मिळाली? अवघ्या ३१ व्या वर्षी. यानंतर विनोबा देशसेवेसाठी अनुकूल अभ्यासाला लागते तरी चालले असते. तरीही त्यांची प्राचीन ग्रंथांच्या अभ्यासाची ओढ संपली नव्हती.
याच दरम्यान, प्राज्ञपाठशाळा, केवलानंद सरस्वती, ही नावे त्यांच्या डोक्यात आली. वाई तर त्यांचे गाव. एक दिवस त्यांनी आश्रम सोडला आणि ते प्राज्ञपाठशाळेत दाखल झाले.
या अनोख्या शिष्याने स्वामी केवलानंदांना पहिला प्रश्न प्रश्न विचारला, ‘कोणताही भेदभाव न करता ही विद्या तुम्ही सर्वाना (विशेषत: स्त्रिया आणि हरिजन) द्याल का?’ स्वामीजींनी नकार देण्याचे काही कारण नव्हते. त्यांचेही विचार आधुनिक होते.
वाईमधील विनोबांचे हे अध्ययन सात ते आठ महिने चालले. या अल्प काळात शरीर परिश्रम आणि अन्य उपक्रम सांभाळून विनोबांनी स्वामीजींच्या देखरेखीखाली, उपनिषद, गीता, ब्रह्मसूत्र आणि शांकरभाष्य, मनुस्मृति, पातंजल योगदर्शन, अशा ग्रंथांचे अध्ययन केले. याखेरीज न्यायसूत्र, वैशेषिकसूत्र, याज्ञवल्क्य स्मृति यांचाही त्यांनी अभ्यास केला. कुणाच्याही मार्गदर्शनाखेरीज अध्ययन करता यावी एवढी शिदोरी स्वामीजींनी विनोबांना दिली.
वाईतील वास्तव्य संपले तरी स्वामीजींविषयी त्यांच्या मनात निरंतर आदरच होता. गीताईची निर्मिती झाल्यानंतर ते लिखाण तपासण्यासाठी विनोबांनी स्वामीजींना विनंती करणारे पत्र लिहिले होते. स्वामीजी ब्रह्मलीन झाल्यावर विनोबांनी ‘सेवक’ या नियतकालिकात एक स्मृतिलेख लिहिला. या लेखालाही तेच शीर्षक दिले आहे. माणूस मातृमान् पितृमान् असेल तर तो आचार्यमान् सहजच होतो, असे विनोबा म्हणत. यातून रुक्मिणीबाई, नरहरपंत आणि स्वामी केवलानंद सरस्वती यांचाही सन्मान होतो.