अतुल सुलाखे jayjagat24 @gmail.com
..प्रेम आणि विचार यात जी शक्ती आहे, ती आणखी कशातही नाही. कुठल्याही संस्थेत नाही, सरकारमध्ये नाही, कोणत्याही वादात नाही, शास्त्रात नाही, शस्त्रात नाही, शक्ती ही प्रेम आणि विचारातच आहे..
– विनोबा, प्रेमपंथ अहिंसेचा
विनोबा, ‘विचारा’ला किती महत्त्व देत होते हे सांगण्यासाठी हा वेचा पुरेसा आहे. विचार आणि प्रयोगाइतकेच त्यांनी आणखी एक तत्त्व शिरोधार्य मानले. ते तत्त्व प्रेमाचे अथवा स्नेहाचे होते.
स्वत:चे, कुणाही व्यक्तीचे आणि पुढे जाऊन अगदी समाजाचे ध्येय सांगताना त्यांनी ‘स्नेहसाधनम्’ हे सूत्रच सांगितले. भगवान येशूंच्या जीवनाचे हे सार त्यांना उमगले होते.
विनोबा म्हणजे कोपिष्ट, रुक्ष अशी एक समजूत असते. ती काही प्रमाणात उचितही म्हणावी लागेल. क्रोध हा त्यांच्या स्वभावाचा भाग होता. कुणी म्हणतात, ते आयुष्याच्या उत्तरार्धात संपूर्ण बदलले आणि मृदू, मवाळ झाले. वास्तव थोडे वेगळे असावे. म्हणजे त्यांच्या साहित्यावरून तरी हे म्हणता येईल. त्यांचा १९५० पर्यंतचा पत्रसंग्रह पुस्तकरूपात प्रकाशित झाला आहे. त्यातील पत्रे वाचताना त्यांच्यातील समोरच्या व्यक्तीविषयीची अपार स्नेहभावना जाणवल्याखेरीज राहात नाही.
काही वेळा त्यांनी हाताशी लेखणी नाही म्हणून कोळशाने पत्रे लिहिली होती. कोणाही माणसाविषयी प्रेम आणि आत्मीयता असल्याखेरीज हे घडत नाही. या पत्रसंग्रहाचे ‘स्नेहसन्निधि’ हे शीर्षकही पुरेसे बोलके आहे.
आणखी एक, ही १९५० पर्यंतची पत्रे त्यांच्या आश्रमीय जीवनातील आहेत. या काळात त्यांची कठोर साधना सुरू होती. राष्ट्रकार्यासाठी कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी ते स्वत:ला सज्ज ठेवत होते. त्यांची साधना कशी होते त्याचे हे एक उदाहरण.
विनोबा, ‘प्रथम सत्याग्रही’ होते हे अनेकांना ठाऊक असते, पण ही जबाबदारी त्यांनी कोणत्या परिस्थितीत स्वीकारली, याची सहसा कल्पना नसते. गांधीजींनी त्यांना भेटीसाठी बोलावून ही जबाबदारी सांगितली. आश्रमाची व्यवस्था लावण्यासाठी वेळ घेतला तरी चालेल असेही बजावले. विनोबा म्हणाले,
‘‘आत्तापासूनच मी ही जबाबदारी घेतली. कारण तुमचे आणि काळाचे बोलावणे माझ्यासाठी सारखेच आहे.’’ सारांश इतक्या निकराच्या काळातही ते समोरच्यावर प्रेम करत होते. १९५० नंतर तर त्यांची समाजाभिमुखता झपाटय़ाने वाढत गेली. विनोबांचा क्रोधी स्वभाव सांगताना त्यांच्या स्वभावाची ही बाजूही ध्यानात घ्यायला हवी.
हा झाला व्यक्तिमत्त्वाचा भाग. त्यांच्यासाठी ‘प्रेम’ हे तत्त्वच होते. आपण अहिंसा म्हणतो तेव्हा हिंसेचा अभाव इतकाच अर्थ ध्वनित होतो. साहजिकच हिंसा नाही तर तिच्या जागी काय असा प्रश्न निर्माण होतो.
विनोबांनी गीताई चिंतनिका( विवरणासह ) या ग्रंथात या पेचाची नेमकी उकल केली आहे. अहिंसा म्हणजे ‘सत्य-प्रेम-करुणा!’ समोरच्यासाठी काही तरी करायला भाग पाडते ती करुणा. सत्य-प्रेम-करुणेचे हे परस्परावलंबन हा विशेष म्हणावा लागेल. अहिंसेचे हे स्पष्टीकरण अनोखे आहे.
थोडक्यात विनोबांच्या ‘विचारा’च्या मुळाशी ‘प्रेम’ होते आणि ‘प्रेमा’च्या मुळाशी ‘विचार’.