मराठी भाषेतील बोली नि त्यातील प्रांतिक शब्द मराठी भाषेच्या शब्दकोशाचे मूलधन आहे. आपल्या शब्दभांडारात जे विचारवाचक, वस्तुवाचक, शब्द होते, वा आहेत किंवा निर्माण करता येतील अशा अर्थाचे परकीय शब्द वापरता कामा नये आणि आपल्या ढिलाईमुळे असे शब्द आपल्या आत घुसले असतील तर त्यांना हुडकून काढून टाकले पाहिजे. परंतु ज्या परदेशी वस्तू आपल्याकडे नव्हत्या, त्याला आपल्याकडे स्वकीय जुने शब्द नाहीत किंवा ज्यांना त्यांच्या त्या परकीय शब्दांसारखे सुटसुटीत स्वकीय शब्द उपयोजणे दुर्घट होते, अशा परकीय शब्दांना आपल्या भाषेत जसेच्या तसे घेण्यात प्रत्यवाय नसावा. जसे, कोट, गुलाब, जिलबी, टेबल, बूट वगैरे. (पण बूट स्वीकारल्यावरही ‘शू’ म्हणणे अनेकांना पसंत नाही. ‘रेल-वे’ला सावरकरांनी शब्द सुचविलेला नाही. मात्र सिग्नलला ‘बावटा’ किंवा ‘बाहुट’ हा शब्द सुचविला आहे. तरीही अशा नव्या वस्तू आपल्याकडे येतात तेव्हा त्याला कोणी स्वकीय नावे देऊन रुळवून दाखवेल तर उत्तमच. त्याचप्रमाणे जगातील कोणत्याही परकीय भाषेतील एखादी शैली वा प्रयोग हा सरस किंवा चटकदार वाटला तर तो आत्मसात करण्यास आडकाठी नसावी. सावरकरांच्या भाषाशुद्धीतील मूलतत्त्वांचे हे सार आहे. जे आजच्या काळातही लागू आहे.
सावरकरांनी हेअर कटिंग सलूनला ‘केशकर्तनालय’, नेव्हीला ‘नौदल’, चित्रपटाच्या इंटरव्हलला ‘मध्यंतर’, पोस्टाला ‘टपाल’ हे सुचवलेले शब्द रुळले आहेत. इन्स्पेक्टरला ‘अन्वेषक’, वकिलाला ‘विधिज्ञ’, हेडमास्टरला ‘मुख्याध्यापक’, प्रिन्सिपॉलला ‘प्राचार्य’, खजिनदाराला ‘कोषाध्यक्ष’, मेयरला ‘महापौर’ हे शब्दही माहिती असतात. त्यांनी अॅम्ब्युलन्सला ‘रुग्णवाहन’, काबीजला ‘हस्तगत’, जिमखान्याला ‘क्रीडांगण’, ट्रस्टला ‘न्यास’, मोहिमेला ‘अभियान’, सहीला ‘स्वाक्षरी’, शाहिराला ‘भाट’ वा ‘कवी’ हे शब्द सुचवले आहेत. ते मराठी वाचकाला परिचित असतात. अजून वापरात आणता येतील असे सावरकरांनी सुचविलेले शब्द पाहूया. उपाहारगृहातील मेनूला ‘पदार्थ’, मेजवानीला‘पंगत’,‘भोजन’,‘जेवणावळ‘, मटनला ‘सागुती‘, रब्बी पिकांना ‘वैशाखी पिके’ मुदतला ‘अवधी’, इशाऱ्याला ‘चेतावणी’, अक्कलला ‘बुद्धी’, जरुरीला ‘आवश्यकता‘, तपशिलाला ‘विवरण’, तपासाला ‘शोध’, चित्रपटाच्या ट्रेलरला ‘परिचयपत्र’ हे शब्द, ‘व’ या उभयान्वयी अव्ययाऐवजी ‘नि’, ‘आणि’ हे शब्द वापरू शकतो हे आपल्याला विसरायला होते. ‘तारीख’ला दिनांक हा शब्द सावरकरांचाच! पण अजूनही ‘तारीख’ शब्द आपलं स्थान टिकवून आहे.
न्यायालयात ‘तारीख’ पडते!,‘दिनांक’ नाहीं! ‘कायदा’ला सर्वत्र ‘विधि’ वापरता येत नाहीं. जमीन/कागद यांना प्रत्येक ठिकाणीं ‘भूमी’,भूमि-पत्र‘ असे शब्द वापरणं योग्य ठरणार नाही. मूव्हीला ‘बोलपट’ शब्द समयोचित असताना त्यांनी सुचविलेला ‘मूकपट’ हा शब्द आता वापरू शकत नाही. काही शब्दांच्या बाबतीत तारतम्य बाळगून व्यवहार करावा लागेल. ‘याद राख’ऐवजी ‘ध्यानात घे’, ‘समजून अस’ हा पण त्यांनीच सुचविलेला शब्दप्रयोग. आपणही समजून असले पाहिजे आपल्या मराठीचे (कर्ज नव्हे) ‘ऋण’. तिचा जास्तीत जास्त वापर करून ते फेडायला हवे!
– डॉ. निधी पटवर्धन
nidheepatwardhan@gmail. com