प्रदीप आपटे
सेरामपुरच्या राहत्या घराभोवती पाच एकरांची बाग फुलवणाऱ्या मिशनरी विल्यम केरीने भारतीय लिपींचेही सिंचन केले..
‘इंग्लिश रेकॉर्डस ऑफ शिवाजी’ या नावाचा इंग्रजांच्या दफ्तरातील दस्तऐवजांचा त्रिखंडी संग्रह उपलब्ध आहे. त्यातल्या २५३ क्रमांकाच्या लेखपत्रात (९ जाने १६७०) पुढील मजकूर आहे. ‘भीमजी पारिखची आपल्याला विनंती आहे की आपण मुंबई येथे एक कुशल मुद्रक पाठवावा. त्याच्या छापखान्यात काही प्राचीन ब्राह्मणी हस्तलिखित ग्रंथांचे मुद्रण करावे अशी त्याची तीव्र इच्छा आहे. मुद्रकास मोबदला म्हणून तीन वर्षांसाठी प्रतिवर्षी ५० पौंड देण्याची तसेच या कामासाठी लागणारी अवजारे व इतर साधनसामग्री याला येणारा खर्च देण्याची भीमजी याची तयारी आहे. हा मोबदला पुरेसा वाटत नसत्यास मुद्रकाला जो मोबदला देणे आपणास योग्य वाटत असेल तसेच इतर बाबतही आपण आज्ञा कराल त्याप्रमाणे करायचे आश्वासन त्याने दिले आहे.’ या विनंतीचा मागोवा घेणारी लेखपत्रेही आहेत. त्यावरून लक्षात येते की मुद्रक म्हणून दोन-तीन कारागीर धाडूनही बनिया लिपीचे योग्य तसे साचे करणारा त्याचे अनुरूप खिळे ओतणारा ओतारी न मिळाल्याने भीमजीचा खटाटोप फळास आला नाही.
नंतरचा आणखी एक नोंदलेला प्रयत्न १२० वर्षांनंतरचा आहे. पुण्याच्या ‘रेसिडेन्सी’मध्ये चार्लस् मॅलेटच्या शिल्प-चित्रशाळेत एका तांबट विद्यार्थ्यांकडून मराठी अक्षरांचे खिळे तयार करून घेण्याचा घाट नाना फडणवीसांनी आरंभला. परंतु १७९६ साली दुसरा बाजीराव गादीवर आला. त्यात नानाचे पारडे फिरले. या घडामोडीने कारागीर पांगले. हा तांबट कारागीर मिरजेस पटवर्धनांच्या आश्रयी गेला. त्यांनी हा उद्योग पुढे सुरू ठेवला आणि १८०५ साली गीतेची छापील पोथी तयार करून घेतली. कालांतराने मुंबईत ही कला आणि व्यवसाय रुजला आणि नावारूपास आला; त्या अगोदरचे हे दोन देशी यत्न!
याच कालांतरात मुद्रणातले लक्षणीय प्रगतिशील उलाढाल घडत गेली ती कोलकाता आणि सेरामपूर (श्रीरामपूर) येथे! १७७४ साली विल्यम जोन्सच्या प्रेरणेने आणि वॉरन हेस्टिंग्जच्या संमतीमुळे नाथनिएल हालहेडने फारसी ग्रंथावरून हिंदू कायद्याचे भाषांतर प्रसिद्ध केले. त्यानेच इतर सरकारी इंग्रज बांधवांसाठी बंगाली भाषेचे व्याकरण लिहिले. गव्हर्नर जनरलच्या आग्रहाखातर ते बंगाली लिपीत छापले. हे बंगाली मुद्राक्षरांत छापलेले पहिले पुस्तक. चार्लस् विल्किन्स या गृहस्थाचा उत्साह आणि अफाट परिश्रम यामुळे हे शक्य झाले. विल्किन्स कंपनीच्या सेवेत १७७० साली दाखल झाला होता. निखळ जिज्ञासेपोटी तो संस्कृत शिकला. १७७९ साली त्याचे संस्कृत व्याकरण शिकविणारे पुस्तक छापले गेले. पण ते रोमन लिपी वापरून छापले होते! याच विल्किन्सने छपाईची कला स्वबळाने आत्मसात केली. धातूच्या ठोकळ्यात अक्षरे कोरणे, त्या मूळ साच्यातून मुद्रा बनविणे, मुद्रांमधून त्याच्या मातृका तयार करायच्या, त्या मातृकांतून धातू ओतून मुद्राक्षरे करायची, ती जुळवायची आणि छापायला वापरायची! हा सगळा खटाटोप त्याने एकटय़ाने केला. एवढेच नव्हे तर ही कला त्याने पंचानन कर्मकार या हिंदुस्तानी लोहाराला शिकविली आणि पंचाननाने ती इतर हिंदूस्तानींना शिकविली. आग लागून कारखाना भस्मसात होण्यापर्यंत सगळी संकटे सोसत त्याने हे कर्म पार पाडले. हेच पुढे त्याने देवनागरी लिपीसाठीदेखील साध्य केले! दरम्यान, त्याची संस्कृतची गोडी बळावतच होती. त्याने संस्कृतचे व्याकरण लिहून, स्वत:च घडविलेल्या देवनागरी मुद्रांसह छापले! त्याला १८३३ साली नाइटहूड (सर) उपाधी देऊन गौरविण्यात आले.
याच परंपरेतला परंतु ईस्ट इंडिया कंपनीच्या कुंपणाबाहेरचा कर्तबगार भाषाभिषग म्हणजे विल्यम केरी. विल्यम केरी हा चर्मकारपेशा असलेला आत्यंतिक ख्रिस्तनिष्ठ गरीब कनवाळू स्वभावाचा गृहस्थ होता. ख्रिस्तप्रचार ही त्याची खरी आस. हिंदूस्तानात तो एका तंबाखू कंपनीचा व्यवस्थापक म्हणून गुजराण करीत होता. ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रदेशात ख्रिस्त धर्मप्रसारावर बंदी होती, तरी तो आपल्या परीने प्रचाराचे गाडे रेटत राही. येशूचा संदेश स्थानिक भाषेच्या आपुलकीने अधिक प्रभावी पोहोचेल यावर त्याचा विश्वास होता. त्याचा मुलगा मरण पावला. पत्नी दुभंग मनाची रुग्ण होती. आर्थिक चणचण असायची. कंपनी डबघाईला आली. उभा केलेला छापखाना जळाला. अशा वैयक्तिक आयुष्यातील सगळ्या हालअपेष्टा दु:खे धीराने गिळत तो भाषा आत्मसात करू लागला. स्थानिक लिपीत मुद्रणाचा ध्यास धरून प्रयत्न करीत राहिला. अंगची बळे दोनच : एक येशू कृपावचनांवरील निष्ठा आणि दुसरी अपार जिज्ञासा! भाषा आत्मसात करणे हा त्याचा जणू सहज देहभाव झाला होता. एवढेच नव्हे तर आसपासच्या अवघ्या परिसराबद्दल त्याला अतोनात कुतूहल. प्राणी, पक्षी, वृक्ष वनस्पती, कीटक यांचे निरखून पारखून वर्णन त्याने लिहिलेले आढळते. प्रत्येक ‘औत्सुक्य विषया’बद्दल तो वेगवेगळ्या चोपडय़ांत नोंद ठेवत असे. रॉक्सबर्ग हा वनस्पतीतज्ज्ञ कोलकाता रॉयल गार्डनचा प्रमुख होता. तो केरीचा खास मित्र. नव्या अपरिचित वृक्षांच्या बिया गोळा करणे, त्याची रोपे बनविणे हा त्याचा जिव्हाळ्याचा छंद होता. रॉक्सबर्ग मरण पावल्याने केरी आणखी दु:खी झाला. पण रॉक्सबर्गचे फ्लोरा इंडिकाचे सचित्र तीन खंडी वर्णनग्रंथ त्यानेच संकलित करून प्रकाशात आणले. सेरामपूरमधल्या डॅनिश वसाहतीत धार्मिक मोकळीक होती. ईस्ट इंडिया कंपनीचा तिथे अंमल नसल्याने भागात ख्रिस्त प्रसाराला मज्जाव नव्हता. तिथले मिशन ख्रिस्त प्रसाराला वाहिले होते. पण त्याची आर्थिक स्थिती ओढगस्तीची असे.
१८०१ मध्ये कोलकात्याच्या फोर्ट विल्यम कॉलेजमध्ये त्याला संस्कृत आणि बंगाली भाषेचा प्राध्यापक म्हणून नेमणूक मिळाली. कालांतराने म्हराटी शिकविण्याचीही जबाबदारी त्याच्यावरच आली. यामुळे त्याची मासिक प्राप्ती चांगलीच वधारून महिना एक हजार रुपये झाली. ‘मुद्रण’कला आणि छपाईतंत्राबद्दलच्या कलेबाबत केरीच्या नेतृत्वाने फार निराळी आणि मोठी मजल मारली. देवनागरी लिपीत व्यंजनवर्ण आणि स्वरांची सांगड (ऊर्फ बाराखडी) आणि जोडाक्षरे यांमुळे मुद्रांची संख्या फार फुगते. सिरामपुरात अशा ७०० मुद्रा तयार केला गेल्या. बंगाली, तमिळ, कानडी लिपींची गरजदेखील अशीच फुगवटय़ाची असते. विल्किन्सच्या तालमीत तयार झालेला पंचानन नोकरी शोधत सेरामपुरात दाखल झाला होता. पंचाननच्या जोडीला त्याच्या जातीचा मनोहर नावाचा मदतनीस येऊन मिळाला. या जोडीने देवनागरी मुद्रा कोरल्या, ओतल्या. देवनागरी मुद्राछापांबद्दल आणखी एक तिढा होता. मराठी भाषेच्या संदर्भात देवनागरी लिपीबद्दल हा तिढा हाताळणे जरुरी होते. तो तिढा मोडी लिपीच्या सढळ सहज वापरामुळे आला. त्या काळात मराठी लिहिणारे वाचणारे बव्हंशी मोडी लिपीतच व्यवहार करत. ग्रंथलेखन वगळता बाळबोध लिपी फार प्रचलित नव्हती. मोडी रूपच प्रचारात होते. त्याबद्दल केरीने नोंदले आहे ‘मराठी भाषेतील पुस्तके सामान्यत: देवनागरी लिपीत लिहिली जातात. परंतु दैनंदिन व्यवहार-व्यापारात लोकांना अधिक परिचित लिपी मोडी हीच आहे. दोन्हीमधली मुळाक्षरांची व्यवस्था सारखीच आहे. मात्र बंगालात अद्यापि मोडी लिपीची मुद्राक्षरे तयार झाली नसल्याने या पुस्तकात (म्हणजे ‘मऱ्हाटा व्याकरण’ या पुस्तकात) देवनागरी लिपीचा अवलंब केला आहे.’ त्यांच्या हाताखालचे अनेक कारागीर लिपी कोरण्यात आणि टाइप फाऊंड्री चालवण्यात भलतेच वाकबगार बनले. पंचाननचा शिष्य मनोहर ४० वर्षे या कामात गुंतला होता. या चमूने अनेक पौर्वात्य भाषांचे सुबक मुद्राक्षरसंच बनविले. केरीने मुख्यत्वेकरून ‘नवा करार’ भारतीय भाषांत आणि लिपीत (त्यांच्या स्थानिक भेदांसह) आणण्याचा धडाका लावला होता. वानगीदाखल काही मोजक्या भाषा व लिपी बघू : बंगाली, उडिया, मागधी, असामी, मणिपुरी, देवनागरी, उदयपुरी, जयपुरी, बिकानेरी, भाटी, गढवाली, नेपाळी, गुजराती, पंजाबी, काश्मिरी, मुलतानी, पुश्तू, बलुची, तेलुगू, कानडी! एवढय़ावरच तो थांबला नाही- १८१३ साली चिनी लिपीचेदेखील सुटय़ा खिळ्यांच्या अक्षरांचे साचे बनविले. त्यापूर्वी सर्व मुद्रणसामग्री इंग्लंडहून आयात करावी लागे. स्थानिक कारागिरीनिशी साकारलेल्या या उद्योगाने खर्च तर भलतेच कमी झाले. इंग्लंडच्या तुलनेने एकतृतीयांश ते एकसप्तमांश एवढे ते कमी खर्चात बनू लागले. त्याचबरोबरीने कागदाची निर्मितीसुद्धा! त्याने कमी खर्चाची आणि भरवशाने पुरवठा करणारी गिरणी उभी केली. अगोदर कागदनिर्मितीसाठी हाताने चालवायच्या ट्रेडमिल होत्या. त्यातले धोके व कष्ट वाचविण्यासाठी बारा अश्वशक्तीचे वाफेचे इंजिन १८२०च्या मार्चमध्ये घडवून घेतले गेले. ते बघायला युरोपीयांसह स्थानिक लोकांच्या झुंडी लोटत, त्याचा ससेमिरा ही एक डोकेदुखीच झाली. त्यामुळे सेरामपूर हे पूर्ण स्थानिक कामगारांच्या बनावटीत बनणाऱ्या हातकागदाचे मोठे केंद्र बनले! १८५७च्या बंडात शिपायांनी वापरलेल्या पिस्तुलातील काडतुसेही या कारखान्यात बनली होती. कालांतराने या कारखान्याला डावलून लंडन येथून कार्यालयीन लेखनसामग्रीचा कागद आणण्याचा घाट घातला गेला. त्यामुळे स्थानिक उद्योग व रोजगार धोक्यात येत होता. या पक्षपाताविरोधात बरीच ओरड झाल्याने तो निर्णय रद्द झाला. ब्रिटिश स्थापित कारखान्यात ‘स्वदेशी हित’ मागणीचा नमुना उजाडला!
लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुप्रतिष्ठ प्राध्यापक असून ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि विचक्षण अभ्यासक आहेत.
pradeepapte1687@gmail.com