|| सुरेश चांदवणकर
लता मंगेशकर यांच्या आयुष्यातली साठहून अधिक वर्षे पाश्र्वगायनाच्या क्षेत्रात गेली. त्यांच्या गाण्याविषयी, आवाजाविषयी व एकूण कारकीर्दीविषयी भरभरून लिहिले गेले आहे. तेच ते असले तरीही यापुढंही पुन:पुन्हा लिहिले जाणार आहे. त्यांची बहुतेक सर्व गाणी ध्वनिमुद्रित झालेली आहेत. अशा ध्वनिमुद्रित संगीताच्या साठवणुकीविषयी मात्र खूप कमी लिहिले गेले आहे. अशा प्रयत्नांची नोंद घेणे आवश्यक आहे.
१९९० पर्यंत असा काही उपक्रम कोणीही हाती घेतला नव्हता. विविध भाषांतल्या हजारो गाण्यांचे आकडे तेवढे अगदी ‘गिनेस बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्ड’मध्ये कोणत्याही पुराव्याशिवाय प्रसिद्ध झाले होते. त्याची दुरुस्तीही झाली. नोंद मागे घेण्यात आली, तरीही तेच आकडे अद्यापही रेटून वापरात आहेत. ते टी. व्ही. वाहिन्या व वर्तमानपत्रांत अगदी कालपरवाही प्रकाशित झाले. विश्वास नेरुरकर यांनी सिद्ध केलेल्या ‘गंधार’ या गीतकोशामुळे वस्तुस्थिती समोर आली असूनही त्यात सुधारणा नाही. उलट, ‘छत्तीस भाषांतून पन्नास हजार गाणी’ असं अगदी शासनाच्या ‘सह्याद्री’सह अनेक वाहिन्यांवर सांगितले गेले. अजूनही नोंदींबाबतच्या बेफिकिरीची कुणालाच ना खंत, ना खेद..
काही वर्षांपूर्वी सोलापूर येथील संग्राहक जयंत राळेरासकर यांच्याकडे गेलो होतो. त्यांचा मुलगा निखिल माझ्याकडून रेकॉर्ड्सविषयी माहिती समजावून घेत होता. ‘काका, मला यात काय करता येईल’ असे विचारता समोरच असलेल्या ‘गंधार’ची प्रत मी त्याला दाखवली. या सूचीतली गाणी गोळा करता येतात का पाहा, असे मी त्याला सुचवले आणि मी विसरूनपण गेलो; पण तो विसरला नव्हता. शाळकरी मुलगा निखिल कॉलेजात जाऊ लागला तोवर त्याने कोशातली सुमारे नव्वद टक्के- म्हणजे पाच हजार गाणी गोळा केली होती. ती आज गानरसिकांना उपलब्ध आहेत. ही अशी काही कामे म्हणजे खरीखुरी प्रकाशाची बेटं आहेत.
आमचा आणखी एक रेकॉर्ड कलेक्टर मित्र सुमन (हे नाव पुरुषाचे आहे.) चौरसिया. लताजींच्या गाण्यांचा भक्त. मुंबईच्या चोरबाजारात भेटायचा. लताजींच्या नावानं इंदूरपासून चाळीस मैलांवर महूपाशी संग्रहालय उभारण्याचा संकल्प बोलून दाखवायचा. आम्ही हसण्यावारी न्यायचो. त्याने मात्र २००८ साली लता दीनानाथ मंगेशकर रेकॉर्ड संग्रहालय पिगडम्बर गावात दोनमजली इमारतीमध्ये उभारले. तिथे साडेसात हजारांहून अधिक ध्वनिमुद्रिका विसावा घेत गानरसिकांच्या प्रतीक्षेत आहेत. लताजींच्या गाण्यांवरचे ‘बाबा तेरी सोन चिरैय्या’ हे कोशासारखे पुस्तक संग्रहालयातर्फे प्रकाशित करण्यात आले आहे. असाच एक ध्येयासक्त संगीत शिक्षक कोलकाता येथे आहे. स्नेहाशीष चटर्जी असं त्याचं नाव. लताजींनी गायिलेल्या गाण्यांचे शब्दांसहित कोश प्रकाशित करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याच्या कामात गेली ३२ वर्षे त्याने स्वत:ला झोकून दिलेले आहे. मराठी व बंगाली गीतांचे कोश प्रसिद्ध झाले असून, इतर खंडांचे काम सुरू आहे. मागणी येईल तेवढय़ा प्रती ते बनवून घेतात. लताजींच्या स्वरांचे गारूड हे असे आहे. इंटरनेटचा काहीही मागमूस नसताना या अवलियांनी हे काम हाती घेतले. त्यातल्या यशापयशाची अजिबात पर्वा न करता ते अखंड चालूच आहे.
२०१० पासून ‘सोशल मीडिया’ व नेटवर्किंगमुळे या साठवणुकीला एक नवीन परिमाण लाभले आहे. ते काम चटदिशी सर्वदूर पोहोचणारे व तरुणाईला आकर्षित करून घेणारे आहे. लताजी गेल्या त्याच दिवशी ‘स्पोटिफाय’ या संगीताचे ऑनलाइन वाटप करणाऱ्या अमेरिकन कंपनीने त्यांच्या ९७ गाण्यांची प्ले-लिस्ट प्रकाशित केली. त्यात ‘महल’मधल्या ‘आयेगा आनेवाला’पासून ‘मोहब्बतें’मधल्या गाण्यांचा समावेश आहे. त्याला २४ तासांच्या आत पन्नास हजार श्रोत्यांनी भेट दिली. या कंपनीचे लाखो वर्गणीदार असून, दहा हजार कर्मचारी काम करतात.
त्या गेल्या त्या क्षणापासून व्हॉटसअॅप विद्यापीठात संदेश पाठवायला व यूटय़ूबवरची गाणी अपलोड करायला उधाणच आले आहे. वर पुन्हा भावपूर्ण आदरांजली. ते ओसरायला काही दिवस जावे लागतील. मग लक्षात येईल की, आपण पुढे पाठविलेला एक आवाज सोडला तर बाकी फारसा काही तपशील आपल्याला ठाऊकच नाही. बघायची इच्छा समजा चुकून झालीच, तर कुठे शोध घ्यायचा तेपण माहीत नाही. सवयीनं मोबाइलवरची बोटं शोध घेऊ लागली तर ‘माय स्वर’ व ‘डिस्कॉगस’ या संकेतस्थळांवर विसावतील. दोन्ही स्थळं गेल्या दहा-बारा वर्षांतली व सतत विकसित होत चाललेली. अगदी यूजर-फ्रेंडली. ‘माय स्वर’ देशी व केवळ हिंदूी चित्रपट संगीताला वाहून घेतलेलं, तर ‘डिस्कॉगस’ अमेरिकन जागतिक संगीताच्या ऑडियो माध्यमाविषयीची सर्व माहिती एका जागी उपलब्ध करून देणारं. आपण एखादी ध्वनिमुद्रिका, कॅसेट वा सी.डी. पाहतो तेव्हा त्याच्या कव्हरवर छापलेली सगळी माहिती म्हणजेच ‘डिस्कोग्राफी’ इथे नोंदलेली आहे. उदा. ‘शिवकल्याण राजा’ या अल्बमची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला तर CDNF 145014 हे सी.डी. कव्हर दिसू लागते. त्यावरची सगळी माहिती एका ठिकाणी वाचता येते. हवे तर डाऊनलोड करून ठेवता येते. देशोदेशीच्या २५ लाखांहून अधिक अल्बम्सची माहिती येथे साठवलेली आहे. थोडे मेहनतीचे काम आहे, पण अतिशय उपयोगाचे आहे. भारतातून फार थोडे असले तरी जगभरातून सुमारे सहा लाख जण या कामात हौस वा छंद म्हणून फावला वेळ सत्कारणी लावत आहेत. इथे लता मंगेशकर यांच्यावर आजपर्यंत ५०० रेकॉर्ड्स कॅसेट्स व सी.डीं.ची नोंद आहे. आणखी बरीच मंडळी यात सामील झाली तर ही संख्या वाढू शकते.
माहिती तर मिळाली, पण गाणी ऐकायची कुठे? असंख्य पर्याय आहेत. काही चिरंजीवी, तर काही अल्पजीवी; पण एका संकेतस्थळावरून दुसरे असे स्थलांतर अगदी सहज करता येते. त्यातलेच एक सॅन फ्रान्सिस्को येथून गेली पंचवीस वर्षे काम करीत आहे. archive. Org असे त्याचे नाव आहे. तिथे लता मंगेशकर या नावाचा शोध घेतला तर पुन्हा ५०० संकेतस्थळे उघडतात व गाणी आणि त्यांची माहिती एका जागी वाचता व ऐकता येते.
एडिसनच्या शोधामुळे आवाज मुद्रित करण्याची सोय झाली त्याला आता १४५ वर्षे पूर्ण होतील. लताजींचा मुद्रित आवाज साठवून ठेवण्याची इतकी सोय आता उपलब्ध आहे. नव्वदच्या आसपास एका टी.व्ही. मुलाखतीत ‘आमची गाणी पुढच्या पिढय़ा ऐकतील का?’ असा रास्त सवाल खुद्द लताजींनीच विचारला होता. त्याचे प्रामाणिक उत्तर ‘नाही’ असेच आहे हे त्यासुद्धा जाणून होत्या. १९०२ पासूनची ध्वनिमुद्रणे सांभाळण्याचा प्रयत्न करताना आम्ही संग्राहकांनी हे अनेक बुजुर्ग गायक-गायिकांच्या बाबतीत प्रत्यक्ष अनुभवले आहे. पण कुणाला इच्छा झालीच तर ती गाणी मात्र विविध ठिकाणी उपलब्ध असणार आहेत, हे नक्की.
chandvankar.suresh@gmail.com