आपल्याला बिल्किस एधी माहीत असतात त्या समझौता एक्स्प्रेसमधून चुकून पाकिस्तानात पोहोचलेल्या गीता या मूकबधिर मुलीवर मायेची पाखर धरणारी व्यक्ती म्हणून. प्रत्यक्षात त्यांचे काम त्याहूनही खूप व्यापक होते.
जतीन देसाई
‘अनाथांची आई’ म्हणून पाकिस्तानात ओळखल्या जाणाऱ्या बिल्किस एधी यांचं १५ एप्रिलला वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झालं. बिल्किस यांचा जन्म १४ ऑगस्ट १९४७ ला गुजरातच्या बाटवा इथं झाला होता. १९६६ मध्ये त्यांचा आणि अब्दुल सत्तार यांचा निकाह झाला. अब्दुल सत्तार यांचा जन्मही बाटवा इथलाच. फाळणीनंतर त्यांच्या कुटुंबाने पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना दोन मुलं आणि दोन मुली आहेत. एधी फाऊंडेशनच्या वतीने त्यांनी आणि त्यांचे पती अब्दुल सत्तार यांनी केलेल्या कामाचं जगभर कौतुक केलं जातं. अब्दुल सत्तार एधी यांचा २०१६ मध्ये मृत्यू झाला. भारताचा आणि एधी दांपत्याचा जवळचा संबंध राहिला आहे.
गीता नावाच्या मूकबधिर मुलीमुळे भारतात बिल्किस आणि त्यांच्या कामाबद्दल लोकांना अधिक माहिती झाली. काही वर्षांपूर्वी गीता ही भारतीय मुलगी लाहोरमध्ये समझौता एक्स्प्रेसमध्ये सापडली. तेव्हा ती साताठ वर्षांची होती. समझौता एक्स्प्रेसमध्ये प्रचंड सुरक्षा व्यवस्था असतानादेखील ती त्या ट्रेनमध्ये कशी गेली, हा प्रश्नच आहे. याच प्रकारे अहमदनगर जिल्ह्यातील भानुदास कराळे आणि मुंबईचा भावेश परमारही पाकिस्तानात पोहोचले होते. काही वर्षे तुरुंगात राहून ते दोन्ही भारतात परत आले. कराळे आणि परमारदेखील समझौता एक्स्प्रेसमध्ये कसे चढले आणि लाहोरला कसे पोहोचले, हे रहस्यच आहे. गीता लहान असल्यामुळे तिचा सांभाळ करण्यासाठी पाकिस्तान सरकारने तिला एधींकडे सोपवले. ही मुलगी हिंदु असल्याचं लक्षात आल्यावर बिल्किस यांनी तिचे नाव गीता ठेवलं आणि हिंदु देव-देवतांचे फोटो आणि मूर्ती तिला आणून दिल्या. आपल्या घरात ती हिंदु म्हणून राहील, याची काळजी त्यांनी घेतली. गीताची गोष्ट बऱ्याच प्रमाणात सलमान खान यांच्या ‘बजरंगी भाईजान’ नावाच्या चित्रपटाशी मिळती-जुळती आहे. सुषमा स्वराज परराष्ट्रमंत्री असताना २०१५ मध्ये त्यांनी गीता भारतात परत येईल, या दृष्टीने पावले उचलली. बिल्किस त्यांना भारतात घेऊन आल्या. भारत सरकारने बिल्किस आणि एधी फाऊंडेशनचं कौतुक केलं.
एधी फाऊंडेशनच्या कामात त्यांनी स्वत:ला गुंतवून घेतलं होतं. अब्दुल सत्तार यांच्या निधनानंतर त्याची मुख्य जबाबदारी बिल्किस आणि त्यांचा मुलगा फैसलवर आली होती. पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या भारतीय कैद्यांना (मच्छीमार व इतर) मदत करण्यास बिल्किस आणि फैसल सतत पुढे असायचे. पाकिस्तानकडून भारतीय कैद्यांना कराचीच्या लांडी जेलमधून सोडले जाते, तेव्हा एधी फाऊंडेशन त्यांना वाघा सरहद्दीपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करते. त्यांना प्रवासासाठी आवश्यक वस्तू आणि पैसेही दिले जातात. पाकिस्तानी तुरुंगात असलेल्या भारतीय मच्छीमारांना तुरुंगातून सोडले जाते तेव्हाही एधी फाऊंडेशन अशाच प्रकारची मदत करते. एवढेच नाही तर एखाद्या भारतीय व्यक्तीचा पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्यू झाला तर त्याचा मृतदेह भारतात पोहोचवण्यासाठीदेखील एधी फाऊंडेशन पुढे असते. अब्दुल सत्तार आणि बिल्किस यांनी त्यांच्या विश्वस्त संस्थेला मानवतेची जोड दिली आहे. त्या अत्यंत संवेदनशील होत्या आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांनाही इतरांशी संवेदनशीलतेने आणि सहानुभूतीपूर्वक वागायचे धडे देत होत्या. आरोग्याच्या क्षेत्रात फाऊंडेशनचं मोठं काम आहे. कराची शहरातच त्यांच्या ३०० हून अधिक रुग्णवाहिका आहेत. संपूर्ण पाकिस्तानात त्यांची बरीच रुग्णालयं आहेत आणि देशभरातील रुग्णवाहिकांची संख्या तर काही हजारात जाईल.
तेहमिना दुरानी यांनी अब्दुल सत्तार यांचं चरित्र इंग्रजीत लिहिलं आहे. त्याचा गुजरातीत अनुवाद कराची येथून प्रकाशित करण्यात आला. तेव्हा अब्दुल सत्तार आणि बिल्किस एधी यांना भेटण्याची मला संधी मिळाली होती. पाकिस्तानात कुठेही नैसर्गिक किंवा इतर दुर्घटना घडली की सगळय़ात आधी एधीचे कार्यकर्ते पोहोचतात, असा अनुभव आहे. लोकांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास आहे. त्यांना एरवीही लोकांकडून देणग्या मिळतातच, पण रमजानच्या काळात तर त्या देणग्यांचं प्रमाण सर्वाधिक असतं. भारतातील तसंच पाकिस्तानातील तुरुंगात अटकेत असलेल्या अनुक्रमे पाकिस्तानी आणि भारतीय मच्छीमारांच्या सुटकेसाठी एधी फाऊंडेशन आणि आम्ही एकत्र प्रयत्न करतो. गरज पडली तर पाकिस्तानच्या शेजारील देशातही एधीचे कार्यकर्ते मदतीसाठी धावून जातात.
बिल्किस एधी यांनी ४० हजारांपेक्षाही जास्त ‘नको असलेल्या’ मुलांना वाचवलं आहे. त्यांच्या घराच्या आणि कार्यालयाच्या बाहेर पाळणे ठेवण्यात आले आहेत. जन्माला आलेली पण काही कारणामुळे ‘नको असलेली’ मुलं लोक त्या पाळण्यात ठेवून जातात. त्या मुलांची काळजी घेण्याचे काम बिल्किस आणि एधी फाऊंडेशन करतं. बऱ्याच वेळा बिल्किस यांची तुलना मदर तेरेसांबरोबर केली जाते.
या वर्षांच्या सुरुवातीस ‘इम्पॅक्ट हॉलमार्क्स’ नावाच्या आंतरराष्ट्रीय संघटनेने बिल्किस आणि अन्य दोघांचा ‘दशकातली सर्वात प्रभावी माणसं’ असा सन्मान केला. १९८६ मध्ये त्यांना रॅमन मॅगसेसे नावाचा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला होता. रशियाने त्यांना लेनिन शांतता पुरस्कार दिला होता. पाकिस्तानने त्यांना हिलाल-ए-इम्तियाज नावाचा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला होता. बिल्किस यांच्या मृत्यूने पाकिस्तानातील सामाजिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. तेथील राजकीय नेत्यांपासून ते फिल्मी कलाकार तसेच सामान्य माणसापर्यंत सगळ्यांनीच त्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. शाहबाज शरीफ पंतप्रधान झाल्यानंतरच्या त्यांच्या कराचीच्या पहिल्या भेटीत त्यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध लेखिका तेहमिना दुरानी यांनी बिल्किस यांची भेट घेतली आणि ट्विटरवर त्या क्षणाचा फोटो पोस्ट केला होता.
बिल्किस यांच्या जाण्यामुळे पाकिस्तानात, खऱ्या अर्थाने, हजारो लोक अनाथ झाले. त्यांच्या घराचा दरवाजा लोकांसाठी कायम उघडा असायचा. आधी अब्दुल सत्तार आणि आता बिल्किस यांच्या निधनामुळे भारताने चांगले मित्र गमावले आहेत. पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटून आलेले भारतीय मच्छीमार त्यांच्याबद्दल बोलताना नेहमीच त्यांचा प्रेमपूर्वक उल्लेख करतात. आता त्यांचा मुलगा फैसल त्यांचं काम तेवढय़ाच प्रामाणिकपणे आणि चिकाटीने पुढे नेत आहे.
jatindesai123@gmail.com