मिलिंद मुरुगकर
‘स्वतंत्र’ भारताचा राष्ट्रवाद हा धर्मभेदमूलक भयस्मृतींपासून मुक्त असू शकतो, हे ओळखायला हवे..

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांनी असे जाहीर केले की यापुढे १४ ऑगस्ट हा दिवस फाळणीचा भयस्मृतीदिन म्हणून ओळखला जाईल. त्यांनी असेही म्हटले की हा दिवस सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा दिवस असेल. पंतप्रधान म्हणतात तसे सामाजिक ऐक्य हा या दिवसाचा हेतू असेल तर ही स्वागतार्ह गोष्ट ठरेल. पण दुर्दैवाने गेल्या सात वर्षांचा इतिहास आपल्याला काही वेगळेच सांगतो. म्हणूनच पंतप्रधानांची ही घोषणा सामाजिक ऐक्याबद्दल चिंता वाढवणारी गोष्ट ठरते.

२०१४ साली नरेंद्र मोदी हे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील हे निश्चित झाल्यावर त्यांनी गुजरातमध्ये सद्भावना यात्रा सुरू केली. गुजरात दंगलीच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाबद्दलची त्यांची सद्भावना त्यांनी अशी व्यक्त करणे ही अनेकांना खूप आश्वासक, स्वागतार्ह गोष्ट वाटली. अनेकांना असे वाटले की, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर खऱ्या अर्थाने समाजातील सर्व धर्माच्या लोकांचे पंतप्रधान म्हणून वर्तन करतील. काहींना तर असेही वाटले की दुसऱ्यांवर स्युडो सेक्युलॅरिझमचा आरोप करणाऱ्या पक्षाचा हा नेता ‘खरा सेक्युलॅरिझम’ म्हणजे काय हे आपल्या वर्तनातून दाखवेल.

पण पंतप्रधानपदी आल्यानंतर गेल्या सात वर्षांत पंतप्रधान, त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी, त्यांच्या पक्षाचे नेते यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या ‘सबका साथ’च्या आपल्या घोषणेला तडा देणारेच वर्तन अनेकदा केले. अशा अनेक घटना आहेत की ज्यात सभ्यपणाच्या आणि किमान माणुसकीच्या मर्यादादेखील नेत्यांनी विधानांद्वारे आणि सोयीस्कर मौनाद्वारे ओलांडल्या. हे सर्व अगदी उघडपणे केले गेले. यामुळे हा फाळणीचा भयस्मृती दिन खरोखर सामाजिक ऐक्य साधण्यासाठी वापरण्यात येणार आहे की भारतातील अल्पसंख्य समाजाबद्दल आणखी अविश्वास आणि तिरस्कार वाढवण्यासाठी आहे अशी दाट शंका निर्माण होते.

१५ ऑगस्ट  १९४७ रोजी  फाळणीची भळभळती जखम हृदयी बाळगून देखील या देशाने स्वातंत्र्यदिन मोठय़ा आशेने साजरा केला. आपली धार्मिक ओळख आणि भारतीय म्हणून असलेली ओळख या पूर्णत: भिन्न आहेत असे मानणारा हा राष्ट्रवाद होता. या राष्ट्रवादानुसार ख्रिश्चन आणि इस्लाम हे धर्मदेखील ‘बाहेरचे नाहीत’, कारण भारत या राष्ट्राची निर्मिती ब्रिटिशांबरोबर झालेल्या संघर्षांमधून निर्माण झाली. ब्रिटिश येण्यापूर्वी भारत हे राष्ट्र-राज्य (नेशन स्टेट) नव्हते. निश्चित भौगोलिक सीमा आणि त्याचे संरक्षण करणारे, एका केंद्रीय राज्यसत्तेला मानणारे सैन्य असल्याखेरीज ‘राष्ट्र’ या शब्दाला अर्थ नसतो हे हा राष्ट्रवाद जाणत होता. भारत नावाचे राष्ट्र उदयाला येण्याआधी इथे येऊन वसलेले लोक, धर्म आणि संस्कृती यादेखील आपल्याच असे या राष्ट्रवादाने मानले. भारताच्या या कल्पनेत हिंदू-मुस्लिम नात्यांबद्दल भाबडेपणा नव्हता. हे नाते अतिशय गुंतागुंतीचे आहे आणि यात टोकाचे संघर्ष जसे आहेत तसा सुंदर सांस्कृतिक मिलाफदेखील आहे, हे हा राष्ट्रवाद जाणत होता. पण इतिहासाचे ओझे न बाळगता यातील सांस्कृतिक मिलाफांवर भर देत घटनेतील व्यक्तिस्वातंत्र्याच्या मूल्याच्या आधारे आधुनिक भारत निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले गेले. आधुनिक देश म्हणजे केवळ आधुनिक विज्ञान तंत्रज्ञान वापरणारा देश नव्हे. आधुनिक देश म्हणजे व्यक्ती कोणत्या धर्मात, जातीत जन्माला आली आहे याचा विचार न करता प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी अंगभूत अशी समान प्रतिष्ठा असते असे मूल्य समाजात रुजलेला देश. फाळणीच्या जखमेच्या पार्श्वभूमीवर असे स्वप्न पाहणे हे मोठे धाडसाचेच काम होते. पण तरीही या वेदनादायी इतिहासाचे ओझे झिडकारून देऊन नवीन स्वप्न पाहण्याचे धाडस गांधी-नेहरू-पटेल आदींच्या नेतृत्वाने केले. गेल्या ७०-७५ वर्षांत या स्वप्नाला अनेकदा धक्के बसले. पण ते स्वप्न शाबूत राहिले. याचे एक कारण म्हणजे सर्व धर्माच्या लोकांनी स्वातंत्र्यलढय़ात खांद्याला खांदा लावून दिलेले योगदान.

पण अलीकडच्या काळात या स्वप्नाला जबर तडे गेले आहेत. स्वातंत्र्य चळवळीतून निर्माण झालेल्या राष्ट्रवादाचा आणि त्या भारताच्या कल्पनेचा आता राजकीय पराभव होण्याचा मार्गावर आहे. २०१४ साली मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून ती प्रक्रिया जोमदार झाली आहे. राष्ट्रवादाचे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भारताच्या कल्पनेचे नवे स्वरूप आज भारतीय मनावर आपला प्रभाव गाजवू लागले आहे.

प्रश्न असा आहे की या कल्पनेतील नवा भारत हा ‘स्वतंत्र’ असू शकतो का? म्हणजे मानसिक दृष्टय़ा हा भारत कधीतरी मुक्त, स्वतंत्र होऊ शकतो का? असा प्रश्न उपस्थित करण्याचे कारण असे की, संघ-भाजपचा हा जो सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे तो भारतीय राष्ट्रवादाची निर्मिती ब्रिटिशांशी संघर्षांमधून झाली  हे नाकारतो. एक सार्वभौम राज्यसत्ता, त्या सत्तेशी निष्ठा असणारे आणि निश्चित अशा भौगोलिक सीमांचे संरक्षक सैन्य असा भारत देश निर्माण होण्यापूर्वीच्या शेकडो वर्षे आधीच्या भारतीय इतिहासात तो भारतीय राष्ट्रवादाची मुळे शोधतो. त्यामुळे या राष्ट्रवादानुसार ख्रिश्चन, मुस्लिम हे धर्म ‘बाहेरून’ आलेले धर्म ठरतात. त्याबरोबर येणाऱ्या संस्कृती, जीवनपद्धती यादेखील ‘बाहेरून’ आलेल्या ठरतात.

मध्ययुगीन इतिहासात घडलेले संघर्ष हे या (सांस्कृतिक) राष्ट्रवादाच्या केंद्रस्थानी असतात. जिथे अगदी अलीकडच्या इतिहासाबद्दल देखील नेमके काय घडले याबद्दल वाद असतात, तिथे मध्ययुगीन इतिहासात नेमके काय घडले हे निर्विवादपणे सांगता येणे अतिशय अवघड. आणि तो इतिहासदेखील किती गुंतागुंतीचा. मग या इतिहासात नेमके काय घडले हे राजकीय विचारसरणीने ठरवण्याचा प्रयत्न होतो. मार्क्‍सवादी इतिहास संशोधक प्रत्येक गोष्ट वर्गीय चष्म्यातून बघतात,  तसे संघ-भाजपच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या विचारसरणीने प्रभावित लोक प्रत्येक मुस्लिम राजा हा कसा निर्दय आणि क्रूर होता असेच सांगतात. आजची मूल्यव्यवस्था मनात बाळगून मध्ययुगीन इतिहासातील घटनांकडे पाहणे खरे तर चुकीचे आहे. पण तसे केले जातेय आणि तेदेखील अतिशय चलाखीने. फक्त मुस्लिम राजांचेच सोयीस्कर चित्र रंगवणे हा देखील त्याचाच भाग.

एकदा इस्लाम आणि इस्लामी संस्कृती ही ‘बाहेरची’ आहे असे मानले की, त्या संस्कृतीची प्रत्येक खूण ही परकीयांनी हिंदूंवर मिळवलेल्या विजयाची खूण ठरते. लाल किल्लय़ाची, फतेहपूर सिक्रीच्या बुलंद दरवाज्याची भव्यता, ताजमहालाचे सौंदर्य, गझल आणि उर्दूमधील नजाकत आणि बिर्याणीची  लज्जतदार चव  नाकारता तर येत नाही, पण मोकळेपणाने या सर्व आपल्याच  संस्कृतीतील आहेत असेही म्हणता येत नाही. अशी अडचण गांधी- नेहरू- सरदार पटेल यांच्या राष्ट्रवादात नव्हती. या सर्व गोष्टी आपल्याच आहेत असे हा राष्ट्रवाद  मानू शकत असे. त्यामुळे अलीगढचे  नवा बदलून हरीगढ  करण्याची मानसिक गरज या भारताला कधी वाटली नाही. तो भारत मुक्त होता. कारण तो कोणत्याच धर्माला आणि संस्कृतीला ‘बाहेरून’ आलेली मानत नव्हता.

पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- भाजपाचा राष्ट्रवाद तत्त्वत:च असा मुक्त असू शकत नाही. मुसलमान या देशात शेकडो वर्षांपासून राहात आले आहेत आणि यापुढेही राहणार आहेत. आणि शेकडो वर्षांपासूनच्या इस्लामिक संस्कृतीच्या खुणा भारतीय जीवनाच्या सर्व क्षेत्रात राहणार आहेत हे सत्य संघ भाजपच्या राष्ट्रवादाला सदैव बोचत राहणारे आहे. यातून सुटका नाही. भाजपला पुढील ५० वर्षे कितीही सर्वंकष सत्ता आणि नरेंद्र मोदींसारखेच नेतृत्व लाभले तरी हा राष्ट्रवाद मध्ययुगीन इतिहासात अडकलेलाच राहाणार आणि पराभवाचे शल्य उरी बाळगणाराच राहणार. या राष्ट्रवादाच्या प्रभावाखालील भारत हा इतिहासाच्या बंधनातून मुक्त नाही होऊ शकत.

कोणताही राष्ट्रवाद हा शत्रूकेंद्रित राहण्याचा धोका असतो. आणि त्यातून प्रचंड मोठी हिंसा जन्म घेते. पण राष्ट्रवादातील विधायक शक्यता अशी की तो सामाजिक ऐक्य आणि बंधुभाव निर्माण होण्यासाठीही उपयोगी पडू शकतो. पण संघ भाजपच्या  सांस्कृतिक राष्ट्रवादात ही क्षमताच नाही. हा राष्ट्रवाद देशातील २० कोटी  मुस्लिम लोकांना इतर हिंदुइतकी प्रतिष्ठा तत्त्वत:च देऊ शकत नाही. या मोठय़ा जनसमूहाबद्दलच्या त्यांच्या भावना संशय ते तिरस्कार या मर्यादांमध्येच अडकून राहणार. आपल्याच देशातील लोकांबद्दलची अशी भावना, त्यांच्यावर प्रभुत्व गाजवण्याची भावना ही संघ-भाजपच्या राष्ट्रवादाची अपरिहार्यता आहे.

आज राजकीय विजय मिळवलेल्या या नव्या भारताची कल्पना ही संकुचित आणि मध्ययुगीन इतिहासात अडकलेली आहे. संघ- भाजपच्या कल्पनेतील हा भारत स्वत:शी शांत असू शकत नाही. ती  या भारताची अपरिहार्यता आहे. हा भारत खऱ्या अर्थाने कधीच स्वतंत्र होऊ नाही शकत.  १४ ऑगस्टच्या भयस्मृतीदिनाची घोषणा करून नरेंद्र मोदींनी या भारताला इतिहासाच्या बंधनात   अधिकच  जखडले आहे.

लेखक सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक आहेत.   milind.murugkar@gmail.com

Story img Loader