|| अमृतांशु नेरुरकर
जीपीएस तंत्रज्ञानाच्या आधारे अक्षांश-रेखांशासकट मिळवलेला ‘मेटाडेटा’ संबंधित व्यक्तीच्या आवडीनिवडी, राजकीय मते, धार्मिक श्रद्धा या अत्यंत खासगी गोष्टी जाणून घेण्यासाठी कसा काय उपयुक्त ठरतो?
२० एप्रिल २०११ रोजी ‘द न्यू यॉर्क टाइम्स’, ‘द वॉशिंग्टन पोस्ट’, ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’सारख्या आघाडीच्या दैनिकांमध्ये एक बातमी प्रसिद्ध झाली, जिने जगभरातील स्मार्टफोन वापरकर्त्यांची झोप उडवली. अलास्डेअर अॅलन आणि पीट वॉर्डन या दोन ब्रिटिश संशोधकांना अकस्मात लागलेल्या शोधाचा हवाला देत दिलेल्या त्या बातमीचा मथळा होता : ‘सावधान! अॅपल तुमच्या दैनंदिन व्यवहारांवर नजर ठेवून आहे!’ त्यानंतर पुढील अनेक आठवडे अॅपलची विदा-व्यवस्थापन पद्धती व त्यामुळे वापरकर्त्यांच्या खासगीपणाच्या हक्कावर होणारा अधिक्षेप यावर माध्यमातून उलटसुलट चर्चा होत राहिली.
अॅलन त्या वेळेस इंग्लंडमधल्या एक्सेटर विद्यापीठात संगणकीय नकाशे बनविण्याच्या प्रणालींवर संशोधन करत होता, तर वॉर्डन हा ‘ओ’रायली’ प्रकाशन संस्थेचा संगणक-तंत्रज्ञान विषयांवर लिहिणारा एक प्रमुख लेखक होता. त्याचबरोबर तो ‘ओपनहीटमॅप’ या भौगोलिक विदेचे चित्रात्मक विश्लेषण करणाऱ्या ओपन सोर्स प्रणालीची निर्मिती करण्यातही गुंतला होता.
‘हीटमॅप’ हा दृश्यात्मक आलेखाचा एक प्रकार आहे, ज्यात एखाद्या विशिष्ट विषयाचे किंवा प्रश्नाचे विश्लेषण हे सर्वसाधारण तक्त्यांचा वापर करून करण्याऐवजी रंगांच्या कमीअधिक तीव्रतेच्या छटांचा वापर करून करतात. उदाहरणार्थ, भारतातील करोना संसर्गाची तीव्रता जाणून घेण्यासाठी जिल्हानिहाय आकडेवारी एका तक्त्यात भरून देण्यापेक्षा हीटमॅप वापरून देता येईल. यामध्ये मुंबई-पुण्यासारख्या जिल्ह्य़ांमधला अतितीव्र संसर्ग दाखवण्यासाठी गडद लाल रंगाचा वापर करता येईल, जयपूरसारख्या मध्यम संसर्ग असलेल्या भागांसाठी पिवळ्या रंगाच्या छटांचा वापर करता येईल, तर अरुणाचल प्रदेशासारख्या नगण्य संसर्ग असलेल्या जागा हिरव्या रंगाने रंगवता येतील. थोडक्यात, एखाद्या विषयाचे विश्लेषण उपलब्ध विदेच्या साहाय्याने कमी वेळात, पण प्रभावीपणे हीटमॅपच्या आधाराने करता येते.
संगणकीय नकाशे व त्यात उपलब्ध असलेल्या विदेचे विश्लेषण हा अॅलन आणि वॉर्डन या दोघांचाही अभ्यासाचा विषय असल्यामुळे या विषयासंबंधातील विविध व्यासपीठांवर होणाऱ्या चर्चामध्ये या दोघांची ओळख झाली. अॅपल आय-फोनमधल्या ‘अॅपल मॅप’ या जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम) तंत्रज्ञानाधारित दिशादर्शक उपयोजनाचा (अॅप) अभ्यास करताना त्यांना अॅपल फोनमध्ये ‘कन्सॉलिडेटेड.डीबी’ नावाची एक फाइल सापडली. त्या फाइलचा सखोल अभ्यास केल्यानंतर त्यांना संशयास्पद अशा दोन गोष्टी आढळल्या, ज्या वापरकर्त्यांच्या गोपनीय विदेच्या सुरक्षेप्रति अॅपलला असलेल्या गांभीर्याबाबत शंका उत्पन्न करायला पुरेशा होत्या.
पहिली गोष्ट म्हणजे, त्या फाइलमध्ये वापरकर्त्यांची स्थळ-काळविषयक असलेली विस्तृत माहिती! गेले जवळपास एक वर्ष वापरकर्ता कोणत्या दिवशी कोणत्या ठिकाणी गेला, तिथे साधारण केवढा वेळ त्याने व्यतीत केला, याची अक्षांश-रेखांशासकट अत्यंत अचूक अशा विदेची नोंद त्या फाइलमध्ये होत होती. वर्षभरातील माझ्या दिनक्रमाचा एक हीटमॅप त्या फाइलमध्ये (माझ्या नकळत) तयार होत होता. अॅपल आपल्या दैनंदिन व्यवहारांवर पाळत तर ठेवत नसेल ना, अशी रास्त शंका अॅलन आणि वॉर्डन यांना आली.
दुसरी आणि त्याहूनही गंभीर गोष्ट म्हणजे, ती फाइल ‘अन-एन्क्रिप्टेड’ स्वरूपातच फोनवर साठवली जात होती. म्हणजेच त्या फाइलमधली विदा सांकेतिक लिपीत कूटबद्ध स्वरूपात साठवली जात नव्हती, ज्यामुळे त्या माहितीचे आकलन करणे हे कोणालाही सहज शक्य होते. थोडक्यात, एवढय़ा खासगी विदेची सुरक्षितता वाऱ्यावर सोडण्यात आलेली होती.
अॅलन आणि वॉर्डन यांनी आपल्या शोधाची जाहीर वाच्यता केल्यानंतर सुरुवातीचा काही काळ अॅपलने गोपनीयतेच्या या उघड उल्लंघनावर कोणतेही भाष्य करणे टाळले. कालौघात हा विषय विस्मृतीत जाईल अशी अॅपलची अटकळ असावी, पण ब्रिटिश आणि अमेरिकी माध्यमांनी हा विषय धसास लावणे सोडले नाही. हळूहळू जनमत आपल्या विरोधात जाईल अशी शक्यता जाणवू लागल्यानंतर मात्र अॅपलला काही गोष्टींचा खुलासा करणे भाग पडले.
प्रथमत: अॅपलने फाइल ‘एन्क्रिप्ट’ न करण्याची ‘अनवधानाने’ झालेली आपली घोडचूक मान्य केली. त्यापुढे जाऊन अॅपलला हे स्पष्ट करावे लागले की, ‘वापरकर्त्यांच्या गोपनीयता हक्काचे संरक्षण करण्यास त्यांचे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि म्हणूनच अशी फाइल तयार करून त्यात एवढी अचूक स्थळ-काळाची नोंद इतक्या विस्तृतपणे ठेवण्यामागे अॅपलचा तिच्या फोनच्या वापरकर्त्यांवर पाळत ठेवण्याचा कोणताही इरादा नाही. जीपीएस तंत्रज्ञानाबरोबर मोबाइल फोनचा ताळमेळ बसवण्यास कधी कधी बराच वेळ जातो व त्यामुळे फोनचे कार्य अत्यंत धिम्या गतीने होऊ लागते. अशी वेळ येऊ नये व जीपीएसकडून माहिती मिळण्यास विलंब झाला तरीही आय-फोनच्या वापरकर्त्यांना ‘अॅपल मॅप’ उपयोजनाद्वारे ठरावीक पत्ता शोधून काढण्याची सेवा विनाव्यत्यय मिळत राहावी म्हणून या माहितीचा वापर अॅपल करीत असे.’
अॅपलच्या खुलाशानंतर या वादावर जरी पडदा पडला असला, तरीही मागील लेखात चर्चिल्याप्रमाणे जीपीएस तंत्रज्ञानाच्या आधारे अक्षांश-रेखांशासकट मिळवलेला हा ‘मेटाडेटा’ आपली जीवनशैली समजून घेण्यास कशी मदत करू शकतो, याचे विश्लेषण करणे जरुरी आहे. मी कोणत्याही क्षणी जिथे आहे त्या ठिकाणच्या पत्त्यासंदर्भातली ही अचूक माहिती- माझ्या आवडीनिवडी, राजकीय मते, धार्मिक श्रद्धा या अत्यंत खासगी गोष्टी जाणून घ्यायला कशी काय उपयुक्त ठरते?
केवळ एखाद्या विशिष्ट वेळी मी कुठे होतो एवढय़ाच माहितीने माझी जीवनशैली समजणे अशक्य आहे. पण जर हीच माहिती अविरतपणे एका दीर्घ कालावधीत गोळा केली गेली तर मात्र संपूर्ण चित्र पालटेल. वर्षभरासाठी खालील ठिकाणांचे पत्ते जर अचूकपणे संकलित केले तर माझ्याबद्दल काय माहिती मिळू शकेल याचा थोडा विचार करू या :
(१) माझ्या घराचे स्थान : मी कुठे राहतो त्यावरून माझ्या आसपासच्या परिसराची माहिती मिळेलच, पण त्याचबरोबर घर किती मोठे आहे, ते माझ्या मालकीचे आहे की मी भाडय़ावर राहतो, जर ते माझ्या मालकीचे असेल तर ते मी कर्जावर घेतले आहे का, अशा सर्व गोष्टींवरून माझा सामाजिक तसेच आर्थिक स्तर समजणे सहज शक्य आहे.
(२) माझ्या कार्यालयाचे स्थान : माझ्या कार्यालयाचा पत्ता माझा पोटापाण्याचा व्यवसाय काय याची माहिती देईल. मी कार्यालयात कसा पोहोचतो, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (लोकल, बस, मेट्रो आदी) की खासगी वाहन वापरतो, प्रवासात माझा किती वेळ वाया जातो, अशी सर्व माहिती बांधकाम व्यावसायिक, दोन किंवा चारचाकी विक्रेते अशांना फार उपयोगाची आहे.
(३) माझ्या विरंगुळ्याच्या जागा : मी दिवाळी, नाताळ अशा सुट्टय़ांमध्ये बाहेर पडतो का, कोणत्या ठिकाणांना भेट देतो, यावरून- मला फिरायची आवड आहे का, कोणत्या प्रकारचे पर्यटन (समुद्रकिनारे, गिरिस्थान, जंगलभ्रमंती) मला अधिक आवडते, अशी माहिती समजू शकते. तसेच अशा वेळी मी कुठे राहतो, काय बघतो आणि कुठे खातो, यावरून- मी विलासी पर्यटक आहे की काटकसरी, याचाही बोध होऊ शकेल.
(४) मी भेट देत असलेली इतर ठिकाणे : मी कोणत्या धर्मस्थळांना भेट देतो, किती वेळेला देतो यावरून माझ्या धार्मिक निष्ठा समजू शकतात, तर कोणत्या डॉक्टरकडे किंवा कोणत्या रुग्णालयाला भेट दिली, किती वेळेला दिली अशी माहिती औषधनिर्माण तसेच विमा कंपन्यांना खूप मोलाची वाटू शकेल.
ही यादी आणखी पुष्कळ वाढवता येईल, पण स्थळ-काळासंदर्भातला ‘मेटाडेटा’ आपल्याबद्दल किती मौल्यवान माहिती पुरवू शकतो याची कल्पना येण्यास वरील उदाहरणे पुरेशी आहेत.
स्वाध्याय म्हणून फावल्या वेळेत एक गोष्ट नक्की करून बघा. आपल्या सर्वाच्या मोबाइलवर विविध प्रकारची उपयोजने (अॅप्स) कार्यरत असतात. त्यांतील कोणतेही एक उपयोजन निवडा आणि त्याची गोपनीयतेची धोरणे (प्रायव्हसी पॉलिसी) काय आहेत, ती एकदा नजरेखालून घाला. कोणकोणत्या प्रकारची खासगी विदा ते उपयोजन संकलित करते? या विदेचे आणि एकंदरीतच आपल्या गोपनीयता हक्काचे संरक्षण करण्यास ती धोरणे सक्षम आहेत असे तुम्हाला वाटते का? जर तुमचे उत्तर ‘नाही’ असे असेल तर त्या धोरणांत काय बदल करायला हवेत असे तुम्हाला वाटते? तुमची निरीक्षणे वाचायला नक्कीच आवडतील!
लेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील ओपन सोर्स, विदासुरक्षा व गोपनीयता तसेच डिजिटल परिवर्तन या विषयांचे अभ्यासक आहेत.
amrutaunshu@gmail.com