|| जतीन देसाई

‘लेडी अल काइदा’ म्हणून कुख्यात असलेली दहशतवादी व अमेरिकी कैदी आफिया सिद्दिकी हिच्या सुटकेसाठी अन्य दहशतवादी प्रयत्न करतातच, पण सारेच पाकिस्तानी राजकीय पक्ष, तेथील प्रसारमाध्यमे आणि अनेक सामान्यजन हेसुद्धा तिला पाठिंबा कसा काय देतात?

‘लेडी अल काइदा’ म्हणून ओळखली जाणारी पाकिस्तानी शास्त्रज्ञ डॉ. आफिया सिद्दिकी हिला अमेरिकेच्या तुरुंगातून सोडविण्यासाठी मलिक फैसल अक्रम (४४) नावाच्या मूळ पाकिस्तानी असलेल्या ब्रिटिश नागरिकाने अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील कोलीव्हिले गावात, ज्यूंच्या धार्मिक स्थळामध्ये (सिनेगॉगमध्ये) घुसून चार जणांना १५ जानेवारीच्या सकाळी ओलीस ठेवले. अमेरिकेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सायंकाळी त्याला ठार मारून चारही जणांना मुक्त केले. २००८ पासून प्रामुख्याने जगभरात या आफिया सिद्दिकीबद्दल चर्चा होत आहे. पाकिस्तानातील सर्व राजकीय पक्ष, एकमेकांशी असलेले मतभेद विसरून, अमेरिकेने आफिया सिद्दिकीला मुक्त करावे, अशी मागणी करत आहेत. अल काइदा आणि इस्लामिक स्टेट (आयएस) सारख्या दहशतवादी संघटनादेखील आफियाला सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत. आफिया सिद्दिकी ही कट्टर दहशतवादी असून अमेरिकेच्या न्यायालयाने तिला ८६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.

आफिया टेक्सासमधल्याच तुरुंगात आहे. काही वर्षांपूर्वी अमेरिकेतल्या काही पाकिस्तानी लोकांनी ‘फ्री डॉ. आफिया मूव्हमेन्ट’ सुरू केली आणि तिला सोडवण्यासाठी तेदेखील प्रयत्न करत आहेत. आफियाला सोडवण्यासाठी चौघा निरपराधांना ओलीस ठेवण्याच्या घटनेचा मात्र या ‘मूव्हमेन्ट’ने निषेध केला आहे. अमेरिकेतल्या एमआयटी आणि बोस्टन येथील ब्रेन्डिस युनिव्हर्सिटीतून आफियाने उच्चशिक्षण घेतले आहे. तीन मुलांची आई असलेली आफिया १९९१ ते २००२ पर्यंत अमेरिकेत होती. आफियाचे वडील मोहम्मद सिद्दिकी कराची येथे डॉक्टर होते. १९९५ मध्ये कराचीच्या डॉ. अमजद खानशी आफियाचा निकाह झाला. अमेरिकेत असतानाच तिच्यावर धार्मिक कट्टरवाद आणि दहशतवादाचा प्रभाव पडला. २००३ मध्ये ती आपल्या मुलांसह पाकिस्तानात परत आली. मायदेशी परतल्यावर तिने  नवऱ्याला तलाक दिला आणि अम्मार अल-बलुचीशी निकाह केला. हा बलुची म्हणजे, खालिद शेख मोहम्मद या (९/११ चा एक सूत्रधार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या) दहशतवाद्याचा जवळचा नातेवाईक. ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’च्या पत्रकार डेनियल पर्लच्या हत्येतदेखील हा खालिद शेख होता. खालिदला २००३ मध्ये सीआयए आणि आयएसआयने संयुक्त कारवाईत  रावर्ळंपडीतून पकडले आणि त्यानंतर आफिया फारशी कुठेही दिसत नव्हती. खालिद आता ‘ग्वान्टानामो बे’ या कुप्रसिद्ध तुरुंगात आहे.

२००८ मध्ये आफिया अचानक अफगाणिस्तानात दिसली. आत्मघाती हल्ल्याचा ती प्रयत्न करत असल्याचे लक्षात येताच अफगाण पोलिसांनी तिला गझनी प्रांतातून ताब्यात घेतले. रासायनिक शस्त्रे आणि ‘डर्टी बॉम्ब’ कसे बनवायचे याची माहिती देणारी काही महत्त्वाची कागदपत्रे  तिच्याकडून मिळाली होती. त्यानंतर अमेरिकेच्या एफबीआय आणि लष्कराचे जवान तिची चौकशी करत असताना अचानक तिने एका जवानाची एम-फोर रायफल हिसकावून घेतली आणि अमेरिकन सैनिकांवर गोळ्या चालवल्या. हे करताना ती ‘अमेरिकेचा सत्यानाश होवो’ अशा घोषणादेखील देत होती. नंतर आफियाला अमेरिकेत नेण्यात आले. अमेरिकन लष्कराच्या जवानांची हत्या करण्याच्या प्रयत्नाबद्दल आफियाला अमेरिकन न्यायालयाने २०१० मध्ये ८६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली. या निकालाच्या विरोधात पाकिस्तानच्या सगळ्या शहरांमध्ये निदर्शने झाली. त्यात ‘जमात-ए-इस्लामी’ या पाकिस्तानी संघटनेचा पुढाकार होता. तेव्हा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) युसूफ रझा गिलानी होते. त्यांनीही, आफियाला सोडवण्यासाठी पाकिस्तान सरकार सर्व प्रकाराने प्रयत्न करणार असे म्हटले होते. पीपीपी हा उदारमतवादी म्हणून ओळखला जाणारा पक्ष असला तरी गिलानींनीदेखील आफियाच्या बाजूने भूमिका घेतली.

आफियाला पाकिस्तानात मिळत असलेल्या सहानुभूतीबद्दल आश्चर्य वाटता कामा नये. तेथील प्रसारमाध्यमेदेखील त्यासाठी जबाबदार आहेत. आफिया निर्दोष असल्याचे लोकांच्या मनावर बिंबवण्यात माध्यमे यशस्वी झाली आहेत. पंतप्रधान इम्रान खान तर उघडउघड आफिया निर्दोष असल्याचे म्हणतात. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी असताना इम्रान खानने आफियाला मुक्त करण्याची विनंती केली होती. २०१९ च्या जुलै महिन्यात ट्रम्पला भेटल्यानंतर इम्रान खान यांनी, ‘भविष्यात शकील आफ्रिदीच्या बदल्यात अमेरिका आफियाला सोडू शकते’ असे पत्रकारांना सांगितले होते. शकील आफ्रिदीने अमेरिकेला ओसामा बिन लादेन पाकिस्तानच्या आबोटाबाद शहरात कुठे राहतो, याची नेमकी माहिती दिली होती. त्या माहितीच्या आधारे २ मे २०११ ला अमेरिकेने हेलिकॉप्टर पाठवून ओसामा बिन लादेन याला ठार मारले. पाकिस्तानने शकील आफ्रिदीला पकडून तुरुंगात ठेवले आहे. अमेरिकेला शकीलला वाचवायचे आहे. कारण त्याने दिलेल्या माहितीमुळे अमेरिकी पथक ओसामाला ठार मारू शकले. अमेरिकेसाठी शकील आफ्रिदी महत्त्वाचा असल्यामुळेच तो अद्याप जिवंत आहे. पाकिस्तानी तुरुंगातदेखील त्याला प्रचंड सुरक्षा देण्यात आली आहे.

अल काइदा आणि आयएससाठीदेखील आफिया महत्त्वाची आहे. आफियाच्या बदल्यात जेम्स फोली नावाच्या पत्रकाराला सोडण्याची तयारी ‘आयएस’ने दाखवली होती. २०१२ मध्ये जेम्सला आयएसने सीरियातून पकडले होते. २०१४ मध्ये आयएसने त्याचा शिरच्छेद केला आणि या प्रकाराचे भयावह ध्वनिचित्रमुद्रण समाजमाध्यमांवर प्रसृत केले. त्यानंतर, आफियाच्या बदल्यात स्टीव्हन सोटलोफ नावाच्या दुसऱ्या पत्रकाराला मुक्त करण्याची तयारी आयएसने दाखवली. २०१४ च्या ऑगस्ट महिन्यात त्याचीदेखील आयएसने हत्या केली. स्टीव्हन याचेदेखील आयएसने सीरियातूनच २०१३ मध्ये अपहरण केले होते. २०१२ मध्ये पाकिस्तानच्या अधिकाऱ्याने अमेरिकेला दिलेल्या एका प्रस्तावात म्हटले होते की, जर अमेरिकेने आफियाला मुक्त करायचे ठरवले तर पाकिस्तान अमेरिकन लष्करातील सार्जंट ब्यूड्राय ऊर्फ ‘बॉ’ बर्गडाल याला हक्कानी नेटवर्कच्या कब्जातून सोडवण्यासाठी मदत करेल.

‘फ्री डॉ. आफिया मूव्हमेन्ट’ आणि पाकिस्तानी-अमेरिकन नागरिकांनी ऑक्टोबर महिन्यात न्यूयॉर्क येथे पाकिस्तानी दूतावासाच्या बाहेर निदर्शने करून पाकिस्तान सरकारला आफियाला सोडवण्यासाठी अधिक प्रयत्न करायची विनंती केली होती. त्यांच्या हातात ‘आफियाला मुक्त करा’ अशा स्वरूपाचे फलक होते. २०१८ मध्ये पाकिस्तानच्या सिनेटने (कायदेमंडळातील, असेम्ब्लीच्या वरचे सभागृह) केलेल्या ठरावात आफियाचा उल्लेख ‘पाकिस्तानची कन्या’ असा करण्यात आला होता आणि तिला सोडवण्यासाठी सरकारने सर्व प्रयत्न करावेत असे विनवण्यात आले होते. २०११ मध्ये ऐमान अल-झवाहिरीकडूनही, ‘यूएसएड’चे वॉरन वँनस्टिन यांच्या बदल्यात आफियाला मुक्त करावे अशी मागणी करण्यात आली होती. ओसामा बिन लादेननंतर मूळ इजिप्तचा हा झवाहिरी अल-काइदाचा प्रमुख आहे.

अब्दीरेहमान शेख मोहम्मद नावाच्या मूळ सोमालियन असलेल्या दहशतवाद्यानेही, टेक्सासच्या तुरुंगावर हल्ला करून आफियाला सोडविण्याची योजना आखली होती, पण त्यापूर्वीच त्याला पकडण्यात आले आणि २०१८ मध्ये त्याला अमेरिकन न्यायालयाने २२ वर्षांची शिक्षा दिली. शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण त्याने सीरियात घेतले होते. आफियाला तुरुंगातून पळवून नेण्याचे बऱ्याच दहशतवाद्यांनी वेगवेगळे प्रयत्न केले. त्यातले बरेच आधी पकडले गेले, तर काही मारले गेले.

या सगळ्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, आफियाला सोडवण्यासाठी पाकिस्तान सरकार, दहशतवादी संघटना आणि पाकिस्तानच्या समाजातला एक वर्ग सक्रिय आहे. त्यातूनच आफियाचे महत्त्व स्पष्ट होते. शकील आफ्रिदीपासून जेम्स फोली ते सार्जंट बॉ बर्गडालला आफियाच्या बदल्यात सोडायला पाकिस्तान सरकार आणि दहशतवादी तयार होते. शकील आफ्रिदीच्या बदल्यात अमेरिका आफियाला मुक्त करेल, असा विचार पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान करू शकतात हेही दिसले आहे.

९/११ आणि त्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानात अल-काइदा व तालिबानच्या दहशतवाद्यांवर आणि त्यांच्या प्रभावाखाली असलेल्या भागात  केलेल्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात अमेरिकाविरोधी वातावरण निर्माण झाले आहे. हे वातावरण फैलावून त्याचा राजकीय फायदा घेण्यात जमात-ए-इस्लामी, इम्रान खान यांचा पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) यांसारख्या पक्षांचा मोठा वाटा होता. त्या अमेरिकाविरोधी वातावरणामुळे आफियाला सहानुभूती मिळत राहिली. आफियाबद्दल लोकांमध्ये निर्माण होत असलेल्या सहानुभूतीचा फायदा घेण्याची पाकिस्तान सरकार व विविध राजकीय पक्षांनी संधी सोडली नाही. या खटाटोपाला माध्यमांनी खतपाणीच घातले.  आफिया दहशतवादी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही तिचा बचाव करण्यासाठी पाकिस्तान सरकार पुढे येते, ही सर्वात शोचनीय गोष्ट आहे.

jatindesai123@gmail.com

Story img Loader