डॉ. जयदेव पंचवाघ
मणक्यांच्या झिजेमुळे होणारा विकार दुर्लक्षामुळे विकोपाला गेल्यास उपचारांचा उपयोग किती, याबद्दल चित्रलिपी काय सांगते?
एडविन स्मिथ हा अमेरिकी पुरातत्त्वज्ञ इजिप्तच्या प्राचीन संस्कृतीच्या अभ्यासातील एक विद्वान. १८६२ साली त्याच्या हाती एक अमूल्य दस्तऐवज पडला. इजिप्तमधील लक्सोर या गावात पुरातन वस्तूंच्या शोधार्थ फिरताना मुस्तफा आगा नावाच्या व्यापाऱ्याकडे कागदाची एक भली मोठी गुंडाळी दिसली. जवळपास १६ फूट लांब असा हा दस्तऐवज. त्यावर खूप मोठा आणि विविध भागांमध्ये विभागलेला मजकूर होता. या लांब कागदाच्या दोन्ही बाजूला तो चित्रलिपीत (हायरोग्लिफ) काळया आणि तांबडय़ा शाईने लिहिलेला होता.
प्राचीन इजिप्तमध्ये वापरल्या जाणाऱ्या या चित्रलिपीमधल्या प्रत्येक चित्राचा एक विशिष्ट अर्थ होता. यात पक्षी, साप, डोळा, गिधाड, करकोचे, बसलेली व्यक्ती.. अशी अनेक प्रकारची चित्रे वापरून माहिती लिहिली जायची. इजिप्तमध्ये नाईल नदीच्या किनाऱ्यावर मुबलक आढळणाऱ्या ‘पपायरस’ वनस्पतीच्या लगद्यापासून त्या काळी कागद बनवला जायचा. असे अनेक छोटे कागद एकमेकांना जोडून एक लांबच्या लांब कागदी पट्टा बनवला जायचा आणि त्यावर विशिष्ट विषयाचा मजकूर लिहून त्या कागदाची गुंडाळी करून ठेवून द्यायचे. हेच ‘इजिप्शियन स्क्रोल’ म्हणून प्रसिद्ध आहेत. प्रत्येक गुंडाळी किंवा स्क्रोल म्हणजे एक पुस्तक असं म्हणायला हरकत नाही. या प्रत्येक स्क्रोलला (गुंडाळीला) ‘पपायरस’ म्हटलं जातं. (ज्या वनस्पतीपासून हा कागद बनवायचे तेच नाव ‘पुस्तक’ या अर्थीसुद्धा वापरलं जायचं.)
१८२२ साली पुरातत्त्वज्ञ या चित्रलिपीचा अर्थ उलगडण्यात प्रथमच यशस्वी झाले. त्यामुळे हे सर्व स्क्रोल वाचणं शक्य झालं. योगायोगाने हे एडविन स्मिथचं जन्मवर्षसुद्धा होतं. तो ‘पपायरस’ची भेंडोळी भरभर वाचण्यात तरबेज! लक्सोरमधल्या व्यापाऱ्याकडील हा स्क्रोल बघताना एका क्षणात त्याचं महत्त्व स्मिथच्या लक्षात आलं.
‘द सीक्रेट बुक ऑफ फिजिशियन’ या नावाने पाश्चात्त्य संशोधकांना माहीत असलेला; पण तोवर न सापडलेला हा स्क्रोल होता. स्मिथने तो तात्काळ विकत घेतला. हा स्क्रोल आजपासून साधारण ४५०० ते ५००० वर्षांपूर्वी लिहिलेला असावा असं अनुमान आहे. महत्त्वाचं म्हणजे यात ‘इमहोटेप’ या इजिप्शियन डॉक्टरनं विविध आजारांविषयी बऱ्यापैकी शास्त्रशुद्ध पद्धतीने लिहिलेलं आहे. ‘प्राचीन इजिप्तमध्ये फक्त मंत्र आणि जादूटोण्याने आजारांवर उपचार केले जात,’ असं तोवर मानलं जायचं. हे बहुतांशी जरी खरं असलं तरी हा स्क्रोल मात्र निराळा होता.
यात विशेषकरून युद्धामध्ये विविध अवयवांना इजा झाल्यावर उपचार कसे करावेत यावर विवेचन होतं. यात डोक्यापासून सुरू करून पायापर्यंत विविध अवयवांच्या इजांबद्दल एक एक केस घेऊन लिहिलं आहे. यात अगदी आजच्या न्यूरोसर्जरीमध्ये येणाऱ्या इजांबद्दलसुद्धा उल्लेख आहेत. कवटीला फ्रॅक्चर होऊन त्यातून रक्त व मेंदू बाहेर येत असलेल्या केसेस, मानेच्या, पाठीच्या व कमरेच्या मणक्याच्या इजा, महत्त्वाच्या नसांना झालेल्या इजा वगैरेंचा समावेश आहे. लेखकाने या इजांचं वर्गीकरण तीन प्रकारांत केलेलं दिसतं : (१) ‘मी या इजेवर बरं करण्याच्या उद्देशाने उपचार करेन’, (२) ‘मी या इजेवर उपचार करण्याचा प्रयत्न करेन’, (३) ‘या इजांवर उपचार करून काहीही उपयोग होणार नाही’ अशा इजा. इतके स्वच्छ विचार आजच्या युगातही अभावानेच दिसतात.
‘मानेच्या मणक्याला इजा होऊन हातापायातील ताकद अर्धवट गेली असेल तर उपचार करण्याचा प्रयत्न करावा, पण ही शक्ती पूर्णच गेली असेल तर उपचार करून उपयोग नाही’ असं इतक्या प्राचीन काळी त्यानं नमूद करून ठेवलं आहे. हे तत्त्व मज्जारज्जूची इजाच नाही- स्पाँडिलोसिससारख्या इतर आजारांनाआजसुद्धा लागू होतं.
आजचा विषय मानेच्या स्पाँडिलोसिससंबंधी असल्यामुळे ही थोडी इतिहासाची झलक.
कवटीच्या तळाला असलेल्या मोठय़ा छिद्रातून मेंदूचा सर्वात खालचा भाग (ब्रेन स्टेम) मानेच्या मणक्यातील पोकळी (कॅनॉल) मध्ये ‘मज्जारज्जू’ (स्पायनल कॉर्ड) म्हणून खाली येतो. तसं बघायला गेलो तर मज्जारज्जू हा मेंदूचाच मानेच्या कण्यात उतरलेला अखंड भाग आहे. ज्याप्रमाणे कवटी नाजूक अशा अवयवाचं म्हणजेच मेंदूचं संरक्षण करते त्याप्रमाणे मानेच्या मणक्याची हाडं या भागातील मज्जारज्जूचं संरक्षण करतात. कवटी व मणक्यातील पोकळी यांत साम्य असं की आतला दाब काही कारणांनी वाढला असता, ते प्रसरण पावू शकत नाहीत.
मानेच्या भागात एकूण सात मणके असतात. या मणक्यांमध्ये दैनंदिन जीवनात भरपूर हालचाल होत असते. त्यामुळे या मणक्यांमधील डिस्कवर आणि सांध्यांवर कायमच ताण पडत असतो. त्यामुळे स्पाँडिलोसिसची प्रक्रियासुद्धा या भागात जास्त लवकर व तीव्र होते. स्पाँडिलोसिस ही एक सर्वसाधारणपणे दिसणारी (कॉमन) प्रक्रिया आहे. हा शब्द बहुतेकांनी ऐकलेला असतो पण त्याची निश्चित माहिती नसते. आणि म्हणूनच हे नेमकं काय प्रकरण आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे असं मला वाटतं. हा शब्द ग्रीक स्पाँडिलस- म्हणजे ‘मणका’ आणि ओसिस – म्हणजे ‘विशिष्ट स्थिती’ यांवरून आलेला आहे. साध्या शब्दात मणक्याच्या ‘विशिष्ट स्थिती’ला ‘स्पाँडिलोसिस’ असं नाव आहे. ‘कोणती विशिष्ट स्थिती?’ हे मात्र या शब्दातून व्यक्त होत नाही.
अगदी साध्या शब्दात सांगायचं म्हणजे वयानुसार मणक्यामध्ये बदल (झीज) होण्याची प्रक्रिया म्हणजे स्पाँडिलोसिस. दोन मणक्यांमधील डिस्क ही कशी ‘शॉक अॅब्सॉर्बर आणि बॉल बेअिरग’चं कार्य करत असते हे आपण मागे पाहिलं. डिस्कच्या मध्यभागी जेलीप्रमाणे मऊ असणाऱ्या भागात ( न्यूक्लिअस) पाण्याचं प्रमाण अत्याधिक असतं. वयानुसार जशी डिस्कची झीज सुरू होते तसं हे पाण्याचं प्रमाण घटायला लागतं. डिस्कची उंची त्यामुळे कमी होते आणि बाजूची घट्ट वीण म्हणजेच ‘अॅन्यूलस’ ढिलं पडू लागतं. अर्थात त्यामुळे दोन मणके एकमेकांच्या जवळ येऊ लागतात. त्यांच्यातील समतोल गडबडून त्यांच्यात अतिरिक्त हालचाल होऊ लागते. याचे दोन परिणाम होतात.
पहिला म्हणजे आपल्या शरीराला ही जाणीव होते की या भागात काही तरी गडबड आहे, अस्थिरता आहे. आपल्या शरीराचा एक गुणधर्म असा आहे की हाडांच्या किंवा सांध्यांच्या संरचनेत कुठेही अस्थिरता जाणवली तर तिथं जास्त हालचाल न होऊ देण्याचे उपाय योजले जातात (उदा. हाडाला फ्रॅक्चर झाल्यास त्या ठिकाणी शरीर अतिरिक्त कॅल्शियम पाठवून फ्रॅक्चर भरून काढतं). त्यामुळे मणक्यातील अस्थिर वाटणाऱ्या ठिकाणी शरीर जास्तीत जास्त कॅल्शियम साचवून किंवा नवीन हाडं तयार करून तिथली अस्थिरता कमी करण्याचा प्रयत्न करतं. ही हाडं डिस्कच्या मागच्या भागात (आणि काही प्रमाणात पुढच्यासुद्धा) विशेषकरून जमा होतात. हळूहळू ती टोकदार चोचीप्रमाणे वाढतात.
दुसरा म्हणजे अशा प्रकारे साचत जाणाऱ्या कॅल्शियमची आणि हाडांची टोकं दोन मणक्यांमध्ये मागे असलेल्या सांध्यांमध्ये (फॅसेट जॉइंट)सुद्धा वाढत जातात. त्याचबरोबर मणक्याच्या आजुबाजूला असणाऱ्या आणि पर्यायाने मज्जारज्जूच्या सान्निध्यात येणाऱ्या उतिबंधांमध्येसुद्धा अधिकाधिक कॅल्शिअम साचत जातं. या सर्व प्रक्रियेला मिळून ‘स्पाँडिलोसिस’ हा शब्द आहे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की हा आजार नसून वयपरत्वे मणक्याची झीज होण्याचा परिणाम आहे. मात्र काही व्यक्तींमध्ये ही प्रक्रिया अधिक झपाटय़ाने होत जाते. याचं कारण त्या व्यक्तींच्या जनुकीय गुणधर्मामध्ये दडलेलं आहे. दैनंदिन जीवनात होणाऱ्या मानेच्या हलचाली या प्रक्रियेच्या आगीत तेल ओततात. स्पाँडिलोसिसच्या वाढत जाणाऱ्या प्रक्रियेमुळे मानेच्या, खांद्याच्या स्नायूंवरही ताण येऊन ते आखडतात. कडक होतात. स्पाँडिलोसिसची प्रक्रिया फार वाढत न जाता बेताचीच राहिली तर मणक्याच्या आतल्या मज्जारज्जूवर व नसांवर दाब येत नाही.
तसं पाहिलं तर वयाच्या पंचविशीनंतर मणक्याची थोडी थोडी झीज सुरू होते. त्यामुळे साठीनंतर मणक्याचा ‘एमआरआय’ केल्यास, जवळपास सर्वानाच कमी-जास्त प्रमाणात स्पाँडिलोसिस असलेला दिसेल. यापैकी बहुसंख्य लोकांना फक्त काही प्रमाणात मानदुखी किंवा मान अवघडणे.. इतपतच त्रास होतो.
‘मानेच्या स्पाँडिलोसिसमुळे चक्कर येते किंवा व्हरटायगो होतो’ असा समज खूपच प्रचलित असलेला दिसतो. तो बरोबर नाही. मानेच्या स्पाँडिलोसिसमध्ये अगदी म्हणजे अगदीच क्वचित हे घडू शकतं आणि तेही स्पाँडिलोसिसच्या अतिप्रगत अवस्थेत. चालताना पायांतला समतोल किंवा बॅलन्स जाण्याची भावना मात्र स्पाँडिलोसिसमध्ये बऱ्याचदा होते; ती मात्र वेगळी.
ज्या लोकांमध्ये स्पाँडिलोसिसची प्रक्रिया जास्त प्रमाणात होते आणि त्यामुळे मज्जारज्जू व नसांवर दाब येतो, त्यांनी मात्र वेळेत उपचार घेणं गरजेचं आहे. याची सुरुवातीची लक्षणं काय आणि त्यावरल्या उपायांचा शोध कसा लागला हा पुढच्या लेखाचा विषय असेल. ही सुरुवातीची लक्षणं नीट समजून घेणं गरजेचं आहे.. कारण, ‘आजार अत्यंत वाढलेल्या स्थितीत हा दाब काढून म्हणावा तसा उपयोग होत नाही.’
हेच ४५०० वर्षांपूर्वी एडविन स्मिथच्या ‘पपायरस’मध्येही म्हटलं आहे!
(लेखक मेंदू व मणक्याचे शस्त्रक्रियातज्ज्ञ आहेत. brainandspinesurgery60@gmail.com