– अतुल सुलाखे  jayjagat24@gmail.com

‘..गीता हा ग्रंथ सर्वसाधारण व्यावहारिक लोकांसाठी आहे, ही लोकमान्य टिळकांची भूमिका मी अक्षरश: खरी मानतो. भगवद्गीता ही तमाम दुनियेसाठी आहे. परमार्थातील सर्व साधन प्रत्येक व्यावहारिक माणसासाठी आहे. आपला व्यवहार शुद्ध व निर्मळ होऊन मनाचे समाधान व शांती कशी लाभावी हे शिकविणारा परमार्थ आहे. व्यवहार शुद्ध कसा करावा हे शिकविण्यासाठी गीता आहे. जेथे तुम्ही व्यवहार करीत आहात तेथे गीता येते. परंतु तेथे ती तुम्हाला ठेवू मात्र इच्छित नाही. तुमचा हात धरून तुम्हाला शेवटच्या मुक्कामावर ती घेऊन जाईल..’ – गीता प्रवचने, अध्याय ६.

विनोबांच्या चिंतनात केंद्रस्थानी कोण आहे तर जीवन आणि तत्त्वज्ञान. प्राज्ञपाठशाळा ते भूदान यज्ञ हा पाच दशकांचा प्रवास याची साक्ष देतो.

प्राज्ञपाठशाळेत अध्ययन करत असताना सहाध्यायींना गीतेचे काही अध्याय त्यांनी शिकवले. व्यायाम, लोकांचे धान्य दळून देणे, आणि भटकंती या पायावर हे अध्ययन आणि अध्यापन झाले. तेव्हा विनोबा गीतेवर जाहीर व्याख्यानेही देत.

पुढे कस्तुरबांना आणि आश्रमीय सहकाऱ्यांना ते गीता शिकवू लागले. तरुणांचा हा समूह गुजराती होता. आजची गीता प्रवचने प्रसिद्ध होण्यापूर्वी त्यांनी एक महिनाभर गीतेवर तशीच प्रवचने दिली होती. रावसाहेब पटवर्धनांनी ती ऐकलीही होती. ती टिपून घेण्याचे आणि त्यांचे साने गुरुजींनी केले तसे शब्दांकन करण्याचे काम मात्र त्यांच्याकडून झाले नाही. पुढे धुळय़ाच्या तुरुंगवासात, सहकाऱ्यांच्या आणि मित्रांच्या विनंतीनुसार दर रविवारी ते गीतेवर प्रवचन देऊ लागले. तुरुंगात महिला कैदीही होत्या. विनोबा ‘पुरुष’ असल्याने त्यांना महिलांच्या कक्षात प्रवेश नव्हता. ही प्रवचने आम्हालाही ऐकायची आहेत, असा महिलांनी हट्ट धरल्याने, तुरुंगाचे नियम बदलले. सर्व स्त्री-पुरुष कैद्यांना, या प्रवचनांचा लाभ घेता येऊ लागला. खुद्द तुरुंगाधिकारी साहेबांनीही आपल्या पत्नीसह ही व्याखाने ऐकली.

हे चिंतन मोजक्या श्रोत्यांपर्यंत राहू नये याची खुद्द ईश्वरानेच काळजी घेतली. एरवी साने गुरुजींना ही प्रवचने टिपून घेण्याची प्रेरणा झाली नसती. त्यांना ‘सच्चिदानंदबाबा’ असे संबोधन विनोबांनीच दिले. या संबोधनातून आपण नकळत स्वत:चेही स्थान सांगतो आहोत हे तेव्हा विनोबांच्या डोक्यातही नसेल.

विनोबांचे गीतेवरील अध्ययन असे प्रत्यक्ष जगण्याशी जोडले होते. या प्रवचनांना श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. कोणत्याही वाङ्मयाचे श्रोते आणि वाचक कसे स्वागत करतात यावर त्याचे मोठपण ठरते.

गीता प्रवचनांसाठी तुरुंगाचे नियम मोडावे लागणे आणि फाशीची शिक्षा झालेल्या कैद्यांनी विनोबांना दक्षिणा देत गीताईची प्रत विकत घेणे ही दोन उदाहरणे पुरेशी आहेत.

विनोबांनी आयुष्यभर संवाद साधताना सोपी भाषा वापरली एवढेच नव्हे तर आधुनिक अभ्यासाची बैठक नाकारली याचे कारण त्यांना सामान्य भारतीयांसोबत जगायचे होते. त्यांच्याशी संवाद साधायचा होता. त्यांच्या गीतेवरील प्रमुख कृतींखेरीज शिल्लक राहिलेल्या चिंतनाचे संकलन ‘गीता जीवनाचा ग्रंथ’ या नावाने उपलब्ध आहे.

जगण्याशी भिडणारे प्रश्न घेऊन आपले चिंतन मांडायचे आणि त्या अनुषंगाने तत्त्वज्ञानाचा विकास करायचा हे विनोबांचे योगदान सर्वस्वी निराळे आहे. जीवन आणि ग्रंथ असा हा मेळ आहे.

Story img Loader